Saturday, 9 September 2017

जेव्हा मी जात शोधली..!

ज्ये्ष्ठ साहित्यिक बाबुराव बागुल लिखित जेव्हा मी जात चोरली होतीह्या आत्मकथनात रेल्वेत कर्मचारी म्हणून काम करत असतानाचं त्यांचं रोजचं मानहानीकारक जीवनाचं उद्वेगजनक चित्रण केलं आहे. हे  आठवण्याचे कारण आजची लोकसत्तामधील पहिल्या पानावरची बातमी. बातमीचं टायटल- जात लपवून स्वयंपाकी बनलेल्या महिलेवर गुन्हा?’ यादवकुलोत्पन्न एका महिलेने निर्मला कुलकर्णी असं नाव धारण करून उच्चशिक्षित ब्राह्मण कुटुंबामध्ये स्वयंपाकीचे काम मिळवलं. सर्व काही सुरळीत चालू होतं. परवा मात्र पोटासाठी केलेली ही चोरी उघड झाली. पूजेसाठी आलेल्या जोशी गुरुजींच्या चाणाक्ष नजरेने ही चोरी हेरली. कुटुंब प्रमुख श्रीमती. मेधा खोले यांनी निर्मलाबाईच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर आपली शुद्ध फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपले वजन वापरून निर्मलाबाईंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले. या मेधा खोले हवामान खात्याच्या माजी संचालिका. हवामानाचा अंदाज फोल ठरल्याने माझ्या वेतनात कपात करा किंवा कसे? अशी अवाजवी मागणी केल्याची बातमी काही यापूर्वी वाचनात आल्याचे स्मरत नाही. हवामानशास्त्र विभागाच्या ह्या माजी संचालिका बाईंनी स्वयंपाकी बाईंची खरी जात शोधून काढल्याबद्दल शाबासकी म्हणून बारामतीची बचकभर साखर खाण्यास त्या पात्र आहेत. समाजहितैषी वेगवेगळ्या संस्था त्यांचा यथोचित गौरव करतीलच. शिवाय खोटं बोलल्याबद्दल / जात चोरल्याबद्दल त्या निर्मला नावाच्या बाईवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहेच. 

ही बातमी कालची होती. पेपर रद्दीत गेला. विषय संपला. इतके आपण बोथट झाले आहोत. आपल्यात हा बधीरपणा कुठून नि कसा आला? वरच्या या प्रसंगाने असंख्य प्रश्नांचं भेंडोळं आपल्यासमोर मांडलंय. 

खोले बाईंची झालेली फसवणूक, सोवळ्या ओवळ्याचं घर ह्या निर्मला बाईंनी बाटवल्याबद्दल, पोटासाठी जात चोरल्याबद्दल आपलं दंड विधान त्यांना शिक्षा करेलच. अठराविश्व दारिद्र्यात जगणाऱ्या त्या निर्मला माउलींच्या हातचं जेवण / अन्न हे पूर्ण ब्रम्ह बनेलच कसं? अठरा शास्त्र आणि कितीतरी पुराणांमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. पण ते कुणी आणि कसं बनवलेलं आहे यावरून ते पूर्ण / अपूर्ण ब्रम्ह ठरवलं जात असावं. प्रश्नांच्या गुंत्यानं डोस्कं अगदी भंजाळून गेलंय. मु्दलात खोले मॅडम ह्या विद्यावाचस्पती आणि वैज्ञानिक आहेत. भारतीय शिक्षणाची यत्तातपासावी लागेल. कोणत्या जगात / युगात आहोत आपण?

काही दिवसांपूर्वी शाळेतल्या एका स्वयंपाकीणीची जात शोधून काही पालक वर्गाने त्या शाळेवरच बहिष्कार टाकण्याचे ठरवले होते. हे पालक कधीतरी शाळेत शिकायला गेलेच असतील. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावरील आम्ही सारे भारतीयही प्रतिज्ञा त्यांनी म्हटलीच असेल. माणूस, अधिक समृद्ध माणूस घडवणंहे शिक्षणाचं उद्दिष्ट गाठण्यात आपण नापास झालो आहोत. 

भारतीय राज्यघटनेने आपापल्या घरात विधिवत जगण्याचं स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेलं आहे. अनेक जातीधर्माने, विविधतेने नटलेल्या आपल्या जगण्याला संविधानाचं सुंदर कोंदण लाभलेलं आहे. मात्र मनामनात घर करून राहिलेली उच्चनिचता / विषमता कधी आणि कशी घालवायची?

- मारुती शेरकर

Tuesday, 22 August 2017

मी अमुक - मी तमुक


कोहम-सोहम अशा अध्यात्मिक गुंत्यात अडकण्याइतकं शहाणपण माझ्याकडे नक्कीच नाही.  पण ह्या मीला गोंजारत बसल्याने अनेकदा आपल्याला निखळ आनंदाला मुकावं लागतं. चालण्याचा व्यायाम करताना, दूरच्या प्रवासाला निघताना साधा बर्म्युडा घालायलाही आपण आपल्या संस्कृतीला वेठीस धरतो. खरेतर आपणच आपल्याला एका कोषात बंदिस्त केलेलं असतं. ओशो म्हणतात, “बस एक ही रोग, क्या कहेंगे लोग?”

इतरांना बरं वाटावं, त्यांनी चांगलं म्हणावं म्हणून मनात आलेला बालसुलभ, नैसर्गिक उमाळा आपण दाबून टाकतो. मीची ही प्रतिमा (false image) बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. आधी असलं मी  अमुक तमुक आपल्या मनात निर्माण होतं .मग जवळच्या लोकांकडून ह्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब केलं जातं. भाई, दादा, अण्णा, बापू अशी कित्येक टोपणनावे हेतुपुरस्सर निर्माण केली जातात. राजकारणात तर हे सर्रास चालू आहे, पण सर्वसामान्य सुद्धा ह्या प्रतिमेसाठी आटापिटा करताना दिसतात. प्रतिमानिर्मिती आणि संवर्धनासाठी काही एजन्सीज काम करतात. तर फ्लेक्स, सोशल मीडियातून कानीकपाळी ओरडून ती प्रतिमा इतरांवर बिंबवली जाते, नव्हे तर लादली जाते.

डायरेक्टर, चेअरमन असली एखादी टर्म जरी मिळाली तरी ती बिरुदावली मेल्यानंतरही मिरवली जाते. अगदीच काही नाही तर गेला बाजार - शेठ, पाटील म्हणवून घेतल्यानेही लोकांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. समाजात किलो किलोने आपली पत वाढली असा त्याला भास होत राहतो.
मानाने, सन्मानाने लोकांनी दिलेली उपाधी नक्कीच शोभून दिसते. माझ्या लहानपणी पारनेर येथील दत्तू पाटील हे मला आजही बॉर्न पाटीलवाटतात. काय त्यांचा रुबाब, बटू मूर्ती होती पण त्यांच्या पल्लेदार मिश्या, भरगच्च पागोटं, एका हातातला धोतराचा सोगा.., चालण्या-बोलण्यातली पाटीलकी ही त्यांच्या नसानसातून वाहत असे. अशा गावोगावच्या पाटलांना इंग्लडच्या राजा-राणीप्रमाणे घराघरात-मनामनात मान होता. रात्री बेरात्री अडीअडचणीला ते धावून येत असत. एक प्रकारचं ते कोर्टच असायचं. त्यांचा शब्द अंतिम असायचा, प्रमाण असायचा. काळ बदलला, परिस्थिती बदलली पण त्यांचे असलेले नसलेले वारस, गाववाले, भावकीवाले आजही नावापुढे पाटीललावतात. त्यांची मात्र कीव करावीशी वाटते. आपण कोण? आपलं कर्तृत्व काय? असले प्रश्न आपल्याला फिजूल वाटू लागतात.

सरकारी कचेऱ्यांमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रातील वरिष्ठांना साहेबसंबोधलं जातं. गावात विविध कार्यकारी सोसायटीच्या कारकुनास भाऊसाहेबम्हटलं जातं. हे भाऊसाहेब नंतर नंतर स्वत:च स्वतःचे नाव विसरलेले असतात. तहसीलदारांना रावसाहेब म्हटलं जातं. खरं तर आपण १९४७ साली ह्या साहेबालाहाकलून लावलेलं आहे. एखाद्याला साहेब संबोधून त्याचं आपण अवमूल्यन करतो असं मला वाटतं. मी तर अनेक सन्माननीय अधिकाऱ्यांना साहेबाऐवजी सरह्या नावाने संबोधतो. काहींना तर मी स्पष्टीकरण करून सांगतो की, इंग्लंडच्या राणीने त्या काळच्या कर्तबगार लोकांना Nighthood  ही उपाधी दिली होती. त्यात आपले गुरुदेव टागोरही होते. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी सरही उपाधी इंग्रजांना परत केली होती. डॉक्टर, वकील, इंजिनिअर अथवा कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ आणि वरिष्ठांना आजही सरम्हटलं जातं.

महात्मा गांधी लोकांना सांगायचे की मी महात्मानसून अल्पात्मा आहे. असंतोषाचे जनक असलेल्या टिळकांना लोकांनी लोकमान्यम्हटलं, पोलादी पुरुष वल्लभभाई पटेलांना लोकांनी सरदारम्हटलं, महाराष्ट्राला साक्षर करणाऱ्या भाऊराव पाटलांना कर्मवीरम्हटलं, फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या तुकाराम साठे या वारणेच्या वाघाला, फकिराला लोकांनी अण्णाभाऊसंबोधलं. विष्णू वामन शिरवाडकरांना अवघं साहित्यजगत तात्यासाहेब म्हणून ओळखतं. कुष्ठरोग्यांची सेवासुश्रुषा करणाऱ्या मुरलीधर देविदास आमटेंना आपण बाबा आमटेम्हणतो. सामान्य माणसाला अनेक अधिकार मिळवून देणाऱ्या राळेगणसिद्धीच्या किसन बाबुराव हजारे ह्यांना आपण अण्णाम्हणतो. अनाथांची नाथ असलेल्या सिंधुताई सपकाळ ह्यांना आपण माईम्हणतो. ह्या थोरामोठ्यांनी आपल्या टोपण नावाचे branding / campaigning  केले नव्हते. तर हे महानुभाव त्या नावा-गावा पलीकडचे आहेत. त्यांचा त्याग, त्यांचं उत्तुंग कार्य बघितल्यानंतर आपण नतमस्तक होतो. आपल्या उपाध्या गळून पडतात.

परवा whats app वर प्रकाश - मंदा हे आमटे उभयता विमानतळावर एका कट्ट्यावर घरून आणलेली चपाती-भाजी खात असतानाचे चित्र बघितले. इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण आणि सुधा मूर्ती असेच जमिनीवर एका कट्ट्यावर राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची वाट पाहत बसले होते. कलामांचा विषय निघाला म्हणून एक प्रसंग सांगण्याचा मोह आवरत नाही.


१९८० दरम्यान आपल्या अवकाश तंत्रज्ञानाद्वारे PSLV  (Polar Satelitte Launch Vehicle) द्वारे भारतीय बनावटीचा उपग्रह आपण अवकाशात सोडला होता. त्याचे शिल्पकार डॉ. अब्दुल कलाम मुंबईच्या नेहरू तारांगण येथे व्याख्यान देत होते. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती. इंदिरा गांधी ह्यांनी आपल्या संरक्षण सल्लागार कॅप्टन सतीश शर्मा यांना फर्मावले होते की, “Who is the man behind this achievement? I want to meet him.” कॅप्टन सतीश शर्मा यांनी तातडीने कलामांशी संपर्क साधला आणि इंदिरांजींचा मेसेज त्यांना दिला. मित्रांनो कलामांनी काय म्हटलं असावं, “माननीय पंतप्रधानांना भेटण्यासाठी माझ्याकडे सूट-बूट नाहीत. ह्या असल्या साध्या वेशात आले तर चालेल काय?” यावर कॅप्टन सतीश शर्मा यांनी दिलेलं उत्तरही तितकंच महत्वाचं आहे. श्री. अब्दुल कलाम, आपण विजयाचे वस्त्रालंकार ल्यायलेले आहात, तुम्ही चिंता करू नका. आहे त्या वेशात या तुमचे स्वागत आहे.अशी अनेक उदाहरणे आहेत.


गोलमेज परिषदेच्या समारोपानंतर सर्व शिष्टमंडळ इग्लंडच्या पंचम जॉर्ज राजाला भेटण्यासाठी आले. तेव्हा सर्वजण सुटाबुटात होते. अपवाद फक्त गांधीजींचा होता. बर्फाळ थंड प्रदेशातही हा भला माणूस इग्लंडमध्ये केवळ पंचा नेसून त्या राजाला भेटला. असा राजा की ज्याच्या साम्राज्याचा सूर्य ह्या पृथ्वीतलावर कधीही मावळत नव्हता. हे घडलं कशामुळे? सुटाबुटातले मोहनदास गांधी आफ्रिकेहून भारतात आले. गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांनी त्यांना भारत भ्रमण करण्यास सांगितले होते. वर्ध्यातल्या आश्रमात त्यांच्या लक्षात आले की, लोकं सार्वजनिक ठिकाणी यायचं टाळतात. विशेषतः महिला की ज्यांना लज्जारक्षणासाठी ल्यायला पुरेसे कपडे नाहीत. तिथे आपण सुटबूट काय मिरवायचा? ह्या साध्या प्रश्नाने मोहनदास गांधींना महात्मा बनवले. हे सर्व महात्मे, महामानव यांनी आपला मार्ग प्रशस्त केलेला आहे. मार्गदर्शन आहे, मार्गक्रमण कुठाय? हा जटील प्रश्न आहे.

तुकोबांनी म्हटलंय,

जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत !
पायाविण भिंत तातडीची !!

तुका म्हणे मना पाहिजे अंकुश !
नित्य नवा दिस जागृतीचा !!

© मारुती शेरकर

Monday, 2 January 2017

सॉरी सावित्रीमाई..

सॉरी सावित्रीमाई..
      
      ३ जानेवारी सावित्रीमाईचा जन्मदिवस. वर्षातला आपला पहिला सण आणि म्हणूनच वर्षातील पहिलं नमन या माऊलीला. यानिमित्तानं तिच्याशी बोलून मोकळं व्हावं म्हणतो. 

तुझी वाट तुडवताना, तुला केवळ सॉरी म्हणणं आमच्या हातात आहे. मळलेली वाट न मळवता, चूल आणि मुल ह्या परंपरेचे पाईक न बनता तू आमच्या उद्धारासाठी शिक्षणाद्वारे प्रशस्त मार्ग निर्माण केला. पण आमच्याने मार्गक्रमण होऊ शकले नाही. म्हणून सॉरी..

आज एकवेळ स्त्री चंद्रावर, मंगळावर पोहोचू शकेल मात्र काही ठराविक मंदिरात किंवा दर्ग्यात ती जाऊ शकत नाही. माणुस म्हणून तिची वाटचाल जर तू दाखवून दिलेल्या मार्गावरून झाली असती, तर नक्कीच असल्या कोणत्याही अमानवी भेदभावाला तिला सामोरे जावे लागले नसते. खरंच सावित्री, तुझी वाट तुडवली असती तर ही शोकांतिका नक्कीच टळली असती. कैक वर्षापूर्वी तू वादळात दिवा लावला. तू घराच्या उंबरठ्याबाहेर पडलीस. नवऱ्याला तोलामोलाची साथ दिलीस. १७५ वर्षापूर्वी तू १ जानेवारी १८४८ ला जोतिबांच्या सहाय्याने भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. जोतिबाचं मानवी हक्कांचं स्वप्न साकारण्यासाठी तू स्त्रीमुक्तीचं कार्य हाती घेतलंस. रितसर प्रशिक्षण घेऊन तू आद्यशिक्षिका, मुख्याध्यापिका बनलीस. आदिम काळापासून स्त्री हा शोषित वर्ग, तिच्या उद्धाराचे अवघड काम तू जीवाच्या आकांताने पार पाडलेस. पारंपरिक, सनातनी आणि म्हणूनच मूर्छीतावस्थेमध्ये जगत असलेल्या स्त्री जातीमध्ये तू प्राण फुंकलास. 

एका माथेफिरू टोळभैरव धटिंगणाने तुला धमकी दिली की तू हे महिलांना शिकवण्याचे पाप करू नको, नाहीतर मी तुझी अब्रू लुटेन. त्यावेळी तुझ्यातल्या रणरागिणीने त्याच्या कानफटात मारली. शंभर पुरुषांचे धाडस तुझ्या ठायी होतं. तुझा मनोनिर्धार पक्का होता. क्रांतीसूर्य जोतीबांची खंबीर साथ, सगुणाआऊंचं मार्गदर्शन, फातीमाजींची वाऱ्यावादळातली अनमोल सोबत तुला लाभली. तू एका आयुष्यात अलौकिक कामांचा डोंगर उभा केलास.

शाळेत जाताना रस्त्यात तुझ्यावर शेण - सडकी अंडी फेकली गेली. तुझ्याकडे आणखीची एक साडी असायची. तुला कळलं होतं की निकोप आणि सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी घरातली स्त्री शिकली पाहिजे. अलीकडे आपण सरकारी एसटी बसवर वाचतो की मुलगी शिकली प्रगती झाली. ह्याची बीजे तू पेरली होतीस. बऱ्यापैकी स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत. पण त्या तुला विसरू लागल्यात. वास्तविक पाहता तुझ्या वाटेवरून चालणाऱ्यांनी जागल्याच्या भूमिकेतून इतर अडल्या नडलेल्यांना सजग करायला हवे. उपासतापास कर्मकांडात अडकलेल्यांना तू दाखवलेल्या मार्गावरून चालावे लागेल. त्या काळात एका विधवेचा अनौरस मुलगा तू दत्तक घेतलास. अत्याचाराला बळी पडलेल्या काशीबाईसारख्या शेकडो स्त्रियांना तू जीवनदान दिलंस. आमच्या येथे बाळंतपणे केली जातील अशी पाटी लावून तू तुझ्या राहत्या घरालाच सुतिकागृह बनवलंस. विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंधकगृह उभारलीस, जरठ विवाह रोखलेस, जोतिबांच्या सत्यशोधक समाजाची धुरा तू अखेरपर्यंत वाहीलीस आणि ते ही दीडशे वर्षापूर्वी, सनातनी पुण्यात.

आजही आपल्या देशात मुलगा हवाच या हट्टापायी गर्भचिकित्सा (गुपचूप) करून स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत. लाज वाटते ते पुरोगामित्व मिरवण्याची. वेळ आली आहे तुझा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याची, आडवे येणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची. पण त्यासाठी समस्त महिलांनी आपल्यातलं स्त्रीत्व-सत्व-तत्व समजून घेणं आवश्यक आहे. मंदिरप्रवेश जर तुमचं माणूसपण नाकारत असेल तर तुम्हांला समस्त देवदेवतांवर सामुहिक बहिष्कार घालावा लागेल. स्त्री स्वतःच निर्मिक आहे याचं भान समस्त स्त्रियांना असणं आवश्यक आहे. खरं तर स्त्रीत्वाचा सन्मान हे पुरुषार्थाचं पहिलं वहिलं लक्षण आहे हे साऱ्या पुरुष जातीने समजून घेणं अत्यावश्यक आहे. 

सावित्रीमाई तू खरीखुरी सरस्वती आहेस आणि तुझ्या प्रयत्नाने आजची स्त्री शिकली, कमावती झाली, माणसात आली. मात्र आजही ती पुरुषप्रधान पुरातन आणि सनातन संस्कृती, रूढी, परंपरा, अज्ञान अशा दुष्टचक्रात गुरफटून गेली आहे. ह्याला अपवाद गरीब/श्रीमंत, साक्षर/निरक्षर असाही नाही. श्रीमंतीत तर महिला एखाद्या wall piece सारख्या अलंकारांनी सदैव आभूषित असतात. शिकलेल्या महिलाही कर्मकांड आणि तीर्थाटनात धन्यता मानताना दिसतात. नवरात्रौत्सवात देवीचा जागर करण्यासाठी नऊ दिवस नऊ रंगांनी न्हाऊन आपण कोणत्या मार्केटिंगला बळी पडत आहोत, याचे भान स्त्री वर्गाला असले पाहिजे. सरकारी कार्यालयांतील भितींवर महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्यासमवेत स्वतःच्या अलौकिक कर्तुत्वाने तु ही विराजमान झालीस. दु:खं याचं आहे की, तुझ्या प्रयत्नातून शिकल्या सवरलेल्या कमावत्या स्त्रिया टेबलाच्या काचेखाली कुठल्यातरी बाबा, बुवा किंवा एखाद्या मातेचा फोटो लावतात, मंगळागौर आणि मार्गशीर्षच्या गुरुवारच्या पुजेची चर्चा करत बसतात. हे बघून आणि ऐकून काय वेदना होत असतील तुझ्या जीवाला ! 
  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना म्हणाले होते, मी हा परिवर्तनाचा गाडा इथपर्यंत आणून ठेवलाय, तो पुढे नेता आला नाही तरी चालेल, पण मागे मात्र नेऊ नका. ह्या उक्तीनुसार दीडशे वर्षापूर्वी सावित्रीमाईनं जो क्रांतिमार्ग आपल्याला दाखवला त्यावरूनच आपली वाटचाल व्हायला हवी. हीच खरी त्या माऊलीला आदरांजली ठरेल.   

आपल्या शिक्षण प्रक्रियेत वैज्ञानिक दृष्टीकोन आणि नागरी जीवनातील संविधानिक तरतुदी अंगी बाणविणे ही काळाची गरज आहे. ज्ञानज्योती-क्रांतीज्योती प्रतिभाशाली कवयित्री होत्या. 
त्या म्हणतात, 
‘शुद्र आणि अतिशूद्र 
अज्ञानाने पछाडले.'
'देव धर्म रूढी अर्ची 
दारिद्र्याने गळाठले.'

वयाच्या २३ व्या वर्षी काव्यफुले आणि उत्तर आयुष्यात सलग ५० वर्षे समाजसेवेला अखंड वाहून घेतल्यानंतर १८९२ साली त्यांचा दुसरा काव्यसंग्रह बावनकशी सुबोध रत्नाकर त्यांनी आपल्याला दिला. उद्वेगाने त्या लिहितात,
दुसऱ्यास मदत नाही,
सेवा, त्याग, दया, माया ही,
जयापाशी सद्गुण नाही,
गुलामगिरीचे दु:ख नाही,
जराही त्यास जाणवत नाही
माणुसकीही समजत नाही
तयास मानव म्हणावे का?

माणूस, अधिक चांगला समृद्ध माणूस घडवण्यासाठी ह्या माऊलीनंं आपलं अवघं आयुष्य वेचलं. ह्या महाराष्ट्राचा आणि देशाचाही सामाजिक, शैक्षणिक लेखाजोखा फुले दांपत्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. सर्व समस्यांवर विशेषकरून सांप्रत स्त्रीच्या दुर्दशेवर मात करण्यासाठी शिक्षण हाच मूलमंत्र तू आम्हाला आपल्या कृतीद्वारे सांगितला आहे.  

शिक्षणावर भाष्य करणारी तू तत्ववेत्ती होतीस. त्यावरील तुझे मूलगामी विचार आजही महत्वाचे आहेत. आईच्या योगाने मुलांची सुधारणा म्हणून स्त्री शिक्षिका आणि स्त्री शिक्षण. समस्त शिक्षक बिरादरीने आपल्या विद्यार्थ्यांची आई बनायला हवे. शिक्षण घरोघरी नव्हे दारोदारी पोहोचण्यासाठी बहुजनांच्या मुलांना बहुजन शिक्षक असावेत. गरिबी आणि गरीबांविषयी त्यांच्या ठायी कणव असेल. शूद्रांचे दुखणे या कवितेत त्या म्हणतात, 
शूद्रांना सांगण्याजोगा आहे 
शिक्षण मार्ग हा 
शिक्षणाने मनुष्याचे 
पशुत्व हाटते पाहा 

ह्या फुले दांपत्याला समाजाने तर वाळीत टाकलेच होते, आईवडिलांनीही त्यांना सोडले, राहते घर सोडावे लागले. पण ह्या सर्वस्वाची होळी करून त्यांनी हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडले नाही. रस्त्यावर आलेल्या फुले उभयतांना त्यांच्या उस्मान शेख ह्या जिवलग मित्राने गंजपेठेत आपल्या राहत्या घरात जागा दिली. त्यांच्या भगिनी फातीमाजी आणि सावित्रीमाई तुम्ही दोघी स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या ठरल्या.

सावित्रीमाई तू एक वीरपत्नी होतीस, सत्यवती होतीस, तत्ववेत्ती होतीस, कवयित्री होतीस. शब्दांच्या पलीकडची तू आमची माऊली आहेस. तुझ्या अलौकीकतेला सलाम करण्यासाठी हा पत्रप्रपंच.

- मारुती शेरकर