Saturday, 15 October 2022

 वाचन प्रेरणा दिन..

आज १५ ऑक्टोबर.


जगद्विख्यात शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन, भारताचे माजी महामहीम राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती.. मोठी माणसं तीच असतात की जी इतर सामान्य लोकांना मोठं बनवतात, देशाला मोठं नाव मिळवून देतात. कलाम साहेबांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या निर्णयानुसार आज देशभर अतिशय उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा होत आहे.


मुळातच आपण भारतीय लोक फार उत्साही असल्याने खूप सारे दिन आपण साजरे करतच असतो, सो वन मोअर दिन अथवा एक इव्हेंट म्हणून वाचन प्रेरणा दिनाकडे आपल्याला पाहता येणार नाही. वाचन चळवळ रुजविण्यासाठी खरंतर परिवर्तनाच्या वाटेवर येण्यासाठी हा क्रांती दिवस ठरावा.. घडत्या वयात एखादं पुस्तक आपल्याला आंतरबाह्य  बदलवू शकते. आपल्याला संविधान देणाऱ्या भारतरत्न बाबासाहेबांना त्यांच्या केळुसकर गुरुजींनी लहानपणीच बुद्ध चरित्र वाचायला दिलं होतं. महात्मा फुल्यांना थॉमस पेन लिखित द राइट्स ऑफ मॅन या पुस्तकाने वैचारिक दिशा दिली होती. महात्मा गांधींना सत्याग्रह, असहकार आणि अहिंसेची प्रेरणा हेन्री थोरो लिखित सिव्हिल डीसओबिडीयन्स, जॉन रस्किन यांच्या अनटू धिस लास्ट या आणि अशा पुस्तकांतून मिळाली होती.. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील तूर्तास आणखी एकच, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे आपल्याला केवळ पारायण करून चालणार नाही तर ज्ञानेशांची एक तरी त्यातील ओवी अनुभवावी लागेल, जगावी लागेल..


मित्रहो, देश घडवण्यासाठी आधी माणूस घडवावा लागेल. वाचन, अभ्यास आणि विधायक कृतीकार्यक्रमांद्वारे माणूस, पर्यायाने समाज घडत असतो.. वाचन - विचार - विश्लेषण ही त्रिसूत्री निर्णायक ठरते. वाचन का? या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर काय वाचावे हा प्रश्न उरत नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणतात, गुरं सुद्धा चांगल्या रानाकडं चरायला वळतात. 


वाचनातून सुखाचा शोध लागेल न लागेल पण स्वतःचा शोध मात्र जरूर लागेल. वाचनाद्वारे स्वतःची स्वतःला नव्याने ओळख होतेच पण ओळखीच्या माणसांची सुद्धा आपल्याला नव्याने ओळख होत असते. सोहम कोहम असल्या जड भानगडीत न पडता आपण एक निसर्गसुलभ माणूस आहोत अशा माणूसपणाची ओळख  वाचनाद्वारे होईल. जग आणि जगणं कळण्यासाठी चिकित्सा, कुतूहल, प्रश्न अशा मैलांचे दगड पार करत तो/ती स्वतःचा रोज नवा शोध घेत आयुष्याची वाट तुडवू लागेल, नाहीतर खायला कहार आणि भुईला भार अशा डेड मासचा एक भाग बनून आयडेंटिटी क्रायसिसमध्ये अडकण्याचा धोका संभवतो. चुकीच्या आणि फुकाच्या बढाया मारण्यात आयुष्य वायाला जाऊ नये म्हणून मनांची मशागत अत्यावश्यक आहे. केवळ रंजन नको, टाइमपास नको, पूर्वग्रह दूषित असे चुकीचे वाचन नको तर स्वतःपल्याड समाजाचा आणि देशाचा विधायक विचार करायला भाग पाडेल असा नवा माणूस वाचनातून घडेल. संविधानकर्त्यांच्या आयडिया ऑफ इंडियाचा एक सक्रिय  सुजाण नागरिक वाचन आणि निरंतर अभ्यासाद्वारे घडण्यास मदत होईल. मंदिरांपेक्षा आपल्याला ज्ञानमंदिरांची अधिक गरज आहे. श्रद्धा आणि विज्ञान याचा आपल्याला मेळ घालता यायला हवा.


भारत हा तरुणांचा देश आहे. असं म्हणतात की युवक वाचतील तर देश वाचेल. युवकांचे मन, मनगट आणि मस्तक सशक्त बनवायचे असेल तर त्याला गुगलबाबाच्या विळख्यातून बाहेर काढावे लागेल. आंतरजालात आकंठ बुडालेले लोक माहितीलाच ज्ञान समजायला लागलेत खरंतर या ज्ञानापेक्षा भान अधिक महत्त्वाचं आहे. भानावर येण्यासाठी, अवताल - भवताल, समस्या - उपाय जाणून घेण्यासाठी, परीक्षेतल्या गुणांबरोबरच आयुष्यातल्या सदगुणांची ओळख करून घेण्यासाठी / देण्यासाठी प्रत्यक्ष वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके आणि हो, अनेक पुस्तके वाचलेल्या माणसांना वाचल्याशिवाय गत्यंतर नाही.. पुस्तकांशी संवाद म्हणजे ज्ञानाचा उत्सव जणू. ज्ञानोबांनी म्हटलं, वाचन एक अमृतानुभव आहे.. आपल्या संत, महामानव, वैज्ञानिक एवढेच काय आपले आई-वडील आणि त्यांच्या पूर्वसुरींनी काय काम करून ठेवलेलं आहे, कोणत्या विचारांचे आपण वारसदार आहोत.. की चुकीच्या परंपरांचे केवळ पाईक आहोत याचा सुगावा लागण्यासाठी चला तर वाचण्याचा केवळ संकल्प करून न थांबता, वाचन हे आपल्या जगण्याचे एक कारण बनवूया..


मारुती शेरकर. १५/१०/२०२२.