Saturday, 30 May 2020

तराळवाडी माझी संस्कारशाळा


तराळवाडी माझी संस्कारशाळा वाडी, माझी तराळवाडी.. तिथली माती, ज्या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे कारण जन्मल्यानंतर माझी नाळ त्या मातीत पुरलेली आहे. त्या मातीची ओढ मला आहे, त्याहीपेक्षा तिथल्या माणसांची अनिवार ओढ माझ्या मनात सदोदित असते..

इथली भजन परंपरा, वडीलधाऱ्यांचे संस्कार आणि आशीर्वाद संस्मरणीय आहेत. आदरणीय काकांचे कीर्तन श्रवणीय असायचेच आणि आजूबाजूला घडणाऱ्या वास्तवतेचे भान देणारे वाटायचे. स्वर्गीय टेलरमामांचा भजनकीर्तनातील आलाप तर भीमसेन जोशींपेक्षा बिलकुल कमी नव्हता. अवघ्या वाडीचे अण्णा म्हणजे स्वर्गीय गणपतअण्णा. त्याकाळात वर्तमानपत्र वाचणारा आणि रेडिओवरून आकाशवाणीच्या बातम्या ऐकणारा वाडीतला हा एकमेव माणूस. रेडिओवरून संध्याकाळच्या सातच्या बातम्या ऐकायला आम्ही संध्याकाळी त्यांच्याकडे जात असू. वाडीचा जगाशी संबंध तो फक्त या बातम्यांपुरता असायचा.. घरात येणाऱ्या आबालवृद्धांचा अण्णांनी कधी तिरस्कार केला नाही. ह्या साऱ्या गोष्टींचं आजमितीला खूप नवल वाटत आहे. ही सारी शिदोरी आयुष्यभर सोबत राहील.

कधीकाळी पायाला चप्पल मिळावी याची आस होती. धोंडीभाऊ चांभारांकडे बलुतं असूनही वडिलांनी त्यांच्याकडे चपलेची सुद्धा कधी मागणी केली नाही. कुणाकडे काही मागणं हे माझ्या वडिलांना आयुष्यभर जमलं नाही. खळ्यावर जमा केलेले त्यांचे ज्वारीची पाचुंदे बैलगाडीतून अनेकदा त्यांच्या घरी पोहोचवले होते. त्यांच्याकडून दहावीला असताना ती चप्पल मला कधीकाळी मिळाली. पावसाळ्यात मनकर्णिका नदीला पूर आल्यानंतर शंकरभाऊ मांग यांच्याकडे एकदा वस्तीला राहिलेलं आठवतय. वाडीतले किसनमामा सोनावणे दिवाबत्ती करायचे. गावकीचा काही निरोप सांगायचे, कोणाच्या काही कार्यक्रमाच्या वेळी लाकडे फोडून द्यायचे. अंगात शर्ट नसलेल्या घामेजलेल्या ह्या भल्या माणसामधे मला गाडगेबाबा दिसतात. खरंतर ही सारी मंडळी खळ्यादळ्यावर,घरीदारी एकत्र भेटायची. सुखदुःखाची देवाण-घेवाण व्हायची. हा सर्वधर्मसमभाव माझ्या मनात रुजला, मला वाटतं हे संस्कार फार महत्त्वाचे आहेत.

कॉलेजला जाण्यासाठी सायकल मिळावी ही सुद्धा इच्छा पूर्ण झाली ती केवळ माझ्या थोरल्या भावामुळे. खोपोलीला सायकलच्या दुकानात मेकॅनिक म्हणून ते काम करत असत. नादुरुस्त सायकलींचे वेगवेगळे स्पेअरपार्टस एकत्र करून एक छानशी सायकल त्यांनी माझ्यासाठी तयार केली आणि पारनेरला येणाऱ्या एसटी गाडीच्या टपावरून ती घेऊन आले. पुढे पारनेरमधूनच ती सायकल चोरीला गेली तो भाग अलाहिदा. खरंतर सगळं लिहायचं म्हटलं तर एक लघुकादंबरी होईल, बघू पुढे केव्हातरी लिहू सविस्तर. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून जगण्यासाठी, अधिक समृद्ध जगण्यासाठी किंबहुना जग आणि जगणं समजून घेण्यासाठी गाव सोडणे क्रमपात्र होते. या मुंबई महानगरीमध्ये मोठमोठ्या सभागृहांमध्ये ऐकण्या-बोलण्याचा योग आला.. त्याची बीजे या गावच्या मातीत फार पूर्वीच पेरली गेली होती.

वाडीच्या आपल्या एकमेवद्वितीय अशा दक्षिणमुखी मंदिरासमोर कितीतरी वेळा हरिपाठ रंगात यायचा आणि घामानं कपडे ओले व्ह्यायचे. स्वर्गीय शिवाजीराव तराळ यांनी आम्हाला लेझीम शिकवला. त्याद्वारे नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचे धडे वाडीतच लहानपणी मिळाले. कितीतरी वेळा भजन कीर्तनाचा सुमधुर अशा नामस्मरणाचा आस्वाद घेतला असेल, श्रावणी सोमवारी मंदिरातले पोथीचे पारायण ऐकले असेल, महिलांचं पारंपरिक गीतांसह फेर धरने असेल.. अशा अनंत आठवणी डोळ्यासमोर तरळतात. तो नादमधुर आवाज कानात रुंजी घालतो. ह्या सार्‍या आठवणींची विण म्हणजे सुंदर फॅब्रिक आहे. हा गावगाडा आणि रामराज्य आयुष्यभर प्रेरणा देत राहील. धन्यवाद..

मारुती शेरकर..

No comments: