Tuesday, 6 December 2016

बाबासाहेब समजून घेताना..


बाबासाहेब समजून घेताना..

‘असतो नर्मदेचा गोटा तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या.’, असंं बलुतंकार दया पवारांनी कोंडवाडा या कवितेत म्हटलंय. विचारी संवेदनशील माणसं अस्वस्थ असतात. बाबासाहेबांच अवघं आयुष्य अस्वस्थतेत गेलं. शेकडो हजारो वर्षे पडीक पडलेली जमीन बाबासाहेबांनी कसायला घेतली, म्हणून आता हे थोडंफार पिक आलंय. त्यांचे मन सुन्न होत असे, मती गुंग होत असे, आम्हीही माणसेच आहोत, हाडा-मांसाची मनं असलेली माणसंच आहोत ना? आणि म्हणूनच त्यांनी किमान माणूसपण नाकारणाऱ्या हिंदू धर्माची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो कोणी ते पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत. शिकल्याने माणसाला आपणही माणूस आहोत याची जाणीव होते. लोकांमध्ये Identity Crisis तेव्हा होता आणि आजही आहे. आपण गुलाम आहोत याचीच जाणीव नसेल तर काय करणार? गावकुसाबाहेर समाज असाच बहिष्कृत राहणार का? १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीनंतर बॅस्टिलच्या तुरुंगातील कैदी बेड्या काढल्यानंतर पळून गेले नाहीत. कारण गुलामी त्यांच्या रक्तात भिनली होती. Old Habits are diehard.. बधीर मने पेटणार कधी? आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मगच तो पेटून उठेल. स्वतःची जाणीव होणं हा क्रांतीक्षण. आपण पेटतो पण व्यक्तिगत स्वार्थासाठी. हा स्वार्थ साध्य झाल्यानंतर पुन्हा विझतो. आपल्या पेटण्याला व्यापक सामाजिक भान असलं पाहिजे. बाबासाहेबांचे विचार म्हणजे धगधगता निखारा आहेत. त्यांच्याविषयी लिहिणं किंवा बोलणं म्हणजे कडाडत्या विजेला पकडण्यासारखं आहे. त्यांचं अलौकिक आणि उत्तुंग कार्यकर्तुत्व हे लेखाद्वारे अथवा पुस्तकाद्वारे व्यक्त करणं अवघड बाब आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांना ‘यावतचंद्रदिवाकरो’ बाबासाहेब प्रेरणा देतील. बाबासाहेब अभ्यासताना स्वतःला स्वतःची नवी ओळख मिळते.

सामाजिक गुलामगिरीतून मुक्त झाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याचा काय फायदा? त्यांच्या दृष्टीने एतद्देशियांपेक्षा इंग्रज हजारपटीने चांगले होते. महार फलटणीने भिमा कोरेगावजवळ पेशवाईचा शेवट केला. इंग्रजी अंमल सुरु झाला. मनुवादी वर्णवर्चस्ववादी स्वकियांकडून आपल्या समाजाची सुटका झाली पाहिजे. बाबासाहेबांनी म्हटले, स्वातंत्र्य, कसले स्वातंत्र्य? We don’t have a motherland and you talk about religion, what does freedom to us? समाज सुस्त झोपलेला, भुकेकंगाल, ठार अज्ञानी आणि आपण माणूस आहोत हेच विसरलेला.
      
२६ जानेवारी १९५० ला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून भारताला पाहिलंवहिलं खरखुरं स्वातंत्र्य मिळालं. सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दिन शेख म्हणतात, ‘भलेही घरी असेल गीता, बायबल, कुराण पण माझा खरा धर्म आहे संविधान.’ दुर्दैवाने २६ जानेवारी रोजी मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये सत्यनारायण केला जातो. बाबासाहेबांनी हयातभर अस्पृश्यतेचे चटके सोसल्याने अस्पृश्यता नष्ट करण्याचे कलम त्यांनी संविधानात अंतर्भूत केले. स्वातंत्र्य-समता-बंधुता हे संविधानाचे प्राणतत्व आहे. संसदीय लोकशाही आणि कायद्याचं राज्य भारतात आलं. बाबासाहेबांच्या मते लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तहीन मार्गाने अमुलाग्र बदल आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही. टाटा-बिरला सुद्धा निवडणुकीत एकच मत देतात आणि सामान्य माणूससुद्धा ते एकच अनमोल मत देतो. दुर्दैवाने गांधीबाबाच्या नोटांना ते मत विकलं जातं आणि बाबासाहेबांचा पराभव होतो. प्रत्यक्ष निवडणुकीतसुद्धा त्याकाळच्या जनतेने बाबासाहेबांना हरवण्यात धन्यता मानली. We choose the Government; we deserve. अर्थतज्ञ Minu Masani म्हणतात, Who says India is a poor country, India is not a poor country but a poorly managed country. दुष्टांच्या दुष्कृत्यांपेक्षाही तथाकथित सज्जनांचे मौन फार घातक आहे. अवघ्या भारताला भारतीयत्वाच्या एका सूत्रात संविधानामुळे गुंफता आले. एकसंघ समाज निर्माण करता आला. बाबासाहेबांनी म्हटले होते, I am Indian first and Indian last. प्रादेशिक, भाषिक आणि इतर असे अनेक कलह भारताची शकले करतील की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना केवळ संविधानच भारताचं, भारतीयांचं रक्षण करू शकेल. अब्दुल कलाम यांनी म्हटले होते, कायदा महान असून चालत नाही. देशातील नागरिक महान असल्याशिवाय देश महान होऊ शकत नाही. टी. एन. शेषन यांनी अधिकार वापरले आणि संविधानाला अभिप्रेत निवडणूक आयुक्त कसा असावा हे दाखवून दिले. प्रत्येकाने आपला टेबल, अधिकार याचा वापर संविधानाला आणि देशप्रेमाला अनुसरून केला तर भारत महान व्हायला वेळ लागणार नाही. आपण फक्त प्रतिमा पुजतो, डोक्यावर घेऊन नाचतो. परंतु त्यांचे विचार डोक्यात आणि अंतर्मनात कधी रुजवणार आहोत?
        
बाबासाहेबांनी खूप अभ्यास केला, खूप विचार केला, अनेक पर्यायांवर खल केला. माझा समाज हिंदू धर्मियांच्या दावणीला बांधलेला आहे. जनावरांसारखं आयुष्य जगणारा आहे. त्यांना माणूसपण बहाल करण्यासाठी बाबासाहेबांनी धम्माकडे वाटचाल केली. मनुस्मृती म्हणते, वर्णव्यवस्था जो मानत नाही तो हिंदू नाही. मनुस्मृतीची होळी करून बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेला मूठमाती दिली. चवदार तळ्याचा संघर्ष – केवळ माणुसकी नाकारणारांच्या विरोधात झाला. महाडच्या ज्या तलावात गुरा-ढोरांना न्हाऊ घातलं जायचं, जिथं कुत्री-मांजरं शी-शु करतात त्या निसर्गाच्या पाण्यावर आमचा हक्क नाही? महाडच्या चवदार तळ्यावरील संघर्ष त्या घोटभर पाण्यासाठी पेटला नव्हता, तर तमाम उपेक्षित वंचित दिनदलितांच्या उद्धारासाठी होता. आम्हाला मंदीरप्रवेश सोडा, निसर्गाच्या पाण्यावरसुद्धा हक्क नाही. आम्हाला पाणी नाकारताय? म्हणजे जीवन नाकारताय? जगणं नाकारताय? आमचं माणूसपण नाकारताय? आता आम्ही जागे झालेलो आहोत, हा इशारा, ही ललकारी बाबासाहेबांनी समस्त धर्ममार्तंडांना आणि सनातन्यांना दिली. या प्रसंगी चित्रे, भिडे, टिपणीस इत्यादी ब्राह्मणांनी बाबासाहेबांना मदत केली. बाबासाहेब म्हणत, ब्राह्मण लोक आमचे वैरी नाहीत, तर ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत. घाणीचं साम्राज्य असलेलं महाडच तळं बाबासाहेबांच्या पतितपावण पावलांनी चवदार झालं, पवित्र झालं, ऐतिहासिक झालं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लोकांनी माणुसपणासाठी संघर्षाची प्रतिज्ञा केली. बाबासाहेबांचं नेतृत्व सर्वमान्य झालं. परतणाऱ्या लोकांवर, आया-बहिणींवर सनातन्यांनी हल्ले केले, अत्याचार केले. बाबासाहेब लालबुंध झाले. त्यात पहिल्या महायुद्धात लढलेले काही वीर होते. सनातन्यांशी दोन हात करण्याची, त्यांना अद्दल घडविण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. बाबासाहेबांनी विनम्रपणे हात जोडून सर्वांना आपापल्या गावी जाण्यास सांगितले. बाबासाहेबांचा शब्द प्रमाण मानून, अंतिम मानून अनुयायी तेथून निघून गेले. क्षोभ माजवणं सोपं पण विचार देणं कठीण असतं. धन्य तो नेता, धन्य ते अनुयायी. असे एक ना अनेक जीवघेण्या प्रसंगांची मालिका बाबासाहेबांच्या जीवनमार्गात निर्माण झाली. अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी आणि आत्मसन्मानासाठी बाबासाहेब हयातभर लढले.

ज्याप्रमाणे प्रत्येक ख्रिश्चनाला मग तो कॅथलिक असो वा प्रोटेस्टंट चर्चमध्ये त्यांना कुणी अडवत नाही. इस्लाम धर्मातील शिया असो वा सुन्नी प्रत्येक मुसलमान अल्लाहकडे इबादत मागू शकतो. पण आम्ही जर हिंदू असु तर मग आम्हाला तो काळाराम, सावळा कृष्ण अथवा अंबामातेचं मुखदर्शन का नको? किती चोख्यांनी फक्त पायरीवरच ठाण मांडून बसायचं आणि समाधान पावायचं? ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ किंवा ‘देरे हरी खाटल्यावरी’ असा प्रगतीला घातक असणारा आळशी विचार बाबासाहेबांना झटकून टाकायचा होता. तत्कालीन सनातन्यांना असे अनेक धक्के दिले तरी ते ढिम्मंच. १९३५ साली येवल्याला त्यांनी घोषणा केली की, आता मी हिंदू म्हणून मरणार नाही. पुढे तब्बल २१ वर्षे त्यांनी प्रस्थापित मनुवाद्यांशी दोन हात केले. १९३६ साली लाहोरच्या जात-पात तोडक मंडळाला त्यांनी निक्षून सांगितले की हे भाषण हिंदू म्हणून माझे शेवटचे भाषण असेल. त्या भाषणाचे स्क्रिप्ट प्रस्थापितांना मानवलं नाही. तिथे ‘न’ झालेलं प्रदीर्घ भाषण पुढे Annihilation of caste ह्या पथदर्शी पुस्तकरुपात शासनाच्या मुद्रणालयात उपलब्ध आहे.

अखेरीस बाबासाहेबांच्या हाती नवनीत लागले. महत्प्रयासांनी, सारासार विचार करून बाबासाहेबांनी मनातला आवाज, अंतर्नाद ऐकला. तो होता अत्तदीपभव, तथागत कारुण्यमूर्ती गौतम बुद्धांचा धम्म. बाबासाहेबांनी म्हटलंय की, आम्हाला धर्मच नव्हता म्हणून आम्ही धर्मांतर नव्हे तर धम्मदीक्षा घेत आहोत. गावकुसाबाहेर अस्पृश्य, बहिष्कृत जिणं असलेल्यांसाठी, शूद्रातिशूद्र शेवटचा पाचवा वर्ण असलेल्यांसाठी, त्यांच्या अस्मितेसाठी, माणुसकीच्या अस्तित्वासाठी केवळ एक आणि एकच उपाय होता. धम्म. आत्मसन्मानाचा आतला दिवा तेवता ठेवण्यासाठी धम्माशिवाय उपाय नव्हता. जुनाट रूढी, परंपरा, प्रतिगामी गुलामगिरीच्या मना-मनाच्या बेड्या खाळकन तुटल्या. बुद्धी प्रामाण्यवाद सांगणारा, नीतीचे आचरण करायला शिकवणारा धम्मच आपल्याला प्रगतीचे नवे आभाळ देऊ शकतो, प्रबुद्ध बनवू शकतो. खुद्द बाबासाहेबांनी सांगून ठेवलंय, ‘‘Don’t lay your head on anyone’s feet whoever he may be.’’ निर्बुद्धांच्या भ्रामक देवभोळेपणाला, विभूतीपुजेला, व्यक्तिपूजेच्या थोतांडाला बाबासाहेबांनी सणसणीत चपराक मारली. बाबासाहेब आणि त्यांचे विचार धगधगता निखारा आहेत, अंगार आहेत. त्यांच्या जाज्वल्य विचारांची वादळे समजून घ्या. बाबासाहेब डॉक्टर होते, त्यांना समाजाची नाडी कळल्यामुळे समाजस्वास्थ्य चांगलं कळलं होतं. त्यांनी हयातभर social operations केली. बाबासाहेब सर्व शोषितांचे, गरिबांचे मसिहा आहेत. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे पायाभूत तत्व असलेल्या धम्माच्या वाटेवर आपल्याला बाबासाहेबांनी आणून ठेवलंय. त्या बाबासाहेबांना “देव” ठरवून मंदीरात बसवू नका. बाबासाहेब हा एक महान विचार आहे. तो विचार आपण यथाशक्ती समजून घेऊया, त्या वाटेवर मार्गक्रमण करूयात. जो-जो अभ्यास करतो, समाजाची मनोभावे सेवा करताना चंदनासारखे झिजतो. तो-तो बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या धम्माच्या वाटेवर आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस कोटीकोटी प्रणाम.
- मारुती शेरकर
६ डिसेंबर २०१६.

No comments: