“मह्या मायपुढं थिटं समदं देऊळ राउळ
तिच्या पायाच्या चिऱ्यात माह्य अजिंठा वेरूळ”
कवी अशोक बुरबुरे यांनी
प्रत्येक लेकराची आपल्या मायेबद्द्लची भावना शब्दबद्ध केली आहे. जगभरात आई या
विषयावर शेकडो पुस्तके, नव्हे ग्रंथ उपलब्ध आहेत. आज मी माझ्या आईविषयी (लोकांच्या
जिजाईविषयी) तुमच्याशी अगदी थोडक्यात बोलणार आहे. पंचेचाळीस वर्षापूर्वी मला म्हणजे
तिच्या अकराव्या अपत्याला तिने एका चंद्रमौळी झोपडीत जन्म दिला. शनिवारी जन्मलो
म्हणून माझ्या काकांनी माझं मारुती असं नामकरण केलं. अगदी अलीकडे म्हणजे दहा
वर्षापूर्वी आईनं आम्हाला सर्वांना पोरकं केलं.
मध्यंतरी अवधूत गुप्ते
यांच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये प्रिय व्यक्तींशी फोनवर बोलण्याची
सोय होती. अर्थात मला आईशी बोलण्यासाठी फोन या माध्यमाची गरज भासत नाही. हवं
तेव्हा विशेषतः उत्तररात्री झोपेतल्या subconscious अवस्थेतली
वेळ मी आईशी गप्पा मारायला राखून ठेवली आहे. मनातल्या द्वंद्वाचा, घुसमटीचा निचरा
झाल्यावर सकाळी माझं छान नवीन आयुष्य सुरु होतं.
आईविषयी बोलताना
सुरुवात कुठून करावी हा प्रश्न माझ्यासमोर आहे. मला वाटतं तिच्या आयुष्याच्या
शेवटापासून मी लेखाची सुरुवात करावी. तिनं आयुष्याच्या संध्याकाळी ऐहिक
संसारापासून निवृत्ती स्वीकारली होती. गळ्यातलं किडूक-मिडूक सोनं विकून
पुणेवाडीच्या भैरवनाथाच्या मंदिरात एक मोठी पितळी घंटा तिने अडकवली होती. तिच्या
त्या आसक्तीला तिने ईश्वरार्पण केलं होतं. अध्यात्मिक गप्पा मारणाऱ्या
भल्याभल्यांना न जमणारी नि:संग वृत्ती तिने लिलया मिळवली होती. अर्थात ही
क्रांतिकारी घटना एकाएकी घडली नव्हती. flashback पद्धतीने तिच्या आयुष्यात डोकावलं
तर याचा अंदाज येऊ शकतो. अनेकवेळा पायी वारी केल्याने पंढरीच्या इठ्ठलाची तिच्यावर
मोठी कृपा होती. तिची एक इच्छा मात्र ह्या इठ्ठलाने पूर्ण केली नाही. म्हणून मला
वाटते कदाचित ती त्याच्यावर अजूनही अधूनमधून रागे भरत असणार. वाखरीच्या
रिंगणसोहळ्यात माउलीच्या मानाच्या अश्वाबरोबर, त्या वीणेकऱ्यांबरोबर धावायचे धाडस
ती करायची. त्या भक्तीसागरात अश्वाच्या टापाखाली, रामकृष्ण हरीच्या गजरात ‘हे राम’
नव्हे ‘हे पांडुरंगा’ म्हणण्याचे स्वप्न तिच्या विठाईने काही पूर्ण होऊ दिले नाही.
तिच्या सत्तरीनंतर तिला पायी वारीला जाऊ देऊ नये असा सर्वांचा आग्रह असताना,
सर्वांचा विरोध पत्करून तिच्या वारीला मी सर्व शक्यता गृहीत धरून भरल्या
अंत:करणाने पाठिंबा देत असे. दरवर्षी नेमानं माझं एक व्हिजिटिंग कार्ड ती वारीत
असताना सदोदित जवळ बाळगत असे. उद्देश एवढाच की समजा तिच्या इच्छेप्रमाणे जर ती
पांडुरंगवासी झाली तर चंद्रभागेतीरी रामकृष्ण हरीच्या गजरात इठ्ठलाच्या चरणी विधी
व्हावेत आणि कुणी वारकऱ्याने ते आम्हा नातेवाईकांना कळवावेत. ह्या सगळ्या
गुजगोष्टी ती माझ्याशी करत असे. शेवटपर्यंत तिचं वारीला जाणं मी थांबवलं नाही.
कारण मला माहित होतं की तिचं धड इथं तर मन तिथं वारीतच असणार व्हतं. दहा
वर्षापूर्वी वारीहून आल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटून झाल्यावर मध्यरात्रीनंतर एका
निवांत क्षणी चालता-बोलता तिनं देह ठेवला. काही तास आधी तिच्या क्षीण आवाजातलं ‘मी
मजेत आहे’ ऐकून मी सैरभैर अवस्थेत तिच्या भेटीसाठी मुंबई-पारनेर रातराणी गाडीने
निघालो होतो. मला वाटायचे की, आयुष्यभर लई दैन सोसलेल्या आईने शेवटच्या क्षणी
माझ्या मांडीवर डोकं ठेऊन निरोप घ्यावा. नियतीला ते मंजूर नव्हतं. दोन अडीच तास ती
आणखी थांबली नाही म्हणून मी ही आयुष्यभर अधुनमधून तिला रागे भरतच राहणार आहे.
महाराष्ट्र माऊली साने गुरुजींच्या ‘श्यामच्या आई’शी असा मी कायमचा जोडला गेलो
आहे.
आईचा तिच्या वयाच्या
सातव्या वर्षीच बालविवाह झाला होता. आजोबांच्या खांद्यावर बसून म्हणे ती सासरी आली
होती. म. फुले, आगरकरांचा मागमूस तिच्यापर्यंत पोहोचला नव्हता. सासरची गरिबी
तिच्या हयातभर सरली नाही. तिच्या पहिल्या दोन बाळांचं अकाली निधन झाल्याचं तिनं
मला सांगितलं होतं. नंतर सलग सहा मुलींनंतर आम्ही तीन मुलं. म्हणजे मी अकरावा.
तिच्या भाषेत छल्ला नंबर. दरम्यान आई आणि मावशी ह्या दोन्ही सख्या बहिणी एकाच घरात
जावा-जावा म्हणून गुण्यागोविंदाने नांदत होत्या. मावशीला तीन मुलींनंतर एक मुलगा
झाला. विहीर खोदण्याच्या ब्लाष्टिंगमुळे काका अंध झाले होते. माझे वडील पराकोटीचे
प्रामाणिक पण व्यवहार शून्य, फक्त कष्ट उपसणे तेही हसतमुखाने ते जाणून होते.
जमिनीचा तुकडा आणि खाणारी तोंडं याचं व्यस्त प्रमाण असल्याने हलाखीला पारावार
नव्हता. पोट भरायची भ्रांत असल्याने शिक्षणबिक्षण त्यांच्या अजेंड्यावर नव्हते.
तरीही नंतरच्या आम्हा भावंडापर्यंत शिक्षणाचा हा कवडसा पोहोचला. मी आपलं लावून
धरलं म्हणून इथपर्यंत पोहोचलो. तर मी बोलत होतो आईविषयी, तिनं जगण्याच्या आणि
आम्हाला जगवण्याच्या लढाईत कधी हार मानली नाही. Fighting Spirit, Will Power, Positivity ह्या शब्दांची ती स्वतः मूर्तिमंत
उदाहरण होती. अवघ्या गावाला १९७२ सालच्या दुष्काळात लई त्रास झाला. हा दुष्काळ आईला हयातभर पुरला. आई मावशीनं गड्यासारखं राबराबून
आम्हाला उभं केलं. शंकरभाऊ मांगाच्या टीममध्ये रोजगार हमी योजनेतून रास्ताभरणीचे
काम करण्यात तिनं जात आडवी येऊ दिली नाही. रस्त्यावर खडी फोडली. गवत विकून त्यांनी
कण्याघुगऱ्या आमच्या पोटात घातल्या.
रविवारच्या आठवडा
बाजारात ती उशीराच जायची. तुटलेल्या आणि खराब झालेल्या केळांचा उक्ता ढीग ती
स्वस्तात विकत घ्यायची. घरी येताना वाट वळवून तिच्या आईला ती आवर्जून दोन केळी खाऊ
घालायची. हीच सवय पुढे तिने वारीला जाताना कायम ठेवली होती. हाराभर केळी विकत घेऊन
दिंडीतल्या वारकऱ्यांना ती केळी खाऊ घालीत असे. प्रेमळ पण तेवढीच ती कर्तव्यकठोर
होती. सासरी गेलेल्या लेकी जर गाऱ्हाणे करू लागल्या तर ती कधी ऐकूनही घेत नसे,
पुन्हा माहेराकडे मागे वळून बघायचं नाही अशी तंबी ती देत असे. त्याकाळी
बाळंतपणासाठी माहेरी येणं जणू सक्तीचं होतं.
ह्या प्रचंड तारांबळीत ह्या नऊ लेकींचे पंचवीशेक बाळंतपण तिनं घरच्याघरी केले.
पंचक्रोशीत अडलेल्या लेकीबाळींची सोडवणूक करणारी ती दायीन होती. आता तिची ही
नातवंड कमावती झाली आहेत. गाडी बंगल्यांची स्वप्न प्रत्यक्षात उतरू पाहात आहेत. पण
ती नवजात बाळं, त्यांचं दुखणं खुपणं त्या माऊलीने मोठ्या कष्टाने आणि तितक्याच
आनंदाने करताना मी पाहिलं आहे. आजकाल विनाकारण चिडणाऱ्या सुखवस्तू माणसांची मला
त्यामुळेच फार कीव वाटते.
१३ जून १९९२ साली
मुंबईतील टिळकनगर येथील ‘आमची शाळा’ या शाळेत शिक्षक म्हणून मी रुजू झालो.
पहिल्याच दिवशी माझी आई हातात पटकुऱ्याऐवजी इणल्याली पिशवी, सोबत ओली छत्री घेऊन
माझ्या थोरल्या बंधूसह शाळेत हजर. तिसऱ्या मजल्यावर इयत्ता नववीच्या सत्तरेक
मुलांसमोर हातात खडू घेऊन मी उभा असताना माझ्या आई आणि भावाने माझ्याकडे
साश्रुनयनाने अर्थात आनंदातिशयाने बघितल्याचे मला आजही स्मरते. दारिद्र्यात
पिचलेल्या, अक्षर ओळख नसलेल्या माऊलीचा हा मुलगा मुंबईत शिक्षक झाला म्हणजे तिनं
चंद्रावर अथवा मंगळावर पाऊल ठेवल्याचा विलक्षण आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. इथेच
आम्ही भरून पावलो.
“तुका म्हणे मायबापे,
अवघी देवाची स्वरूपे” हे तुकोबांचे वचन सार्थ करण्यासाठी मला नेहमी वाटते की आपल्या घरात आणि मनातसुद्धा आईवडिलांसाठी एक कोपरा असावा. असलाच तर एक झोपाळा असावा. प्रयत्नांपेक्षाही माझा
पुण्याईवर अधिक विश्वास आहे. वडीलधाऱ्यांच्या पुण्याईमुळेच आपण बऱ्यापैकी यशवंत गुणवंत होत असतो.
तिच्या त्या करुणाकार पांडुरंगाकडे माझी ही नेहमीच तक्रार असणार आहे की, हा अलौकिक सोहळा याची देही याची डोळा तिला का पाहू दिला नाही? माझ्या थोरल्या बंधूच्या व्यसनमुक्तीसाठी तिने पुणेवाडीच्या पद्मावती देवी मंदिरापासून भैरवनाथ मंदिरापर्यंत जवळपास एक किलोमीटरचे अंतर रणरणत्या उन्हात साष्टांग दंडवत घालून पार केले, शेवटपर्यंत डाव्या हाताने ती जेवत राहिली. तिच्या त्या काळजाच्या तुकड्याचं व्यसनमुक्त होणं तिचं बघायचं राहून गेलं. तिची एक लाडकी नात अहमदनगरला जिल्हा शिक्षणाधिकारी झालेली बघताना मला वाटते ती एवढंच म्हटली असती, ‘इठ्ठला-पांडुरंगा तुझीच ही कृपा’.
तिच्या त्या करुणाकार पांडुरंगाकडे माझी ही नेहमीच तक्रार असणार आहे की, हा अलौकिक सोहळा याची देही याची डोळा तिला का पाहू दिला नाही? माझ्या थोरल्या बंधूच्या व्यसनमुक्तीसाठी तिने पुणेवाडीच्या पद्मावती देवी मंदिरापासून भैरवनाथ मंदिरापर्यंत जवळपास एक किलोमीटरचे अंतर रणरणत्या उन्हात साष्टांग दंडवत घालून पार केले, शेवटपर्यंत डाव्या हाताने ती जेवत राहिली. तिच्या त्या काळजाच्या तुकड्याचं व्यसनमुक्त होणं तिचं बघायचं राहून गेलं. तिची एक लाडकी नात अहमदनगरला जिल्हा शिक्षणाधिकारी झालेली बघताना मला वाटते ती एवढंच म्हटली असती, ‘इठ्ठला-पांडुरंगा तुझीच ही कृपा’.
माझ्या एका भाच्याने
सांगितलेला प्रसंग सांगतो नि थांबतो. आजी आणि हा नातू ज्वारीच्या उभ्या पिकातून
वाट काढत चालत असताना एका सापाने अचानक तिच्या पायाला वेटोळे घातले होते. तेव्हा
स्तब्ध उभी राहून दोन्ही हात जोडून डोळे मिटून तिने पांडुरंगाचा धावा केला. साप
आल्या वाटेने निघून गेला आणि काही घडलेच नाही अशा अविर्भावात तिने पुढची वाट धरली.
आमचं अवघं आयुष्य आनंदवारी करण्याचं श्रेय तिच्या जीवघेण्या धडपडीला जातंं. आई जिजाईची ही कथा-व्यथा इतरांना बोधकारक ठरेल. ही माय माझ्या गोतावळ्याला संस्कार शिदोरी देणारी एक आदर्श विद्यापीठ ठरली आहे.
आमचं अवघं आयुष्य आनंदवारी करण्याचं श्रेय तिच्या जीवघेण्या धडपडीला जातंं. आई जिजाईची ही कथा-व्यथा इतरांना बोधकारक ठरेल. ही माय माझ्या गोतावळ्याला संस्कार शिदोरी देणारी एक आदर्श विद्यापीठ ठरली आहे.
- मारुती शेरकर
२४ नोव्हेंबर २०१६.

1 comment:
Atyant hrudaybhedak lekh ahe man he lavun takle
Post a Comment