Monday, 6 April 2020

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी आणि माझे मामा साहेबराव ठाणगे यांना वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा..!


“जगण्यासाठी शोधल्यास तू
किती सुखाच्या वाटा,
काढलास का कधी कुणाच्या
पायामधला काटा?”

कुणाच्या पायामधला काटा काढण्याने आपण सुखाच्या वाटेवर येऊन पोहोचतो. त्यासाठी तीर्थाटने, उपासतापास आणि अनेक मांडवाखालून जाण्याची गरज नाही. असा सर्वांना समजेल उमजेल असा रोखठोक विचार कवितेतून व्यक्त करणारे कवी साहेबराव ठाणगे. सध्या महाराष्ट्र टाईम्स दैनिकातील वाचकप्रिय सगुणनिर्गुण या सदराचे लेखक आहेत. अवघं मराठीजगत त्यांना वाचत आहे..

तुकोबांच्या अभंगांप्रमाणे, जोतीबांच्या अखंडाप्रमाणे अतिशय उपहासगर्भ आणि अर्थपूर्ण त्यांच्या रचना मराठी मनांची मशागत करत आहेत. मूलतः संवेदनशील मनाच्या या कवीने आणखीही खूप सारी साहित्यसंपदा आपल्याला दिलेली आहे. १९८८ साली मा. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पहिलावहिला वेदना-संवेदना हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. नंतर सैरभैर, कवितारंग, पाऊसपाणी असे अनेक उत्तमोत्तम काव्यसंग्रह त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. ह्या सर्व कवितांचे नवनीत घेऊन ‘मन पाखरू पाखरू’ हा त्यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्रभर खूप गाजत आहे.

साहेबराव ठाणगे आपल्या खास शैलीत गाऊन कविता सादर करतात. त्यांचं दोन शब्दांमधलं, दोन पंक्तीमधलं विश्लेषण ऐकणं म्हणजे तुकोबांच्या अभंगांचे, जोतिबांच्या अखंडांचे निरुपण ऐकल्याची अपूर्व प्रचीती येते.

मुंबई बँकेत सरव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले साहेबराव ठाणगे. ज्यांच्या नावातच साहेब आहे. आईवडिलांनी ठेवलेलं साहेब हे नाव त्यांनी आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाने अगदी सार्थ करून दाखवलं आहे. बँकेत उच्चपदस्थ असताना कोटींच्या आकडेवारीचा हिशेब मांडत असताना मॅनेजरच्या खुर्चीतल्या पांढऱ्या स्वच्छ टर्कीस टॉवेलचा दर्प, अहंकार त्यांनी कधी स्वतःला शिवू दिला नाही. आकड्यांशी व्यवहार करत असताना आपल्या मातीला, माणसांना वाचणं त्यांनी कधी थांबवलं नाही.

पारनेरच्या दुष्काळी भागातील करंदी गावातून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत हे इवलंस पाखरू मुंबईच्या दिशेला झेपावलं. मनातल्या मनात आजूबाजूच्या विषण्ण परिस्थितीने आजही हे पाखरू अस्वस्थ राहातं. माणसांचं अवघं आयुष्य त्यांच्या सुखदु:खासह कसं सार्थकी लागेल याचा विचार ते सदोदित करत असतं. वेदनेला वाणी मिळाली, भावनांच्या कल्लोळाला शब्दांचे धूमारे फुटले आणि कवितेबरोबर इतरही साहित्याचा ठेवा त्यांनी आपल्याला सुपूर्द केला. मनातल्या मनात, खेळखंडोबा, उजेडाच्या वाटा अशा अतिशय विचारप्रवण साहित्यरचना त्यांच्या नावावर आहेत. २०१२ साली डिंपल प्रकाशनातर्फे त्यांच्या ‘उजेडाच्या वाटा’ या व्यक्तिचित्र संग्रहाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी कवयित्री नीरजा, रामदास फुटाणे (नाना), फ. मु. शिंदे, अशोक बागवे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे अशी बरीच दिग्गज मंडळी मुंबईतील दादरच्या धुरू हॉलमध्ये हजर होती. कवितांच्या गावा जावे, कवितारंग असे कार्यक्रम ते एकत्र करत असत. या कार्यक्रमात मी सुत्रसंचालन केले होते. नानांनी या प्रसंगी सुचवलं की, साहेबराव तुम्ही गाऊन कविता सादर करताना जरा पॉज घेत चला.. आणि हा सूत्रसंचालक तुमच्या ‘मन पाखरू पाखरू’ या कार्यक्रमात निवेदन करेन. बघा तुम्ही दोघेजण एकत्र हा कार्यक्रम करून. सायबामामांनी त्यांना सांगितले की हा निवेदक माझा भाचा आहे. आम्ही हा कार्यक्रम करू. काही दिवसांतच वाशी, नवी मुंबईच्या साहित्यमंदिरात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मन पाखरू पाखरू’ हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम म्हणजे उत्कट काव्यानुभव, अस्सल जीवनानुभव आहे. किंबहुना प्रबोधनाचा जागर आहे. त्यामुळे श्रोत्यांना हा कार्यक्रम जरा जड वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यात रंजनाला फारच कमी जागा आहे. बहिणाबाई मानवी मनाविषयी जसं लिहितात,

“मन पाखरू पाखरू,
त्याची काय सांगू मात ,
आता व्हतं भुईवर,
गेलं गेलं आभायात ..
मन जह्यरी जह्यरी ,
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू साप बरा ,
त्याले उतारे मंतर ”

‘मन पाखरू पाखरू’ हा कार्यक्रमच मुळी बहिणाबाईंच्या भाषेत बोलायचं झालं तर, “माणसा माणसा कधी व्हशील रे तू माणूस..” हा विचार यथाशक्ती पुढे नेण्याचा कवीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मानवी मन अशी एक अजब आणि अनाकलनीय भानगड आहे की जी आजतागायत संत, विचारवंत, तत्वज्ञ इतकंच काय मनोवैज्ञानिकांनाही पुरून उरलेली आहे. सर्वजण हतबल आहेत. ही कवी मंडळी मनावरचे तरंग शब्दांद्वारे अचूक टिपतात. ज्याप्रमाणे हजार शब्दांत जे सांगता येणार नाही ते एखादा चित्रकार एका चित्रातून बोलून जातो. प्रसंगी परकाया प्रवेश करून ही कवी मंडळी स्वतःबरोबरच इतरांच्या भावभावना शब्दबद्ध करतात. उगीच नाही कवींना शब्दसृष्टीचे ईश्वर म्हटलं जातं. त्यांच्या संवेदनशील मनातील सहानुभूती आणि समानुभूती (sympathy and empathy) कागदावर उमटते आणि तो अनुभव वाचकाला आपला वाटायला लागतो. मग ती कविता कवीची राहात नाही ती रसिक वाचकांची होऊन जाते. कवी सूक्ष्म निरीक्षण करत असतो. त्याच्या चष्म्याचा नंबरही इतरांपेक्षा वेगळा असतो. आजूबाजूच्या विषण्ण परिस्थितीने तो मनातल्या मनात अस्वस्थ असतो. जगण्याच्या धबडग्यातल्या साध्या साध्या गोष्टींकडेही कवी कुतूहलपूर्वक पाहतो. विलियम वर्ल्डस्वर्थ म्हणतो की, “Poetry is a spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility”.. प्ल्युटो तर याहीपुढे जाऊन म्हणतो की प्रेमाचा परीसस्पर्श कवी होण्यासाठी पुरेसा आहे. या सर्व भावभावनांचा कल्लोळ कवितेतून व्यक्त होत असतो. साहीर लुधियानवी या शायरनं म्हटलंय,

“जिंदगी एक सुलगतीसी चिता है साहीर,
शोला बनती है, न ये बुझके धुवॉ होती है”

कवी साहेबराव ठाणगे यांच्या कवितांमधून सुद्धा माणसाचं अवघं आयुष्य त्याच्या सुखदु:खांसह कसं सार्थकी लागेल याचं विवेचन आपल्याला पाहायला मिळतं.

“पोरकच मन माझं,
सदा बिच्चारं बिच्चारं ,
मेली मन माणसांची,
हाच विच्चार विच्चार”

विचारी मन अस्वस्थ असतं. माणूस आणि माणुस'की' जिवंत राहावी हाच काय तो विचार त्यांच्या मनात असतो. सायबामामा वयाच्या विशीपर्यंत गावाला राहिल्याने मुंबईत पन्नास वर्षे राहूनही त्यांच्या मनातलं गाव त्यांच्या मनात लख्ख घर करून राहिलेल आहे आणि ते ग्रामीण जीवन हाच त्यांच्या विचारांचा गाभाघटक राहीला आहे. ‘देव’ नावाची त्यांची एक अप्रतिम कलाकृती आहे. श्रमावर विश्वास ठेवणारा भोळाभाबडा शेतकरी गेला तर जातो पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीला, नाहीतर नारायणगावच्या विठाबाईच्या बारीला.. आपल्या शेतात, श्रमात आणि घामातच देव शोधणारा शेतकरी आपल्या देवाची कशी पूजा करतो हे सांगताना ते लिहितात,

“देव आहे किंवा नाही।
कुणी पहिले देवाला।
सेंदराच्या दगडाचा।
उभा आधार गावाला।।
देव बैल गुरं गाई।
देव जन्मदाती आई।
तिच्या पुण्याईची सर।
खुद्द देवालाही नाही।।
देव असो किंवा नसो।
माझे शेत औक्षवंत।
बीजातून रोज नवा।
उगवेल भगवंत।।”

पण गावाकडे रामराज्याची, लोकसंस्कृतीची वेगाने उसवण होताना दिसत आहे. ज्या गावातल्या मंदिरातून भल्या सकाळी काकडआरतीचा गजर कानावर यायचा, गावाच्या आडाच्या रहाटावरून काकणभरल्या हातांचा पाणी शेंदण्याचा आवाज यायचा, तालमीत पहिलवानांच्या घुमण्याचा आवाज यायचा, सुखदु:खात सारा गाव एक व्हायचा, पण आज काय परिस्थिती आहे? जग बदलतंय, माणसं बदलतायत, सारच्या सारं भवताल वेगाने बदलत आहे. फक्त हा बदल विधायक, रचनात्मक असायला हवा. मात्र तसा होताना दिसत नाही. जागतिकीकरण, खुले आर्थिक धोरण, वाढता चंगळवाद आणि नवनव्या अंधश्रद्धांमुळे साधेभोळे शेतकरीही बुवा बापूंच्या चरणी लीन होताना दिसत आहेत. खरंखुरं शिक्षण आणि प्रबोधनापासून वंचित असलेली खेडी, गाव प्रचंड वेगाने बदलत आहेत. माझा गाव या कवितेत साहेबराव ठाणगे यांनी या परिस्थितीचे अगदी समर्पक वर्णन केले आहे.

हरवला माझा।
गवताचा गाव।
साधा भोळा भाव।
माणसांचा।।
कुलदैवतांचा।
आंधळा अंगारा।
नात्यांचा निवारा।
देशोधडी।।
अर्धपोटी बाप।
उपाशीच मेला।
तालुका जेवला।
दहाव्याचे।।
तालमीचे जागी।
बियरचे बार।
पैलवान पोरं।
फेसाळली।।
बांधली देवळे।
उंच ती केव्हढी।
स्वर्गालाच शिडी।
लावियेली।।
किती केली तीर्थ।
पोथी पारायणं।
तरी नारायण।
भेटेचिना।।
असे कसे झाले।
टरफलाचे धनी।
दाणे नेले कोणी।
हातोहाती।।
चालतात सारी।
अंधाराची वारी।
कोण यास तारी।
पांडुरंगा।।

राजकीय आणि सामाजिक बदल झाले. हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वराज्यात आजही आपण सुराज्यासाठी चाचपडतो आहोत. सत्तर वर्षांची झाली आपली लोकशाही. काय गत झालीय आपल्या लोकशाहीची? स्वातंत्र्याचं वय वाढत असताना सर्वसामान्यांचे भय सुद्धा वाढतेच आहे. बेरोजगारीने आणि महागाईने घराघराचं अर्थशास्त्र मोडीत काढले आहे. लोकशाही या लावणीतून हे विदारक चित्र साहेबराव ठाणगे यांनी आपल्यासमोर मांडलं आहे.

वरती फेटा बांधता बांधता,
खालती धोतर सुटतंय राव।
लोकशाहीचं मायंदळ पाणी,
मधल्यामधेच आटतंय राव।।
उडदामाजी काळं-गोरं,
सुक्यात वल्लबी पेटतंय राव।
रक्ताचं पाणी करणार कोणी,
एखादं येडं भेटतंय राव।।

पूर्वी समाजकारणासाठी राजकारणाचा आधार घ्यावा लागायचा. आता मात्र सेवाभाव संपून राजकारण जणू धंदा झाला आहे. झटपट श्रीमंत होऊन पुढच्या अनेक पिढ्यांची सोय करण्याच्या या धंद्याचे तरुण पिढीलाही आकर्षण वाटू लागले आहे, राजकारणातल्या या पांढऱ्या कावळ्यांविषयी कवी साहेबराव ठाणगे म्हणतात.

“अंडील गोऱ्ह्यांचा।
धाब्यावर दंगा।
क्वाटरची गंगा।
ओसांडली।।
स्कॉर्पियो सफेद।
सफेद्च वेश।
शुभ्रतेचा फेस।
अंगोपांगी।।
भाऊचा हो दादा।
दादाचा साहेब।
गरिबी गायब।
एकाएकी।।
पुढाऱ्यांच्या मागे।
पेंढारी पांढरे।
भाड्याची मेंढरे।
जमलेली।।”

या विषण्ण परिस्थितीतही कवीचा आशावाद टिकून आहे. डाकू वाल्याकोळीचा रामायणकर्ता वाल्मिकी ऋषीपर्यंतचा प्रवास सर्वांना ज्ञात आहे. वाल्याकोळी जंगलात दबा धरून बसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटायचा. त्यासाठी त्यांचे खूनही पाडायचा. अशा लुटमारीत मिळवलेली संपत्ती, पैसाअडका आपल्या पत्नीकडे द्यायचा. तीही त्याचा योग्य हिशेब ठेवायची. वाल्याकोळ्याने एक माणूस मारला की ती एका मोठ्या रांजणात एक दगड टाकायची. असं वर्षानुवर्षे चाललं होतं. वाल्याकोळ्याने असे बरेच पापाचे रांजण भरले होते. एकदा त्या जंगलातून नारदमुनी मुखानं ‘नारायण नारायण’ म्हणत चालले असता वाल्याकोळ्याने त्यांना अडवलं. त्यांच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालणार तोच त्याला अडवून नारदमुनी म्हणाले, “थांब आधी मला सांग. तू जे कर्म करीत आहेस त्यात तुझी पत्नी वाटेकरी आहे काय? ते तिला आधी विचारून ये. तो पर्यंत मी इथेच थांबतो आणि तुझ्या पापात ती सहभागी असेल तर मग मला खुशाल मार.” वाल्या धावतच घरी येतो आणि बायकोला विचारतो, “मला खरं सांग मी करीत असलेल्या या पापात तू सहभागी आहेस की नाही?” दरोडेखोर वाल्याच्या त्या अडाणी बाईने जे सडेतोड आणि मर्मभेदी उत्तर दिले त्या एका ‘नाही’ या शब्दाने वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि त्याने पुढे रामायण लिहिले. वाल्याकोळ्याची ही गोष्ट अगदी साधी वाटते. पण असा विचार करा की वाल्याच्या ह्या बायकोने “होय मी तुमच्या पापात वाटेकरी आहे” असं उत्तर दिलं असतं तर? तर वाल्या उड्या मारतच नारदाजवळ पोहोचला असता आणि त्यानं नारदाचं शीर धडावेगळं केलं असतं. पण तसं झालं नाही. वाल्याच्या त्या अशिक्षित, अडाणी बायकोच्या एका सडेतोड उत्तरामुळे वाल्याकोळ्याचे डोळे खाडकन उघडले. त्याने नारदाचे पाय धरले. नारदाने त्याला दीक्षा दिली. त्याने बारा वर्षे जप केला आणि वाल्याकोळी नावाच्या एका क्रूरकर्मा दरोडेखोराचा थोर वाल्मिकी ऋषी झाला. कशामुळे तर बायकोच्या एका बाणेदार उत्तरामुळे. नाहीतर कसला वाल्मिकी आणि कसले रामायण.

रामायणाला आपण आपला आदर्श ग्रंथ मानतो त्याची पारायणं करतो आणि आदर्श पती-पत्नी म्हणून राम-सीतेकडे पाहतो. मात्र हे सर्व ज्या एका स्त्रीच्या सडेतोड आणि निर्भीड, सत्य उत्तरामुळे घडले त्या रामायणकर्त्या वाल्याकोळ्याच्या बाणेदार बायकोला आपण विसरूनच गेलो आहोत. इतकंच काय तिचं नाव काय होत? तिचं पुढं काय झालं? याचाही आपण तपास केला नाही. माझ्या मते एकवेळ आज आपण सर्व रामायण विसरलो तरी चालेल, पण लक्षात ठेवलं पाहिजे त्या वाल्याकोळ्याच्या धाडसी बायकोच्या उत्तराचा.. देशात आज बोकाळलेला भ्रष्टाचार आणि पावलोपावली लाचखोरी करणारे आधुनिक वाल्याकोळी आपण पाहतो. मात्र या दरोडेखोरांच्या घरी वाल्याच्या बायकोसारखी सडेतोड गृहिणी मात्र सापडत नाही. एव्हढंच काय वाल्याकोळ्याच्या या आधुनिक बायकाही नवऱ्याच्या बरोबरीने लाचखोरीची वाटमारी करू लागल्या आहेत. पगाराचे दिवस नसूनही नवऱ्याने घरी आणलेली नोटांची पुडकी पाहून या वाल्यांच्या आधुनिक मिसेस लगेच ज्वेलरच्या दुकानात पळायची तयारी करतात. आपल्या लाचखोर नवऱ्यासमोर कौतुकाची आरती ओवाळतात. समजा या देशातल्या घरोघरच्या गृहिणींनी आपापल्या नवऱ्यांना “मी तुमच्या पापात सहभागी नाही” असं ठामपणे सांगितलं आणि पापाचा पैसा आणणाऱ्या पतीरायाला उंबऱ्यातूनच परत पाठवलं तर, तर या देशातला भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. मी तर म्हणेन वाल्याकोळ्याच्या बायकोचे पुतळे नाक्यानाक्यावर उभारावेत आणि तिची प्रतिमा घराघरातल्या देव्हाऱ्यात ज्या दिवशी पुजली जाईल त्या दिवशी या देशात रामराज्य येईल.

अर्थात हे एका भाबड्या कवीचं स्वप्न आहे. स्वप्न पाहणं हा कवीचा हक्कच आहे. आपल्या या प्राणप्रिय धर्मग्रंथाकडे अशाही दृष्टीकोनातून पाहण्याची सदिच्छा आपल्या मनात जागावी म्हणूनचं हे सारं पुर्वरामायण.

शब्दांना केवळ धार असून चालत नाही, त्यास सामाजिक आधार असावा लागतो. मन पाखरू पाखरू या उपहासगर्भ अभंगांतून, हवं तर विडंबन काव्यातून म्हणा आपण सर्व एक उत्कट काव्यानुभव घेतो. मला निवेदक म्हणून माझ्या मर्यादांची जाणीव आहे. कवी साहेबराव ठाणगे यांच्या कवितांवर मी बोलावं, भाष्य करावं इतका मला अधिकार निश्चितच नाही. मात्र कवीच्या मनाची तगमग आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी मी सेतू बांधण्याचा विनम्र आणि प्रामाणिक प्रयत्न करतो आहे.
G B Shaw says, “People are ready to die but they don’t change.” कवींच्या मते आपला देश तमाशाने बिघडला नाही वा कीर्तनाने सुधारलाही नाही. सततचे शिक्षण आणि प्रबोधनातुनच हा बदलाचा प्रवास शक्य आहे. Computer किंवा आपला Mobile सुद्धा काही काळानंतर format करावा लागतो तसं mind formating आवश्यक आहे.

निर्मळ, नितळ, crystal clear, आरपार असं आरसपाणी मन आपल्या व्यक्तिगत स्वास्थ्याबरोबरच समाजस्वास्थ्यासाठीही आवश्यक आहे. आयुष्य हे रडगाणं नसून ते एक जीवनगाणं आहे. गझलकार ए के शेख म्हणतात, “सुखाबरोबर दु:खाचाही सत्कार करूया, असे सहज हे आयुष्य अलवार करूया.” उदासी आणि नैराश्याचे मळभ दूर करून कवीच्या मनात एक उत्कट आशावाद आहे.

रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय, “कधीतरी नक्कीच उजाडेल. कवी जागल्याच्या भूमिकेतून नेहमी जागाच राहणार आहे.”
जाता जाता पाखरापासून सुरु झालेली मामांची कविता या प्रचंड आशावादी पाखराच्या कवितेपर्यंत पोहोचते.

माझ्या बाभूळबनात
एक चुकलं पाखरू,
सैरभैर वाऱ्यावर
वाट हुकलं पाखरू,
काट्याकुट्यांच्या रानात
फुल शोधीतं पाखरू,
आभाळाच्या फांदीवर
घर बांधीतं पाखरू,
काट्यासंग बाभळीच्या
झिम्मा खेळतं पाखरू,
हासे खेळे वरवर
आत जळतं पाखरू,
मुक्या पाखरूपणाची
जात टाकतं पाखरू,
पहाऱ्यात पारध्यांच्या
कात टाकतं पाखरू,
होता सांजवेळ दाट
सैरभैरलं पाखरू,
सरे उजेडाची वाट
मागे उरलं पाखरू,
एका श्रावणसरीची
वाट पहातं पाखरू,
पुन्हा होईल पहाट
जागं राहातं पाखरू,
जागं राहातं पाखरू,
जागं राहातं पाखरू..

मारूती शेरकर
9867708408

No comments: