Saturday, 30 May 2020

तराळवाडी माझी संस्कारशाळा


तराळवाडी माझी संस्कारशाळा वाडी, माझी तराळवाडी.. तिथली माती, ज्या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे कारण जन्मल्यानंतर माझी नाळ त्या मातीत पुरलेली आहे. त्या मातीची ओढ मला आहे, त्याहीपेक्षा तिथल्या माणसांची अनिवार ओढ माझ्या मनात सदोदित असते..

इथली भजन परंपरा, वडीलधाऱ्यांचे संस्कार आणि आशीर्वाद संस्मरणीय आहेत. आदरणीय काकांचे कीर्तन श्रवणीय असायचेच आणि आजूबाजूला घडणाऱ्या वास्तवतेचे भान देणारे वाटायचे. स्वर्गीय टेलरमामांचा भजनकीर्तनातील आलाप तर भीमसेन जोशींपेक्षा बिलकुल कमी नव्हता. अवघ्या वाडीचे अण्णा म्हणजे स्वर्गीय गणपतअण्णा. त्याकाळात वर्तमानपत्र वाचणारा आणि रेडिओवरून आकाशवाणीच्या बातम्या ऐकणारा वाडीतला हा एकमेव माणूस. रेडिओवरून संध्याकाळच्या सातच्या बातम्या ऐकायला आम्ही संध्याकाळी त्यांच्याकडे जात असू. वाडीचा जगाशी संबंध तो फक्त या बातम्यांपुरता असायचा.. घरात येणाऱ्या आबालवृद्धांचा अण्णांनी कधी तिरस्कार केला नाही. ह्या साऱ्या गोष्टींचं आजमितीला खूप नवल वाटत आहे. ही सारी शिदोरी आयुष्यभर सोबत राहील.

कधीकाळी पायाला चप्पल मिळावी याची आस होती. धोंडीभाऊ चांभारांकडे बलुतं असूनही वडिलांनी त्यांच्याकडे चपलेची सुद्धा कधी मागणी केली नाही. कुणाकडे काही मागणं हे माझ्या वडिलांना आयुष्यभर जमलं नाही. खळ्यावर जमा केलेले त्यांचे ज्वारीची पाचुंदे बैलगाडीतून अनेकदा त्यांच्या घरी पोहोचवले होते. त्यांच्याकडून दहावीला असताना ती चप्पल मला कधीकाळी मिळाली. पावसाळ्यात मनकर्णिका नदीला पूर आल्यानंतर शंकरभाऊ मांग यांच्याकडे एकदा वस्तीला राहिलेलं आठवतय. वाडीतले किसनमामा सोनावणे दिवाबत्ती करायचे. गावकीचा काही निरोप सांगायचे, कोणाच्या काही कार्यक्रमाच्या वेळी लाकडे फोडून द्यायचे. अंगात शर्ट नसलेल्या घामेजलेल्या ह्या भल्या माणसामधे मला गाडगेबाबा दिसतात. खरंतर ही सारी मंडळी खळ्यादळ्यावर,घरीदारी एकत्र भेटायची. सुखदुःखाची देवाण-घेवाण व्हायची. हा सर्वधर्मसमभाव माझ्या मनात रुजला, मला वाटतं हे संस्कार फार महत्त्वाचे आहेत.

कॉलेजला जाण्यासाठी सायकल मिळावी ही सुद्धा इच्छा पूर्ण झाली ती केवळ माझ्या थोरल्या भावामुळे. खोपोलीला सायकलच्या दुकानात मेकॅनिक म्हणून ते काम करत असत. नादुरुस्त सायकलींचे वेगवेगळे स्पेअरपार्टस एकत्र करून एक छानशी सायकल त्यांनी माझ्यासाठी तयार केली आणि पारनेरला येणाऱ्या एसटी गाडीच्या टपावरून ती घेऊन आले. पुढे पारनेरमधूनच ती सायकल चोरीला गेली तो भाग अलाहिदा. खरंतर सगळं लिहायचं म्हटलं तर एक लघुकादंबरी होईल, बघू पुढे केव्हातरी लिहू सविस्तर. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून जगण्यासाठी, अधिक समृद्ध जगण्यासाठी किंबहुना जग आणि जगणं समजून घेण्यासाठी गाव सोडणे क्रमपात्र होते. या मुंबई महानगरीमध्ये मोठमोठ्या सभागृहांमध्ये ऐकण्या-बोलण्याचा योग आला.. त्याची बीजे या गावच्या मातीत फार पूर्वीच पेरली गेली होती.

वाडीच्या आपल्या एकमेवद्वितीय अशा दक्षिणमुखी मंदिरासमोर कितीतरी वेळा हरिपाठ रंगात यायचा आणि घामानं कपडे ओले व्ह्यायचे. स्वर्गीय शिवाजीराव तराळ यांनी आम्हाला लेझीम शिकवला. त्याद्वारे नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचे धडे वाडीतच लहानपणी मिळाले. कितीतरी वेळा भजन कीर्तनाचा सुमधुर अशा नामस्मरणाचा आस्वाद घेतला असेल, श्रावणी सोमवारी मंदिरातले पोथीचे पारायण ऐकले असेल, महिलांचं पारंपरिक गीतांसह फेर धरने असेल.. अशा अनंत आठवणी डोळ्यासमोर तरळतात. तो नादमधुर आवाज कानात रुंजी घालतो. ह्या सार्‍या आठवणींची विण म्हणजे सुंदर फॅब्रिक आहे. हा गावगाडा आणि रामराज्य आयुष्यभर प्रेरणा देत राहील. धन्यवाद..

मारुती शेरकर..

Wednesday, 27 May 2020

पद, पुरस्कार, वाढदिवस वगैरे..

गुरुदेव टागोरांनी गांधींना महात्मा म्हटलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या महात्म्याला राष्ट्रपिता म्हटलं. आणि हा महात्मा स्वतःला अल्पात्मा म्हणत असे हा भाग वेगळा.. टागोरानांही कुणीतरी गुरुदेव आणि सुभाषचंद्र बोस यांना नेताजी या नावाने संबोधलं असणार. स्वतःहून तर ते म्हटले नसतील की मला अमुकतमुक म्हणा. किंबहुना त्यांच्या अलौकिक आणि लोकोत्तर कार्यकर्तुत्वाची इतरांकडून दखल घेतली जाण्याचा आणि गुणगौरवाचा हा एक प्रकार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने प्रज्ञासूर्य (The Brightest Star) म्हणून गौरवलं. खरं तर या सर्व महानुभावांचे काम त्यांना देऊ करण्यात आलेल्या उपाध्यांपेक्षाही कितीतरी मोठं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने प्रज्ञासूर्य किताब देऊन विशेष सत्कार केला तेव्हा बाबासाहेबांच्या उत्तरादाखल भाषणातील एक वाक्य वानगीदाखल.. ते म्हणाले, “मला वाटलं होतं की या ज्ञानसागरामध्ये पोहणारा मी एक राजहंस बनेल पण पाहतो तर काय, मी फक्त गुड्गाभर पाण्यात उभा आहे, पोहीन कसा?”

उत्तरार्धात आपणास माहीत आहेच की गांधी-आंबेडकर या उत्तुंग माणसांमध्ये काही तात्त्विक मतभेद असूनही म. गांधींनी हा भारत देश घडवण्यासाठी डॉ. आंबेडकरांकरवी आदर्श असं संविधान नेहरूंच्या हाती सुपूर्द केलं. तर हे झालं मतभेदातलं अलौकिक सौंदर्य. अलीकडच्या काळात ही बाब अतिशय दुर्मिळ झालेली आहे.

जोतीबांसारख्या, गाडगेबाबांसारख्या महामानवांना आपण कोणत्या पुरस्काराने गौरवणार आहोत? नावासाठी-पदासाठी त्यांचं काम नव्हतच मुळी, तर त्यांचं काम हे त्यांच्या जगण्याचं कारण बनलं होतं. त्यांच्या समोर, त्यांच्या उत्तुंग कामापुढे आपण फक्त आणि फक्त नतमस्तकच होऊ शकतो. आणि हो थोडीफार चाड असेल तर त्यांच्या विचारांचे पाईक बनून यथाशक्ती हे काम अंशतः का होईना पुढे घेऊन जायला हवं किंबहुना त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. खरंतर किती परमोच्च त्याग केलाय त्यांनी आणि तोही किती विपरीत परिस्थितीत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, सामाजिक सुधारणा करण्यासाठी असंख्य लोकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं.

"परी जयांच्या दहनभूमिवर,
नाही चिरा, नाही पणती,
दिव्यत्वाची जेथ प्रचिती,
तेथे कर माझे जुळती।"

सर्वांचीच इतिहासात नोंद होत नाही, केली जात नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर आद्य स्वातंत्र्यसैनिक राघोजी भांगरे, उमाजी नाईक अशा कितीतरी क्रांतिकारकांचे देता येईल. त्यांचं अतुलनीय कार्यपर्व सहज उपलब्ध नाही मात्र प्राप्त परिस्थितीत त्यांनी दिलेल्या योगदानाचे विस्मरण अतिशय कृतघ्नपणाचे ठरेल.

वर्तमानातल्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी भूतकाळातलं ऐतिहासिक योगदान नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त जयंती-पुण्यतिथी, वर्गणी, गावभोजनापुरता हा कार्यक्रम सिमीत नसावा. त्यांच्या प्रतिमा पूजण्यापेक्षा, अथवा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणं, किंबहुना त्यांना अभिप्रेत असं थोडंफार यथाशक्ति वागणं अतिशय महत्त्वाचं आहे.

विंदा करंदीकरांनी अतिशय मार्मिक असं भाष्य केलेलं आहे. ते म्हणतात,

"इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊनि ना नाचा !
पदस्थल करूनि त्याचे
वरती चढुनि भविष्य वाचा !!"

मात्र सद्यस्थिती अगदीच शोचनीय आहे. सगळीकडे भाई, दादा, बापू, शेठ, राजे, सावकार, सरकार यांची चलती आहे. ही काही त्यांनी केलेल्या त्यागमय कामाबद्दल इतरांनी कृतज्ञतेने त्यांना दिलेली उपाधी नसते तर स्वतःच स्वतःला चिकटवलेली बिरुदावली असते. त्यासाठी त्यांची स्वतःची यंत्रणा असते. त्यांचे शेकडो पोस्टर्स आपलं लक्ष वेधून घेत असतात. मुळात इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठीच त्यांचा हा सारा खटाटोप असतो. त्यासाठीच हे सारं बोभाटा प्रकरण.. फोमो नावाची ही नवीन व्याधी अलिकडे निर्माण झालेली आहे. Fomo - fear of missing out.

मलाही विचारा, विचारात घ्या, बघा माझ्याकडे. त्यासाठी फ्लेक्स, बॅनर्स आणि सोबतचे गडी सवंगडी. ह्या उपद्रव मूल्याचा राजकारणात चांगला उपयोग होतो. ह्याच्याही पुढं जाऊन शिकल्या सवरल्या लोकांमध्येही वेगवेगळ्या संस्था, असोसिएशन, फेडरेशनमधे डायरेक्टर-चेअरमन होण्यासाठी अहमहमिका चालू असते. लोकोपयोगी कामे, जनजागरण हा भाग अलाहिदा. बरं ते सगळं चालतं त्या महामानवांच्या नावावर. ज्यांनी उभ्या आयुष्यात कधी हारतुरे स्वीकारलेले नसतात.

कर्मवीर आण्णांनी मुंबई- पुण्यात शाळा न काढता अगदी अनवाणी चालत जिथे रस्ताच नाही अशा गावा-खेड्यात, डोंगरात शाळा काढल्या. नवं लुगडं धोतर घेऊ नका पण बाळाला शाळा शिकवा म्हणणाऱ्या गाडगेबाबांनी स्वतः कधी नवा कपडा अंगावर ल्यायला नाही. विद्रोहाचे प्रणेते जोतीबा फुले लोकांना शहाणं करता करता स्वतः औषधपाण्यावाचून हे जग सोडून गेले. दत्तक मुलगा डॉ. यशवंताचं म्हणणं धुडकावून लावत सावित्रीबाई या माऊलीने प्लेग झालेल्यांची सेवा सुश्रुषा करता करता देह ठेवला. आपण ह्या महामानवांचे विचार न अंगिकारता त्यांच्या जयंत्या मयंत्यांचे थाट मांडतो, इव्हेंट साजरे करतो.. हारतुऱ्यांच्या आणि मान-सन्मानाच्या पलिकडची मुव्हमेंट खरं तर आता अभिप्रेत आहे.

महाराष्ट्रमाऊली साने गुरुजींच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारातून नवे साने गुरुजी, ज्ञानजोती सावित्रीमाईंच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारातून नव्या सावित्रीमाई शाळाशाळांमधून अवतरल्या असत्या तर नक्कीच समाजामध्ये नवनवे आदर्श निर्माण झाले असते. प्रत्येक शाळेत एक सानेगुरुजी किंवा एक सावित्रीबाई जर असेल तर ती शाळा एक संस्कारशाळा होईल आणि नवसमाज घडेल. असे होत नाही असे नाही मात्र अपवादात्मकच. पुरस्कारांसाठी अर्ज / आर्जव करणारी शिक्षक मंडळी पाहून वाईट वाटतं. मुलांना आयुष्याला सामोरे जाण्यासाठी तयार करत असताना अपेक्षित प्रश्न - उत्तर, परीक्षा - मार्क्स याच्यापलीकडे जेव्हा आपण जीवनशिक्षणाच्या चार गोष्टी सांगताना भावनेने ओथंबलेल्या अवस्थेत रंगून जातो, तल्लीन होऊन ऐकणाऱ्या त्या बाळाच्या गालावरून कधीतरी आसवाचा एखादा थेंब ओघळतो आणि त्या दवबिंदुमधे त्या शिक्षकाला जर स्वतःचं प्रतिबिंब दिसलं  तर लकाकणारा हा क्रांतीक्षण त्या शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांसाठीही नोबेलपेक्षाही मोठा पुरस्कार ठरावा. शिक्षकी पेशातले हे ट्रान्समध्ये घेऊन जाणारे क्षण ज्याच्या आयुष्यात जास्त येतील तो खरंतर आदर्श शिक्षक समजला जावा.

पद पुरस्कार आणि संबोधनांविषयी आपण बोलत होतो. मंत्रालयातल्या भाप्रसे पासून ग्रामपंचायतीतल्या ग्रामसेवकापर्यंतच्या मधल्या साखळीतील सर्व अधिकाऱ्यांना साहेब, भाऊसाहेब, रावसाहेब असं संबोधलं जातं. खरंतर आपण १९४७ सालीच या ब्रिटिश साहेबांना त्यांच्या मायदेशी पाठवलं. मात्र मनातला हा साहेब आपण कायम जपून ठेवला आहे. मला वाटतं साहेब म्हणन्यामध्ये आदर कमी आणि लांगूलचालन जास्त.. याउलट 'सर' म्हणण्याने समोरच्या व्यक्तीविषयीचा आदर द्विगुणित होतो. डॉक्टर्स इंजिनिअर्स आपापल्या क्षेत्रातील सिनियर्सना सर या नावानेच संबोधतात. ब्रिटिश राजघराण्याकडून नाईटहूड हा किताब दिला जात असे. Knight म्हणजे सरदार. जलियावालाबाग हत्याकांडानंतर गुरुदेवांनी त्यांना मिळालेला सर हा बहुमान ब्रिटिशांना परत केला होता.

तर आपण बोलत होतो पुरस्कारांविषयी. रक्त आटवणारी, तळमळ आणि कळकळ असणारी वल्ली समाजाने शोधावी, तिचा यथोचित गुणगौरव व्हावा ही रास्त अपेक्षा. कारण ते इतरांसाठी रोल मॉडेल असतात, वाटाडे असतात, जागले असतात. इतर झोपलेले असताना ते जागे असतात.

थोर समाजसेवक बाबा आमटे म्हणत,

"साथसोबत हवीय कुणाला?
माझंच आभाळ, माझीच धरती,
असाच एकटा चालत राहिन,
वादळं घेऊन खांद्यावरती."

माझे गाव माझे तीर्थ समजून लोककल्याणाचा ध्यास घेणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी, कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारणारे स्व. बाबा आमटे यांच्यासारख्या कितीतरी महानुभावांनी कोणत्या पुरस्कारासाठी कुठे अर्ज केल्याची सुतराम शक्यता असू शकत नाही. कोणताही पुरस्कार त्यांना दिल्याने अथवा न दिल्याने त्यांचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही. काम आधी पुरस्कार नंतर. जग त्या कामाची दखल घेईन, न घेईन याची पर्वा ही मंडळी करत नाहीत. काही व्यक्ती, सामाजिक संस्था, प्रतिष्ठानं अशा लोकोत्तर व्यक्ती शोधून त्यांचा यथोचित सन्मान जरूर करतात. अशा सोहळ्यांमधून त्यागमय विचारांची, नवं काही काम करण्याची उर्मी इतरांना मिळते. आपल्या माणसांची शाबासकीची ही थाप पाठीवर पडल्याने खरंतर चिमणीचाही गरूड होतो. नवं काम नव्या ऊर्जेने करण्याची नवी उमेद निर्माण होते. हा अतिशय स्त्युत्य उपक्रम समजला जावा.

पण अलिकडे काही संस्था, म्हणण्यापेक्षा संस्थाचालक विशिष्ट शुल्क आकारून पुरस्कार घेऊ इच्छिणारांचे रितसर अर्ज मागवतात. पुरस्काराला राज्यस्तरीय वगैरे आकर्षक नावं देतात. विशेष म्हणजे असले पुरस्कार घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अशा प्रसंगी पुरस्कार देणारे आणि तो घेणारे दोन्ही कमअस्सल समजावेत.

हीच गोष्ट वाढदिवस साजरा करण्याची अथवा लग्नासारखा एपिसोड.. रस्त्यात चौकात फ्लेक्स, बॅनरद्वारे गाजावाजा असतो. डीजे वगैरे ओंगळवाणे हिडिस प्रदर्शन कशासाठी? मोबाईल सुद्धा अशा शुभेच्छांनी भरून वाहत असतात.

सुप्रसिद्ध शायर साहिर लुधियानवी म्हणतात,

"जिंदगी एक सुलगतीसी चिता है साहिर
शोला बनती है न ये बुझ के धुवाँ होती है।"

या साहिर लुधियानवी साहेबांना मुलाखतकाराने विचारले की, तुमचा जन्म पाकिस्तानात कुठे झाला? साहिर साहेबांनी मुलाखतकाराला प्रतिप्रश्न केला, माझा जन्म कुठे झाला? कधी झाला? असे फिजूल प्रश्न विचारण्याऐवजी मला थेट का विचारत नाहीस की माझा जन्म 'का' झाला?

निसर्ग नियमानुसार जन्म झाला इथवर ठिक आहे. पण तो का झाला हे कळत नाही तोवर तो जन्म सार्थकी लागला असे म्हणता येत नाही. जन्मदिवस साजरा करण्यासाठी हे दुसरं कारण संयुक्तिक आहे. अर्थात आपला जन्म का झाला हे कळणाऱ्यांना जन्मदिवसाच्या सोहळ्याचे काही सोयरसुतक नसते.

आचार्य अत्रे याही पुढे जाऊन म्हणतात,

"उठल्या सुटल्या देऊ नकोस गं,
भान मला वाढत्या वयाचे,
असेच आहे धुंदपणे वयास,
चुकवित फुलायचे."

मारुती शेरकर..