Friday, 28 December 2018

सोनू तुला शिकायचं नाय काय?


दुपारी अडीचची वेळ. इयत्ता सहावीत शिकत असलेल्या आरती या माझ्या विद्यार्थिनीच्या मागोमाग चालत मी तिच्या घरी पोहोचलो. घर कसलं? चिंध्या नी ताडपत्री वापरून केलेला तात्पुरता निवारा. बाहेर उजेड मात्र आत काळोख. मोबाईलच्या उजेडाने आत डोकावलं. साताठ वर्षांचा एक मुलगा गोवर ने सर्वांगावर फोड्या येऊन तापाने फणफणत होता. घायकुतीला आलेला, अंधारात मुटकुळी घालून पडलेला तो जीव बघून मन सुन्न झालं. तेवढ्यात त्या सहा मुलांचा बाप आपल्या दोन बायकांसह तेथे अवतरला. हे वडार समाजाचे कुटुंब कर्नाटकच्या बिदर भागातून इथे जगायला आलंय. बाळाच्या औषद पाण्याची चौकशी केली. ते म्हंटले उद्या देवीच्या नावानं लिंबाच्या पाण्यानं आंघोळ घातली की तो बरा होईल. मी तात्काळ सायन रुग्णालयातल्या ओळखीच्या डॉक्टरांना फोन करून मुलाच्या मेडिकल ट्रीटमेंटची व्यवस्था करून दिली. बाकी मुलांची चौकशी केली तेव्हा कळले की सगळीच मुले लिहिण्या-वाचण्यात अडचणी जाणवणारी. मात्र ही मुलं वरच्या वर्गात येत राहिली. खाण्यापिण्याची चौकशी करता कळले की सकाळी चहा बरोबर पाव किंवा ब्रेड खाऊन मुले शाळेत येतात. शाळेत यांना पोषण आहार मिळतो. संध्याकाळी शिळा भात वगैरे.. गरम चपाती यांना ठाऊकच नाही. आरतीचा जन्म दाखला नसल्याने शिक्षण हक्क कायद्यानुसार अंदाजे वय बघून गेल्या वर्षी तिला पाचवीत प्रवेश दिला. तसं पाहिलं तर ही अक्षरशत्रू मुलगी आहे. अबकड येत नसल्याने लिहिणं-वाचणं दूरच.

लिहिता-वाचता न येणारी मुलं वरच्या वर्गात येतातच कशी? 6 ते 14 वर्षे वयोगटातल्या मुलांचा मोफत शिक्षण हक्क कायदा आणि नो डीटेन्शन पॉलिसी. मग त्या त्या वर्गातील त्या-त्या विषयाची अध्ययन निश्चिती, क्षमता कशी तपासली जाईल? रेमेडियल टीचींग, उपचारात्मक शिक्षण, वरच्या वर्गाला जलदगती शिक्षण वगैरे. संकलित, सर्वंकष आकारिक मूल्यमापनाद्वारे चालण्या-बोलण्याला, अर्धवट वह्यांना सुद्धा गुण आहेत. हा काही त्यावरचा रामबाण उपाय नाही. ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातच नाही. वर पासून खालपर्यंत आपली शिक्षण व्यवस्था नापास झाली की काय?

ब्लेमगेम न करता आपण आपले ऑडिट करूया, नव्हे पोस्टमार्टम करूया. शिक्षक, प्रशासन आणि पालक सर्वांनाच अंतर्मुख होण्याची वेळ आलेली आहे. केवळ समाजाला आणि पालकांना दोष देण्यात काय अर्थ? जगण्याची धडपड प्रसंगी धुणी-भांडी सफाई कामगार असे हातावरचे पोट असलेले हे तळागाळातले लोक आपले पालक आहेत. शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्यांना परवडणारे शिक्षण उपलब्ध आहे. मात्र गोरगरिबांना आपलं मूल शिकावं ही जरी इच्छा असली तरी हे शिक्षण त्यांच्या अजेंड्यावर नाही. अनेक निरोप पाठवूनही पालक शाळेत शिक्षकांना भेटायला येत नाहीत. अशा वेळी शिक्षकांनी त्या पालकांपर्यंत पोहोचले पाहिजे. शास्तीच्या धास्तीमुळे नाही किंवा कोणाची शाबासकी मिळविण्यासाठी नव्हे. कुठला पुरस्कार मिळवण्यासाठी नव्हे तर केवळ आपल्या आंतरिक समाधानासाठी आपण हे करायला हवं. मुलांच्या अनुपस्थितीची कारणे शोधली पाहिजेत. हे बाळ पोटभर जेवलं की नाही? मुलाचं वर्गात शिक्षकांकडे लक्ष का लागत नाही? शरीराने वर्गात आणि मनाने आणखी कुठेतरी भकटण्याला attention deficiency म्हणतात. आणि अभ्यास करण्याची इच्छाच नसण्याला poverty of expectation म्हणतात. आपण त्यांचे प्रेरणास्रोत आहोत. त्यांच्यात नवी स्वप्नं आपल्याला रुजवायची आहेत. प्रेमाला पारखे असलेल्या ह्या मुलांचे मायबाप आपल्याला बनता आलं पाहिजे.

हे मूल शाळेत आलं पाहिजे, ते शाळेत टिकलं पाहिजे आणि हो ते शिकलं पाहिजे यावर प्रशासन ठाम आहे. प्रत्येक मूल वेगळं आहे. शिकण्याचा त्याचा वेग वेगवेगळा आहे. वस्तुस्थिती मात्र अतिशय विदारक आहे. अजिबात लिहिता-वाचता न येणाऱ्या मुलांपैकी काहीजण गतिमंद अथवा मतिमंद असू शकतात. त्यांना लर्निंग डिसेबलचा दाखला मिळवून देण्यासाठी डॉक्टरांकडे पाठवण गरजेचं आहे. शिक्षक शिकवतात. अधिकारी शाळांना भेट देतात. ऑन पेपर सगळं आलबेल आहे. मात्र वर्गनिहाय अध्ययन क्षमता प्राप्त न केल्याने ही मुलं जगाच्या आणि जगण्याच्या मुख्य प्रवाहात येत नाहीत. त्यासाठी रिझल्ट ओरिएंटेड काम होणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ प्रत्येक मूल लिहितं-बोलतं झालं, म्हणजे आपलं काम झालं असं नव्हे. तर घराघरातून आणि शाळाशाळांमधून चांगला संस्कार त्यांच्यावर होणे आवश्यक आहे.

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मी शिकवलेली काही मुलं अमेरिकेत आहेत. 1995 सालातली सुवर्णा कुऱ्हाडे या माजी विद्यार्थिनीने तोंडी परीक्षेचे मार्क नसतानाही इंग्रजी विषयात 90 गुण मिळवले होते. तिची गुणपत्रिका मी मुद्दाम सांभाळून ठेवली आहे. सध्या ती अमेरिकेत असते. तेव्हा तर बायोमेट्रिक अटेंडन्स नव्हता. लवकर येऊन आम्ही जास्तीचा वेळ मुलांना देत होतो. मी गेल्या 27 वर्षांपासून शिक्षकी पेशात कार्यरत आहे. काळ आणि परिस्थितीसापेक्ष बदलांना तोंड देता देता पुरती दमछाक होत आहे. चिडचिड न करता बदल सहज स्वीकारले तर अर्थात हा त्रास कमी होईल. बघूया काय ते..


- मारुती शेरकर (28/12/2018)

Friday, 7 December 2018

शाळा...!


न्यु इंग्लिश स्कूल, पारनेर ही माझी शाळा. १९८५ ची दहावीची बॅच. तीस पस्तीस वर्षांनंतर एका वर्गातले मित्र आता भेटू लागले आहेत. मित्रांचे चेहरे ठार बदललेले आहेत. आवाज बदलले आहेत. सर्वांचा तो निरागस लाजरा बुजरा चेहरा गायब होऊन शहाण्या माणसाचा मुखवटा बघून हसायला येतं. नव्वदीतले इंजिनियर्स, एम बी ए पदवीधारक आज मोठ्याच हुद्यावर आहेत. त्यात एखाद-दुसरा वाण्या-बामणाचा अथवा शिकलेल्या आई-बापाचा मुलगा असेल, बाकी सर्वजण शेतकऱ्याची मुले. मुले अशासाठी की दहावीपर्यंतच्या एकही मुलीचे नाव माझ्या आज स्मरणात नाही. एकतर मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी होते आणि ज्या शिकत होत्या त्यांच्याशी बोलणे होत नव्हते. दहावीपर्यंतचा पहिला टप्पा पार करणे आमच्यासाठी दिव्य होते. प्राथमिक शाळा घराजवळ होती. मात्र इयत्ता पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी रोजची काही मैल पायपीठ होती. तेव्हा पायाला चप्पल असण्याची ऐश नव्हती. काट्या-साराट्यांशी तेव्हा जवळचं नातं होतं. काटे-सराटे माझ्या पायाच्या वाट्याला फारसे गेल्याचे आठवत नाही. पण आता मात्र अनवाणी एक पाउलसुद्धा पडत नाही.

वायरच्या नाहीतर इनल्याल्या पिशवीत चार-दोन वह्या पुस्तकं कोंबायची आणि पाठीवर धोपटं टाकून निघायची स्वारी साळंला. आई निगुतीनं भाकरी कोरड्यास फडक्यात बांधून द्यायची. सकाळ-संध्याकाळ गुरंढोरं-वैरणकाडी-शेणपोटी अथवा खळ्या-दळ्यावर काम करावं लागे. शेतात औतकाठी हाकणं, न सांगता पडेल ते काम विना कुरकुर करायची सवय अंगवळणी पडली होती. ह्या संस्कारामुळे आजही कामं अंगावर ओढून घ्यायची सवय आहेच म्हणाना. त्या वेळेला खाण्याची भ्रांत असल्याने नवीन कपडे-चपला-सहली-गोळ्या-चॉकलेट ह्यांची बिलकुल आसक्ती नव्हती. त्या आई-वडिलांना मानाचा मुजरा आणि लाखो सलाम की त्यांना तशाही परिस्थितीत वाटलं की आपलं पोरगं शिकावं. शिकून साह्येब होत्याती हे त्यांना कळलं होतं. महाराष्ट्र साक्षर करणारे कर्मवीर अण्णा, महाराष्ट्राला प्रबोधित करणारे गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ही मायबाप थोर की ज्यांनी मराठी मनामनात शिक्षणाचं बीज पेरलं. ह्यांचे प्रेरणास्त्रोत ते जोती-सावित्री... आई-बापानी जन्म दिला पण ह्या महापुरुष मायबापांनी ओळख दिली. समृद्ध माणसाचं उच्चभ्रू राहणीमान-जीवनमान दिलं. म्हणून दोघांचेही ऋणाईत..

बोलत होतो माझ्या शाळेविषयी, न्यु इंग्लिश स्कूल-पारनेर ही तशी मोठी शाळा. पारनेरच्या बारा वाड्यांची मुले-मुली येथे शिकायला येत होती. त्यातल्या त्यात जमीनदारांच्या मुलांची थोडीफार मिजास होती. पण ते पुढील शिक्षणासाठी आमच्याबरोबर तग धरू शकले नाहीत. खात्या-पित्या घरची अनुकुलता त्यांच्या शिक्षणा आड आली. मात्र त्या काळात थोडं फार शिकलेल्यांची मुले आम्हा सगळ्यात पुढे राहिली.

पाचवी ते आठवीपर्यंत आमची शाळा माजी आमदार कॉम्रेड भास्करराव औटी यांच्या जुन्या वाड्यात भरत असे. वाड्यात तळघर होतं. मजबूत दगडी-लाकडी बांधकाम होतं. ह्या क्रांतिकारी-पुरोगामी आमदार महोदयांना भेटण्याचा योग आला नाही. पण त्यांचे सुपुत्र मा. प्राचार्य विद्याधर औटी यांच्याकडून वडिलांचे चरित्र वाचावयास-ऐकावयास मिळाले. आमदार असूनही ह्या माणसाचे साधेपण अचंबित करणारे आहे. आपलं राहातं घर शाळेसाठी उपलब्ध करून देणाऱ्या, आम्हाला लिहितं वाचतं करणाऱ्या ह्या महामानवास माझा लाल सलाम... पुढे मुलांची संख्या वाढल्याने पर्यायी जागा शोधली गेली. तिथे दगडी बांधकाम करून आधी पत्रा नंतर अलीकडे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. प्रसंगी हे दगड वाहण्याचे काम आम्ही केले आहे. वर्गासमोर झाडे लावली. डोक्याइतका खड्डा घेऊन आम्ही आपापल्या घरून शेणमाती आणून ते लावलेलं झाड आज बघणं हा अवर्णनीय आनंद आहे. तिथल्या आजच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हा इतिहास ठाऊक असण्याचे कारण नाही किंवा सांगण्याचाही अट्टाहास नाही. पण ही इमारत उभी करणारे मा. मुख्याध्यापक तांबे सर आणि त्यांच्या टीमसमोर नतमस्तक होणंच फक्त आपल्या हाती आहे.


इयत्ता पाचवीत आम्हाला तत्कालिन मुख्याध्यापक मा. शंकरराव नरसाळे इंग्रजी विषय शिकवत असत. बटू मूर्ती सरांना शिक्षकांसह सगळी शाळा घाबरायची. डोक्याएवढी उंच लाकडी पट्टी घेऊन सर वर्गात यायचे. आल्याबरोबर फळ्यावर समांतर रेषा आखायचे. कॅपिटल आणि स्मॉल एबीसीडी त्यावेळीच आमच्या काळजावर कोरली गेली ती कायमचीच. इंग्रजी-मराठी भाषेतला काना-मात्रा-उकार-वेलांटी त्यांनी अशी काही समजावून सांगितली होती की इयत्ता पाचवीत असूनही मी कोणताही मराठी शब्द इंग्रजीतून लिहू शकत होतो. इंग्रजी वाड़मयातून पुढील उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा मला नरसाळे सरांकडून मिळाली. ह्या इंग्रजीने माझ्या आयुष्याचे गणित सोडवले, माझे सोने करणारे ते नरसाळे सर..

गणपत अंबुले सर म्हणजे आईचं काळीज असणारा भला माणूस. स्थानिक असल्याने पालकांशी थेट संवाद. मुलांना बेण्याशिवाय हाक मारायचे नाहीत. त्यांच्या ठायी विद्यार्थ्यांप्रती विलक्षण तळमळ व कळवळ होती. शिकवायच्या ‘content’ पेक्षा, हे काय शिकायचं ह्यापेक्षा ‘का शिकायचं?’ याच्यावर त्यांचा अधिक भर होता. जीवाचं रान, रात्रीचा दिवस, प्रयत्नांची पराकाष्टा असले प्रेरणादायी शब्द त्यांच्याकडून हमखास ऐकायला मिळायचे. एका रात्री आम्ही चोरून तमाशा बघायला गेलो होतो, तोंडाला मफलर गुंडाळून आम्हा चोरांचा शोध त्यांनी लावलाच आणि दुसऱ्या दिवशी वर्गात त्यांच्या स्टाईलने त्यांनी आमचा समाचार घेतला होता.

पिंपरकर सर मराठी शिकवायचे. फार मनस्वी माणूस, जणू प्रति साने गुरुजी. त्यांच्या सांगण्यावरून इयत्ता सातवीत असताना श्यामची आई ही कादंबरी सलग वाचल्याचे आठवते. पुढच्या वर्गांसाठी त्यांची जागा भापकर मॅडम आणि अच्युतराव जगदाळे यांनी तितक्याच समर्थपणे चालवली. संपत औटी सरांनी इंग्रजी भाषेतील ‘to be’ ची रूपे असोत वा इंग्रजी व्याकरण असो, कसे शिकावे याचा वस्तुपाठ आमच्यासमोर ठेवला. भापकर मॅडम आणि संपत औटी सर अकाली निवर्तल्याचं कळलं, खूप वाईट वाटलं. व्यवसाय मार्गदर्शनाचे प्रशिक्षण घेऊन आलेले इंग्रजी भाषेचे शिक्षक गंगाधर रोहोकले सर यांचाही दरारा मोठा होता. त्यांचा मोठा मुलगा सुनील हा माझा वर्गमित्र. तो सध्या Ask Group चा सीईओ / एमडी आहे. यापूर्वी तो ICICI बँकेचा जनरल मॅनेजर होता. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला हा पठ्या थेट अमेरिकेच्या बहुचर्चित फोर्ब्स मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकला आहे. सलाम त्याच्या प्रवासाला.. आम्हाला गजरे सर गणित शिकवायचे. त्यांचा मुलगाही ह्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा विद्यार्थी. हा विकास गजरे IAS अधिकारी झालाय. अशी मोठी परंपरा शाळेला लाभली आहे. आबा गाडगे सर ही गणित शिकवायचे. गणित आणि इंग्रजीच्या सरांची मोठीच दहशत होती. त्यांच्या सावलीलाही आम्ही फिरकायचो नाही. दिनकर झावरे सर आणि खिलारी सर ह्या टाकळीकर सरांचेही आम्ही ऋणाईत आहोत.

हा शिक्षक वृंद पारनेरमध्येच वास्तव्यास असे. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर ही शिक्षक मंडळी हॉलीबॉल खेळायची. खरं म्हणजे हा स्टाफ अगदीच sporty आणि ignited होता. दहावीच्या विद्यार्थ्यांना रोज संध्याकाळी ६ ते ९ अशी तीन तास स्टडी सर्कल असायची. एका बेंचवर एकंच विद्यार्थी बसत असे. कुणीही सुपरव्हायजर नसायचे. ही शिक्षक मंडळी त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे पायाचा आवाज न करता हळूच डोकावून जायचे. काही शिक्षक मागच्या बाजूने खिडकीतून नजर ठेवायचे. विद्यार्थी-शिक्षक सारेचजण झपाटलेले होते.

माध्यमिक शिक्षण म्हणजे घडणं किंवा बिघडणं. या जडणघडणीच्या काळात आम्ही ह्या गुरुजनांमुळे खऱ्या अर्थाने घडलो. त्या काळात मैदानी खेळ, वार्षिक स्नेहसंमेलन ही तितक्याच उत्साहाने होत होते. आम्हा विद्यार्थ्यांनाही त्या काळातलं दुर्मिळ असं बुंदीचं जेवण शाळेनं आम्हाला दिलं होतं. थोर क्रांतिकारक सेनापती बापट ह्यांच्या जन्मस्थळी स्मारक उभारण्यात आलं होतं. त्या ठिकाणी थोर महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या होत असत. मी माझ्या Public speaking ची ABCD तिथेच गिरवली. दाटीवाटीत पण शिस्तीत मुलं त्या हॉलमध्ये बसत असत. वक्तृत्व स्पर्धा वगैरे वरचेवर होत असत. बऱ्याचदा विनायकनाना औटी कार्यक्रमाचे अध्यक्ष असत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला अगदी जोशात मिरवणुका निघायच्या, ऊर भरून यायचा. आमचा गणवेश खाकी हाफ पॅन्ट, पांढरा हाफ सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी. रोज परिपाठाला वर्गनिहाय रांग असायची. मास पीटीचे सातपुते सर ही किमया करायचे. अर्थात ते सर्वांचं टीमवर्क होतं.


तेव्हा 'शिक्षण हक्क कायदा' नव्हता, 'सर्व शिक्षा अभियान' नव्हतं, सो कॉल्ड 'ज्ञानरचनावाद' नव्हता, शाळा डिजिटल नव्हती, ऑनलाईनची भानगड नव्हती. पण खरं सांगू शाळेत माझ्या ‘जीवन शिक्षण’ मिळत होतं. त्या संस्कार शिदोरीच्या सहाय्याने आम्ही यशवंत झालो, गुणवंत झालो. त्या शाळेला, त्या गुरुजनांना, त्या भारलेल्या दिवसांना मनोभावे साष्टांग दंडवत.

- मारुती शेरकर