Tuesday, 28 December 2021

नमन पांडुरंगा..

पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून पांडुरंग सदाशिव साने या महामानवाने आमरण उपोषण केले. निर्धार एवढा ठाम होता की उपोषण मागे घेण्यासंदर्भातील गांधीजींच्याही विनंतीला त्यांनी जुमानले नाही. हे सारं त्या पांडुरंगाप्रति असणाऱ्या भक्तीभावाने असेलही पण त्याहीपेक्षा माणूस इथून तिथून सारखाच आहे, प्रभूची लेकरे असणाऱ्या या माणसामाणसांमध्ये कुठलाही भेदभाव असता कामा नये हाच विचार मुळाशी होता. या मातीतल्या जातिव्यवस्थेमुळे माणसामाणसात जी विषमतेची पेरणी झालेली आहे, माणूस माणसापासून दुरावला गेला आहे, मोबाईल जमान्यात आता तर तो स्वतःच्या आतून सुद्धा तुटत चालला आहे, स्वतःपासूनच दुरावत आहे.

जात धर्म अहम अज्ञान इत्यादींमुळे माणसातलं माणूसपण हरवत चाललेलं असताना जगाला प्रेम अर्पावे अशी आर्त साद घालणारे महाराष्ट्रमाऊली पूज्य साने गुरुजी यांची प्रकर्षाने आठवण येते. शाळाशाळांमधून साने गुरुजी गायब झालेत, किमान एक सानेगुरुजी प्रत्येक शाळेत असेल तर ती संस्कारशाळा बनू शकेल. पालक म्हणून श्यामच्या आईवडिलांचे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांना साने गुरुजी एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. गुरुजींनी या मराठी मातीत धडपड नावाचं बियाणं पेरलेलं आहे. त्यातून प्रेरित झालेल्या धडपडणार्‍या पिढीने ठीकठिकाणी प्रगतीची आशादायी बेटं निर्माण केलेली आहेत. गुरुजींच्या ठायी असलेली भावोत्कट तगमग आपल्याला विधायक आणि रचनात्मक काम करण्यासाठी रोड मॅप तयार करून देते. ५१व्या वर्षी गुरुजींनी आत्महत्या केली. आत्महत्येचं समर्थन करता येत नाही परंतु गुरुजींच्या मनातला उद्वेग हा काही व्यक्तिगत स्वार्थाचा नव्हता तर  त्यांना अभिप्रेत असणाऱ्या नवसमाजाच्या स्वप्नांच्या चिंधड्या होताना पाहणं गुरुजींना पहावलं गेलं नाही. तीच तगमग आणि घुसमट त्यांचा प्राण घेऊन गेली. बलसागर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी प्राणपणाला लावणाऱ्या पूज्य साने गुरुजींचा उद्वेग आणि समाजाप्रती, देशाप्रती असणारी त्यांची तगमग आपण समजून घेणार आहोत की नाहीमाणुसकीचं मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या पूज्य साने गुरुजींना जयंतीदिनी मनोभावे नमन..

 - मारुती शेरकर

अधिकारी..

व्यक्तीचं खरंखुरं व्यक्तिमत्व जर समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला एकदा अधिकारी करा असं म्हटलं जातं. अधिकारी प्रवर्गाची व्यामिश्रता हा अभ्यासाचा विषय आहे. अधिकाऱ्यामधला माणूस आणि माणुसकीची मात्रा खूप मॅटर करत असते. 

द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण म्हणत असत की रुक्ष कागदांच्या फाईलमध्ये एक मानवी चेहरा असतो, त्या चेहऱ्यावरील भावना वाचता आल्या पाहिजेत. लोककल्याणाची जबाबदारी व्यवस्थेने आपल्यावर सोपवलेली आहे याचे भान त्या अधिकाऱ्याला असले पाहिजे. गांधीजींच्या मते शेवटच्या देहाती सामान्य माणसापर्यंत तुम्ही राबवलेल्या धोरणाचे फायदे पोहोचत असतील तर ते धोरण चांगले.. तुमचे हेतू शुद्ध असावेत आणि हेतू साध्यतेचे मार्गही तितकेच शुद्ध असावेत.

हे नोकरशहा जेव्हा बाबू बनतात तिथे आपली व्यवस्था हारते. बंडलबाज अधिकाऱ्यांच्या घरी-दारी, नातेवाईकांकडे नोटांचे बंडल मिळतात तेव्हा संवैधानिक व्यवस्थेनं अधिकार बहाल केलेल्या या विश्वस्थांवरचा विश्वास उडू लागतो. अधिकारपदामुळे काहींचा पाठीचा कणा एकदम ताठ होतो आणि त्या फॉल्स इमेजमुळे ही अधिकारी मंडळी माणसातून उठून जातात. आपण जणू एलियन्स आहोत असा भास या मंडळींना होतो. खुर्चीवरील पांढऱ्या टर्किश टॉवेलची परीटघडी या वेगळेपणाची नव्हे तर एकाकी आणि एकारलेपणाची साक्ष देतात. सहीचे अधिकार संपल्यावर म्हणजे निवृत्त झाल्यावर ही माणसं खूपच एकलकोंडी बनतात. मी नेमका कोण? असला स्वतःच्या अस्तित्वाचाच मूलभूत प्रश्न त्यांना सतावतो.

नेत्याला जशी कार्यकर्त्यांच्या गर्दीची नशा असते त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना सुद्धा या स्वार्थी स्तुतिपाठकांमध्ये रमायला आवडतं. सोय आणि स्वार्थ संपला कि ही भाटांची गर्दी ओसरते तोवर आपला बर्‍यापैकी वापर करून घेतला गेलाय याचे भान अधिकाऱ्याला येते. पदाला, पोझिशनला रिस्पेक्ट देणाऱ्या ह्या मंडळींना त्या अधिकाऱ्यामधील व्यक्तित्वाशी काही देणेघेणे नसते. खरंतर व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आणि त्यांच्या शुद्ध हेतूबाबत अधिकारी वर्गाचा आदर केला जावा.. धोरणकर्ते ते लाभार्थी अशा धोरण अंमलबजावणीतील अधिकारी हा प्रमुख दुवा असतो, सेतू असतो..

मोजकेच अधिकारी मात्र लोकसेवकाच्या भूमिकेत जमिनीवर राहून लवचिक धोरण स्वीकारत माणसात राहतात आणि गर्दीत उठून दिसतात. 

पद, खुर्ची आणि अधिकार हे सर्वसामान्य लोकांसाठी असतात. लोकांनाही याचे भान नसते. ते अधिकाऱ्यांना साहेब साहेब म्हणून हिणवत असतात. साहेब म्हणून संबोधनं खरंतर गुलामीचे लक्षण आहे, त्याऐवजी सर हे संबोधन अधिक आदराचं. आपण 1947 सालीच साहेबांना हाकलून लावलेलं आहे. पण आपल्या नेणिवेत जे काही भाऊसाहेब आणि रावसाहेब बसलेले आहेत त्याचे काय? त्यासाठी नागरिकत्व, एकत्व, भारतीयत्व अशा संवैधानिक तरतुदींचा अभ्यास करावा लागेल. अधिकारांचा आग्रह धरताना जबाबदाऱ्यांचेही भान ठेवावे लागेल. क्लिष्ट जीआरमधे लोककल्याणकारी कृतिकार्यक्रमांद्वारे प्राण फुंकण्यासाठी अधिकारी मात्र तितका जिंदादिल असावा. असा खूप सारा प्रवास होणे बाकी आहे.

 - मारूती शेरकर

कार्यकर्ता..

कार्यकर्ता हे सर्वोच्च पद आहे. हे पद अढळ ध्रुव ताऱ्याप्रमाणे असल्याने कधीही ते कोणालाही हिरावून घेता येत नाही. या पदाला तसे ग्लॅमर नसल्याने बहुधा सर्वांना नेता होण्याची हौस आणि घाई झालेली असते. ग्रासरूटला जमिनीवर पाय रोवून अतिशय समर्पित सेवा भावनेने व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीतला कार्यकर्ता हा अतिशय प्रमुख शिलेदार असतो. धोरणकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील हा सर्वमान्य प्रमुख दुवा असतो. 

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात विशिष्ट विचारसरणीने भारलेले आणि झपाटलेले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर होते. नेमून दिलेलं काम ते चोख पार पाडत असत. व्यक्तीशी आणि विचारांशी बांधिलकी ते जिवापाड जपत असत. मात्र अलीकडच्या मोबाईल युगात गल्ली ते दिल्ली, घर ते शाळा किंवा चौकाचौकात सामाजिक सांस्कृतिक मूव्हमेंटऐवजी रोज इव्हेंट झालेले दिसून येतात. सोशल मीडियावर त्याचा रोज रतीब पाहायला मिळतो. आपल्या खांद्यावर आपलंच डोकं रहावं यासाठी किंवा कोणी आपला त्यांच्या स्वार्थासाठी वापर करू नये याचं आत्मभान कार्यकर्त्याला असणे आवश्यक आहे. हाती कोणता झेंडा घ्यावा किंवा कोणत्या पालखीचे भोई व्हावं हा ज्याच्या त्याच्या वैचारिक जडणघडणीचा विषय आहे. 

मौनात राहण्यापेक्षा व्यक्तीला अभिव्यक्ती असावी. मत असावं. भूमिका असावी. आणि मतभेदांमधलं स्वातंत्र्य आणि सौंदर्य विचारात घेऊन, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता संयतपणे व्यक्त होता यावं. बऱ्याचदा कार्यकर्ता विचारवंत असत नाही आणि सो कॉल्ड विचारवंत कार्यकर्ता असत नाही. कार्यकर्त्याचा काही एक अभ्यास असावा. प्रत्येक कार्यकर्त्याने भारतीय संस्कृती, धर्मविचार, संतांची प्रबोधन परंपरा, महामानवांचं लोकोत्तर कार्य, व्यक्तिगत आणि सामाजिक सार्वजनिक जीवनात सांविधानिक मूल्यांचे अधिष्ठान इत्यादींबाबत स्वतःचे भरण-पोषण करून घेणे अतिशय आवश्यक ठरते. 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असल्या अस्सल कार्यकर्त्यांची वाणवा क्लेशदायी आहे. पोटार्थी चाकरमानी आणि व्यवस्थेने ज्यांना सर्व काही बहाल केलेले आहे असली बरीचशी मंडळी आत्ममग्न आहेत, झालीच तर केवळ चर्चिल आहेत. गावगन्ना कार्यकर्ते जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो करत ही निवडणूक, ती निवडणूक करत अल्पसंतुष्ट आहेत. प्रत्येक निवडणुकीत जात आणि पैसा निर्णायक ठरतो. इथल्या शिक्षणाने आपली यत्ता उंचावली नाही हे मात्र खरं..

- मारुती शेरकर