Monday, 13 April 2020

कडाडती वीज..


"असतो नर्मदेचा गोटा तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या.", असंं बलुतंकार दया पवारांनी कोंडवाडा या कवितेत म्हटलंय. विचारी, संवेदनशील माणसं अस्वस्थ असतात. बाबासाहेबांच अवघं आयुष्य अस्वस्थतेत गेलं. शेकडो हजारो वर्षे पडीक पडलेली जमीन बाबासाहेबांनी कसायला घेतली, म्हणून आता हे थोडंफार पिक आलंय. बऱ्यापैकी आपण सारे भेद संपवून भारतीय होत आहोत. मात्र यासाठी अनेक महानुभावांनी आपले आयुष्य पणाला लावले. बाबासाहेब त्यांपैकी अग्रणी आहेत. त्यांचे मन सुन्न होत असे, मती गुंग होत असे. आम्हीही माणसेच आहोत, हाडा-मांसाची आणि हो मनं असलेली माणसंच आहोत ना? म्हणूनच त्यांनी किमान माणूसपण नाकारणाऱ्या हिंदू धर्माची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली. येवल्याला 1935 साली त्यांनी सांगून टाकले की जरी मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार मात्र नाही. इथेच त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला होता. शिक्षण, विशेषत्वाने इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो कोणी ते पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणत. शिकल्याने माणसाला आपणही माणूस आहोत याची जाणीव होते. लोकांमध्ये Identity Crisis तेव्हा होता आणि आजही आहे. आपण गुलाम आहोत याचीच जाणीव नसेल तर तो पेटणार कधी? ते म्हणत "शिकणं म्हणजे, बुद्धीला सत्याकडे, मनाला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे घेऊन जाणे.." पण हे होणे अजूनही बाकी आहे.. गावकुसाबाहेरचा माझा समाज असाच बहिष्कृत राहणार का? १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीनंतर बॅस्टिलच्या तुरुंगातील कैदी बेड्या काढल्यानंतर पळून गेले नाहीत. कारण गुलामी त्यांच्या रक्तात भिनली होती. Old Habits are diehard.. बधीर मने पेटणार कधी? आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मगच तो पेटून उठेल. स्वतःची जाणीव होणं हा क्रांतीक्षण. आपण पेटतो पण व्यक्तिगत स्वार्थासाठी. हा स्वार्थ साध्य झाल्यानंतर पुन्हा विझतो. आपल्या पेटण्याला व्यापक सामाजिक भान असलं पाहिजे. बाबासाहेबांचे विचार म्हणजे धगधगता निखारा आहेत. त्यांच्याविषयी लिहिणं किंवा बोलणं म्हणजे कडाडत्या विजेला पकडण्यासारखं आहे. ही वीज पकडण्याचे धारिष्ट्य ही त्यांच्या अभ्यासातून मिळालेले आहे. त्यांचं अलौकिक आणि उत्तुंग कार्यकर्तुत्व हे लेखाद्वारे अथवा पुस्तकाद्वारे व्यक्त करणं अवघड बाब आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांना ‘यावतचंद्रदिवाकरो’ बाबासाहेब प्रेरणा देतील.
आपापल्या वकुबानुसार बाबासाहेबांबद्दल लिहितील, बोलतील, पण त्यांना थोडंफार का होईना अनुसरावं लागेल आपल्याला.. अखंडपणे अनेक खंड अजूनही त्यांच्यावर लिहिले जातील.. बाबासाहेब अभ्यासताना स्वतःला स्वतःची नवी ओळख मिळत जाते.

सामाजिक गुलामगिरीतून मुक्त झाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याचा काय फायदा? त्यांच्या दृष्टीने एतद्देशियांपेक्षा इंग्रज अनेकपटीने चांगले होते. महार पलटणीने भिमा कोरेगावजवळ पेशवाईचा शेवट केला. इंग्रजी अंमल सुरु झाला. मनुवादी वर्णवर्चस्ववादी स्वकियांकडून आपल्या समाजाची सुटका झाली पाहिजे. बाबासाहेबांनी म्हटले, स्वातंत्र्य, कसले स्वातंत्र्य? We don't have a motherland and you talk about religion, what does freedom to us? समाज सुस्त झोपलेला, भुकेकंगाल, ठार अज्ञानी आणि आपण माणूस आहोत हेच विसरलेला.

२६ जानेवारी १९५० ला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून भारताला पाहिलंवहिलं खरखुरं स्वातंत्र्य मिळालं. सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दिन शेख म्हणतात,
"भलेही घरी असेल माझ्या
गीता, बायबल, कुराण !
पण माझा खरा धर्म आहे
संविधान, संविधान, संविधान.!!"

दुर्दैवाने २६ जानेवारी रोजी मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये पगारदार शिकल्या सवरलेल्यांकडून सत्यनारायण केला जातो.. लोकशाहीच्या ह्या लाभार्थ्यांना सांविधानिक तरतुदींच्या आधारेच नोकऱ्या मिळालेल्या असतात.. खूप काम होणे बाकी आहे.

बाबासाहेबांनी हयातभर अस्पृश्यतेचे चटके सोसल्याने अस्पृश्यता नष्ट करण्याचे कलम त्यांनी संविधानात अंतर्भूत केले. स्वातंत्र्य-समता-बंधुता हे संविधानाचे प्राणतत्व आहे. संसदीय लोकशाही आणि कायद्याचं राज्य भारतात आलं. बाबासाहेबांच्या मते लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तहीन मार्गाने अामुलाग्र बदल आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही. टाटा-बिरला सुद्धा निवडणुकीत एकच मत देतात आणि सामान्य माणूससुद्धा ते एकच अनमोल मत देतो. खेदाची गोष्ट अशी की गांधीबाबाचा फोटो छापलेल्या नोटा देऊन ते मत विकत घेतलं जातं, विकलं जातं आणि मग बाबासाहेबांचा आणि त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचाही पराभव होतो.

प्रत्यक्ष निवडणुकीतसुद्धा त्याकाळच्या जनतेने बाबासाहेबांना हरवण्यात धन्यता मानली. We choose the Government; we deserve. अर्थतज्ञ Minu Masani म्हणतात, Who says India is a poor country, India is not a poor country, but a poorly managed country. दुष्टांच्या दुष्कृत्यांपेक्षाही तथाकथित सज्जनांचे मौन फार घातक आहे. अवघ्या भारताला भारतीयत्वाच्या एका सूत्रात संविधानामुळे गुंफता आले. एकसंघ समाज निर्माण करता आला. बाबासाहेबांनी म्हटले होते, I am Indian firstly and Indian lastly. प्रादेशिक, भाषिक आणि इतर असे अनेक कलह भारताची शकले करतील की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना केवळ संविधानच भारताचं, भारतीयांचं रक्षण करू शकेल. पण दुर्दैवाने संविधानाला न मानणारे, बाबासाहेंबाना न जुमाननारे या देशात कमी नाहीत. बाबासाहेब हे जाती धर्माच्या पलीकडचे भारतीय होते.

अब्दुल कलाम यांनी म्हटले होते, "कायदा महान असून चालत नाही. देशातील नागरिक महान असल्याशिवाय देश महान होऊ शकत नाही." टी. एन. शेषन यांनी आपले अधिकार वापरले आणि संविधानाला अभिप्रेत निवडणूक आयुक्त कसा असावा हे दाखवून दिलं. प्रत्येकाने आपला टेबल, आपला अधिकार याचा वापर संविधानाला आणि देशप्रेमाला अनुसरून केला तर भारत महान व्हायला वेळ लागणार नाही. आपण फक्त प्रतिमा पुजतो, डोक्यावर घेऊन नाचतो. परंतु त्यांचे विचार डोक्यात आणि अंतर्मनात कधी रुजवणार आहोत?

बाबासाहेबांनी खूप अभ्यास केला, खूप विचार केला, अनेक पर्यायांवर खल केला. माझा समाज हिंदू धर्मियांच्या दावणीला बांधलेला आहे. जनावरांसारखं आयुष्य जगणारा आहे. त्यांना माणूसपण बहाल करण्यासाठी बाबासाहेबांनी धम्माकडे वाटचाल केली. मनुस्मृती म्हणते, वर्णव्यवस्था जो मानत नाही तो हिंदू नाही. मनुस्मृतीची होळी करून बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेला मूठमाती दिली. चवदार तळ्याचा संघर्ष-केवळ माणुसकी नाकारणारांच्या विरोधात झाला. महाडच्या ज्या तलावात गुरा-ढोरांना न्हाऊ घातलं जायचं, जिथं कुत्री-मांजरं शी-शु करतात त्या निसर्गाच्या पाण्यावर आमचा हक्क नाही? महाडच्या चवदार तळ्यावरील संघर्ष त्या घोटभर पाण्यासाठी पेटला नव्हता, तर तमाम उपेक्षित वंचित दीनदलितांच्या उद्धारासाठी होता. त्यांच्या मूलभूत हक्कासंदर्भात होता. आम्हाला मंदीरप्रवेश सोडा, निसर्गाच्या पाण्यावरसुद्धा हक्क नाही. आम्हाला पाणी नाकारताय? म्हणजे जीवन नाकारताय? जगणं नाकारताय? आमचं माणूसपण नाकारताय? आता आम्ही जागे झालेलो आहोत, हा इशारा, ही ललकारी बाबासाहेबांनी समस्त धर्ममार्तंडांना आणि सनातन्यांना दिली. या प्रसंगी चित्रे, भिडे, टिपणीस इत्यादी ब्राह्मणांनी बाबासाहेबांना मदत केली. बाबासाहेब म्हणत, ब्राह्मण लोक आमचे वैरी नाहीत, तर ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत. घाणीचं साम्राज्य असलेलं महाडच तळं बाबासाहेबांच्या पतितपावण पावलांनी चवदार झालं, पवित्र झालं, ऐतिहासिक झालं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लोकांनी माणुसपणासाठी संघर्षाची प्रतिज्ञा केली. बाबासाहेबांचं नेतृत्व सर्वमान्य झालं. परतणाऱ्या लोकांवर सनातन्यांनी हल्ले केले. बाबासाहेब लालबुंद झाले. त्यात पहिल्या महायुद्धात लढलेले काही वीर होते. सनातन्यांशी दोन हात करण्याची, त्यांना अद्दल घडविण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. बाबासाहेबांनी विनम्रपणे हात जोडून सर्वांना आपापल्या गावी जाण्यास सांगितले. बाबासाहेबांचा शब्द प्रमाण मानून, अंतिम मानून अनुयायी तेथून निघून गेले. क्षोभ माजवणं सोपं पण विचार देणं कठीण असतं. धन्य तो नेता, धन्य ते अनुयायी. असे एक ना अनेक जीवघेण्या प्रसंगांची मालिका बाबासाहेबांच्या जीवनमार्गात निर्माण झाली. अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी आणि आत्मसन्मानासाठी बाबासाहेब हयातभर लढले.

ज्याप्रमाणे प्रत्येक ख्रिश्चनाला मग तो कॅथलिक असो वा प्रोटेस्टंट चर्चमध्ये त्यांना कुणी अडवत नाही. इस्लाम धर्मातील शिया असो वा सुन्नी प्रत्येक मुसलमान अल्लाहकडे इबादत मागू शकतो. पण आम्ही जर हिंदू असु तर मग आम्हाला तो काळाराम, सावळा कृष्ण अथवा अंबामातेचं मुखदर्शन का नको? किती चोख्यांनी फक्त पायरीवरच ठाण मांडून बसायचं आणि समाधान पावायचं? ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ किंवा ‘दे रे हरी खाटल्यावरी’ असा प्रगतीला घातक असणारा आळशी विचार बाबासाहेबांना झटकून टाकायचा होता. समतेची आणि सहिष्णुतेची अॅक्च्युअल प्रॅक्टिस त्यांना हवी होती. तत्कालीन सनातन्यांना असे अनेक धक्के दिले तरी ते ढिम्मंच. अनेक वर्षे त्यांनी प्रस्थापित मनुवाद्यांशी दोन हात केले. १९३६ साली लाहोरच्या जात-पात तोडक मंडळाला त्यांनी निक्षून सांगितले की हे भाषण हिंदू म्हणून माझे शेवटचे भाषण असेल. त्या भाषणाचे स्क्रिप्ट प्रस्थापितांना मानवलं नाही. तिथे ‘न’ झालेलं प्रदीर्घ भाषण पुढे Annihilation of caste (जातींचे विध्वंसन) ह्या पथदर्शी पुस्तकरुपात शासनाच्या मुद्रणालयात उपलब्ध आहे.

अखेरीस बाबासाहेबांच्या हाती नवनीत लागले. महत्प्रयासांनी, सारासार विचार करून बाबासाहेबांनी मनातला आवाज, अंतर्नाद ऐकला. तो होता अत्तदीपभव, तथागत कारुण्यमूर्ती गौतम बुद्धांचा धम्म. बाबासाहेबांनी म्हटलंय की, आम्हाला धर्मच नव्हता म्हणून आम्ही धर्मांतर नव्हे तर धम्मदीक्षा घेत आहोत. गावकुसाबाहेर अस्पृश्य, बहिष्कृत जिणं असलेल्यांसाठी, शूद्रातिशूद्र शेवटचा पाचवा वर्ण असलेल्यांसाठी, त्यांच्या अस्मितेसाठी, माणुसकीच्या अस्तित्वासाठी केवळ एक आणि एकच उपाय होता. धम्म. आत्मसन्मानाचा आतला दिवा तेवता ठेवण्यासाठी धम्माशिवाय उपाय नव्हता. जुनाट रूढी, परंपरा, प्रतिगामी गुलामगिरीच्या मना-मनाच्या बेड्या खाळकन तुटल्या. बुद्धी प्रामाण्यवाद सांगणारा, नीतीचे आचरण करायला शिकवणारा धम्मच आपल्याला प्रगतीचे नवे आभाळ देऊ शकतो, प्रबुद्ध बनवू शकतो. खुद्द बाबासाहेबांनी सांगून ठेवलंय, ‘‘Don't lay your head on anyone's feet whoever he may be.’’ निर्बुद्धांच्या भ्रामक देवभोळेपणाला, विभूतीपुजेला, व्यक्तिपूजेच्या थोतांडाला बाबासाहेबांनी सणसणीत चपराक मारली. बाबासाहेबांच्या जाज्वल्य विचारांची वादळे समजून घ्या. बाबासाहेब डॉक्टर होते, त्यांना समाजाची नाडी कळल्यामुळे समाजस्वास्थ्य कशात आहे हे चांगलं कळलं होतं. त्यांनी हयातभर social operations केली. बाबासाहेब सर्व शोषितांचे, गरिबांचे मसिहा आहेत. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे पायाभूत तत्व असलेल्या धम्माच्या वाटेवर आपल्याला बाबासाहेबांनी आणून ठेवलंय. त्या बाबासाहेबांना 'देव' ठरवून मंदीरात बसवू नका. बाबासाहेब हा एक विचार आहे, धगधगता विचार आहे. परिवर्तनाचा, माणुसकीचा हा विचार आपण यथाशक्ती समजून घेऊया, त्या वाटेवर मार्गक्रमण करूयात. जो-जो अभ्यास करतो, समाजाची मनोभावे सेवा करताना चंदनासारखे झिजतो. तो-तो बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या धम्माच्या वाटेवर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

- मारुती शेरकर
9867708408

Thursday, 9 April 2020

ज्ञानमंदिर


ज्ञानमंदिर,
मु. औटी-शेरकर वस्ती,
तराळवाडी, ता. पारनेर,
जि. अहमदनगर-४१४३०२.

हा पत्ता आहे एका आगळ्यावेगळ्या मंदिराचा. जिथं मंदिर आहे पण मूर्ती नाही. विचारांचा - ज्ञानाचा मूर्तिमंत समृद्ध ठेवा इथं पुस्तकांच्या रुपात आहे..

पूर्वी किंवा आजही काही ठिकाणी गावाच्या पारावर झाडाखाली लोकं बसतात. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पाटप्पा तिथं होतात. सुखदुःखाच्या हितगुजापासून एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत बरच काही तिथं होत असायचं. एकत्र येण्यानं, बोलण्यानं भावभावनांचा निचरा व्हायचा. कालौघात अशा ‘जागा’ कमीकमी होत गेल्या. माणसं मोबाईल झालीत. यंत्रवत होत चाललीत. गावचं गावपण, घराचं घरपण, माणसाचं माणूसपण टिकवण्यासाठी अशा जागा आता निर्माण करणं अनिवार्य झालं आहे. त्यासाठीच या ज्ञानमंदिराचा प्रयोग केला आहे.

सुधीर शेरकर आणि ऋषिकेश औटी या दोन मित्रांनी इतर बालगोपाळांसह रस्त्याच्या कडेला या जागेत कापड-प्लास्टिकचा कागद वापरून छोटसं शेड उभारून इथं गणेशोत्सव सुरु केला. लोकं अतिशय उत्साहाने हा उत्सव साजरा करायचे, आजही करतात. गणपतीच्या सुट्टीत मी हे न्याहाळत होतो. मनात विचार आला, आपण या तरुणाईच्या उत्साहाला, शेतात राबराब राबणाऱ्या भोळ्याभाबड्या जीवांच्या त्या श्रद्धेला एक विधायक वळण दिलं तर? भजन-कीर्तन, प्रवचन, सत्संगात रमणारी ही मंडळी. श्रावणात भक्तिभावाने नवनाथ किंवा हरिविजय ग्रंथ वाचून शेवटी प्रसाद म्हणजे इतरांना जेवण देण्यात धन्यता मानणारी ही आपली माणसं. त्यांच्या भक्तीला, श्रद्धेला कुठेही तडा न जाऊ देता हे सारे शेजारी पाजारी मनाने एक कसे राहतील? तर त्यांना एकत्र येण्यासाठी कारण हवंय, विचार हवाय, जागा हवी आहे. पनवेलला माझ्याकडे काही पुस्तकं होती. त्यात मामा साहेबराव ठाणगे, साथी अरविंद लोहार आणि आमच्या वाडीतील जेष्ठ कीर्तनकार सोपानकाका औटी यांनी त्यांच्याकडील काही पुस्तकं देऊ केली.

माझ्या ह्या माणसांना ग्रंथांची मनोभावे पारायणे करता-करता संतांची, महामानवांच्या विचारांची ओळख करून देणं आवश्यक होतं. गाथा आणि ज्ञानेश्वरी जर अर्थपूर्ण भाषेत यांना वाचायला मिळाली तर. पारायणासोबतच तसं वागण्यासाठी, प्रयत्नांची प्रामाणिकपणे पराकाष्ठा करण्यासाठी त्यांना संतवचनांचं नक्की पाठबळ मिळेल. जवळपास तीनशे पुस्तकं आणि दैनिक सकाळ हे वृत्तपत्र उपलब्ध करून द्यायचं मी ठरवलं. पण जागेचा प्रश्न, थोड्याफार बांधकामाचा प्रश्न, मूर्तीशिवाय मंदिर? असे अनेक प्रश्न होते.

प्रश्नांना भिडणं म्हणजे प्रश्न सोडविणं. सर्वात आधी चर्चा सुरु केली. सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद आला. जागामालक दत्तात्रय औटी यांनी एकाच वाक्यात मला सांगितलं, “आबा तुम्ही म्हणाल ते सगळं होईल..” जागाबांधणीसाठी सर्वांनीच हातभार लावला. रामहरी, विठ्ठल, दत्ता, आप्पा, भिमाप्पा, अण्णा, शंकरराव यांनी आणि वस्तीवरल्या इतरही मंडळींनी स्वतः काम करून हा छोटासा पण टुमदार निवारा बांधला. नाही म्हणायला एक मुद्दा चर्चेला आलाच, मूर्तीशिवाय मंदिर? त्यावर सविस्तर आणि यशस्वी चर्चा झाली. सर्वच तपशिलात जात नाही. मात्र ज्ञान - पुस्तके - वर्तमानपत्र - विचार - एकत्र येणं - वेगवेगळे कार्यक्रम करणं यावर एकमत झालं. जग कळावं, आपलं जगणं आकळावं, माणूस आधिक समृद्ध व्हावा यासाठी वाचन, विचार आणि विश्लेषणाची नितांत आवश्यकता असते. मला वाटतं वाचन हे सर्व सुखांचे आगर आहे. नवीन प्रश्न, त्यांची नवनवीन उत्तरं ह्या वाचनातून मिळत असतात. सोबत जीवनानुभव असतातच. ही वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी घरोघरी, गावोगावी खेडोपाडी प्रयत्न होणं आवश्यक आहे.

मुंबईत यशस्वीपणे ग्रंथमहोत्सव भरवणारे लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते या आमच्या वस्तीवर ज्ञानमंदिराचं दिमाखात उद्घाटन झालं. याप्रसंगी कवी साहेबराव ठाणगे, राजकीय विश्लेषक पत्रकार राजा कांदळकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, साहित्यिक चळवळीतले दिनेशबापू औटी, जिल्हा शिक्षणाधिकारी (माझी भाची) सुनंदा ठुबे-वाखारे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, तत्कालीन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, नगरसेविका नंदा देशमाने, ह.भ.प. सोपानकाका औटी, माझे सर प्रा. रभाजी औटी, मित्र प्रा. अभिमान तराळ, साहेबराव देशमाने, भाचा अशोक गायकवाड आणि प्रत्येक कामातला माझा साथी जनार्दन औटी सर.. आणि समस्त तराळवाडीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा भाऊ नामदेव शेरकर तर खूप साऱ्या शिक्षक मित्रांसोबत तिथं राबत होता. इथंच मला ओमप्रकाश देंडगेंसारखे अनेक रसिक मित्र मिळाले..

इथं राबणाऱ्या हातांना मी मनोमन सलाम करत होतो. मी अर्थात स्टेजवर नव्हतो. प्रकाशात साजऱ्या होणाऱ्या उत्सवाला दुरून गर्दीतून डोळ्यांत सामावून घेत होतो. कानात साठवून घेत होतो. रस्त्याच्या कडेला छोट्याशा जागेत वाडीतील-पंचक्रोशीतील शेकडो लोकं दाटीवाटीने शाहिरांना, कवी साहेबराव ठाणगे यांना तल्लीन होऊन ऐकत होते.

एरव्ही भजन-कीर्तन, सत्संगात रमणारी ही मंडळी पावसाच्या हलक्या सरी लीलया झेलत शाहीर व कवी महोदयांच्या आशयघन विचारांच्या कारंजात आनंदाने न्हाऊन निघाली. सर्वांसाठी प्रीतीभोजनाचा बेत होता..

खरं तर प्रत्येक घटना दोनदा घडत असते. एकदा मनात आणि नंतर प्रत्यक्षात. मनातली हरेक घटना प्रत्यक्षात साकार होत नसते. या ज्ञानमंदिराची संकल्पना साकार होत असतानाचा हा कार्यक्रम शब्दबद्ध करणं माझ्यासाठी अशक्यप्राय होतं. तशातच सूत्रसंचालक ऋषीने सुचवलं की आता आमचे आबा बोलतील. बोलण्याची बऱ्यापैकी सवय असणारा मी क्षणभर स्तब्धच उभा राहिलो. तुकोबा माझ्या मदतीला नेहमीप्रमाणे धावून आले.

पूर आला आनंदाचा।
लाटा उसळती प्रेमाच्या।।
आनंदाचे डोही। आनंद तरंग।।

म्हटलं आयुष्यात जे अत्यानंदाचे चार क्षण असतील त्यातला हा एक जगायला प्रेरणा देणारा अत्युच्च क्षण आहे. कार्यक्रमात या ज्ञानमंदिराचा प्रवर्तक म्हणून माझा उल्लेख झाला होता. याप्रसंगी मी अतिशय कृतज्ञापूर्वक खऱ्याखुऱ्या प्रवर्तकांचा आवर्जून उल्लेख केला. या ज्ञानमंदिराची पायाभरणी करणारे शिल्पकार वेगळेच होते. जे आता हयात नाहीत. आमचे दादा रेवजी बापू शेरकर.. ज्यांनी सत्तरच्या दशकात औटी आणि शेरकर या दोन वेगवेगळे आडनावं असणाऱ्या परिवारांना एकत्र आणलं. एकत्र विहीर खणायला घेतली. आमच्या आधीच्या पिढीने आयुष्यभर एकत्रितरित्या सत्तरऐंशी फुटांची ही विहीर खोदली, पुढच्या पिढीची तजवीज करून ठेवली. मी वयाच्या विशीपर्यंत हे सर्व बघत लहानाचा मोठा झालो. त्याकाळी सपरात राहणारे भाऊमामा, नारायणमामा पीडब्ल्यूडी खात्यात रस्त्यांवर मैलकामगाराचे काम करत असत. आज ते हयात नाहीत. आज त्यांची पुढची पिढी छान बंगल्यांमध्ये स्थिरावली आहे. हे औटी- शेरकर परिवार खरेतर एकमेकांच्या गरीबीचे साक्षीदार आणि एकमेकांना सुखदु:खात साथ देणारे होते. अर्थात हा वारसा पुढच्या पिढ्यांनीही पुढे चालू ठेवला आहे. माझी आई-मावशी, तात्या आज नाहीत. पण ह्या सगळ्यांनी या ज्ञानमंदिराची, प्रेमाची, एकमेकांना सहकार्य करण्याची मुहूर्तमेढ इथं रोवली होती. केवळ वाडीतच नव्हे तर पंचक्रोशीत ज्ञानमंदिर हा विषय कौतुकाचा झाला आहे.

या ठिकाणी ही मंडळी एकत्र येतात. उत्सवादरम्यान वेगवेगळे खेळ खेळतात. मुळात या सर्वांना एकत्र आणणं हाच प्रमुख हेतू होता. वर्तमानपत्र, पुस्तकं वाचावीत हा दुय्यम हेतू होता. आता मात्र वाचक वाढू लागलेत. मुले या जागेचा अभ्यासिका म्हणून वापर करताना दिसत आहेत. सकाळ संध्याकाळ मंडळी इथं एकत्र बसून एकमेकांची विचारपूस करत आहेत. हाच अभ्यास, हीच पूजा मला अभिप्रेत होती. ज्यायोगे वस्तीचे स्वास्थ्य अबाधित राहिल. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे अॅकरिंग करताना बिग बी अमिताभ बच्चन म्हणायचे,

कर्म के कुरुक्षेत्र में,
ना रूप काम आता है,
ना झुठ काम आता है,
ना जाती काम आती है,
ना बाप का नाम काम आता है,
सिर्फ ज्ञान ही आपको आपका हक दिलाता है।।

मारुती शेरकर..
9867708408

बा जोतीबा


बा जोतीबा तुमची खुरटी दाढी, रापलेला चेहरा, डोक्यावरचं पागोटं हे सगळं सगळं मला माझ्या ‘बा’मध्ये दिसलं. माझा बा माझा जैविक बाप आहे. पण महामानव जोतीबा, बाप मानसा, तुमच्या खांद्यावर बसून मी हे अद्भुत जग आणि जगणं न्याहाळतोय.

शालेय जीवनात कार्यालयीन भिंतीवरल्या महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुसटशी ओळख होती. मात्र महात्मा जोतीराव फुल्यांचा काही बोध होत नव्हता. कॉलेजला शिकत असताना आमचे प्राचार्य डॉ. विद्याधर औटी सरांच्या तोंडून या फुले दांपत्याचा परिचय झाला. सर स्वतः विज्ञानवादी आणि विवेकवादी, दैववादाला बिलकुल थारा न देणारे, अतिशय कडक शिस्तीचे.. आम्ही शेतकऱ्यांची पोरं. अॅकॅडेमिक अभ्यास करून बीए झालो. इंग्रजीसोबत इतिहास विषय अभ्यासाला असूनही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं आकलन त्या पदवी परीक्षेच्या कालखंडात झालं नाही. पुढे नोकरीला लागल्यानंतर, म्हणजे पोटाची सोय झाल्यानंतर थोडंफार वाचू बोलू लागलो आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची abcd गिरवायला सुरुवात केली. मनात प्रचंड अज्ञान असल्याने स्वतःची कीव वाटू लागली. पण त्या अस्वस्थतेतून पुढील वाटचाल पक्की होत गेली.

मुंबईच्या चर्नी रोड स्टेशनलगत शासकीय मुद्रणालय आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित पुस्तके, महामानवांची चरित्रे असे अनेक दस्तऐवज तिथं माफक दरात विकत मिळतात. आजवर अनेक पुस्तकं मी तेथून आणली आहेत. परीचितांनाही वाचायला देत आहे. इथेच मला फुल्यांवरील ‘शोधाच्या नव्या वाटा’ मिळाले. हरी नरके संपादित या पुस्तकात महात्मा फुल्यांविषयी डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. विद्याधर औटी अशा विचारवंतांचे लेख आहेत. पुस्तक वाचल्यानंतर कधी एकदा पारनेरला जातोय आणि माजी प्राचार्य लेखक विचारवंत औटी सरांना भेटतोय असं झालं. मग सरांच्या तोंडून तासंतास फुले ऐकले, क्रांतीजोती सावित्रीमाई ऐकल्या.. महाराष्ट्राची जडणघडण ऐकली.. नवं विचारविश्व उलगडलं.

जोतीरावांना उतारवयात अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांचा उजवा हात लुळा झाल्याने, त्या हाती पेन न धरता आल्याने, शरीरातील साऱ्या असह्य वेदना सहन करत डाव्या हाताने त्यांनी ‘सार्वजनिक सत्य धर्म’ वाचकांना सुपूर्द केला. ऐन उमेदीत जोतीराव फुले पुण्यातील एक यशस्वी उद्योजक होते. कॉन्ट्रॅक्टर होते. ते त्यातच रममाण झाले असते तर अंबानी, टाटासारखे फुले घराणे त्या अर्थाने नावलौकिकास आले असते. मात्र अखेरच्या श्वासापर्यंत समाजसुधारणेचा ध्यास घेतलेल्या जोतीरावांचा मृत्यू औषधपाण्यावाचून झाला आहे, ही खंत आणि अपराधीपणाची भावना महाराष्ट्राला सदैव बोचत राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या छोट्यामोठ्या सर्व कार्यालयांमध्ये मंत्रालयापासून न्यायालयापर्यंत, ग्रामपंचायतीपासून सर्व शाळाशाळांमध्ये जोती-साऊच्या प्रतिमा पहावयास मिळतात. ह्या दांपत्याचे अलौकिक कार्य मनामनांमध्ये जर रुजलं तर नवा महाराष्ट्र उदयास येईल.

जोतीरावांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून काढली. मराठी मनामनामध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या रयतेच्या या राजावर ‘कुळवाडी भूषण’ नावाचा प्रदीर्घ पोवाडा त्यांनी लिहिला. आपल्या लेखणीने तत्कालीन प्रस्थापित विषमतावादी समाजव्यवस्थेचे वाभाडे त्यांनी काढले. ‘ब्राह्मणाचे कसब’, ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘गुलामगिरी’ इ. पुस्तकांद्वारे समकालीन समाजाच्या समस्या आणि त्यावरील उपायांचा विस्तृत उहापोह त्यांनी केलेला आहे. ‘गुलामगिरी’ हे पुस्तक अमेरिकेच्या बराक ओबामांनी व्हाईट हाउसच्या ग्रंथालयात ठेऊन घेतले. याला कारणही तसेच आहे. जोतीरावांनी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्णीय निग्रो लोकांच्या लढ्यास अर्पण केले आहे. अर्पणपत्रिकेत ते लिहितात, “युनायटेड स्टेट्समधील सदाचारी लोकांनी गुलामांस दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात औदार्य, निरपेक्षता व परोपकार बुद्धी दाखवली. यास्तव त्यांच्या सन्मानार्थ हे लहानसे पुस्तक त्यांस परम प्रीतिने नजर करितो आणि माझे देशबांधव त्यांच्या या स्तुत्य कृत्याचा कित्ता, आपले शुद्र बांधवांस ब्राह्मण लोकांच्या दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात घेतील अशी आशा बाळगतो.”

थॉमस पेन लिखित ‘Rights of Man’ (मानवाचे हक्क) या पुस्तकाचे शालेय वयातच त्यांच्यावर गारुड होते. सर्व प्रकारच्या दास्यापासून हा माणूस मुक्त झाला पाहिजे. जोतीबांची ही वाट पुढे चालताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त संविधान सभेने नागरिकांच्या मुलभूत हक्कासंदर्भात हा मूलगामी विचार अमलात आणलेला आहे. टाईम्स ऑफ इंडिया या अग्रगण्य दैनिकात लिहिलेलं असं काहीसं, “Education gives us knowledge, knowledge gives us confidence, and confidence gives us respect.” हे आत्मभान आणि समाजभान येण्यासाठी शिक्षण अनिवार्य सांगताना फुल्यांनी म्हटलं होतं की, “सारे अनर्थ एका अविद्येने केले आहेत.” अलीकडे देशभरात ‘शिक्षण हक्क’ कायदा आला. पण फुल्यांनी १८८२ साली हंटर कामिशनसमोर शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची शिफारस केली होती. सरकारने १२ वर्षे वयापर्यंतच्या सर्व बालकांस शिक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. शिक्षकांची निवड बहुजनांमधून करावी, ते प्रशिक्षित असावेत, त्यांना पुरेसे वेतन असावे, खेड्यातील मुलांना शेतकीचे आणि तांत्रिक शिक्षण देण्यात यावे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जावे ही मागणी करणारे जोतीराव हे पहिले भारतीय होते.

सुमारे १७० वर्षांपूर्वी जोतीरावांनी १८५१ साली मुलींसाठी या देशातील पहिली शाळा काढली. साऊआई आणि फातिमाबी या देशाच्या आद्यशिक्षिका ठरल्या. युगानुयुगे अंधारात खितपत पडलेल्यांना शिक्षणरुपी उजेडाचा कवडसा दिसू लागला. विधवा पुनर्विवाह, सुतिकागृह, अस्पृशांना हर तऱ्हेची मदत असं सर्वव्यापी मिशनरी काम फुल्यांनी केलं. इथल्या समाजस्वास्थ्याची नेमकी नस त्यांनी शोधली होती. ड्युक ऑफ कनॉट यांच्या सत्काराप्रसंगी ब्रिटिशांना त्यांनी निर्भीडपणे सुनावले होते, “आपल्यासमोर रेशमी कपडे नि अलंकार परिधान केलेले श्रीमंत, सरदार आणि जहागीरदार पाहून रयतेविषयी आपण मत बनवू नये. खरा हिंदुस्तान पहायचा असेल तर माझ्या बरोबर खेड्यात चला.”

जोतीराव हे बोलघेवडे सुधारक नव्हते, तर अतिशय कर्तव्यकठोर कर्ते सुधारक होते. ते इथल्या पददलितांच्या दु:खांशी समरस झाले होते. त्यांचं लिखाण अतिशय रांगडं आणि तिखट असं आहे. त्यात अभिजनांचा रंजनवादी अभिनिवेश बिलकुल आढळत नाही. माणूस इथून तिथून एक आहे. त्याची भाकरी, त्याचा आत्मसन्मान हेच विषय प्रधान्यांनी त्यांनी अनुसरले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्या लेखनाला ग्राम्य वगैरे म्हटलं. फुल्यांच्या पुस्तकाची टर उडवताना चिपळूणकरांनी म्हटलं की, फुल्यांना व्याकरणाचे व शुद्ध लिहिण्याचे ज्ञान नाही. पण जोतीरावांचा इरादा स्पष्ट होता. न्या. रानडे यांनी ग्रंथकारांच्या संमेलनाला जोतीरावांना निमंत्रित केले होते. उत्तरादाखल जोतीरावांनी त्यांना सुनावले होते की, “उंटावरून शेळ्या वळणाऱ्या घालमोड्या दादा, मनुष्याच्या मानवी हक्कांविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यास ते हक्क त्यांच्याने खुशीने व उघडपणे देववत नाहीत, पुढेही देववणार नाहीत. तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा वा पुस्तकांचा मेळ मिळत नाही.” पुढे त्यांनी ग्रंथकारास असेही बजावले की, “सर्व मानवी प्राण्यांत परस्पर अक्षय बंधुप्रिती काय केल्याने वाढेल, त्याचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकांद्वारे प्रसिद्ध करावे. अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही.” तर मंडळी ग्रंथकारांचे संमेलन म्हणजे सध्याचे शासनाच्या निधीवर मोठ्या दिमाखात साजरे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. तमाम लेखकांना काय लिहावं, कसं लिहावं याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे.

मा. शरद पवार साहेबांनी ‘कोरोना’बाबत फुले जयंतीदिनी दारात ‘ज्ञानाचा दिवा’ लावा असं सांगितलं आहे. महाराष्ट्राला पुरोगामित्व बहाल करणाऱ्या महानुभावांमध्ये पवारसाहेबांचे नाव अतिशय आदराने घेतलं जातं. सरकार त्यांचं ऐकतं, आपण का ऐकू नये? महात्मा फुल्यांच्याच सत्यशोधन करणाऱ्या अखंडाने ह्या लेखाची सांगता करतो,

धर्म राज्य भेद मानवा नसावे।
सत्याने वागावे! ईशासाठी।।

ख्रिस्त महंमद मांग! ब्राह्मणासी।
धरावे पोटासी। बंधूपरी।।

निर्मिकाचा धर्म! सत्य आहे एक।
भांडणे अनेक। कशासाठी?।।

मारूती शेरकर
9867708408

Monday, 6 April 2020

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी आणि माझे मामा साहेबराव ठाणगे यांना वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा..!


“जगण्यासाठी शोधल्यास तू
किती सुखाच्या वाटा,
काढलास का कधी कुणाच्या
पायामधला काटा?”

कुणाच्या पायामधला काटा काढण्याने आपण सुखाच्या वाटेवर येऊन पोहोचतो. त्यासाठी तीर्थाटने, उपासतापास आणि अनेक मांडवाखालून जाण्याची गरज नाही. असा सर्वांना समजेल उमजेल असा रोखठोक विचार कवितेतून व्यक्त करणारे कवी साहेबराव ठाणगे. सध्या महाराष्ट्र टाईम्स दैनिकातील वाचकप्रिय सगुणनिर्गुण या सदराचे लेखक आहेत. अवघं मराठीजगत त्यांना वाचत आहे..

तुकोबांच्या अभंगांप्रमाणे, जोतीबांच्या अखंडाप्रमाणे अतिशय उपहासगर्भ आणि अर्थपूर्ण त्यांच्या रचना मराठी मनांची मशागत करत आहेत. मूलतः संवेदनशील मनाच्या या कवीने आणखीही खूप सारी साहित्यसंपदा आपल्याला दिलेली आहे. १९८८ साली मा. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पहिलावहिला वेदना-संवेदना हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. नंतर सैरभैर, कवितारंग, पाऊसपाणी असे अनेक उत्तमोत्तम काव्यसंग्रह त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. ह्या सर्व कवितांचे नवनीत घेऊन ‘मन पाखरू पाखरू’ हा त्यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्रभर खूप गाजत आहे.

साहेबराव ठाणगे आपल्या खास शैलीत गाऊन कविता सादर करतात. त्यांचं दोन शब्दांमधलं, दोन पंक्तीमधलं विश्लेषण ऐकणं म्हणजे तुकोबांच्या अभंगांचे, जोतिबांच्या अखंडांचे निरुपण ऐकल्याची अपूर्व प्रचीती येते.

मुंबई बँकेत सरव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले साहेबराव ठाणगे. ज्यांच्या नावातच साहेब आहे. आईवडिलांनी ठेवलेलं साहेब हे नाव त्यांनी आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाने अगदी सार्थ करून दाखवलं आहे. बँकेत उच्चपदस्थ असताना कोटींच्या आकडेवारीचा हिशेब मांडत असताना मॅनेजरच्या खुर्चीतल्या पांढऱ्या स्वच्छ टर्कीस टॉवेलचा दर्प, अहंकार त्यांनी कधी स्वतःला शिवू दिला नाही. आकड्यांशी व्यवहार करत असताना आपल्या मातीला, माणसांना वाचणं त्यांनी कधी थांबवलं नाही.

पारनेरच्या दुष्काळी भागातील करंदी गावातून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत हे इवलंस पाखरू मुंबईच्या दिशेला झेपावलं. मनातल्या मनात आजूबाजूच्या विषण्ण परिस्थितीने आजही हे पाखरू अस्वस्थ राहातं. माणसांचं अवघं आयुष्य त्यांच्या सुखदु:खासह कसं सार्थकी लागेल याचा विचार ते सदोदित करत असतं. वेदनेला वाणी मिळाली, भावनांच्या कल्लोळाला शब्दांचे धूमारे फुटले आणि कवितेबरोबर इतरही साहित्याचा ठेवा त्यांनी आपल्याला सुपूर्द केला. मनातल्या मनात, खेळखंडोबा, उजेडाच्या वाटा अशा अतिशय विचारप्रवण साहित्यरचना त्यांच्या नावावर आहेत. २०१२ साली डिंपल प्रकाशनातर्फे त्यांच्या ‘उजेडाच्या वाटा’ या व्यक्तिचित्र संग्रहाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी कवयित्री नीरजा, रामदास फुटाणे (नाना), फ. मु. शिंदे, अशोक बागवे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे अशी बरीच दिग्गज मंडळी मुंबईतील दादरच्या धुरू हॉलमध्ये हजर होती. कवितांच्या गावा जावे, कवितारंग असे कार्यक्रम ते एकत्र करत असत. या कार्यक्रमात मी सुत्रसंचालन केले होते. नानांनी या प्रसंगी सुचवलं की, साहेबराव तुम्ही गाऊन कविता सादर करताना जरा पॉज घेत चला.. आणि हा सूत्रसंचालक तुमच्या ‘मन पाखरू पाखरू’ या कार्यक्रमात निवेदन करेन. बघा तुम्ही दोघेजण एकत्र हा कार्यक्रम करून. सायबामामांनी त्यांना सांगितले की हा निवेदक माझा भाचा आहे. आम्ही हा कार्यक्रम करू. काही दिवसांतच वाशी, नवी मुंबईच्या साहित्यमंदिरात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मन पाखरू पाखरू’ हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम म्हणजे उत्कट काव्यानुभव, अस्सल जीवनानुभव आहे. किंबहुना प्रबोधनाचा जागर आहे. त्यामुळे श्रोत्यांना हा कार्यक्रम जरा जड वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यात रंजनाला फारच कमी जागा आहे. बहिणाबाई मानवी मनाविषयी जसं लिहितात,

“मन पाखरू पाखरू,
त्याची काय सांगू मात ,
आता व्हतं भुईवर,
गेलं गेलं आभायात ..
मन जह्यरी जह्यरी ,
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू साप बरा ,
त्याले उतारे मंतर ”

‘मन पाखरू पाखरू’ हा कार्यक्रमच मुळी बहिणाबाईंच्या भाषेत बोलायचं झालं तर, “माणसा माणसा कधी व्हशील रे तू माणूस..” हा विचार यथाशक्ती पुढे नेण्याचा कवीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मानवी मन अशी एक अजब आणि अनाकलनीय भानगड आहे की जी आजतागायत संत, विचारवंत, तत्वज्ञ इतकंच काय मनोवैज्ञानिकांनाही पुरून उरलेली आहे. सर्वजण हतबल आहेत. ही कवी मंडळी मनावरचे तरंग शब्दांद्वारे अचूक टिपतात. ज्याप्रमाणे हजार शब्दांत जे सांगता येणार नाही ते एखादा चित्रकार एका चित्रातून बोलून जातो. प्रसंगी परकाया प्रवेश करून ही कवी मंडळी स्वतःबरोबरच इतरांच्या भावभावना शब्दबद्ध करतात. उगीच नाही कवींना शब्दसृष्टीचे ईश्वर म्हटलं जातं. त्यांच्या संवेदनशील मनातील सहानुभूती आणि समानुभूती (sympathy and empathy) कागदावर उमटते आणि तो अनुभव वाचकाला आपला वाटायला लागतो. मग ती कविता कवीची राहात नाही ती रसिक वाचकांची होऊन जाते. कवी सूक्ष्म निरीक्षण करत असतो. त्याच्या चष्म्याचा नंबरही इतरांपेक्षा वेगळा असतो. आजूबाजूच्या विषण्ण परिस्थितीने तो मनातल्या मनात अस्वस्थ असतो. जगण्याच्या धबडग्यातल्या साध्या साध्या गोष्टींकडेही कवी कुतूहलपूर्वक पाहतो. विलियम वर्ल्डस्वर्थ म्हणतो की, “Poetry is a spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility”.. प्ल्युटो तर याहीपुढे जाऊन म्हणतो की प्रेमाचा परीसस्पर्श कवी होण्यासाठी पुरेसा आहे. या सर्व भावभावनांचा कल्लोळ कवितेतून व्यक्त होत असतो. साहीर लुधियानवी या शायरनं म्हटलंय,

“जिंदगी एक सुलगतीसी चिता है साहीर,
शोला बनती है, न ये बुझके धुवॉ होती है”

कवी साहेबराव ठाणगे यांच्या कवितांमधून सुद्धा माणसाचं अवघं आयुष्य त्याच्या सुखदु:खांसह कसं सार्थकी लागेल याचं विवेचन आपल्याला पाहायला मिळतं.

“पोरकच मन माझं,
सदा बिच्चारं बिच्चारं ,
मेली मन माणसांची,
हाच विच्चार विच्चार”

विचारी मन अस्वस्थ असतं. माणूस आणि माणुस'की' जिवंत राहावी हाच काय तो विचार त्यांच्या मनात असतो. सायबामामा वयाच्या विशीपर्यंत गावाला राहिल्याने मुंबईत पन्नास वर्षे राहूनही त्यांच्या मनातलं गाव त्यांच्या मनात लख्ख घर करून राहिलेल आहे आणि ते ग्रामीण जीवन हाच त्यांच्या विचारांचा गाभाघटक राहीला आहे. ‘देव’ नावाची त्यांची एक अप्रतिम कलाकृती आहे. श्रमावर विश्वास ठेवणारा भोळाभाबडा शेतकरी गेला तर जातो पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीला, नाहीतर नारायणगावच्या विठाबाईच्या बारीला.. आपल्या शेतात, श्रमात आणि घामातच देव शोधणारा शेतकरी आपल्या देवाची कशी पूजा करतो हे सांगताना ते लिहितात,

“देव आहे किंवा नाही।
कुणी पहिले देवाला।
सेंदराच्या दगडाचा।
उभा आधार गावाला।।
देव बैल गुरं गाई।
देव जन्मदाती आई।
तिच्या पुण्याईची सर।
खुद्द देवालाही नाही।।
देव असो किंवा नसो।
माझे शेत औक्षवंत।
बीजातून रोज नवा।
उगवेल भगवंत।।”

पण गावाकडे रामराज्याची, लोकसंस्कृतीची वेगाने उसवण होताना दिसत आहे. ज्या गावातल्या मंदिरातून भल्या सकाळी काकडआरतीचा गजर कानावर यायचा, गावाच्या आडाच्या रहाटावरून काकणभरल्या हातांचा पाणी शेंदण्याचा आवाज यायचा, तालमीत पहिलवानांच्या घुमण्याचा आवाज यायचा, सुखदु:खात सारा गाव एक व्हायचा, पण आज काय परिस्थिती आहे? जग बदलतंय, माणसं बदलतायत, सारच्या सारं भवताल वेगाने बदलत आहे. फक्त हा बदल विधायक, रचनात्मक असायला हवा. मात्र तसा होताना दिसत नाही. जागतिकीकरण, खुले आर्थिक धोरण, वाढता चंगळवाद आणि नवनव्या अंधश्रद्धांमुळे साधेभोळे शेतकरीही बुवा बापूंच्या चरणी लीन होताना दिसत आहेत. खरंखुरं शिक्षण आणि प्रबोधनापासून वंचित असलेली खेडी, गाव प्रचंड वेगाने बदलत आहेत. माझा गाव या कवितेत साहेबराव ठाणगे यांनी या परिस्थितीचे अगदी समर्पक वर्णन केले आहे.

हरवला माझा।
गवताचा गाव।
साधा भोळा भाव।
माणसांचा।।
कुलदैवतांचा।
आंधळा अंगारा।
नात्यांचा निवारा।
देशोधडी।।
अर्धपोटी बाप।
उपाशीच मेला।
तालुका जेवला।
दहाव्याचे।।
तालमीचे जागी।
बियरचे बार।
पैलवान पोरं।
फेसाळली।।
बांधली देवळे।
उंच ती केव्हढी।
स्वर्गालाच शिडी।
लावियेली।।
किती केली तीर्थ।
पोथी पारायणं।
तरी नारायण।
भेटेचिना।।
असे कसे झाले।
टरफलाचे धनी।
दाणे नेले कोणी।
हातोहाती।।
चालतात सारी।
अंधाराची वारी।
कोण यास तारी।
पांडुरंगा।।

राजकीय आणि सामाजिक बदल झाले. हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वराज्यात आजही आपण सुराज्यासाठी चाचपडतो आहोत. सत्तर वर्षांची झाली आपली लोकशाही. काय गत झालीय आपल्या लोकशाहीची? स्वातंत्र्याचं वय वाढत असताना सर्वसामान्यांचे भय सुद्धा वाढतेच आहे. बेरोजगारीने आणि महागाईने घराघराचं अर्थशास्त्र मोडीत काढले आहे. लोकशाही या लावणीतून हे विदारक चित्र साहेबराव ठाणगे यांनी आपल्यासमोर मांडलं आहे.

वरती फेटा बांधता बांधता,
खालती धोतर सुटतंय राव।
लोकशाहीचं मायंदळ पाणी,
मधल्यामधेच आटतंय राव।।
उडदामाजी काळं-गोरं,
सुक्यात वल्लबी पेटतंय राव।
रक्ताचं पाणी करणार कोणी,
एखादं येडं भेटतंय राव।।

पूर्वी समाजकारणासाठी राजकारणाचा आधार घ्यावा लागायचा. आता मात्र सेवाभाव संपून राजकारण जणू धंदा झाला आहे. झटपट श्रीमंत होऊन पुढच्या अनेक पिढ्यांची सोय करण्याच्या या धंद्याचे तरुण पिढीलाही आकर्षण वाटू लागले आहे, राजकारणातल्या या पांढऱ्या कावळ्यांविषयी कवी साहेबराव ठाणगे म्हणतात.

“अंडील गोऱ्ह्यांचा।
धाब्यावर दंगा।
क्वाटरची गंगा।
ओसांडली।।
स्कॉर्पियो सफेद।
सफेद्च वेश।
शुभ्रतेचा फेस।
अंगोपांगी।।
भाऊचा हो दादा।
दादाचा साहेब।
गरिबी गायब।
एकाएकी।।
पुढाऱ्यांच्या मागे।
पेंढारी पांढरे।
भाड्याची मेंढरे।
जमलेली।।”

या विषण्ण परिस्थितीतही कवीचा आशावाद टिकून आहे. डाकू वाल्याकोळीचा रामायणकर्ता वाल्मिकी ऋषीपर्यंतचा प्रवास सर्वांना ज्ञात आहे. वाल्याकोळी जंगलात दबा धरून बसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटायचा. त्यासाठी त्यांचे खूनही पाडायचा. अशा लुटमारीत मिळवलेली संपत्ती, पैसाअडका आपल्या पत्नीकडे द्यायचा. तीही त्याचा योग्य हिशेब ठेवायची. वाल्याकोळ्याने एक माणूस मारला की ती एका मोठ्या रांजणात एक दगड टाकायची. असं वर्षानुवर्षे चाललं होतं. वाल्याकोळ्याने असे बरेच पापाचे रांजण भरले होते. एकदा त्या जंगलातून नारदमुनी मुखानं ‘नारायण नारायण’ म्हणत चालले असता वाल्याकोळ्याने त्यांना अडवलं. त्यांच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालणार तोच त्याला अडवून नारदमुनी म्हणाले, “थांब आधी मला सांग. तू जे कर्म करीत आहेस त्यात तुझी पत्नी वाटेकरी आहे काय? ते तिला आधी विचारून ये. तो पर्यंत मी इथेच थांबतो आणि तुझ्या पापात ती सहभागी असेल तर मग मला खुशाल मार.” वाल्या धावतच घरी येतो आणि बायकोला विचारतो, “मला खरं सांग मी करीत असलेल्या या पापात तू सहभागी आहेस की नाही?” दरोडेखोर वाल्याच्या त्या अडाणी बाईने जे सडेतोड आणि मर्मभेदी उत्तर दिले त्या एका ‘नाही’ या शब्दाने वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि त्याने पुढे रामायण लिहिले. वाल्याकोळ्याची ही गोष्ट अगदी साधी वाटते. पण असा विचार करा की वाल्याच्या ह्या बायकोने “होय मी तुमच्या पापात वाटेकरी आहे” असं उत्तर दिलं असतं तर? तर वाल्या उड्या मारतच नारदाजवळ पोहोचला असता आणि त्यानं नारदाचं शीर धडावेगळं केलं असतं. पण तसं झालं नाही. वाल्याच्या त्या अशिक्षित, अडाणी बायकोच्या एका सडेतोड उत्तरामुळे वाल्याकोळ्याचे डोळे खाडकन उघडले. त्याने नारदाचे पाय धरले. नारदाने त्याला दीक्षा दिली. त्याने बारा वर्षे जप केला आणि वाल्याकोळी नावाच्या एका क्रूरकर्मा दरोडेखोराचा थोर वाल्मिकी ऋषी झाला. कशामुळे तर बायकोच्या एका बाणेदार उत्तरामुळे. नाहीतर कसला वाल्मिकी आणि कसले रामायण.

रामायणाला आपण आपला आदर्श ग्रंथ मानतो त्याची पारायणं करतो आणि आदर्श पती-पत्नी म्हणून राम-सीतेकडे पाहतो. मात्र हे सर्व ज्या एका स्त्रीच्या सडेतोड आणि निर्भीड, सत्य उत्तरामुळे घडले त्या रामायणकर्त्या वाल्याकोळ्याच्या बाणेदार बायकोला आपण विसरूनच गेलो आहोत. इतकंच काय तिचं नाव काय होत? तिचं पुढं काय झालं? याचाही आपण तपास केला नाही. माझ्या मते एकवेळ आज आपण सर्व रामायण विसरलो तरी चालेल, पण लक्षात ठेवलं पाहिजे त्या वाल्याकोळ्याच्या धाडसी बायकोच्या उत्तराचा.. देशात आज बोकाळलेला भ्रष्टाचार आणि पावलोपावली लाचखोरी करणारे आधुनिक वाल्याकोळी आपण पाहतो. मात्र या दरोडेखोरांच्या घरी वाल्याच्या बायकोसारखी सडेतोड गृहिणी मात्र सापडत नाही. एव्हढंच काय वाल्याकोळ्याच्या या आधुनिक बायकाही नवऱ्याच्या बरोबरीने लाचखोरीची वाटमारी करू लागल्या आहेत. पगाराचे दिवस नसूनही नवऱ्याने घरी आणलेली नोटांची पुडकी पाहून या वाल्यांच्या आधुनिक मिसेस लगेच ज्वेलरच्या दुकानात पळायची तयारी करतात. आपल्या लाचखोर नवऱ्यासमोर कौतुकाची आरती ओवाळतात. समजा या देशातल्या घरोघरच्या गृहिणींनी आपापल्या नवऱ्यांना “मी तुमच्या पापात सहभागी नाही” असं ठामपणे सांगितलं आणि पापाचा पैसा आणणाऱ्या पतीरायाला उंबऱ्यातूनच परत पाठवलं तर, तर या देशातला भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. मी तर म्हणेन वाल्याकोळ्याच्या बायकोचे पुतळे नाक्यानाक्यावर उभारावेत आणि तिची प्रतिमा घराघरातल्या देव्हाऱ्यात ज्या दिवशी पुजली जाईल त्या दिवशी या देशात रामराज्य येईल.

अर्थात हे एका भाबड्या कवीचं स्वप्न आहे. स्वप्न पाहणं हा कवीचा हक्कच आहे. आपल्या या प्राणप्रिय धर्मग्रंथाकडे अशाही दृष्टीकोनातून पाहण्याची सदिच्छा आपल्या मनात जागावी म्हणूनचं हे सारं पुर्वरामायण.

शब्दांना केवळ धार असून चालत नाही, त्यास सामाजिक आधार असावा लागतो. मन पाखरू पाखरू या उपहासगर्भ अभंगांतून, हवं तर विडंबन काव्यातून म्हणा आपण सर्व एक उत्कट काव्यानुभव घेतो. मला निवेदक म्हणून माझ्या मर्यादांची जाणीव आहे. कवी साहेबराव ठाणगे यांच्या कवितांवर मी बोलावं, भाष्य करावं इतका मला अधिकार निश्चितच नाही. मात्र कवीच्या मनाची तगमग आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी मी सेतू बांधण्याचा विनम्र आणि प्रामाणिक प्रयत्न करतो आहे.
G B Shaw says, “People are ready to die but they don’t change.” कवींच्या मते आपला देश तमाशाने बिघडला नाही वा कीर्तनाने सुधारलाही नाही. सततचे शिक्षण आणि प्रबोधनातुनच हा बदलाचा प्रवास शक्य आहे. Computer किंवा आपला Mobile सुद्धा काही काळानंतर format करावा लागतो तसं mind formating आवश्यक आहे.

निर्मळ, नितळ, crystal clear, आरपार असं आरसपाणी मन आपल्या व्यक्तिगत स्वास्थ्याबरोबरच समाजस्वास्थ्यासाठीही आवश्यक आहे. आयुष्य हे रडगाणं नसून ते एक जीवनगाणं आहे. गझलकार ए के शेख म्हणतात, “सुखाबरोबर दु:खाचाही सत्कार करूया, असे सहज हे आयुष्य अलवार करूया.” उदासी आणि नैराश्याचे मळभ दूर करून कवीच्या मनात एक उत्कट आशावाद आहे.

रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय, “कधीतरी नक्कीच उजाडेल. कवी जागल्याच्या भूमिकेतून नेहमी जागाच राहणार आहे.”
जाता जाता पाखरापासून सुरु झालेली मामांची कविता या प्रचंड आशावादी पाखराच्या कवितेपर्यंत पोहोचते.

माझ्या बाभूळबनात
एक चुकलं पाखरू,
सैरभैर वाऱ्यावर
वाट हुकलं पाखरू,
काट्याकुट्यांच्या रानात
फुल शोधीतं पाखरू,
आभाळाच्या फांदीवर
घर बांधीतं पाखरू,
काट्यासंग बाभळीच्या
झिम्मा खेळतं पाखरू,
हासे खेळे वरवर
आत जळतं पाखरू,
मुक्या पाखरूपणाची
जात टाकतं पाखरू,
पहाऱ्यात पारध्यांच्या
कात टाकतं पाखरू,
होता सांजवेळ दाट
सैरभैरलं पाखरू,
सरे उजेडाची वाट
मागे उरलं पाखरू,
एका श्रावणसरीची
वाट पहातं पाखरू,
पुन्हा होईल पहाट
जागं राहातं पाखरू,
जागं राहातं पाखरू,
जागं राहातं पाखरू..

मारूती शेरकर
9867708408