Thursday, 9 April 2020

ज्ञानमंदिर


ज्ञानमंदिर,
मु. औटी-शेरकर वस्ती,
तराळवाडी, ता. पारनेर,
जि. अहमदनगर-४१४३०२.

हा पत्ता आहे एका आगळ्यावेगळ्या मंदिराचा. जिथं मंदिर आहे पण मूर्ती नाही. विचारांचा - ज्ञानाचा मूर्तिमंत समृद्ध ठेवा इथं पुस्तकांच्या रुपात आहे..

पूर्वी किंवा आजही काही ठिकाणी गावाच्या पारावर झाडाखाली लोकं बसतात. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पाटप्पा तिथं होतात. सुखदुःखाच्या हितगुजापासून एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत बरच काही तिथं होत असायचं. एकत्र येण्यानं, बोलण्यानं भावभावनांचा निचरा व्हायचा. कालौघात अशा ‘जागा’ कमीकमी होत गेल्या. माणसं मोबाईल झालीत. यंत्रवत होत चाललीत. गावचं गावपण, घराचं घरपण, माणसाचं माणूसपण टिकवण्यासाठी अशा जागा आता निर्माण करणं अनिवार्य झालं आहे. त्यासाठीच या ज्ञानमंदिराचा प्रयोग केला आहे.

सुधीर शेरकर आणि ऋषिकेश औटी या दोन मित्रांनी इतर बालगोपाळांसह रस्त्याच्या कडेला या जागेत कापड-प्लास्टिकचा कागद वापरून छोटसं शेड उभारून इथं गणेशोत्सव सुरु केला. लोकं अतिशय उत्साहाने हा उत्सव साजरा करायचे, आजही करतात. गणपतीच्या सुट्टीत मी हे न्याहाळत होतो. मनात विचार आला, आपण या तरुणाईच्या उत्साहाला, शेतात राबराब राबणाऱ्या भोळ्याभाबड्या जीवांच्या त्या श्रद्धेला एक विधायक वळण दिलं तर? भजन-कीर्तन, प्रवचन, सत्संगात रमणारी ही मंडळी. श्रावणात भक्तिभावाने नवनाथ किंवा हरिविजय ग्रंथ वाचून शेवटी प्रसाद म्हणजे इतरांना जेवण देण्यात धन्यता मानणारी ही आपली माणसं. त्यांच्या भक्तीला, श्रद्धेला कुठेही तडा न जाऊ देता हे सारे शेजारी पाजारी मनाने एक कसे राहतील? तर त्यांना एकत्र येण्यासाठी कारण हवंय, विचार हवाय, जागा हवी आहे. पनवेलला माझ्याकडे काही पुस्तकं होती. त्यात मामा साहेबराव ठाणगे, साथी अरविंद लोहार आणि आमच्या वाडीतील जेष्ठ कीर्तनकार सोपानकाका औटी यांनी त्यांच्याकडील काही पुस्तकं देऊ केली.

माझ्या ह्या माणसांना ग्रंथांची मनोभावे पारायणे करता-करता संतांची, महामानवांच्या विचारांची ओळख करून देणं आवश्यक होतं. गाथा आणि ज्ञानेश्वरी जर अर्थपूर्ण भाषेत यांना वाचायला मिळाली तर. पारायणासोबतच तसं वागण्यासाठी, प्रयत्नांची प्रामाणिकपणे पराकाष्ठा करण्यासाठी त्यांना संतवचनांचं नक्की पाठबळ मिळेल. जवळपास तीनशे पुस्तकं आणि दैनिक सकाळ हे वृत्तपत्र उपलब्ध करून द्यायचं मी ठरवलं. पण जागेचा प्रश्न, थोड्याफार बांधकामाचा प्रश्न, मूर्तीशिवाय मंदिर? असे अनेक प्रश्न होते.

प्रश्नांना भिडणं म्हणजे प्रश्न सोडविणं. सर्वात आधी चर्चा सुरु केली. सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद आला. जागामालक दत्तात्रय औटी यांनी एकाच वाक्यात मला सांगितलं, “आबा तुम्ही म्हणाल ते सगळं होईल..” जागाबांधणीसाठी सर्वांनीच हातभार लावला. रामहरी, विठ्ठल, दत्ता, आप्पा, भिमाप्पा, अण्णा, शंकरराव यांनी आणि वस्तीवरल्या इतरही मंडळींनी स्वतः काम करून हा छोटासा पण टुमदार निवारा बांधला. नाही म्हणायला एक मुद्दा चर्चेला आलाच, मूर्तीशिवाय मंदिर? त्यावर सविस्तर आणि यशस्वी चर्चा झाली. सर्वच तपशिलात जात नाही. मात्र ज्ञान - पुस्तके - वर्तमानपत्र - विचार - एकत्र येणं - वेगवेगळे कार्यक्रम करणं यावर एकमत झालं. जग कळावं, आपलं जगणं आकळावं, माणूस आधिक समृद्ध व्हावा यासाठी वाचन, विचार आणि विश्लेषणाची नितांत आवश्यकता असते. मला वाटतं वाचन हे सर्व सुखांचे आगर आहे. नवीन प्रश्न, त्यांची नवनवीन उत्तरं ह्या वाचनातून मिळत असतात. सोबत जीवनानुभव असतातच. ही वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी घरोघरी, गावोगावी खेडोपाडी प्रयत्न होणं आवश्यक आहे.

मुंबईत यशस्वीपणे ग्रंथमहोत्सव भरवणारे लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते या आमच्या वस्तीवर ज्ञानमंदिराचं दिमाखात उद्घाटन झालं. याप्रसंगी कवी साहेबराव ठाणगे, राजकीय विश्लेषक पत्रकार राजा कांदळकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, साहित्यिक चळवळीतले दिनेशबापू औटी, जिल्हा शिक्षणाधिकारी (माझी भाची) सुनंदा ठुबे-वाखारे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, तत्कालीन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, नगरसेविका नंदा देशमाने, ह.भ.प. सोपानकाका औटी, माझे सर प्रा. रभाजी औटी, मित्र प्रा. अभिमान तराळ, साहेबराव देशमाने, भाचा अशोक गायकवाड आणि प्रत्येक कामातला माझा साथी जनार्दन औटी सर.. आणि समस्त तराळवाडीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा भाऊ नामदेव शेरकर तर खूप साऱ्या शिक्षक मित्रांसोबत तिथं राबत होता. इथंच मला ओमप्रकाश देंडगेंसारखे अनेक रसिक मित्र मिळाले..

इथं राबणाऱ्या हातांना मी मनोमन सलाम करत होतो. मी अर्थात स्टेजवर नव्हतो. प्रकाशात साजऱ्या होणाऱ्या उत्सवाला दुरून गर्दीतून डोळ्यांत सामावून घेत होतो. कानात साठवून घेत होतो. रस्त्याच्या कडेला छोट्याशा जागेत वाडीतील-पंचक्रोशीतील शेकडो लोकं दाटीवाटीने शाहिरांना, कवी साहेबराव ठाणगे यांना तल्लीन होऊन ऐकत होते.

एरव्ही भजन-कीर्तन, सत्संगात रमणारी ही मंडळी पावसाच्या हलक्या सरी लीलया झेलत शाहीर व कवी महोदयांच्या आशयघन विचारांच्या कारंजात आनंदाने न्हाऊन निघाली. सर्वांसाठी प्रीतीभोजनाचा बेत होता..

खरं तर प्रत्येक घटना दोनदा घडत असते. एकदा मनात आणि नंतर प्रत्यक्षात. मनातली हरेक घटना प्रत्यक्षात साकार होत नसते. या ज्ञानमंदिराची संकल्पना साकार होत असतानाचा हा कार्यक्रम शब्दबद्ध करणं माझ्यासाठी अशक्यप्राय होतं. तशातच सूत्रसंचालक ऋषीने सुचवलं की आता आमचे आबा बोलतील. बोलण्याची बऱ्यापैकी सवय असणारा मी क्षणभर स्तब्धच उभा राहिलो. तुकोबा माझ्या मदतीला नेहमीप्रमाणे धावून आले.

पूर आला आनंदाचा।
लाटा उसळती प्रेमाच्या।।
आनंदाचे डोही। आनंद तरंग।।

म्हटलं आयुष्यात जे अत्यानंदाचे चार क्षण असतील त्यातला हा एक जगायला प्रेरणा देणारा अत्युच्च क्षण आहे. कार्यक्रमात या ज्ञानमंदिराचा प्रवर्तक म्हणून माझा उल्लेख झाला होता. याप्रसंगी मी अतिशय कृतज्ञापूर्वक खऱ्याखुऱ्या प्रवर्तकांचा आवर्जून उल्लेख केला. या ज्ञानमंदिराची पायाभरणी करणारे शिल्पकार वेगळेच होते. जे आता हयात नाहीत. आमचे दादा रेवजी बापू शेरकर.. ज्यांनी सत्तरच्या दशकात औटी आणि शेरकर या दोन वेगवेगळे आडनावं असणाऱ्या परिवारांना एकत्र आणलं. एकत्र विहीर खणायला घेतली. आमच्या आधीच्या पिढीने आयुष्यभर एकत्रितरित्या सत्तरऐंशी फुटांची ही विहीर खोदली, पुढच्या पिढीची तजवीज करून ठेवली. मी वयाच्या विशीपर्यंत हे सर्व बघत लहानाचा मोठा झालो. त्याकाळी सपरात राहणारे भाऊमामा, नारायणमामा पीडब्ल्यूडी खात्यात रस्त्यांवर मैलकामगाराचे काम करत असत. आज ते हयात नाहीत. आज त्यांची पुढची पिढी छान बंगल्यांमध्ये स्थिरावली आहे. हे औटी- शेरकर परिवार खरेतर एकमेकांच्या गरीबीचे साक्षीदार आणि एकमेकांना सुखदु:खात साथ देणारे होते. अर्थात हा वारसा पुढच्या पिढ्यांनीही पुढे चालू ठेवला आहे. माझी आई-मावशी, तात्या आज नाहीत. पण ह्या सगळ्यांनी या ज्ञानमंदिराची, प्रेमाची, एकमेकांना सहकार्य करण्याची मुहूर्तमेढ इथं रोवली होती. केवळ वाडीतच नव्हे तर पंचक्रोशीत ज्ञानमंदिर हा विषय कौतुकाचा झाला आहे.

या ठिकाणी ही मंडळी एकत्र येतात. उत्सवादरम्यान वेगवेगळे खेळ खेळतात. मुळात या सर्वांना एकत्र आणणं हाच प्रमुख हेतू होता. वर्तमानपत्र, पुस्तकं वाचावीत हा दुय्यम हेतू होता. आता मात्र वाचक वाढू लागलेत. मुले या जागेचा अभ्यासिका म्हणून वापर करताना दिसत आहेत. सकाळ संध्याकाळ मंडळी इथं एकत्र बसून एकमेकांची विचारपूस करत आहेत. हाच अभ्यास, हीच पूजा मला अभिप्रेत होती. ज्यायोगे वस्तीचे स्वास्थ्य अबाधित राहिल. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे अॅकरिंग करताना बिग बी अमिताभ बच्चन म्हणायचे,

कर्म के कुरुक्षेत्र में,
ना रूप काम आता है,
ना झुठ काम आता है,
ना जाती काम आती है,
ना बाप का नाम काम आता है,
सिर्फ ज्ञान ही आपको आपका हक दिलाता है।।

मारुती शेरकर..
9867708408

No comments: