Thursday, 18 June 2020



नमस्कार
 
मी मारुती शेरकर.
 
मुंबई महानगरपालिका संचालित सायन मनपा माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे.
 
आपल्या क्रमिक पुस्तकांमधील राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि संविधानाची उद्देशिका केवळ त्या कागदावरच राहिली आहे. रोजच्या परिपाठात त्यांचं केवळ यांत्रिक उच्चारण केलं जातं. कागदावरचे हे शब्द खरंतर ही मूल्ये जर संस्कारक्षम काळजांवर उमटतील तर आणि तरच विविधतेनं नटलेल्या या देशाची एकता अभंग राहिल. इथलं एकत्व, भारतीयत्व टिकून राहिल. आम्ही यथाशक्ती आमची शाळा संविधान साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्देशिकेतील सांविधानिक मूल्यांची किमान तोंडओळख आमच्या मुलांना झालेली आहे. परिपाठाद्वारे, वेगवेगळ्या स्पर्धांद्वारे संविधानाधारित लोकशाहीची बाराखडी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या त्या बालमनांवर रुजवता येणं शक्य आहे. त्यायोगे शाळा संविधान साक्षर होऊ शकते. सुजाण नागरिकत्त्वाची मुळाक्षरे इथूनच आपल्याला गिरवावी लागतील. त्यासाठी शिक्षकांना संविधान साक्षरतेचे प्रशिक्षण द्यावे लागेल. संविधानातील कलमे, अनुच्छेद, अधिकार, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे ह्यांचा अभ्यास यथावकाश करता येईल. एलएलबीच्या अभ्यासक्रमात भारतीय संविधान हा एक विषय आहे. परंतु सर्वचजण कायदेपंडीत होत नाहीत. प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीयत्वाची आणि नागरिकत्वाची किमान पात्रता कळणे अत्यंत गरजेचं आहे. इयत्ता बारावीचा विद्यार्थी नागरिकत्त्वाच्या उंबरठ्यावर उभा असतो. या देशाचा तो नवमतदार बनणार असतो. या नव्या युगाच्या शिलेदाराच्या हाती या नवभारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे. म्हणून इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात संविधान आणि किमान त्यातील मूल्यांवर आधारित ५० मार्कांचा एक पेपर असावा.
 
केवळ लिहिता वाचता येण्याने औपचारिक साक्षरता येऊ शकते. पण सुसंस्कृतपणा येण्यासाठी, माणुसकी रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक काही संस्कार करावे लागतील. शिक्षणातून चांगले परिक्षार्थी बनून ऐहिक सुखाचे लाभार्थी बनता येईल पण इतरांविषयी आपुलकी, कणव, तळमळ, कळकळ, सेवा, प्रेम, करूणा ऑनलाईन डाऊनलोड करता येत नाही. माणुसकीची आच लागल्याशिवाय या सो कॉल्ड डिग्री होल्डरला सर्वार्थाने 'माणूस' म्हणता येणार नाही. त्याचे शिक्षण झाले असेही म्हणता येणार नाही.
 
आत्मभान, समाजभान, जग जगणं, आपलं भवताल, हे राज्यसकट कसं चालवलं जातं. ह्याचं मुलभूत ज्ञान ह्या सांविधानिक मूल्यांद्वारा मिळू शकतं. एक मत एक मूल्य असा मतदानाचा अधिकार संविधानाने आपल्याला बहाल केलेला आहे. परंतु स्वातंत्र्य मिळून ७० वर्षानंतरही इथला मतदार राजा ह्या लोकशाहीचा लाभार्थी कधीकधी आपलं अमूल्य मत विकताना दिसतो. हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. व्यक्तीला मत असावं, त्याला भूमिका घेता यावी, त्यावर ठाम राहता यावं. तसेच लोकशाहीत विरोधी मतांचा आदर करण्याची सहिष्णू वृत्ती असावी हे सारे आदर्श प्रत्यक्षात साकारण्यासाठी संविधानाचे धडे बालवयातच देणे आवश्यक आहे.
 
माणसाला माणूस म्हणून आत्मसन्मानाने जगायला शिकवणारा जीवनग्रंथ म्हणजे संविधान.
भारतीय नागरिकाच्या सर्वांगिण मुक्तीचा लिखित ग्रंथ म्हणजे संविधान.
लाखो करोडो भारतीयांच्या आशा आकांक्षाचे प्रतीक आणि स्फुर्तिस्थान म्हणजे आपले संविधान.
सामाजिक विषमतेने गांजलेल्या या देशवासियांमध्ये समताधिष्टित समाजनिर्मितीचा हुंकार म्हणजे संविधान.
प्रगतिक विज्ञाननिष्ठ व विवेकशील समाज उभारण्याची सामुहिक प्रतिज्ञा, सामुहिक निर्धार म्हणजे संविधान.
एकूणच काय तर आपल्या अस्तित्वाचे विधान म्हणजे आपले संविधान. 
 
अशा भारतीय संविधानाचा विचार कुठून युरोप, अमेरिकेतून आलेला नाही. ह्या जमिनीतच ते निपजलेले आहे. इथला बळीराजा, गौतम बुद्ध, महावीर, गुरुनानक, कबीर, तुकोबा, ज्ञानोबा, छत्रपती शिवराय ह्या सर्वांची महान अशी विचार परंपरा संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये, अनुच्छेदामध्ये पानोपानी आपल्याला जाणवते. भारतभूमीतल्या संतांचं, पंथांचं, महामानवांच्या विचारांचं प्रतिबिंब आपल्या संविधानात कसे उमटले आहे ह्याची मीमांसा करत, विवेचन करत, लोकशाहीर संभाजी भगत राष्ट्र सेवा दलाचे अल्लाउद्दीन शेख यांच्याशी चर्चा करत मिशन माणुसकीच्या वतीने 'भारतीयत्वाची abcd' ही छोटीशी पुस्तिका मी लिहिली आहे. सन्माननीय आमदार कपिल पाटील यांच्या प्रेरणेने ही पुस्तिका तत्कालीन शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. उद्देशिकेतील शब्दाशब्दाचा नव्हे तर प्रत्येक मूल्याचा सहज आणि सुलभ अन्वयार्थ लावण्याचा मी त्याद्वारे प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना नक्कीच ही पुस्तिका उपयुक्त ठरेल.
 
संविधान निर्मितीची प्रक्रिया :
शेकडो बॅरिस्टर्स, त्यांची प्रदीर्घ चर्चा, त्यांच्यातल्या मतभेदांचं सौंदर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं अतुलनीय योगदान, इ..
 
जात, धर्म, भाषा, वंश, प्रांत या भेदांपालिकडे जाऊन आपण भारतीय व्हावं, एनलायटेड म्हणजे प्रबुद्ध आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी, आपल्या प्रजासत्ताक संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आपल्यासमोर संविधानाशिवाय दुसरा पर्याय नाही.
 
फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकारांच्या स्वप्नांचा अर्क असलेलं संविधान मनामनात रुजवण्यासाठी दोन मागण्याः
 
१) शिक्षकांना संविधान साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावं.
२) इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात संविधान आणि किमान त्यातील मूल्यांवर आधारित ५० मार्कांचा एक पेपर असावा..
 
संविधान प्रचारक आणि मिशन माणुसकीच्या संयुक्त विद्यमाने संविधानाच्या उद्देशिकेतील प्रत्येक मूल्यावर संविधान अभ्यासकांची आत्तापर्यंत पंधरा व्याख्याने झालेली आहेत. नामवंत साहित्यिक कवी विचारवंत आणि समाजकारणातील धुरीणांचे यासंदर्भातले व्हिडिओज आपण शेअर करत आहोत. याबाबतीतला आजचा पहिला व्हिडिओ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांचा आहे. तुम्ही हे सारे व्हिडिओज ऐकावेत. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.  काळाची गरज असलेल्या या अभियानामध्ये सक्रिय सहभागी व्हावे. ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद..

 व्हिडिओ : https://youtu.be/mF4DKQSkmDw

 
मारुती शेरकर.


Saturday, 6 June 2020

संविधान संवर्धन आणि साक्षरता अभियानांतर्गत कार्यशाळा मार्गदर्शन

२१ ऑक्टोबर २०१८

मी मारुती शेरकर,
मु. तराळवाडी,
ता. पारनेर,
जि. अहमदनगर.

मी हे अशासाठी सांगतो की हा मारुती शेरकर हे प्रातिनिधीक स्वरूप आहे. तुम्ही पण एक मारुती शेरकर आहात. तुमचंही असंच एक कुठलंतरी गाव आहे. कुठल्यातरी कानाकोपऱ्यातून आपण सगळीजण इथं आलेलो आहोत. व्यवस्थिरित्या आब आणि रुबाब ठेवून मी तुमच्यासमोर उभा आहे. हा जो प्रवास आहे तो अतिशय विस्मयकारी आहे. ज्या आईवडिलांनी जन्म दिला ते ठार निरक्षर होते. पण ते माझं विद्यापीठ आहे. कारण त्यांनी मला किंवा आपल्या सर्वांना दिलेली शिकवण. त्यानंतर या पुरोगामी महाराष्ट्रातले जे महामानव आहेत. ज्यांनी आपल्या योगदानातून ह्या महाराष्ट्राला एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. ते ही आपले आईबाबा आहेत. तेही आपले पालक आहेत. त्यांनी आपल्याला सर्वांना इथपर्यंत आणलेलं आहे. पण आजही आपले लाखो बांधव-भगिनी वंचित आहेत. त्यांना या संविधानाचे ते फायदे किंवा फळं मिळालेली नाहीत. ते आजही या लोकशाहीचे लाभार्थी नाहीत. लोकशाहीचे लाभार्थी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. म्हणून ही जी लोकशाही आहे त्याचा जो मुलभूत गाभा आहे तो म्हणजे आपले संविधान. ती सांविधानिक मुल्ये काय आहेत याचा विसर पडून कसा चालेलआपल्याला त्या संविधानिक मूल्यांचा आधी अभ्यास आणि नंतर अंगीकार करून आपल्याला अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे आहे. त्यासाठीच तर हे अभ्यास शिबिर आयोजित केलेले आहे..

एक अमेरिकन इतिहासकार हॅले नावाचे गृहस्थत्यांनी असं म्हटलंय की, “Coming together is beginning, keeping together is progress & working together is success.” हे जे successively success आहे हे केवळ आपल्या एकत्र येण्यातून होणार आहे. कारण ते एकत्वते भारतीयत्व काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपला जो एक certain comfort zone आहे. comfort zone म्हणजे की एक नाईन टू फाइव जॉब असतो. हॅन्ड टू माऊथ आपलं सगळं मॉर्निंग आणि स्पेंडींग सगळं आलबेल चाललेलं आहे. मग हे जे काही वेड आहेअसं म्हणतात It is wise to be mad for some purpose या जगाला शहाणं जर कोणी केलं असेल नातर ते ह्या वेड्या लोकांनीच. एक certain madness त्यांच्याकडे होता. certain insight त्यांच्याकडे होती. sight सगळ्यांकडं आहे what about insight?. एक Mindset त्यांच्याकडे होतं. एक dream होतं आणि ती एक ideology होती. ते स्वप्नंत्याची फळं चाखायला किंवा ते बघायलाही ते नाहीत. पण त्यांनी हे जे काही वेड होतं. म्हणजे तुकोबा असतीलशिवबा असतीलफुले-आंबेडकरशाहू महाराज असतील. त्या त्या लोकांनी त्या त्या काळात बघितलेलं ते एक वेड होतं. मग संविधान म्हणजे नेमकं कायतर या सगळ्या आशा आकांक्षाचा अर्क आहेनवनीत आहे. आपल्या सगळ्यांच्या स्वप्नांचं ते प्रतिक आहे. त्यामुळे हे जे काही आपण आज या सभागृहामध्ये छानअगदी सुटबुट जरी नसला तरी ज्याला आपण एक living standard म्हणतो ते आपण maintain करत आहोत. म्हणून आपल्याला हे social किंवा थोडीशी आपली commitment to society, pay back to society. म्हणजे आपण ऋणात असणं. कशाकशाच्या ऋणात असायला हवंअसं आहे की, gratitude is a memory of heart आपल्या हृदयाची आपल्या काळजाची ती भाषा असते. Thanks म्हणणं. मग तो निसर्ग असेलआपली जडणघडण करणारा.

हे संविधान समजून घेण्यापूर्वी आपल्याला काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत ज्याला आपण समाजभान म्हणतो. समाजभान येण्यासाठी आधी आत्मभान यावं लागतं. आपण सगळे भानावर आहोत म्हणून इथं पोहोचलो आहोत. भान येणंहे आत्मभान म्हणजे कायते आत्मभान येण्यासाठी आधी आपल्याला आत्मसन्मान, self respect की जसं संविधानामध्ये dignity of an individuality म्हटलेलं आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा. पण तत्पूर्वी मला मी स्वतः प्रतिष्ठीत समजतोय का? Education gives us knowledge, knowledge gives us confidence & confidence gives us respect या वाटेवर मी आहे काफुल्यांनी जे म्हटलं कीत्या एका अविद्येने सर्व अनर्थ केलेले आहेत. बलुतंकार दया पवार कोंडवाडा कवितेत असं म्हणतात, “असतो नर्मदेचा गोटा तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या.” मला माणूसपणाची जाणीव झाली. म्हणजे मला आत्मभान आलं. आत्मसन्मान मिळाला आणि मग मी गावकुसाबाहेर का आहेकिंवा मी का वंचित आहेमी या इंडियामध्ये कधी प्रवेश करता होणार आहेज्या १% लोकांकडे जवळपास ७०% संपत्ती आहे. या भारताच्या स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर. तर मी या भारतातला एक शेवटचा किंवा सामान्य किंवा असा एक फाटका माणूस का आहेआपण तिथून आलेलो आहोत. आपली पहिली पिढी आहेगाव सोडून आपण जगायला आणि चांगलं जगायला. चांगला माणूस अधिक समृद्ध प्रबुद्ध माणूस म्हणून माणसात आलो. तर हा कोणता प्रवास आहेकुठून आणि कसा हा प्रवास सुरु झालातर आपल्याला कुठंतरी जागं व्हायचं आहे. आपल्याला भानावर यायचं आहे. म्हणून हा सगळा खटाटोप आहे. कारण आपण बघतो की एक आत्मस्तुती किंवा आत्मसमर्थनसेल्फ जस्टीफिकेशनमी कसा बरोबर आहे आणि मग नंतर आत्मरंजन म्हणजे स्वतःला खूष ठेवणं. मग त्यातून कुठेतरी एक फॉल्स इमेज तयार होते. त्या फॉल्स इमेजमध्ये आपलं आयुष्य पुढे पुढे जात राहातं. म्हणजे मी फेडरेशनचा चेअरमन आहेमी डायरेक्टर आहेमी मी मी.. त्या मीपणातून मी खराखुरा कोण आहेहे जगहे जगणं हे समजून घेण्यासाठी आपल्याला सांविधानिक मूल्ये जर चांगली लक्षात आली तर नक्कीच आपल्या जीवनाला एक वेगळा अर्थ प्राप्त होईल.

संविधानाकडे जाण्यापूर्वी आणखी एक गोष्ट मी तुम्हाला पालकत्वाची सांगत होतो. जे महापुरुष आहेत. म्हणजे देव आपल्या श्रद्धा देतात. संविधानामध्ये उपासनेचं स्वातंत्र्य आहे. त्याहीपेक्षा जेव्हा प्रेरणाम्हणजे certain belief विश्वास ह्या सगळ्या गोष्टी संविधानाने आपल्याला बहाल केलेल्या आहेत. मला कोणतंही विवादात्मक विधान करायचं नाही. पण जेव्हा आपल्या आजूबाजूला काय घडतंयजेव्हा समाजभान या विषयावर आपण बोलतोय तेव्हा उल्लेख केलाच पाहिजे. शबरीमाला मंदिरामध्ये आजही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सलग आठ दिवस तिथं संचारबंदी आहे. आपल्या आयाबहिणी आणि लेकीबाळी नाही जाऊ शकत तिथे. १० ते ५० वयोगटातील या रजस्वल महिलांना इथल्या महिलांनीच अडवलंय. म्हणजे मासिक पाळी अपवित्र आहे हे महिला सांगतायत. म्हणजे त्यांना आत्मसन्मान नाहीए. त्यांना त्यांची ओळख नाही स्वतःचीत्या स्त्रीत्वाची. म्हणून या घटना घडत आहेत. परवा पिंपरी चिंचवडला दसऱ्याच्या आदल्या दिवशी ऐश्वर्या नावाची कांजारभाट समाजातली ती मुलगी नवरात्रात माहेरी आली होती. त्या तेविस वर्षाच्या मुलीने जे काही वर्षा दोन वषापूर्वी लग्न केलंकोर्ट मॅरेज केलं. तेव्हा तिथं योनिसूचिता आणि कौमार्यभंग असे विषय निर्माण झाले. कौमार्य चाचणीला तिने विरोध केला. म्हणून त्या जातपंचायतीने तिला बहिष्कृत केलं. ती परवा माहेरी आली. चालली गरब्याला गेली तिथे. तिथल्या लोकांनी गरबाच बंद करून टाकला. कारण ती बाहेर जात नव्हती. शेवटी ती पोलीस ठाण्यात गेली. म्हणजे सांविधानिक मूल्ये काय आहेतस्त्री-पुरुष समानता म्हणजे काय? equality म्हणजे कायजर आपण संविधानातली ही जी काही मूल्ये आहेत ती जर आपण बघायची म्हटलं तर आपल्याला हे भान येणं फार आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला काय घडत आहेमाझ्या मनामध्ये काय गोंधळ आहे कासंभ्रमावस्था आहे कामघाशी मी माझ्या मित्रासोबत बोलत असताना म्हटलंसॉक्रेटीस एक म्हणायचा की, “I know.. that I don’t know..” हे जग म्हणजे आपल्याला.. मूळात कळतं केव्हाकी आपल्याला ठार कळत नाही हे तरी कळलं पाहिजे नाकाय आहे जगजेव्हा कळत नाही हे आपल्याला कळतं आणि तिथून आपल्याला कळायला सुरूवात होते. आपल्याला खूप समस्या आल्या म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक समस्याअनेक कुतूहल असली पाहिजेत. म्हणून इथं बाबासाहेबांनी जसं म्हटलंय की या जगात दोनच जाती आहेत. एक स्त्री आणि दुसरा पुरुष आणि एकच धर्म आहे तो म्हणजे मानवता. हे काम आपल्याला पुढं न्यायचंय. तर हे आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे आणि मग याच्या मूळाशी जर आपण गेलो तर या महापुरुषांनी आपल्याला जे काय पुरोगामीत्त्व बहाल केलेलं आहे. मग ते ज्ञानोबा तुकोबा असतीलकबीर असतील , चार्वाक असतील ह्या सगळ्या लोकांनी त्या काळात बघितलेल्या स्वप्नांचं हे प्रतीक आहे किंवा आरसा आहे असं समजूया. आता ते हवे होते हे सगळं बघायला. मग एक कडाडती वीज किंवा कळसाध्याय जो बाबासाहेबांच्या रुपानं जे मनाला माणुसकीकडं घेऊन जाणारंशरीराला श्रमाकडं घेऊन जाणारंबुद्धीला सत्याकडं नेणारं अशी जी काही विचार प्रक्रिया.. thought process त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे मूलभूत संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. आपलं जगण्याचं सार त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून संविधान या masses पर्यंत.. आता हे masses म्हणजे कायतर आपण बघतो झेंड्यांचे कलर्स वेगवेगळे आहेत. कुणाच्या हातात आणखी काय दगड पण असू शकतो. कोणाच्या खांद्यावर कायआपल्या महाराष्ट्राचे अजून एक living legend आहेत डॉ. आ. ह. साळुंखे. ते म्हणतात तुमच्या खांद्यावर तुमचंच डोकं आहे कायम्हणजे आपल्या खांद्यावर डोकं कुणाचं आहे हा प्रश्न पडतो. मग कुठेतरी ही शिक्षण व्यवस्था नापास झालेली आहे कायआपल्याला घडवणारी ही संस्कृती नापास झालेली आहे कायआपण कुठे आहोततर हे जे masses आहेत ना त्यांना many asses असं म्हटलं जातं. त्यांना कसं divert करायचंकुठं न्यायचंकाय असतं.. एक नेतृत्त्व असतं. ते एक वेडेपण असतं. त्यांना ते स्वप्नं पडलेलं असतं. मग ते जर विधायक असेलरचनात्मक असेल जसं संविधान आहे. संविधान ही संरचना आपलं जगणं आपल्या समोर मांडतं.. जसं महात्मा गांधी असं म्हणायचेकी तुमचे हेतू शुद्ध असावेत आणि हेतू साध्यतेचे मार्गही तितकेच शुद्ध असावेत. म्हणजे my life is my message म्हणजे इतकं त्यांचं.. सत्याचे प्रयोग किंवा सत्य आणि अहिंसा ती तत्वे जगप्रसिद्ध आहेत. आइन्सटाईन असं म्हणायचेजगामध्ये असा गांधी नावाचा माणूस होऊन गेला असेल यावर पुढच्या पन्नास वर्षांनंतरची पिढी विश्वाससुद्धा ठेवणार नाही. तर हे जे काही वेगवेगळ्या धारेची विचारधारेचे लोक आहेत ज्यांना आपण masses म्हणतो हे raw material आहे. आपल्याला त्याला कुठेतरी एका organizational पातळीवर.. मग त्याच्या काही ideologies आहेत. आपल्याला त्या विषयावर आज बोलायचं नाही. पुन्हा केव्हा तरी त्या विषयावर बोलू आपण. म्हणजे जे काही प्रोग्रॅमपॉलिसीजडिसीप्लीनलिडरशीपअॅक्टीव्हीस्ट या विषयावर आपण नंतर बोलू.

आज आपल्याला या सांविधानिक मूल्ये किंवा ज्या तरतूदी आहेत. कारण आपण सर्वजन या लोकशाहीचे लाभार्थी आहोत. ही Democracy is not an object but it is an instrument, it’s a tool to achieve our objectives. हे कोणते objectives आपल्याला achieve करायचे आहेतआपण सारे भारतीय आहोत. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा प्रत्येकाने म्हणजे.. आपण कधीतरी शाळेत गेलो तेव्हा सुद्धा ती प्रतिज्ञा होती. अलिकडे प्रतिज्ञेनंतर सरनाम्याची त्यात भर टाकलेली आहे. मग हा संविधानाचा जो सरनामा आहेउद्देशिका आहेप्रस्ताविका आहे. म्हणजे तो ट्रेलर आहे. सिनेमा पुढे आहे. म्हणजे आपल्याला कलमं सगळी अभ्यासालीच पाहिजे असे नाही तर ते गरजेनुसार आपण नंतर बघू किंवा ते वैयक्तिक पातळीवर आपल्याला करता येईल. एकदा संविधान का जाणून घ्यायचंका अभ्यासायचंहे एकदा कळलं की ते काम कसं करायचं हा मुद्दा गौण ठरतो. That is methodology. I am talking about some ideology एक mindset. आपल्याला हे का करायचं आहेते जाणून घ्यायचं आहे. मग हा जो भारत विरुद्ध इंडिया. हा स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर भारत विरुद्ध इंडिया आणि ही जी विषमता आहे. सगळ्या बाबतीतली ती जर मिटत नाही. म्हणजे बाबासाहेब तेव्हा संविधान सुपूर्द करताना म्हटले होतेप्रचंड विसंगती आहे इथे आणि या विसंगतीपूर्ण अवस्थेत हे संविधान आपण आपल्यालाच अर्पण करत आहोत. We the people of India म्हणजे आम्ही भारतीय लोक. हे कोणा ईश्वराला किंवा आणखी एखाद्या राष्ट्रपित्याला पण ते अर्पण केलेले नाही. आम्ही भारतीय लोक. आम्ही भारतीय लोक म्हणजे कायतर आपल्याला ती जी ओळख होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. संविधान देशाला देशाप्रती ते अर्पण करत असताना तेव्हा त्यांनी म्हटलं होतं कीविसंगती आहे. Full of contrast आहे. म्हणजे एक विशिष्ट जात काहीतरी गू-घाण डोक्यावर घेऊन मैला वाहते आहे. दुसरे लोक कुठेतरी मॅजिस्ट्रेट आहेत. तर त्याच्या ह्या श्रमाला प्रतिष्ठा काय आहेकाय आहे हेकसली विषमता आहेजर वंचितांना न्याय मिळत नसेल तर कदाचित ते हे संविधान अमान्य करतील. मी जर जिवंत असेल तर मी त्या वंचितांच्या बाजूने असेल. असं डॉ.बाबासाहेब म्हटलेले आहेत. म्हणजे ते संविधान यशस्वी करायचं की नाही हे या सर्व आम्हा भारतीयांवर अवलंबून आहे.

मग या लोकशाहीच्या संदर्भात.. जसं अथेंसमध्ये सॉक्रेटीसने सांगितलं की दोनच जाती होत्या एक गुलाम आणि दुसरा मालक. आपल्याकडेही शेकडो राजे होते आणि राजेशाही होती. सरंजामशाही होती. आजही ती सनातनी वृत्ती आपल्याकडे बर्‍याचजणांच्या डोक्यात आहे. म्हणजे कुठल्यातरी सो कॉल्ड उच्च वर्णात जन्माला आले म्हणून ती सनातनी वृत्ती येते असं नाही. जेव्हा एक ऐहिक सुखंपैसा किंवा इतर काही भौतिक गोष्टी आपल्या पायाशी लोळण घेतात तेव्हा आपण अचानक उडी मारतो वरच्या वर्गामध्येवरच्या वर्णामध्ये. म्हणजे इथं कुठल्या जातीलाधर्माला आपल्याला काही नावं ठेवायची नाहीत. ही बिरादरी पैसे असणारांची म्हणजे श्रीमंतांची आणि दुसरीकडे गरिबांची. तर हा जो काही भेद आहे त्या भेदावर आपल्याला काम करायचंय.

बोलत होतो लोकशाहीवर. जे लिंकनने म्हटलं, For the people, by the people अशी जी काही system आहे. आता हे buy the people असं म्हणायची वेळ आलीय. आजही पुन्हा एकदा आपण असं म्हणूया की एवढ्या वर्षानंतर मतं जर विकली जात असतील. म्हणजे ज्या संविधानानं आपल्याला एक मत एक मूल्य दिलंय. ते मत अक्षरशः विकलं जातं. ठार आडाणी लोक त्यांचं एकवेळ आपण समजू शकतो. त्यांना काय साडी दिलीचोळी दिलीधोतर दिलं. जगण्यासाठी त्यांना ती गरज आहे. त्यांच्या पोटाची गरज आहे. पण जेव्हा शिकलेली लोक.. म्हणून मी म्हटलं शिक्षण व्यवस्था नापास झालेली आहे कायशिकलेली माणसं जर आपलं मत विकत असतीलमत विकणं म्हणजे आत्मा विकणं. स्वतःचं आत्मभान विसरणं. मी विकायला काढलंय स्वतःला. अशी जी काही अवस्था.. मग मला मत नाही. मत म्हणजे opinion.. मला काय वाटतं? What do you mean? What is my opinion? What according to you? मला काहीच वाटत नाहीकुठंतरी आपण अंमलबजावणीमध्ये कमी पडत आहोत.

या लोकशाहीचे आपण सारे लाभार्थी जर आहोत तर ही लोकशाही आपण समजून घेतली पाहिजे नातिचे जे काही चार स्तंभ आहेत. ते सर्वोच्च न्यायालय आहे. ज्या न्यायालयाने हस्तक्षेप केलेत अनेक ठिकाणी. कारण संविधानात तशी तरतूद आहे. जेव्हा सुरक्षान्यायसमता या गोष्टींना जर बाधा येत असेल तर सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं. म्हणजे त्या शबरीमाला प्रकरणामध्ये उच्च न्यायालयातील एक न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी असं म्हटलं कीनको बाबा तिथं धार्मिक काही स्वयंभू संस्था आहेत त्यात्यांच्यात आपण नाही हस्तक्षेप करायचा. एका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण असं म्हणतात. म्हणजे जिथं स्त्री-पुरुष समतासमानता, gender equality चा विषय येतो. तर इथं ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागेल. मग मीडिया असेलमग तो इलेक्ट्रॉनिक आहे किंवा हा प्रिंट मीडिया आहे. त्यानंतर कायदेमंडळ आहे. म्हणजे संसदीय लोकशाही आपली. कायदे बनवणारी संसद आहे. हे नोकरशहांचं जे काही कार्यकारी मंडळ आहे. या सर्व सांविधानिक संस्था आहेत. मग हा जो देश आहे विविधतेनं नटलेला. या देशाचं एकत्व किंवा आपल्याला जे भारतीयत्व दिलंय. बाबासाहेब म्हणायचे की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे. कारण जेव्हा प्रादेशिक वाद निर्माण झाले. मी मराठी आहेमी आसामी आहेमी बंगाली आहे. मी भारतीय आहे.. नाही काअशा वेळेला भारतीयत्वाची म्हणून जी एक ओळख आहे. जे नागरिकत्त्व आपल्याला बहाल झालेलं आहे. कारण पूर्वी राजा होताप्रजा होती. गुलाम होते. हे सगळं संपुष्टात आलं. एका फटक्यात. संविधानाच्या एका आसूडानं एका तडाख्यानं आपण सगळे भारतीय झालो. आपण सगळे नागरिक झालो. हे जे काही मूलभूत हक्कअधिकार आपल्याला जे मिळालेले आहेत. ते जाणून घेताना हे संविधान.. त्यावेळेला जी बॅरिस्टर लोक होती. जवळपास शंभरेक लोक बॅरिस्टर होते. त्याच्यामध्ये महात्मा गांधीपंडित नेहरूसरदार पटेलडॉ. राजेंद्र प्रसादमौलाना आझाद ही सगळी बॅरिस्टर मंडळी होती. या जवळपास ९०% सवर्ण लोक होते १०% ओबीसी एससी मायनॉरिटी या लोकांचा त्यात सहभाग होता. बाबासाहेबांनांही तिथपर्यंत जाण्यासाठी खूप खटपट करावी लागली. परवा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर असं म्हटले की या देशाने दोन महापुरुषांना विसरता कामा नये. त्यामध्ये निश्चितच बाबासाहेब आहेत. पण त्यांनी महात्मा गांधींजींचं नाव घेतलं. त्याचं कारण असं आहे की घटना समितीमध्ये पंडित नेहरूंना त्यांनी सूचना केल्या होत्या. हे मसूद्याचं जे काम आहे हे बाबासाहेबांकडं द्या. कारण ही माणसं दिलदार होती. ती वाचक होती अभ्यासक होती.

एक प्रसंग सांगतो मी. जेव्हा पंडितजींना एक संदर्भ हवा होता. त्यांच्या पीएनं सांगितलं की हा संदर्भ हे पुस्तक केवळ आपल्या बाबासाहेबांकडं मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी राजगृह बांधलं आणि सगळ्यात जास्त म्हणजे संसदेच्या लायब्ररीमध्येही जी पुस्तके नाहीत ती त्याकाळी बाबासाहेबांकडं होती. पंडितजींनी त्यांच्या पीएला सांगितलं जा म्हणे ते पुस्तक घेऊन ये. ते पुस्तक मागण्यासाठी बाबासाहेबांकडं ते गृहस्थ आले. बाबासाहेब म्हटले कीहा मी येऊ शकेल एकवेळेस पण माझं पुस्तक नाही जाऊ शकत त्यांच्याकडे. त्यांना हवा असेल संदर्भ तर त्यांनी इथं यायचं आणि ते अभ्यासायचं. पंडित नेहरू पण तेवढेच दिलदार होते. त्यांनी व्यक्तिगत असं घेतलं नाही ते. कारण दोघेही व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचा मानत. तिथं विभूतीपूजेला स्थान नव्हतं तर विचाराला स्थान होतं. पंडितजी स्वतः बाबासाहेबांकडे आलेचहापान झालं. हास्यविनोद झालेचर्चा झाली आणि ते निघून गेले. म्हणजे आज आपण जे राजकारणात बघतो किंवा सामाजिक जीवनामध्ये आपण मतभेदातलं सौंदर्य विसरलेलो आहोत. चर्चा करायचं सौंदर्य विसरलेलो आहोत. आपण गोळ्या घालायला लागलो. माणसं संपवायला लागलो आहे. फार प्रचंड वाईट अवस्था आहे. इथे या स्टेजवर आपल्याला पक्ष.. पक्ष म्हणजे विचार.. आपला पक्ष कोणता आहेआपला विचार कोणता आहेतर भारतीयत्व. ही संविधानाची जी काही अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी आपल्या या लाखो करोडो लोकांच्या आशा आकांक्षा ज्या आपल्या या सांविधानिक मूल्यांद्वारे व्यक्त झालेल्या आहेत. ही जी काही मूल्ये आहेत. समाजवाद. संपत्तीचं असं न्याय्य वाटप व्हावं. म्हणजे मार्क्सने जे साम्यवाद किंवा समाजातल्या कुणा एकाची उंची वाढता कामा नये. तर सर्वांची उंची थोडी थोडी का असेना वाढावी असे आग्रही मत मांडले. चीनमध्ये तो काही अंशी साम्यवाद यशस्वी झाला. रशियामध्ये हा साम्यवाद फेल गेला. कारण लोकांना त्या लोकशाहीचं.. विशेषतः भांडवलशाहीचं आणि उदारमतवादाचं जास्त आकर्षण आहे. पण कल्याणकारी राज्य ही जी संकल्पना आहे. ती या समाजाची मालकी. जे फ्रेंच राज्यक्रांतीची जी काही मुलतत्वे आहेत. १७८९ ला ज्यावेळेला व्हाल्टेयररुसोरॉबेस्पिअरमॉन्टेस्क्यू या मंडळींनी जे मूलभूत विचार दिले. आपल्या संविधानामध्ये जगातल्या सगळ्या राज्यरचना राजेशाही पासून लोकशाहीपर्यंत.. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे. तर याचा सगळ्यांचा विचार झालेला आहे. secularism ही संकल्पना नेमकी काय आहेही जी सांविधानिक मूल्ये आहेत. शाळांशाळांमधून त्या मुलांना शिक्षकांनाही त्याची जाणीव नाही. म्हणून आपल्यापर्यंत ते रुजलं नाहीजे पोहोचलं नाही. या सरकारला कोणताही धर्म नाही. म्हणजे काय आहे हेव्यक्तीला धर्म असू शकतो. कारण त्याला उपासनेचं स्वातंत्र्य आहे. मात्र सरकारला असा कोणताही धर्म नाही. सरकार कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही. सर्व धर्मीयांसाठी समान वागणूक आहे. तर मला असं वाटतं की मी आता हे जे काही मोठी मंडळी इथं आलेली आहेत. तर मी माझं बोलणं थोडं आटोपतं घेतो. आपण इथं आलात.. फक्त मला जे काही एक भान आहे. मी शबरीमालाचं उदाहरण दिलंसमाजभान म्हणत होतो. लोक व्यक्तीपूजेकडं चाललेले आहेत. विभूतीपूजा होते आहे. मत विकलं जातं आहे. असं आहे की जर व्यक्तीपूजा आणि विभूतीपूजा झाली तर आपण हुकूमशाहीकडे जातो आहोत हे ही आपल्याला संविधानकर्त्या बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. लोक असा आक्षेप घेतात की हे संविधान अलिकडचं आहे५० वर्षांपूर्वीचं. आमचा धर्म आमची संस्कृती आमचं सारं काही फार पूर्वीचं आहे म्हणे. आमच्या घटना आमचं संविधान वेगळंच आहे. तर आपल्याला जे काही भारतीयत्वनागरिकत्वएकत्व या संविधानाने बहाल केलेलं आहे. ते आपण जपूया. ते जपण्यासाठी त्याचं संवर्धन करण्यासाठी त्याबाबत आपण स्वतः साक्षर होऊयात. ते काय आहे हे सगळं समजून घेऊया. इतर सगळ्यांना शहाणं करून सोडूया. धन्यवाद..🙏

मारुती शेरकर.

Saturday, 30 May 2020

तराळवाडी माझी संस्कारशाळा


तराळवाडी माझी संस्कारशाळा वाडी, माझी तराळवाडी.. तिथली माती, ज्या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे कारण जन्मल्यानंतर माझी नाळ त्या मातीत पुरलेली आहे. त्या मातीची ओढ मला आहे, त्याहीपेक्षा तिथल्या माणसांची अनिवार ओढ माझ्या मनात सदोदित असते..

इथली भजन परंपरा, वडीलधाऱ्यांचे संस्कार आणि आशीर्वाद संस्मरणीय आहेत. आदरणीय काकांचे कीर्तन श्रवणीय असायचेच आणि आजूबाजूला घडणाऱ्या वास्तवतेचे भान देणारे वाटायचे. स्वर्गीय टेलरमामांचा भजनकीर्तनातील आलाप तर भीमसेन जोशींपेक्षा बिलकुल कमी नव्हता. अवघ्या वाडीचे अण्णा म्हणजे स्वर्गीय गणपतअण्णा. त्याकाळात वर्तमानपत्र वाचणारा आणि रेडिओवरून आकाशवाणीच्या बातम्या ऐकणारा वाडीतला हा एकमेव माणूस. रेडिओवरून संध्याकाळच्या सातच्या बातम्या ऐकायला आम्ही संध्याकाळी त्यांच्याकडे जात असू. वाडीचा जगाशी संबंध तो फक्त या बातम्यांपुरता असायचा.. घरात येणाऱ्या आबालवृद्धांचा अण्णांनी कधी तिरस्कार केला नाही. ह्या साऱ्या गोष्टींचं आजमितीला खूप नवल वाटत आहे. ही सारी शिदोरी आयुष्यभर सोबत राहील.

कधीकाळी पायाला चप्पल मिळावी याची आस होती. धोंडीभाऊ चांभारांकडे बलुतं असूनही वडिलांनी त्यांच्याकडे चपलेची सुद्धा कधी मागणी केली नाही. कुणाकडे काही मागणं हे माझ्या वडिलांना आयुष्यभर जमलं नाही. खळ्यावर जमा केलेले त्यांचे ज्वारीची पाचुंदे बैलगाडीतून अनेकदा त्यांच्या घरी पोहोचवले होते. त्यांच्याकडून दहावीला असताना ती चप्पल मला कधीकाळी मिळाली. पावसाळ्यात मनकर्णिका नदीला पूर आल्यानंतर शंकरभाऊ मांग यांच्याकडे एकदा वस्तीला राहिलेलं आठवतय. वाडीतले किसनमामा सोनावणे दिवाबत्ती करायचे. गावकीचा काही निरोप सांगायचे, कोणाच्या काही कार्यक्रमाच्या वेळी लाकडे फोडून द्यायचे. अंगात शर्ट नसलेल्या घामेजलेल्या ह्या भल्या माणसामधे मला गाडगेबाबा दिसतात. खरंतर ही सारी मंडळी खळ्यादळ्यावर,घरीदारी एकत्र भेटायची. सुखदुःखाची देवाण-घेवाण व्हायची. हा सर्वधर्मसमभाव माझ्या मनात रुजला, मला वाटतं हे संस्कार फार महत्त्वाचे आहेत.

कॉलेजला जाण्यासाठी सायकल मिळावी ही सुद्धा इच्छा पूर्ण झाली ती केवळ माझ्या थोरल्या भावामुळे. खोपोलीला सायकलच्या दुकानात मेकॅनिक म्हणून ते काम करत असत. नादुरुस्त सायकलींचे वेगवेगळे स्पेअरपार्टस एकत्र करून एक छानशी सायकल त्यांनी माझ्यासाठी तयार केली आणि पारनेरला येणाऱ्या एसटी गाडीच्या टपावरून ती घेऊन आले. पुढे पारनेरमधूनच ती सायकल चोरीला गेली तो भाग अलाहिदा. खरंतर सगळं लिहायचं म्हटलं तर एक लघुकादंबरी होईल, बघू पुढे केव्हातरी लिहू सविस्तर. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून जगण्यासाठी, अधिक समृद्ध जगण्यासाठी किंबहुना जग आणि जगणं समजून घेण्यासाठी गाव सोडणे क्रमपात्र होते. या मुंबई महानगरीमध्ये मोठमोठ्या सभागृहांमध्ये ऐकण्या-बोलण्याचा योग आला.. त्याची बीजे या गावच्या मातीत फार पूर्वीच पेरली गेली होती.

वाडीच्या आपल्या एकमेवद्वितीय अशा दक्षिणमुखी मंदिरासमोर कितीतरी वेळा हरिपाठ रंगात यायचा आणि घामानं कपडे ओले व्ह्यायचे. स्वर्गीय शिवाजीराव तराळ यांनी आम्हाला लेझीम शिकवला. त्याद्वारे नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचे धडे वाडीतच लहानपणी मिळाले. कितीतरी वेळा भजन कीर्तनाचा सुमधुर अशा नामस्मरणाचा आस्वाद घेतला असेल, श्रावणी सोमवारी मंदिरातले पोथीचे पारायण ऐकले असेल, महिलांचं पारंपरिक गीतांसह फेर धरने असेल.. अशा अनंत आठवणी डोळ्यासमोर तरळतात. तो नादमधुर आवाज कानात रुंजी घालतो. ह्या सार्‍या आठवणींची विण म्हणजे सुंदर फॅब्रिक आहे. हा गावगाडा आणि रामराज्य आयुष्यभर प्रेरणा देत राहील. धन्यवाद..

मारुती शेरकर..

Wednesday, 27 May 2020

पद, पुरस्कार, वाढदिवस वगैरे..

गुरुदेव टागोरांनी गांधींना महात्मा म्हटलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या महात्म्याला राष्ट्रपिता म्हटलं. आणि हा महात्मा स्वतःला अल्पात्मा म्हणत असे हा भाग वेगळा.. टागोरानांही कुणीतरी गुरुदेव आणि सुभाषचंद्र बोस यांना नेताजी या नावाने संबोधलं असणार. स्वतःहून तर ते म्हटले नसतील की मला अमुकतमुक म्हणा. किंबहुना त्यांच्या अलौकिक आणि लोकोत्तर कार्यकर्तुत्वाची इतरांकडून दखल घेतली जाण्याचा आणि गुणगौरवाचा हा एक प्रकार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने प्रज्ञासूर्य (The Brightest Star) म्हणून गौरवलं. खरं तर या सर्व महानुभावांचे काम त्यांना देऊ करण्यात आलेल्या उपाध्यांपेक्षाही कितीतरी मोठं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने प्रज्ञासूर्य किताब देऊन विशेष सत्कार केला तेव्हा बाबासाहेबांच्या उत्तरादाखल भाषणातील एक वाक्य वानगीदाखल.. ते म्हणाले, “मला वाटलं होतं की या ज्ञानसागरामध्ये पोहणारा मी एक राजहंस बनेल पण पाहतो तर काय, मी फक्त गुड्गाभर पाण्यात उभा आहे, पोहीन कसा?”

उत्तरार्धात आपणास माहीत आहेच की गांधी-आंबेडकर या उत्तुंग माणसांमध्ये काही तात्त्विक मतभेद असूनही म. गांधींनी हा भारत देश घडवण्यासाठी डॉ. आंबेडकरांकरवी आदर्श असं संविधान नेहरूंच्या हाती सुपूर्द केलं. तर हे झालं मतभेदातलं अलौकिक सौंदर्य. अलीकडच्या काळात ही बाब अतिशय दुर्मिळ झालेली आहे.

जोतीबांसारख्या, गाडगेबाबांसारख्या महामानवांना आपण कोणत्या पुरस्काराने गौरवणार आहोत? नावासाठी-पदासाठी त्यांचं काम नव्हतच मुळी, तर त्यांचं काम हे त्यांच्या जगण्याचं कारण बनलं होतं. त्यांच्या समोर, त्यांच्या उत्तुंग कामापुढे आपण फक्त आणि फक्त नतमस्तकच होऊ शकतो. आणि हो थोडीफार चाड असेल तर त्यांच्या विचारांचे पाईक बनून यथाशक्ती हे काम अंशतः का होईना पुढे घेऊन जायला हवं किंबहुना त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. खरंतर किती परमोच्च त्याग केलाय त्यांनी आणि तोही किती विपरीत परिस्थितीत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, सामाजिक सुधारणा करण्यासाठी असंख्य लोकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं.

"परी जयांच्या दहनभूमिवर,
नाही चिरा, नाही पणती,
दिव्यत्वाची जेथ प्रचिती,
तेथे कर माझे जुळती।"

सर्वांचीच इतिहासात नोंद होत नाही, केली जात नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर आद्य स्वातंत्र्यसैनिक राघोजी भांगरे, उमाजी नाईक अशा कितीतरी क्रांतिकारकांचे देता येईल. त्यांचं अतुलनीय कार्यपर्व सहज उपलब्ध नाही मात्र प्राप्त परिस्थितीत त्यांनी दिलेल्या योगदानाचे विस्मरण अतिशय कृतघ्नपणाचे ठरेल.

वर्तमानातल्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी भूतकाळातलं ऐतिहासिक योगदान नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त जयंती-पुण्यतिथी, वर्गणी, गावभोजनापुरता हा कार्यक्रम सिमीत नसावा. त्यांच्या प्रतिमा पूजण्यापेक्षा, अथवा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणं, किंबहुना त्यांना अभिप्रेत असं थोडंफार यथाशक्ति वागणं अतिशय महत्त्वाचं आहे.

विंदा करंदीकरांनी अतिशय मार्मिक असं भाष्य केलेलं आहे. ते म्हणतात,

"इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊनि ना नाचा !
पदस्थल करूनि त्याचे
वरती चढुनि भविष्य वाचा !!"

मात्र सद्यस्थिती अगदीच शोचनीय आहे. सगळीकडे भाई, दादा, बापू, शेठ, राजे, सावकार, सरकार यांची चलती आहे. ही काही त्यांनी केलेल्या त्यागमय कामाबद्दल इतरांनी कृतज्ञतेने त्यांना दिलेली उपाधी नसते तर स्वतःच स्वतःला चिकटवलेली बिरुदावली असते. त्यासाठी त्यांची स्वतःची यंत्रणा असते. त्यांचे शेकडो पोस्टर्स आपलं लक्ष वेधून घेत असतात. मुळात इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठीच त्यांचा हा सारा खटाटोप असतो. त्यासाठीच हे सारं बोभाटा प्रकरण.. फोमो नावाची ही नवीन व्याधी अलिकडे निर्माण झालेली आहे. Fomo - fear of missing out.

मलाही विचारा, विचारात घ्या, बघा माझ्याकडे. त्यासाठी फ्लेक्स, बॅनर्स आणि सोबतचे गडी सवंगडी. ह्या उपद्रव मूल्याचा राजकारणात चांगला उपयोग होतो. ह्याच्याही पुढं जाऊन शिकल्या सवरल्या लोकांमध्येही वेगवेगळ्या संस्था, असोसिएशन, फेडरेशनमधे डायरेक्टर-चेअरमन होण्यासाठी अहमहमिका चालू असते. लोकोपयोगी कामे, जनजागरण हा भाग अलाहिदा. बरं ते सगळं चालतं त्या महामानवांच्या नावावर. ज्यांनी उभ्या आयुष्यात कधी हारतुरे स्वीकारलेले नसतात.

कर्मवीर आण्णांनी मुंबई- पुण्यात शाळा न काढता अगदी अनवाणी चालत जिथे रस्ताच नाही अशा गावा-खेड्यात, डोंगरात शाळा काढल्या. नवं लुगडं धोतर घेऊ नका पण बाळाला शाळा शिकवा म्हणणाऱ्या गाडगेबाबांनी स्वतः कधी नवा कपडा अंगावर ल्यायला नाही. विद्रोहाचे प्रणेते जोतीबा फुले लोकांना शहाणं करता करता स्वतः औषधपाण्यावाचून हे जग सोडून गेले. दत्तक मुलगा डॉ. यशवंताचं म्हणणं धुडकावून लावत सावित्रीबाई या माऊलीने प्लेग झालेल्यांची सेवा सुश्रुषा करता करता देह ठेवला. आपण ह्या महामानवांचे विचार न अंगिकारता त्यांच्या जयंत्या मयंत्यांचे थाट मांडतो, इव्हेंट साजरे करतो.. हारतुऱ्यांच्या आणि मान-सन्मानाच्या पलिकडची मुव्हमेंट खरं तर आता अभिप्रेत आहे.

महाराष्ट्रमाऊली साने गुरुजींच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारातून नवे साने गुरुजी, ज्ञानजोती सावित्रीमाईंच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारातून नव्या सावित्रीमाई शाळाशाळांमधून अवतरल्या असत्या तर नक्कीच समाजामध्ये नवनवे आदर्श निर्माण झाले असते. प्रत्येक शाळेत एक सानेगुरुजी किंवा एक सावित्रीबाई जर असेल तर ती शाळा एक संस्कारशाळा होईल आणि नवसमाज घडेल. असे होत नाही असे नाही मात्र अपवादात्मकच. पुरस्कारांसाठी अर्ज / आर्जव करणारी शिक्षक मंडळी पाहून वाईट वाटतं. मुलांना आयुष्याला सामोरे जाण्यासाठी तयार करत असताना अपेक्षित प्रश्न - उत्तर, परीक्षा - मार्क्स याच्यापलीकडे जेव्हा आपण जीवनशिक्षणाच्या चार गोष्टी सांगताना भावनेने ओथंबलेल्या अवस्थेत रंगून जातो, तल्लीन होऊन ऐकणाऱ्या त्या बाळाच्या गालावरून कधीतरी आसवाचा एखादा थेंब ओघळतो आणि त्या दवबिंदुमधे त्या शिक्षकाला जर स्वतःचं प्रतिबिंब दिसलं  तर लकाकणारा हा क्रांतीक्षण त्या शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांसाठीही नोबेलपेक्षाही मोठा पुरस्कार ठरावा. शिक्षकी पेशातले हे ट्रान्समध्ये घेऊन जाणारे क्षण ज्याच्या आयुष्यात जास्त येतील तो खरंतर आदर्श शिक्षक समजला जावा.

पद पुरस्कार आणि संबोधनांविषयी आपण बोलत होतो. मंत्रालयातल्या भाप्रसे पासून ग्रामपंचायतीतल्या ग्रामसेवकापर्यंतच्या मधल्या साखळीतील सर्व अधिकाऱ्यांना साहेब, भाऊसाहेब, रावसाहेब असं संबोधलं जातं. खरंतर आपण १९४७ सालीच या ब्रिटिश साहेबांना त्यांच्या मायदेशी पाठवलं. मात्र मनातला हा साहेब आपण कायम जपून ठेवला आहे. मला वाटतं साहेब म्हणन्यामध्ये आदर कमी आणि लांगूलचालन जास्त.. याउलट 'सर' म्हणण्याने समोरच्या व्यक्तीविषयीचा आदर द्विगुणित होतो. डॉक्टर्स इंजिनिअर्स आपापल्या क्षेत्रातील सिनियर्सना सर या नावानेच संबोधतात. ब्रिटिश राजघराण्याकडून नाईटहूड हा किताब दिला जात असे. Knight म्हणजे सरदार. जलियावालाबाग हत्याकांडानंतर गुरुदेवांनी त्यांना मिळालेला सर हा बहुमान ब्रिटिशांना परत केला होता.

तर आपण बोलत होतो पुरस्कारांविषयी. रक्त आटवणारी, तळमळ आणि कळकळ असणारी वल्ली समाजाने शोधावी, तिचा यथोचित गुणगौरव व्हावा ही रास्त अपेक्षा. कारण ते इतरांसाठी रोल मॉडेल असतात, वाटाडे असतात, जागले असतात. इतर झोपलेले असताना ते जागे असतात.

थोर समाजसेवक बाबा आमटे म्हणत,

"साथसोबत हवीय कुणाला?
माझंच आभाळ, माझीच धरती,
असाच एकटा चालत राहिन,
वादळं घेऊन खांद्यावरती."

माझे गाव माझे तीर्थ समजून लोककल्याणाचा ध्यास घेणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी, कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारणारे स्व. बाबा आमटे यांच्यासारख्या कितीतरी महानुभावांनी कोणत्या पुरस्कारासाठी कुठे अर्ज केल्याची सुतराम शक्यता असू शकत नाही. कोणताही पुरस्कार त्यांना दिल्याने अथवा न दिल्याने त्यांचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही. काम आधी पुरस्कार नंतर. जग त्या कामाची दखल घेईन, न घेईन याची पर्वा ही मंडळी करत नाहीत. काही व्यक्ती, सामाजिक संस्था, प्रतिष्ठानं अशा लोकोत्तर व्यक्ती शोधून त्यांचा यथोचित सन्मान जरूर करतात. अशा सोहळ्यांमधून त्यागमय विचारांची, नवं काही काम करण्याची उर्मी इतरांना मिळते. आपल्या माणसांची शाबासकीची ही थाप पाठीवर पडल्याने खरंतर चिमणीचाही गरूड होतो. नवं काम नव्या ऊर्जेने करण्याची नवी उमेद निर्माण होते. हा अतिशय स्त्युत्य उपक्रम समजला जावा.

पण अलिकडे काही संस्था, म्हणण्यापेक्षा संस्थाचालक विशिष्ट शुल्क आकारून पुरस्कार घेऊ इच्छिणारांचे रितसर अर्ज मागवतात. पुरस्काराला राज्यस्तरीय वगैरे आकर्षक नावं देतात. विशेष म्हणजे असले पुरस्कार घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अशा प्रसंगी पुरस्कार देणारे आणि तो घेणारे दोन्ही कमअस्सल समजावेत.

हीच गोष्ट वाढदिवस साजरा करण्याची अथवा लग्नासारखा एपिसोड.. रस्त्यात चौकात फ्लेक्स, बॅनरद्वारे गाजावाजा असतो. डीजे वगैरे ओंगळवाणे हिडिस प्रदर्शन कशासाठी? मोबाईल सुद्धा अशा शुभेच्छांनी भरून वाहत असतात.

सुप्रसिद्ध शायर साहिर लुधियानवी म्हणतात,

"जिंदगी एक सुलगतीसी चिता है साहिर
शोला बनती है न ये बुझ के धुवाँ होती है।"

या साहिर लुधियानवी साहेबांना मुलाखतकाराने विचारले की, तुमचा जन्म पाकिस्तानात कुठे झाला? साहिर साहेबांनी मुलाखतकाराला प्रतिप्रश्न केला, माझा जन्म कुठे झाला? कधी झाला? असे फिजूल प्रश्न विचारण्याऐवजी मला थेट का विचारत नाहीस की माझा जन्म 'का' झाला?

निसर्ग नियमानुसार जन्म झाला इथवर ठिक आहे. पण तो का झाला हे कळत नाही तोवर तो जन्म सार्थकी लागला असे म्हणता येत नाही. जन्मदिवस साजरा करण्यासाठी हे दुसरं कारण संयुक्तिक आहे. अर्थात आपला जन्म का झाला हे कळणाऱ्यांना जन्मदिवसाच्या सोहळ्याचे काही सोयरसुतक नसते.

आचार्य अत्रे याही पुढे जाऊन म्हणतात,

"उठल्या सुटल्या देऊ नकोस गं,
भान मला वाढत्या वयाचे,
असेच आहे धुंदपणे वयास,
चुकवित फुलायचे."

मारुती शेरकर..

Monday, 13 April 2020

कडाडती वीज..


"असतो नर्मदेचा गोटा तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या.", असंं बलुतंकार दया पवारांनी कोंडवाडा या कवितेत म्हटलंय. विचारी, संवेदनशील माणसं अस्वस्थ असतात. बाबासाहेबांच अवघं आयुष्य अस्वस्थतेत गेलं. शेकडो हजारो वर्षे पडीक पडलेली जमीन बाबासाहेबांनी कसायला घेतली, म्हणून आता हे थोडंफार पिक आलंय. बऱ्यापैकी आपण सारे भेद संपवून भारतीय होत आहोत. मात्र यासाठी अनेक महानुभावांनी आपले आयुष्य पणाला लावले. बाबासाहेब त्यांपैकी अग्रणी आहेत. त्यांचे मन सुन्न होत असे, मती गुंग होत असे. आम्हीही माणसेच आहोत, हाडा-मांसाची आणि हो मनं असलेली माणसंच आहोत ना? म्हणूनच त्यांनी किमान माणूसपण नाकारणाऱ्या हिंदू धर्माची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली. येवल्याला 1935 साली त्यांनी सांगून टाकले की जरी मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार मात्र नाही. इथेच त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला होता. शिक्षण, विशेषत्वाने इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो कोणी ते पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणत. शिकल्याने माणसाला आपणही माणूस आहोत याची जाणीव होते. लोकांमध्ये Identity Crisis तेव्हा होता आणि आजही आहे. आपण गुलाम आहोत याचीच जाणीव नसेल तर तो पेटणार कधी? ते म्हणत "शिकणं म्हणजे, बुद्धीला सत्याकडे, मनाला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे घेऊन जाणे.." पण हे होणे अजूनही बाकी आहे.. गावकुसाबाहेरचा माझा समाज असाच बहिष्कृत राहणार का? १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीनंतर बॅस्टिलच्या तुरुंगातील कैदी बेड्या काढल्यानंतर पळून गेले नाहीत. कारण गुलामी त्यांच्या रक्तात भिनली होती. Old Habits are diehard.. बधीर मने पेटणार कधी? आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मगच तो पेटून उठेल. स्वतःची जाणीव होणं हा क्रांतीक्षण. आपण पेटतो पण व्यक्तिगत स्वार्थासाठी. हा स्वार्थ साध्य झाल्यानंतर पुन्हा विझतो. आपल्या पेटण्याला व्यापक सामाजिक भान असलं पाहिजे. बाबासाहेबांचे विचार म्हणजे धगधगता निखारा आहेत. त्यांच्याविषयी लिहिणं किंवा बोलणं म्हणजे कडाडत्या विजेला पकडण्यासारखं आहे. ही वीज पकडण्याचे धारिष्ट्य ही त्यांच्या अभ्यासातून मिळालेले आहे. त्यांचं अलौकिक आणि उत्तुंग कार्यकर्तुत्व हे लेखाद्वारे अथवा पुस्तकाद्वारे व्यक्त करणं अवघड बाब आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांना ‘यावतचंद्रदिवाकरो’ बाबासाहेब प्रेरणा देतील.
आपापल्या वकुबानुसार बाबासाहेबांबद्दल लिहितील, बोलतील, पण त्यांना थोडंफार का होईना अनुसरावं लागेल आपल्याला.. अखंडपणे अनेक खंड अजूनही त्यांच्यावर लिहिले जातील.. बाबासाहेब अभ्यासताना स्वतःला स्वतःची नवी ओळख मिळत जाते.

सामाजिक गुलामगिरीतून मुक्त झाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याचा काय फायदा? त्यांच्या दृष्टीने एतद्देशियांपेक्षा इंग्रज अनेकपटीने चांगले होते. महार पलटणीने भिमा कोरेगावजवळ पेशवाईचा शेवट केला. इंग्रजी अंमल सुरु झाला. मनुवादी वर्णवर्चस्ववादी स्वकियांकडून आपल्या समाजाची सुटका झाली पाहिजे. बाबासाहेबांनी म्हटले, स्वातंत्र्य, कसले स्वातंत्र्य? We don't have a motherland and you talk about religion, what does freedom to us? समाज सुस्त झोपलेला, भुकेकंगाल, ठार अज्ञानी आणि आपण माणूस आहोत हेच विसरलेला.

२६ जानेवारी १९५० ला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून भारताला पाहिलंवहिलं खरखुरं स्वातंत्र्य मिळालं. सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दिन शेख म्हणतात,
"भलेही घरी असेल माझ्या
गीता, बायबल, कुराण !
पण माझा खरा धर्म आहे
संविधान, संविधान, संविधान.!!"

दुर्दैवाने २६ जानेवारी रोजी मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये पगारदार शिकल्या सवरलेल्यांकडून सत्यनारायण केला जातो.. लोकशाहीच्या ह्या लाभार्थ्यांना सांविधानिक तरतुदींच्या आधारेच नोकऱ्या मिळालेल्या असतात.. खूप काम होणे बाकी आहे.

बाबासाहेबांनी हयातभर अस्पृश्यतेचे चटके सोसल्याने अस्पृश्यता नष्ट करण्याचे कलम त्यांनी संविधानात अंतर्भूत केले. स्वातंत्र्य-समता-बंधुता हे संविधानाचे प्राणतत्व आहे. संसदीय लोकशाही आणि कायद्याचं राज्य भारतात आलं. बाबासाहेबांच्या मते लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तहीन मार्गाने अामुलाग्र बदल आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही. टाटा-बिरला सुद्धा निवडणुकीत एकच मत देतात आणि सामान्य माणूससुद्धा ते एकच अनमोल मत देतो. खेदाची गोष्ट अशी की गांधीबाबाचा फोटो छापलेल्या नोटा देऊन ते मत विकत घेतलं जातं, विकलं जातं आणि मग बाबासाहेबांचा आणि त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचाही पराभव होतो.

प्रत्यक्ष निवडणुकीतसुद्धा त्याकाळच्या जनतेने बाबासाहेबांना हरवण्यात धन्यता मानली. We choose the Government; we deserve. अर्थतज्ञ Minu Masani म्हणतात, Who says India is a poor country, India is not a poor country, but a poorly managed country. दुष्टांच्या दुष्कृत्यांपेक्षाही तथाकथित सज्जनांचे मौन फार घातक आहे. अवघ्या भारताला भारतीयत्वाच्या एका सूत्रात संविधानामुळे गुंफता आले. एकसंघ समाज निर्माण करता आला. बाबासाहेबांनी म्हटले होते, I am Indian firstly and Indian lastly. प्रादेशिक, भाषिक आणि इतर असे अनेक कलह भारताची शकले करतील की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना केवळ संविधानच भारताचं, भारतीयांचं रक्षण करू शकेल. पण दुर्दैवाने संविधानाला न मानणारे, बाबासाहेंबाना न जुमाननारे या देशात कमी नाहीत. बाबासाहेब हे जाती धर्माच्या पलीकडचे भारतीय होते.

अब्दुल कलाम यांनी म्हटले होते, "कायदा महान असून चालत नाही. देशातील नागरिक महान असल्याशिवाय देश महान होऊ शकत नाही." टी. एन. शेषन यांनी आपले अधिकार वापरले आणि संविधानाला अभिप्रेत निवडणूक आयुक्त कसा असावा हे दाखवून दिलं. प्रत्येकाने आपला टेबल, आपला अधिकार याचा वापर संविधानाला आणि देशप्रेमाला अनुसरून केला तर भारत महान व्हायला वेळ लागणार नाही. आपण फक्त प्रतिमा पुजतो, डोक्यावर घेऊन नाचतो. परंतु त्यांचे विचार डोक्यात आणि अंतर्मनात कधी रुजवणार आहोत?

बाबासाहेबांनी खूप अभ्यास केला, खूप विचार केला, अनेक पर्यायांवर खल केला. माझा समाज हिंदू धर्मियांच्या दावणीला बांधलेला आहे. जनावरांसारखं आयुष्य जगणारा आहे. त्यांना माणूसपण बहाल करण्यासाठी बाबासाहेबांनी धम्माकडे वाटचाल केली. मनुस्मृती म्हणते, वर्णव्यवस्था जो मानत नाही तो हिंदू नाही. मनुस्मृतीची होळी करून बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेला मूठमाती दिली. चवदार तळ्याचा संघर्ष-केवळ माणुसकी नाकारणारांच्या विरोधात झाला. महाडच्या ज्या तलावात गुरा-ढोरांना न्हाऊ घातलं जायचं, जिथं कुत्री-मांजरं शी-शु करतात त्या निसर्गाच्या पाण्यावर आमचा हक्क नाही? महाडच्या चवदार तळ्यावरील संघर्ष त्या घोटभर पाण्यासाठी पेटला नव्हता, तर तमाम उपेक्षित वंचित दीनदलितांच्या उद्धारासाठी होता. त्यांच्या मूलभूत हक्कासंदर्भात होता. आम्हाला मंदीरप्रवेश सोडा, निसर्गाच्या पाण्यावरसुद्धा हक्क नाही. आम्हाला पाणी नाकारताय? म्हणजे जीवन नाकारताय? जगणं नाकारताय? आमचं माणूसपण नाकारताय? आता आम्ही जागे झालेलो आहोत, हा इशारा, ही ललकारी बाबासाहेबांनी समस्त धर्ममार्तंडांना आणि सनातन्यांना दिली. या प्रसंगी चित्रे, भिडे, टिपणीस इत्यादी ब्राह्मणांनी बाबासाहेबांना मदत केली. बाबासाहेब म्हणत, ब्राह्मण लोक आमचे वैरी नाहीत, तर ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत. घाणीचं साम्राज्य असलेलं महाडच तळं बाबासाहेबांच्या पतितपावण पावलांनी चवदार झालं, पवित्र झालं, ऐतिहासिक झालं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लोकांनी माणुसपणासाठी संघर्षाची प्रतिज्ञा केली. बाबासाहेबांचं नेतृत्व सर्वमान्य झालं. परतणाऱ्या लोकांवर सनातन्यांनी हल्ले केले. बाबासाहेब लालबुंद झाले. त्यात पहिल्या महायुद्धात लढलेले काही वीर होते. सनातन्यांशी दोन हात करण्याची, त्यांना अद्दल घडविण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. बाबासाहेबांनी विनम्रपणे हात जोडून सर्वांना आपापल्या गावी जाण्यास सांगितले. बाबासाहेबांचा शब्द प्रमाण मानून, अंतिम मानून अनुयायी तेथून निघून गेले. क्षोभ माजवणं सोपं पण विचार देणं कठीण असतं. धन्य तो नेता, धन्य ते अनुयायी. असे एक ना अनेक जीवघेण्या प्रसंगांची मालिका बाबासाहेबांच्या जीवनमार्गात निर्माण झाली. अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी आणि आत्मसन्मानासाठी बाबासाहेब हयातभर लढले.

ज्याप्रमाणे प्रत्येक ख्रिश्चनाला मग तो कॅथलिक असो वा प्रोटेस्टंट चर्चमध्ये त्यांना कुणी अडवत नाही. इस्लाम धर्मातील शिया असो वा सुन्नी प्रत्येक मुसलमान अल्लाहकडे इबादत मागू शकतो. पण आम्ही जर हिंदू असु तर मग आम्हाला तो काळाराम, सावळा कृष्ण अथवा अंबामातेचं मुखदर्शन का नको? किती चोख्यांनी फक्त पायरीवरच ठाण मांडून बसायचं आणि समाधान पावायचं? ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ किंवा ‘दे रे हरी खाटल्यावरी’ असा प्रगतीला घातक असणारा आळशी विचार बाबासाहेबांना झटकून टाकायचा होता. समतेची आणि सहिष्णुतेची अॅक्च्युअल प्रॅक्टिस त्यांना हवी होती. तत्कालीन सनातन्यांना असे अनेक धक्के दिले तरी ते ढिम्मंच. अनेक वर्षे त्यांनी प्रस्थापित मनुवाद्यांशी दोन हात केले. १९३६ साली लाहोरच्या जात-पात तोडक मंडळाला त्यांनी निक्षून सांगितले की हे भाषण हिंदू म्हणून माझे शेवटचे भाषण असेल. त्या भाषणाचे स्क्रिप्ट प्रस्थापितांना मानवलं नाही. तिथे ‘न’ झालेलं प्रदीर्घ भाषण पुढे Annihilation of caste (जातींचे विध्वंसन) ह्या पथदर्शी पुस्तकरुपात शासनाच्या मुद्रणालयात उपलब्ध आहे.

अखेरीस बाबासाहेबांच्या हाती नवनीत लागले. महत्प्रयासांनी, सारासार विचार करून बाबासाहेबांनी मनातला आवाज, अंतर्नाद ऐकला. तो होता अत्तदीपभव, तथागत कारुण्यमूर्ती गौतम बुद्धांचा धम्म. बाबासाहेबांनी म्हटलंय की, आम्हाला धर्मच नव्हता म्हणून आम्ही धर्मांतर नव्हे तर धम्मदीक्षा घेत आहोत. गावकुसाबाहेर अस्पृश्य, बहिष्कृत जिणं असलेल्यांसाठी, शूद्रातिशूद्र शेवटचा पाचवा वर्ण असलेल्यांसाठी, त्यांच्या अस्मितेसाठी, माणुसकीच्या अस्तित्वासाठी केवळ एक आणि एकच उपाय होता. धम्म. आत्मसन्मानाचा आतला दिवा तेवता ठेवण्यासाठी धम्माशिवाय उपाय नव्हता. जुनाट रूढी, परंपरा, प्रतिगामी गुलामगिरीच्या मना-मनाच्या बेड्या खाळकन तुटल्या. बुद्धी प्रामाण्यवाद सांगणारा, नीतीचे आचरण करायला शिकवणारा धम्मच आपल्याला प्रगतीचे नवे आभाळ देऊ शकतो, प्रबुद्ध बनवू शकतो. खुद्द बाबासाहेबांनी सांगून ठेवलंय, ‘‘Don't lay your head on anyone's feet whoever he may be.’’ निर्बुद्धांच्या भ्रामक देवभोळेपणाला, विभूतीपुजेला, व्यक्तिपूजेच्या थोतांडाला बाबासाहेबांनी सणसणीत चपराक मारली. बाबासाहेबांच्या जाज्वल्य विचारांची वादळे समजून घ्या. बाबासाहेब डॉक्टर होते, त्यांना समाजाची नाडी कळल्यामुळे समाजस्वास्थ्य कशात आहे हे चांगलं कळलं होतं. त्यांनी हयातभर social operations केली. बाबासाहेब सर्व शोषितांचे, गरिबांचे मसिहा आहेत. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे पायाभूत तत्व असलेल्या धम्माच्या वाटेवर आपल्याला बाबासाहेबांनी आणून ठेवलंय. त्या बाबासाहेबांना 'देव' ठरवून मंदीरात बसवू नका. बाबासाहेब हा एक विचार आहे, धगधगता विचार आहे. परिवर्तनाचा, माणुसकीचा हा विचार आपण यथाशक्ती समजून घेऊया, त्या वाटेवर मार्गक्रमण करूयात. जो-जो अभ्यास करतो, समाजाची मनोभावे सेवा करताना चंदनासारखे झिजतो. तो-तो बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या धम्माच्या वाटेवर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

- मारुती शेरकर
9867708408

Thursday, 9 April 2020

ज्ञानमंदिर


ज्ञानमंदिर,
मु. औटी-शेरकर वस्ती,
तराळवाडी, ता. पारनेर,
जि. अहमदनगर-४१४३०२.

हा पत्ता आहे एका आगळ्यावेगळ्या मंदिराचा. जिथं मंदिर आहे पण मूर्ती नाही. विचारांचा - ज्ञानाचा मूर्तिमंत समृद्ध ठेवा इथं पुस्तकांच्या रुपात आहे..

पूर्वी किंवा आजही काही ठिकाणी गावाच्या पारावर झाडाखाली लोकं बसतात. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पाटप्पा तिथं होतात. सुखदुःखाच्या हितगुजापासून एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत बरच काही तिथं होत असायचं. एकत्र येण्यानं, बोलण्यानं भावभावनांचा निचरा व्हायचा. कालौघात अशा ‘जागा’ कमीकमी होत गेल्या. माणसं मोबाईल झालीत. यंत्रवत होत चाललीत. गावचं गावपण, घराचं घरपण, माणसाचं माणूसपण टिकवण्यासाठी अशा जागा आता निर्माण करणं अनिवार्य झालं आहे. त्यासाठीच या ज्ञानमंदिराचा प्रयोग केला आहे.

सुधीर शेरकर आणि ऋषिकेश औटी या दोन मित्रांनी इतर बालगोपाळांसह रस्त्याच्या कडेला या जागेत कापड-प्लास्टिकचा कागद वापरून छोटसं शेड उभारून इथं गणेशोत्सव सुरु केला. लोकं अतिशय उत्साहाने हा उत्सव साजरा करायचे, आजही करतात. गणपतीच्या सुट्टीत मी हे न्याहाळत होतो. मनात विचार आला, आपण या तरुणाईच्या उत्साहाला, शेतात राबराब राबणाऱ्या भोळ्याभाबड्या जीवांच्या त्या श्रद्धेला एक विधायक वळण दिलं तर? भजन-कीर्तन, प्रवचन, सत्संगात रमणारी ही मंडळी. श्रावणात भक्तिभावाने नवनाथ किंवा हरिविजय ग्रंथ वाचून शेवटी प्रसाद म्हणजे इतरांना जेवण देण्यात धन्यता मानणारी ही आपली माणसं. त्यांच्या भक्तीला, श्रद्धेला कुठेही तडा न जाऊ देता हे सारे शेजारी पाजारी मनाने एक कसे राहतील? तर त्यांना एकत्र येण्यासाठी कारण हवंय, विचार हवाय, जागा हवी आहे. पनवेलला माझ्याकडे काही पुस्तकं होती. त्यात मामा साहेबराव ठाणगे, साथी अरविंद लोहार आणि आमच्या वाडीतील जेष्ठ कीर्तनकार सोपानकाका औटी यांनी त्यांच्याकडील काही पुस्तकं देऊ केली.

माझ्या ह्या माणसांना ग्रंथांची मनोभावे पारायणे करता-करता संतांची, महामानवांच्या विचारांची ओळख करून देणं आवश्यक होतं. गाथा आणि ज्ञानेश्वरी जर अर्थपूर्ण भाषेत यांना वाचायला मिळाली तर. पारायणासोबतच तसं वागण्यासाठी, प्रयत्नांची प्रामाणिकपणे पराकाष्ठा करण्यासाठी त्यांना संतवचनांचं नक्की पाठबळ मिळेल. जवळपास तीनशे पुस्तकं आणि दैनिक सकाळ हे वृत्तपत्र उपलब्ध करून द्यायचं मी ठरवलं. पण जागेचा प्रश्न, थोड्याफार बांधकामाचा प्रश्न, मूर्तीशिवाय मंदिर? असे अनेक प्रश्न होते.

प्रश्नांना भिडणं म्हणजे प्रश्न सोडविणं. सर्वात आधी चर्चा सुरु केली. सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद आला. जागामालक दत्तात्रय औटी यांनी एकाच वाक्यात मला सांगितलं, “आबा तुम्ही म्हणाल ते सगळं होईल..” जागाबांधणीसाठी सर्वांनीच हातभार लावला. रामहरी, विठ्ठल, दत्ता, आप्पा, भिमाप्पा, अण्णा, शंकरराव यांनी आणि वस्तीवरल्या इतरही मंडळींनी स्वतः काम करून हा छोटासा पण टुमदार निवारा बांधला. नाही म्हणायला एक मुद्दा चर्चेला आलाच, मूर्तीशिवाय मंदिर? त्यावर सविस्तर आणि यशस्वी चर्चा झाली. सर्वच तपशिलात जात नाही. मात्र ज्ञान - पुस्तके - वर्तमानपत्र - विचार - एकत्र येणं - वेगवेगळे कार्यक्रम करणं यावर एकमत झालं. जग कळावं, आपलं जगणं आकळावं, माणूस आधिक समृद्ध व्हावा यासाठी वाचन, विचार आणि विश्लेषणाची नितांत आवश्यकता असते. मला वाटतं वाचन हे सर्व सुखांचे आगर आहे. नवीन प्रश्न, त्यांची नवनवीन उत्तरं ह्या वाचनातून मिळत असतात. सोबत जीवनानुभव असतातच. ही वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी घरोघरी, गावोगावी खेडोपाडी प्रयत्न होणं आवश्यक आहे.

मुंबईत यशस्वीपणे ग्रंथमहोत्सव भरवणारे लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते या आमच्या वस्तीवर ज्ञानमंदिराचं दिमाखात उद्घाटन झालं. याप्रसंगी कवी साहेबराव ठाणगे, राजकीय विश्लेषक पत्रकार राजा कांदळकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, साहित्यिक चळवळीतले दिनेशबापू औटी, जिल्हा शिक्षणाधिकारी (माझी भाची) सुनंदा ठुबे-वाखारे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, तत्कालीन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, नगरसेविका नंदा देशमाने, ह.भ.प. सोपानकाका औटी, माझे सर प्रा. रभाजी औटी, मित्र प्रा. अभिमान तराळ, साहेबराव देशमाने, भाचा अशोक गायकवाड आणि प्रत्येक कामातला माझा साथी जनार्दन औटी सर.. आणि समस्त तराळवाडीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा भाऊ नामदेव शेरकर तर खूप साऱ्या शिक्षक मित्रांसोबत तिथं राबत होता. इथंच मला ओमप्रकाश देंडगेंसारखे अनेक रसिक मित्र मिळाले..

इथं राबणाऱ्या हातांना मी मनोमन सलाम करत होतो. मी अर्थात स्टेजवर नव्हतो. प्रकाशात साजऱ्या होणाऱ्या उत्सवाला दुरून गर्दीतून डोळ्यांत सामावून घेत होतो. कानात साठवून घेत होतो. रस्त्याच्या कडेला छोट्याशा जागेत वाडीतील-पंचक्रोशीतील शेकडो लोकं दाटीवाटीने शाहिरांना, कवी साहेबराव ठाणगे यांना तल्लीन होऊन ऐकत होते.

एरव्ही भजन-कीर्तन, सत्संगात रमणारी ही मंडळी पावसाच्या हलक्या सरी लीलया झेलत शाहीर व कवी महोदयांच्या आशयघन विचारांच्या कारंजात आनंदाने न्हाऊन निघाली. सर्वांसाठी प्रीतीभोजनाचा बेत होता..

खरं तर प्रत्येक घटना दोनदा घडत असते. एकदा मनात आणि नंतर प्रत्यक्षात. मनातली हरेक घटना प्रत्यक्षात साकार होत नसते. या ज्ञानमंदिराची संकल्पना साकार होत असतानाचा हा कार्यक्रम शब्दबद्ध करणं माझ्यासाठी अशक्यप्राय होतं. तशातच सूत्रसंचालक ऋषीने सुचवलं की आता आमचे आबा बोलतील. बोलण्याची बऱ्यापैकी सवय असणारा मी क्षणभर स्तब्धच उभा राहिलो. तुकोबा माझ्या मदतीला नेहमीप्रमाणे धावून आले.

पूर आला आनंदाचा।
लाटा उसळती प्रेमाच्या।।
आनंदाचे डोही। आनंद तरंग।।

म्हटलं आयुष्यात जे अत्यानंदाचे चार क्षण असतील त्यातला हा एक जगायला प्रेरणा देणारा अत्युच्च क्षण आहे. कार्यक्रमात या ज्ञानमंदिराचा प्रवर्तक म्हणून माझा उल्लेख झाला होता. याप्रसंगी मी अतिशय कृतज्ञापूर्वक खऱ्याखुऱ्या प्रवर्तकांचा आवर्जून उल्लेख केला. या ज्ञानमंदिराची पायाभरणी करणारे शिल्पकार वेगळेच होते. जे आता हयात नाहीत. आमचे दादा रेवजी बापू शेरकर.. ज्यांनी सत्तरच्या दशकात औटी आणि शेरकर या दोन वेगवेगळे आडनावं असणाऱ्या परिवारांना एकत्र आणलं. एकत्र विहीर खणायला घेतली. आमच्या आधीच्या पिढीने आयुष्यभर एकत्रितरित्या सत्तरऐंशी फुटांची ही विहीर खोदली, पुढच्या पिढीची तजवीज करून ठेवली. मी वयाच्या विशीपर्यंत हे सर्व बघत लहानाचा मोठा झालो. त्याकाळी सपरात राहणारे भाऊमामा, नारायणमामा पीडब्ल्यूडी खात्यात रस्त्यांवर मैलकामगाराचे काम करत असत. आज ते हयात नाहीत. आज त्यांची पुढची पिढी छान बंगल्यांमध्ये स्थिरावली आहे. हे औटी- शेरकर परिवार खरेतर एकमेकांच्या गरीबीचे साक्षीदार आणि एकमेकांना सुखदु:खात साथ देणारे होते. अर्थात हा वारसा पुढच्या पिढ्यांनीही पुढे चालू ठेवला आहे. माझी आई-मावशी, तात्या आज नाहीत. पण ह्या सगळ्यांनी या ज्ञानमंदिराची, प्रेमाची, एकमेकांना सहकार्य करण्याची मुहूर्तमेढ इथं रोवली होती. केवळ वाडीतच नव्हे तर पंचक्रोशीत ज्ञानमंदिर हा विषय कौतुकाचा झाला आहे.

या ठिकाणी ही मंडळी एकत्र येतात. उत्सवादरम्यान वेगवेगळे खेळ खेळतात. मुळात या सर्वांना एकत्र आणणं हाच प्रमुख हेतू होता. वर्तमानपत्र, पुस्तकं वाचावीत हा दुय्यम हेतू होता. आता मात्र वाचक वाढू लागलेत. मुले या जागेचा अभ्यासिका म्हणून वापर करताना दिसत आहेत. सकाळ संध्याकाळ मंडळी इथं एकत्र बसून एकमेकांची विचारपूस करत आहेत. हाच अभ्यास, हीच पूजा मला अभिप्रेत होती. ज्यायोगे वस्तीचे स्वास्थ्य अबाधित राहिल. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे अॅकरिंग करताना बिग बी अमिताभ बच्चन म्हणायचे,

कर्म के कुरुक्षेत्र में,
ना रूप काम आता है,
ना झुठ काम आता है,
ना जाती काम आती है,
ना बाप का नाम काम आता है,
सिर्फ ज्ञान ही आपको आपका हक दिलाता है।।

मारुती शेरकर..
9867708408

बा जोतीबा


बा जोतीबा तुमची खुरटी दाढी, रापलेला चेहरा, डोक्यावरचं पागोटं हे सगळं सगळं मला माझ्या ‘बा’मध्ये दिसलं. माझा बा माझा जैविक बाप आहे. पण महामानव जोतीबा, बाप मानसा, तुमच्या खांद्यावर बसून मी हे अद्भुत जग आणि जगणं न्याहाळतोय.

शालेय जीवनात कार्यालयीन भिंतीवरल्या महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुसटशी ओळख होती. मात्र महात्मा जोतीराव फुल्यांचा काही बोध होत नव्हता. कॉलेजला शिकत असताना आमचे प्राचार्य डॉ. विद्याधर औटी सरांच्या तोंडून या फुले दांपत्याचा परिचय झाला. सर स्वतः विज्ञानवादी आणि विवेकवादी, दैववादाला बिलकुल थारा न देणारे, अतिशय कडक शिस्तीचे.. आम्ही शेतकऱ्यांची पोरं. अॅकॅडेमिक अभ्यास करून बीए झालो. इंग्रजीसोबत इतिहास विषय अभ्यासाला असूनही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं आकलन त्या पदवी परीक्षेच्या कालखंडात झालं नाही. पुढे नोकरीला लागल्यानंतर, म्हणजे पोटाची सोय झाल्यानंतर थोडंफार वाचू बोलू लागलो आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची abcd गिरवायला सुरुवात केली. मनात प्रचंड अज्ञान असल्याने स्वतःची कीव वाटू लागली. पण त्या अस्वस्थतेतून पुढील वाटचाल पक्की होत गेली.

मुंबईच्या चर्नी रोड स्टेशनलगत शासकीय मुद्रणालय आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित पुस्तके, महामानवांची चरित्रे असे अनेक दस्तऐवज तिथं माफक दरात विकत मिळतात. आजवर अनेक पुस्तकं मी तेथून आणली आहेत. परीचितांनाही वाचायला देत आहे. इथेच मला फुल्यांवरील ‘शोधाच्या नव्या वाटा’ मिळाले. हरी नरके संपादित या पुस्तकात महात्मा फुल्यांविषयी डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. विद्याधर औटी अशा विचारवंतांचे लेख आहेत. पुस्तक वाचल्यानंतर कधी एकदा पारनेरला जातोय आणि माजी प्राचार्य लेखक विचारवंत औटी सरांना भेटतोय असं झालं. मग सरांच्या तोंडून तासंतास फुले ऐकले, क्रांतीजोती सावित्रीमाई ऐकल्या.. महाराष्ट्राची जडणघडण ऐकली.. नवं विचारविश्व उलगडलं.

जोतीरावांना उतारवयात अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांचा उजवा हात लुळा झाल्याने, त्या हाती पेन न धरता आल्याने, शरीरातील साऱ्या असह्य वेदना सहन करत डाव्या हाताने त्यांनी ‘सार्वजनिक सत्य धर्म’ वाचकांना सुपूर्द केला. ऐन उमेदीत जोतीराव फुले पुण्यातील एक यशस्वी उद्योजक होते. कॉन्ट्रॅक्टर होते. ते त्यातच रममाण झाले असते तर अंबानी, टाटासारखे फुले घराणे त्या अर्थाने नावलौकिकास आले असते. मात्र अखेरच्या श्वासापर्यंत समाजसुधारणेचा ध्यास घेतलेल्या जोतीरावांचा मृत्यू औषधपाण्यावाचून झाला आहे, ही खंत आणि अपराधीपणाची भावना महाराष्ट्राला सदैव बोचत राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या छोट्यामोठ्या सर्व कार्यालयांमध्ये मंत्रालयापासून न्यायालयापर्यंत, ग्रामपंचायतीपासून सर्व शाळाशाळांमध्ये जोती-साऊच्या प्रतिमा पहावयास मिळतात. ह्या दांपत्याचे अलौकिक कार्य मनामनांमध्ये जर रुजलं तर नवा महाराष्ट्र उदयास येईल.

जोतीरावांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून काढली. मराठी मनामनामध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या रयतेच्या या राजावर ‘कुळवाडी भूषण’ नावाचा प्रदीर्घ पोवाडा त्यांनी लिहिला. आपल्या लेखणीने तत्कालीन प्रस्थापित विषमतावादी समाजव्यवस्थेचे वाभाडे त्यांनी काढले. ‘ब्राह्मणाचे कसब’, ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘गुलामगिरी’ इ. पुस्तकांद्वारे समकालीन समाजाच्या समस्या आणि त्यावरील उपायांचा विस्तृत उहापोह त्यांनी केलेला आहे. ‘गुलामगिरी’ हे पुस्तक अमेरिकेच्या बराक ओबामांनी व्हाईट हाउसच्या ग्रंथालयात ठेऊन घेतले. याला कारणही तसेच आहे. जोतीरावांनी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्णीय निग्रो लोकांच्या लढ्यास अर्पण केले आहे. अर्पणपत्रिकेत ते लिहितात, “युनायटेड स्टेट्समधील सदाचारी लोकांनी गुलामांस दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात औदार्य, निरपेक्षता व परोपकार बुद्धी दाखवली. यास्तव त्यांच्या सन्मानार्थ हे लहानसे पुस्तक त्यांस परम प्रीतिने नजर करितो आणि माझे देशबांधव त्यांच्या या स्तुत्य कृत्याचा कित्ता, आपले शुद्र बांधवांस ब्राह्मण लोकांच्या दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात घेतील अशी आशा बाळगतो.”

थॉमस पेन लिखित ‘Rights of Man’ (मानवाचे हक्क) या पुस्तकाचे शालेय वयातच त्यांच्यावर गारुड होते. सर्व प्रकारच्या दास्यापासून हा माणूस मुक्त झाला पाहिजे. जोतीबांची ही वाट पुढे चालताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त संविधान सभेने नागरिकांच्या मुलभूत हक्कासंदर्भात हा मूलगामी विचार अमलात आणलेला आहे. टाईम्स ऑफ इंडिया या अग्रगण्य दैनिकात लिहिलेलं असं काहीसं, “Education gives us knowledge, knowledge gives us confidence, and confidence gives us respect.” हे आत्मभान आणि समाजभान येण्यासाठी शिक्षण अनिवार्य सांगताना फुल्यांनी म्हटलं होतं की, “सारे अनर्थ एका अविद्येने केले आहेत.” अलीकडे देशभरात ‘शिक्षण हक्क’ कायदा आला. पण फुल्यांनी १८८२ साली हंटर कामिशनसमोर शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची शिफारस केली होती. सरकारने १२ वर्षे वयापर्यंतच्या सर्व बालकांस शिक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. शिक्षकांची निवड बहुजनांमधून करावी, ते प्रशिक्षित असावेत, त्यांना पुरेसे वेतन असावे, खेड्यातील मुलांना शेतकीचे आणि तांत्रिक शिक्षण देण्यात यावे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जावे ही मागणी करणारे जोतीराव हे पहिले भारतीय होते.

सुमारे १७० वर्षांपूर्वी जोतीरावांनी १८५१ साली मुलींसाठी या देशातील पहिली शाळा काढली. साऊआई आणि फातिमाबी या देशाच्या आद्यशिक्षिका ठरल्या. युगानुयुगे अंधारात खितपत पडलेल्यांना शिक्षणरुपी उजेडाचा कवडसा दिसू लागला. विधवा पुनर्विवाह, सुतिकागृह, अस्पृशांना हर तऱ्हेची मदत असं सर्वव्यापी मिशनरी काम फुल्यांनी केलं. इथल्या समाजस्वास्थ्याची नेमकी नस त्यांनी शोधली होती. ड्युक ऑफ कनॉट यांच्या सत्काराप्रसंगी ब्रिटिशांना त्यांनी निर्भीडपणे सुनावले होते, “आपल्यासमोर रेशमी कपडे नि अलंकार परिधान केलेले श्रीमंत, सरदार आणि जहागीरदार पाहून रयतेविषयी आपण मत बनवू नये. खरा हिंदुस्तान पहायचा असेल तर माझ्या बरोबर खेड्यात चला.”

जोतीराव हे बोलघेवडे सुधारक नव्हते, तर अतिशय कर्तव्यकठोर कर्ते सुधारक होते. ते इथल्या पददलितांच्या दु:खांशी समरस झाले होते. त्यांचं लिखाण अतिशय रांगडं आणि तिखट असं आहे. त्यात अभिजनांचा रंजनवादी अभिनिवेश बिलकुल आढळत नाही. माणूस इथून तिथून एक आहे. त्याची भाकरी, त्याचा आत्मसन्मान हेच विषय प्रधान्यांनी त्यांनी अनुसरले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्या लेखनाला ग्राम्य वगैरे म्हटलं. फुल्यांच्या पुस्तकाची टर उडवताना चिपळूणकरांनी म्हटलं की, फुल्यांना व्याकरणाचे व शुद्ध लिहिण्याचे ज्ञान नाही. पण जोतीरावांचा इरादा स्पष्ट होता. न्या. रानडे यांनी ग्रंथकारांच्या संमेलनाला जोतीरावांना निमंत्रित केले होते. उत्तरादाखल जोतीरावांनी त्यांना सुनावले होते की, “उंटावरून शेळ्या वळणाऱ्या घालमोड्या दादा, मनुष्याच्या मानवी हक्कांविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यास ते हक्क त्यांच्याने खुशीने व उघडपणे देववत नाहीत, पुढेही देववणार नाहीत. तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा वा पुस्तकांचा मेळ मिळत नाही.” पुढे त्यांनी ग्रंथकारास असेही बजावले की, “सर्व मानवी प्राण्यांत परस्पर अक्षय बंधुप्रिती काय केल्याने वाढेल, त्याचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकांद्वारे प्रसिद्ध करावे. अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही.” तर मंडळी ग्रंथकारांचे संमेलन म्हणजे सध्याचे शासनाच्या निधीवर मोठ्या दिमाखात साजरे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. तमाम लेखकांना काय लिहावं, कसं लिहावं याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे.

मा. शरद पवार साहेबांनी ‘कोरोना’बाबत फुले जयंतीदिनी दारात ‘ज्ञानाचा दिवा’ लावा असं सांगितलं आहे. महाराष्ट्राला पुरोगामित्व बहाल करणाऱ्या महानुभावांमध्ये पवारसाहेबांचे नाव अतिशय आदराने घेतलं जातं. सरकार त्यांचं ऐकतं, आपण का ऐकू नये? महात्मा फुल्यांच्याच सत्यशोधन करणाऱ्या अखंडाने ह्या लेखाची सांगता करतो,

धर्म राज्य भेद मानवा नसावे।
सत्याने वागावे! ईशासाठी।।

ख्रिस्त महंमद मांग! ब्राह्मणासी।
धरावे पोटासी। बंधूपरी।।

निर्मिकाचा धर्म! सत्य आहे एक।
भांडणे अनेक। कशासाठी?।।

मारूती शेरकर
9867708408

Monday, 6 April 2020

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी आणि माझे मामा साहेबराव ठाणगे यांना वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा..!


“जगण्यासाठी शोधल्यास तू
किती सुखाच्या वाटा,
काढलास का कधी कुणाच्या
पायामधला काटा?”

कुणाच्या पायामधला काटा काढण्याने आपण सुखाच्या वाटेवर येऊन पोहोचतो. त्यासाठी तीर्थाटने, उपासतापास आणि अनेक मांडवाखालून जाण्याची गरज नाही. असा सर्वांना समजेल उमजेल असा रोखठोक विचार कवितेतून व्यक्त करणारे कवी साहेबराव ठाणगे. सध्या महाराष्ट्र टाईम्स दैनिकातील वाचकप्रिय सगुणनिर्गुण या सदराचे लेखक आहेत. अवघं मराठीजगत त्यांना वाचत आहे..

तुकोबांच्या अभंगांप्रमाणे, जोतीबांच्या अखंडाप्रमाणे अतिशय उपहासगर्भ आणि अर्थपूर्ण त्यांच्या रचना मराठी मनांची मशागत करत आहेत. मूलतः संवेदनशील मनाच्या या कवीने आणखीही खूप सारी साहित्यसंपदा आपल्याला दिलेली आहे. १९८८ साली मा. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पहिलावहिला वेदना-संवेदना हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. नंतर सैरभैर, कवितारंग, पाऊसपाणी असे अनेक उत्तमोत्तम काव्यसंग्रह त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. ह्या सर्व कवितांचे नवनीत घेऊन ‘मन पाखरू पाखरू’ हा त्यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्रभर खूप गाजत आहे.

साहेबराव ठाणगे आपल्या खास शैलीत गाऊन कविता सादर करतात. त्यांचं दोन शब्दांमधलं, दोन पंक्तीमधलं विश्लेषण ऐकणं म्हणजे तुकोबांच्या अभंगांचे, जोतिबांच्या अखंडांचे निरुपण ऐकल्याची अपूर्व प्रचीती येते.

मुंबई बँकेत सरव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले साहेबराव ठाणगे. ज्यांच्या नावातच साहेब आहे. आईवडिलांनी ठेवलेलं साहेब हे नाव त्यांनी आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाने अगदी सार्थ करून दाखवलं आहे. बँकेत उच्चपदस्थ असताना कोटींच्या आकडेवारीचा हिशेब मांडत असताना मॅनेजरच्या खुर्चीतल्या पांढऱ्या स्वच्छ टर्कीस टॉवेलचा दर्प, अहंकार त्यांनी कधी स्वतःला शिवू दिला नाही. आकड्यांशी व्यवहार करत असताना आपल्या मातीला, माणसांना वाचणं त्यांनी कधी थांबवलं नाही.

पारनेरच्या दुष्काळी भागातील करंदी गावातून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत हे इवलंस पाखरू मुंबईच्या दिशेला झेपावलं. मनातल्या मनात आजूबाजूच्या विषण्ण परिस्थितीने आजही हे पाखरू अस्वस्थ राहातं. माणसांचं अवघं आयुष्य त्यांच्या सुखदु:खासह कसं सार्थकी लागेल याचा विचार ते सदोदित करत असतं. वेदनेला वाणी मिळाली, भावनांच्या कल्लोळाला शब्दांचे धूमारे फुटले आणि कवितेबरोबर इतरही साहित्याचा ठेवा त्यांनी आपल्याला सुपूर्द केला. मनातल्या मनात, खेळखंडोबा, उजेडाच्या वाटा अशा अतिशय विचारप्रवण साहित्यरचना त्यांच्या नावावर आहेत. २०१२ साली डिंपल प्रकाशनातर्फे त्यांच्या ‘उजेडाच्या वाटा’ या व्यक्तिचित्र संग्रहाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी कवयित्री नीरजा, रामदास फुटाणे (नाना), फ. मु. शिंदे, अशोक बागवे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे अशी बरीच दिग्गज मंडळी मुंबईतील दादरच्या धुरू हॉलमध्ये हजर होती. कवितांच्या गावा जावे, कवितारंग असे कार्यक्रम ते एकत्र करत असत. या कार्यक्रमात मी सुत्रसंचालन केले होते. नानांनी या प्रसंगी सुचवलं की, साहेबराव तुम्ही गाऊन कविता सादर करताना जरा पॉज घेत चला.. आणि हा सूत्रसंचालक तुमच्या ‘मन पाखरू पाखरू’ या कार्यक्रमात निवेदन करेन. बघा तुम्ही दोघेजण एकत्र हा कार्यक्रम करून. सायबामामांनी त्यांना सांगितले की हा निवेदक माझा भाचा आहे. आम्ही हा कार्यक्रम करू. काही दिवसांतच वाशी, नवी मुंबईच्या साहित्यमंदिरात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मन पाखरू पाखरू’ हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम म्हणजे उत्कट काव्यानुभव, अस्सल जीवनानुभव आहे. किंबहुना प्रबोधनाचा जागर आहे. त्यामुळे श्रोत्यांना हा कार्यक्रम जरा जड वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यात रंजनाला फारच कमी जागा आहे. बहिणाबाई मानवी मनाविषयी जसं लिहितात,

“मन पाखरू पाखरू,
त्याची काय सांगू मात ,
आता व्हतं भुईवर,
गेलं गेलं आभायात ..
मन जह्यरी जह्यरी ,
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू साप बरा ,
त्याले उतारे मंतर ”

‘मन पाखरू पाखरू’ हा कार्यक्रमच मुळी बहिणाबाईंच्या भाषेत बोलायचं झालं तर, “माणसा माणसा कधी व्हशील रे तू माणूस..” हा विचार यथाशक्ती पुढे नेण्याचा कवीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मानवी मन अशी एक अजब आणि अनाकलनीय भानगड आहे की जी आजतागायत संत, विचारवंत, तत्वज्ञ इतकंच काय मनोवैज्ञानिकांनाही पुरून उरलेली आहे. सर्वजण हतबल आहेत. ही कवी मंडळी मनावरचे तरंग शब्दांद्वारे अचूक टिपतात. ज्याप्रमाणे हजार शब्दांत जे सांगता येणार नाही ते एखादा चित्रकार एका चित्रातून बोलून जातो. प्रसंगी परकाया प्रवेश करून ही कवी मंडळी स्वतःबरोबरच इतरांच्या भावभावना शब्दबद्ध करतात. उगीच नाही कवींना शब्दसृष्टीचे ईश्वर म्हटलं जातं. त्यांच्या संवेदनशील मनातील सहानुभूती आणि समानुभूती (sympathy and empathy) कागदावर उमटते आणि तो अनुभव वाचकाला आपला वाटायला लागतो. मग ती कविता कवीची राहात नाही ती रसिक वाचकांची होऊन जाते. कवी सूक्ष्म निरीक्षण करत असतो. त्याच्या चष्म्याचा नंबरही इतरांपेक्षा वेगळा असतो. आजूबाजूच्या विषण्ण परिस्थितीने तो मनातल्या मनात अस्वस्थ असतो. जगण्याच्या धबडग्यातल्या साध्या साध्या गोष्टींकडेही कवी कुतूहलपूर्वक पाहतो. विलियम वर्ल्डस्वर्थ म्हणतो की, “Poetry is a spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility”.. प्ल्युटो तर याहीपुढे जाऊन म्हणतो की प्रेमाचा परीसस्पर्श कवी होण्यासाठी पुरेसा आहे. या सर्व भावभावनांचा कल्लोळ कवितेतून व्यक्त होत असतो. साहीर लुधियानवी या शायरनं म्हटलंय,

“जिंदगी एक सुलगतीसी चिता है साहीर,
शोला बनती है, न ये बुझके धुवॉ होती है”

कवी साहेबराव ठाणगे यांच्या कवितांमधून सुद्धा माणसाचं अवघं आयुष्य त्याच्या सुखदु:खांसह कसं सार्थकी लागेल याचं विवेचन आपल्याला पाहायला मिळतं.

“पोरकच मन माझं,
सदा बिच्चारं बिच्चारं ,
मेली मन माणसांची,
हाच विच्चार विच्चार”

विचारी मन अस्वस्थ असतं. माणूस आणि माणुस'की' जिवंत राहावी हाच काय तो विचार त्यांच्या मनात असतो. सायबामामा वयाच्या विशीपर्यंत गावाला राहिल्याने मुंबईत पन्नास वर्षे राहूनही त्यांच्या मनातलं गाव त्यांच्या मनात लख्ख घर करून राहिलेल आहे आणि ते ग्रामीण जीवन हाच त्यांच्या विचारांचा गाभाघटक राहीला आहे. ‘देव’ नावाची त्यांची एक अप्रतिम कलाकृती आहे. श्रमावर विश्वास ठेवणारा भोळाभाबडा शेतकरी गेला तर जातो पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीला, नाहीतर नारायणगावच्या विठाबाईच्या बारीला.. आपल्या शेतात, श्रमात आणि घामातच देव शोधणारा शेतकरी आपल्या देवाची कशी पूजा करतो हे सांगताना ते लिहितात,

“देव आहे किंवा नाही।
कुणी पहिले देवाला।
सेंदराच्या दगडाचा।
उभा आधार गावाला।।
देव बैल गुरं गाई।
देव जन्मदाती आई।
तिच्या पुण्याईची सर।
खुद्द देवालाही नाही।।
देव असो किंवा नसो।
माझे शेत औक्षवंत।
बीजातून रोज नवा।
उगवेल भगवंत।।”

पण गावाकडे रामराज्याची, लोकसंस्कृतीची वेगाने उसवण होताना दिसत आहे. ज्या गावातल्या मंदिरातून भल्या सकाळी काकडआरतीचा गजर कानावर यायचा, गावाच्या आडाच्या रहाटावरून काकणभरल्या हातांचा पाणी शेंदण्याचा आवाज यायचा, तालमीत पहिलवानांच्या घुमण्याचा आवाज यायचा, सुखदु:खात सारा गाव एक व्हायचा, पण आज काय परिस्थिती आहे? जग बदलतंय, माणसं बदलतायत, सारच्या सारं भवताल वेगाने बदलत आहे. फक्त हा बदल विधायक, रचनात्मक असायला हवा. मात्र तसा होताना दिसत नाही. जागतिकीकरण, खुले आर्थिक धोरण, वाढता चंगळवाद आणि नवनव्या अंधश्रद्धांमुळे साधेभोळे शेतकरीही बुवा बापूंच्या चरणी लीन होताना दिसत आहेत. खरंखुरं शिक्षण आणि प्रबोधनापासून वंचित असलेली खेडी, गाव प्रचंड वेगाने बदलत आहेत. माझा गाव या कवितेत साहेबराव ठाणगे यांनी या परिस्थितीचे अगदी समर्पक वर्णन केले आहे.

हरवला माझा।
गवताचा गाव।
साधा भोळा भाव।
माणसांचा।।
कुलदैवतांचा।
आंधळा अंगारा।
नात्यांचा निवारा।
देशोधडी।।
अर्धपोटी बाप।
उपाशीच मेला।
तालुका जेवला।
दहाव्याचे।।
तालमीचे जागी।
बियरचे बार।
पैलवान पोरं।
फेसाळली।।
बांधली देवळे।
उंच ती केव्हढी।
स्वर्गालाच शिडी।
लावियेली।।
किती केली तीर्थ।
पोथी पारायणं।
तरी नारायण।
भेटेचिना।।
असे कसे झाले।
टरफलाचे धनी।
दाणे नेले कोणी।
हातोहाती।।
चालतात सारी।
अंधाराची वारी।
कोण यास तारी।
पांडुरंगा।।

राजकीय आणि सामाजिक बदल झाले. हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वराज्यात आजही आपण सुराज्यासाठी चाचपडतो आहोत. सत्तर वर्षांची झाली आपली लोकशाही. काय गत झालीय आपल्या लोकशाहीची? स्वातंत्र्याचं वय वाढत असताना सर्वसामान्यांचे भय सुद्धा वाढतेच आहे. बेरोजगारीने आणि महागाईने घराघराचं अर्थशास्त्र मोडीत काढले आहे. लोकशाही या लावणीतून हे विदारक चित्र साहेबराव ठाणगे यांनी आपल्यासमोर मांडलं आहे.

वरती फेटा बांधता बांधता,
खालती धोतर सुटतंय राव।
लोकशाहीचं मायंदळ पाणी,
मधल्यामधेच आटतंय राव।।
उडदामाजी काळं-गोरं,
सुक्यात वल्लबी पेटतंय राव।
रक्ताचं पाणी करणार कोणी,
एखादं येडं भेटतंय राव।।

पूर्वी समाजकारणासाठी राजकारणाचा आधार घ्यावा लागायचा. आता मात्र सेवाभाव संपून राजकारण जणू धंदा झाला आहे. झटपट श्रीमंत होऊन पुढच्या अनेक पिढ्यांची सोय करण्याच्या या धंद्याचे तरुण पिढीलाही आकर्षण वाटू लागले आहे, राजकारणातल्या या पांढऱ्या कावळ्यांविषयी कवी साहेबराव ठाणगे म्हणतात.

“अंडील गोऱ्ह्यांचा।
धाब्यावर दंगा।
क्वाटरची गंगा।
ओसांडली।।
स्कॉर्पियो सफेद।
सफेद्च वेश।
शुभ्रतेचा फेस।
अंगोपांगी।।
भाऊचा हो दादा।
दादाचा साहेब।
गरिबी गायब।
एकाएकी।।
पुढाऱ्यांच्या मागे।
पेंढारी पांढरे।
भाड्याची मेंढरे।
जमलेली।।”

या विषण्ण परिस्थितीतही कवीचा आशावाद टिकून आहे. डाकू वाल्याकोळीचा रामायणकर्ता वाल्मिकी ऋषीपर्यंतचा प्रवास सर्वांना ज्ञात आहे. वाल्याकोळी जंगलात दबा धरून बसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटायचा. त्यासाठी त्यांचे खूनही पाडायचा. अशा लुटमारीत मिळवलेली संपत्ती, पैसाअडका आपल्या पत्नीकडे द्यायचा. तीही त्याचा योग्य हिशेब ठेवायची. वाल्याकोळ्याने एक माणूस मारला की ती एका मोठ्या रांजणात एक दगड टाकायची. असं वर्षानुवर्षे चाललं होतं. वाल्याकोळ्याने असे बरेच पापाचे रांजण भरले होते. एकदा त्या जंगलातून नारदमुनी मुखानं ‘नारायण नारायण’ म्हणत चालले असता वाल्याकोळ्याने त्यांना अडवलं. त्यांच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालणार तोच त्याला अडवून नारदमुनी म्हणाले, “थांब आधी मला सांग. तू जे कर्म करीत आहेस त्यात तुझी पत्नी वाटेकरी आहे काय? ते तिला आधी विचारून ये. तो पर्यंत मी इथेच थांबतो आणि तुझ्या पापात ती सहभागी असेल तर मग मला खुशाल मार.” वाल्या धावतच घरी येतो आणि बायकोला विचारतो, “मला खरं सांग मी करीत असलेल्या या पापात तू सहभागी आहेस की नाही?” दरोडेखोर वाल्याच्या त्या अडाणी बाईने जे सडेतोड आणि मर्मभेदी उत्तर दिले त्या एका ‘नाही’ या शब्दाने वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि त्याने पुढे रामायण लिहिले. वाल्याकोळ्याची ही गोष्ट अगदी साधी वाटते. पण असा विचार करा की वाल्याच्या ह्या बायकोने “होय मी तुमच्या पापात वाटेकरी आहे” असं उत्तर दिलं असतं तर? तर वाल्या उड्या मारतच नारदाजवळ पोहोचला असता आणि त्यानं नारदाचं शीर धडावेगळं केलं असतं. पण तसं झालं नाही. वाल्याच्या त्या अशिक्षित, अडाणी बायकोच्या एका सडेतोड उत्तरामुळे वाल्याकोळ्याचे डोळे खाडकन उघडले. त्याने नारदाचे पाय धरले. नारदाने त्याला दीक्षा दिली. त्याने बारा वर्षे जप केला आणि वाल्याकोळी नावाच्या एका क्रूरकर्मा दरोडेखोराचा थोर वाल्मिकी ऋषी झाला. कशामुळे तर बायकोच्या एका बाणेदार उत्तरामुळे. नाहीतर कसला वाल्मिकी आणि कसले रामायण.

रामायणाला आपण आपला आदर्श ग्रंथ मानतो त्याची पारायणं करतो आणि आदर्श पती-पत्नी म्हणून राम-सीतेकडे पाहतो. मात्र हे सर्व ज्या एका स्त्रीच्या सडेतोड आणि निर्भीड, सत्य उत्तरामुळे घडले त्या रामायणकर्त्या वाल्याकोळ्याच्या बाणेदार बायकोला आपण विसरूनच गेलो आहोत. इतकंच काय तिचं नाव काय होत? तिचं पुढं काय झालं? याचाही आपण तपास केला नाही. माझ्या मते एकवेळ आज आपण सर्व रामायण विसरलो तरी चालेल, पण लक्षात ठेवलं पाहिजे त्या वाल्याकोळ्याच्या धाडसी बायकोच्या उत्तराचा.. देशात आज बोकाळलेला भ्रष्टाचार आणि पावलोपावली लाचखोरी करणारे आधुनिक वाल्याकोळी आपण पाहतो. मात्र या दरोडेखोरांच्या घरी वाल्याच्या बायकोसारखी सडेतोड गृहिणी मात्र सापडत नाही. एव्हढंच काय वाल्याकोळ्याच्या या आधुनिक बायकाही नवऱ्याच्या बरोबरीने लाचखोरीची वाटमारी करू लागल्या आहेत. पगाराचे दिवस नसूनही नवऱ्याने घरी आणलेली नोटांची पुडकी पाहून या वाल्यांच्या आधुनिक मिसेस लगेच ज्वेलरच्या दुकानात पळायची तयारी करतात. आपल्या लाचखोर नवऱ्यासमोर कौतुकाची आरती ओवाळतात. समजा या देशातल्या घरोघरच्या गृहिणींनी आपापल्या नवऱ्यांना “मी तुमच्या पापात सहभागी नाही” असं ठामपणे सांगितलं आणि पापाचा पैसा आणणाऱ्या पतीरायाला उंबऱ्यातूनच परत पाठवलं तर, तर या देशातला भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. मी तर म्हणेन वाल्याकोळ्याच्या बायकोचे पुतळे नाक्यानाक्यावर उभारावेत आणि तिची प्रतिमा घराघरातल्या देव्हाऱ्यात ज्या दिवशी पुजली जाईल त्या दिवशी या देशात रामराज्य येईल.

अर्थात हे एका भाबड्या कवीचं स्वप्न आहे. स्वप्न पाहणं हा कवीचा हक्कच आहे. आपल्या या प्राणप्रिय धर्मग्रंथाकडे अशाही दृष्टीकोनातून पाहण्याची सदिच्छा आपल्या मनात जागावी म्हणूनचं हे सारं पुर्वरामायण.

शब्दांना केवळ धार असून चालत नाही, त्यास सामाजिक आधार असावा लागतो. मन पाखरू पाखरू या उपहासगर्भ अभंगांतून, हवं तर विडंबन काव्यातून म्हणा आपण सर्व एक उत्कट काव्यानुभव घेतो. मला निवेदक म्हणून माझ्या मर्यादांची जाणीव आहे. कवी साहेबराव ठाणगे यांच्या कवितांवर मी बोलावं, भाष्य करावं इतका मला अधिकार निश्चितच नाही. मात्र कवीच्या मनाची तगमग आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी मी सेतू बांधण्याचा विनम्र आणि प्रामाणिक प्रयत्न करतो आहे.
G B Shaw says, “People are ready to die but they don’t change.” कवींच्या मते आपला देश तमाशाने बिघडला नाही वा कीर्तनाने सुधारलाही नाही. सततचे शिक्षण आणि प्रबोधनातुनच हा बदलाचा प्रवास शक्य आहे. Computer किंवा आपला Mobile सुद्धा काही काळानंतर format करावा लागतो तसं mind formating आवश्यक आहे.

निर्मळ, नितळ, crystal clear, आरपार असं आरसपाणी मन आपल्या व्यक्तिगत स्वास्थ्याबरोबरच समाजस्वास्थ्यासाठीही आवश्यक आहे. आयुष्य हे रडगाणं नसून ते एक जीवनगाणं आहे. गझलकार ए के शेख म्हणतात, “सुखाबरोबर दु:खाचाही सत्कार करूया, असे सहज हे आयुष्य अलवार करूया.” उदासी आणि नैराश्याचे मळभ दूर करून कवीच्या मनात एक उत्कट आशावाद आहे.

रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय, “कधीतरी नक्कीच उजाडेल. कवी जागल्याच्या भूमिकेतून नेहमी जागाच राहणार आहे.”
जाता जाता पाखरापासून सुरु झालेली मामांची कविता या प्रचंड आशावादी पाखराच्या कवितेपर्यंत पोहोचते.

माझ्या बाभूळबनात
एक चुकलं पाखरू,
सैरभैर वाऱ्यावर
वाट हुकलं पाखरू,
काट्याकुट्यांच्या रानात
फुल शोधीतं पाखरू,
आभाळाच्या फांदीवर
घर बांधीतं पाखरू,
काट्यासंग बाभळीच्या
झिम्मा खेळतं पाखरू,
हासे खेळे वरवर
आत जळतं पाखरू,
मुक्या पाखरूपणाची
जात टाकतं पाखरू,
पहाऱ्यात पारध्यांच्या
कात टाकतं पाखरू,
होता सांजवेळ दाट
सैरभैरलं पाखरू,
सरे उजेडाची वाट
मागे उरलं पाखरू,
एका श्रावणसरीची
वाट पहातं पाखरू,
पुन्हा होईल पहाट
जागं राहातं पाखरू,
जागं राहातं पाखरू,
जागं राहातं पाखरू..

मारूती शेरकर
9867708408