Thursday, 18 June 2020



नमस्कार
 
मी मारुती शेरकर.
 
मुंबई महानगरपालिका संचालित सायन मनपा माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे.
 
आपल्या क्रमिक पुस्तकांमधील राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि संविधानाची उद्देशिका केवळ त्या कागदावरच राहिली आहे. रोजच्या परिपाठात त्यांचं केवळ यांत्रिक उच्चारण केलं जातं. कागदावरचे हे शब्द खरंतर ही मूल्ये जर संस्कारक्षम काळजांवर उमटतील तर आणि तरच विविधतेनं नटलेल्या या देशाची एकता अभंग राहिल. इथलं एकत्व, भारतीयत्व टिकून राहिल. आम्ही यथाशक्ती आमची शाळा संविधान साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्देशिकेतील सांविधानिक मूल्यांची किमान तोंडओळख आमच्या मुलांना झालेली आहे. परिपाठाद्वारे, वेगवेगळ्या स्पर्धांद्वारे संविधानाधारित लोकशाहीची बाराखडी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या त्या बालमनांवर रुजवता येणं शक्य आहे. त्यायोगे शाळा संविधान साक्षर होऊ शकते. सुजाण नागरिकत्त्वाची मुळाक्षरे इथूनच आपल्याला गिरवावी लागतील. त्यासाठी शिक्षकांना संविधान साक्षरतेचे प्रशिक्षण द्यावे लागेल. संविधानातील कलमे, अनुच्छेद, अधिकार, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे ह्यांचा अभ्यास यथावकाश करता येईल. एलएलबीच्या अभ्यासक्रमात भारतीय संविधान हा एक विषय आहे. परंतु सर्वचजण कायदेपंडीत होत नाहीत. प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीयत्वाची आणि नागरिकत्वाची किमान पात्रता कळणे अत्यंत गरजेचं आहे. इयत्ता बारावीचा विद्यार्थी नागरिकत्त्वाच्या उंबरठ्यावर उभा असतो. या देशाचा तो नवमतदार बनणार असतो. या नव्या युगाच्या शिलेदाराच्या हाती या नवभारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे. म्हणून इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात संविधान आणि किमान त्यातील मूल्यांवर आधारित ५० मार्कांचा एक पेपर असावा.
 
केवळ लिहिता वाचता येण्याने औपचारिक साक्षरता येऊ शकते. पण सुसंस्कृतपणा येण्यासाठी, माणुसकी रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक काही संस्कार करावे लागतील. शिक्षणातून चांगले परिक्षार्थी बनून ऐहिक सुखाचे लाभार्थी बनता येईल पण इतरांविषयी आपुलकी, कणव, तळमळ, कळकळ, सेवा, प्रेम, करूणा ऑनलाईन डाऊनलोड करता येत नाही. माणुसकीची आच लागल्याशिवाय या सो कॉल्ड डिग्री होल्डरला सर्वार्थाने 'माणूस' म्हणता येणार नाही. त्याचे शिक्षण झाले असेही म्हणता येणार नाही.
 
आत्मभान, समाजभान, जग जगणं, आपलं भवताल, हे राज्यसकट कसं चालवलं जातं. ह्याचं मुलभूत ज्ञान ह्या सांविधानिक मूल्यांद्वारा मिळू शकतं. एक मत एक मूल्य असा मतदानाचा अधिकार संविधानाने आपल्याला बहाल केलेला आहे. परंतु स्वातंत्र्य मिळून ७० वर्षानंतरही इथला मतदार राजा ह्या लोकशाहीचा लाभार्थी कधीकधी आपलं अमूल्य मत विकताना दिसतो. हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. व्यक्तीला मत असावं, त्याला भूमिका घेता यावी, त्यावर ठाम राहता यावं. तसेच लोकशाहीत विरोधी मतांचा आदर करण्याची सहिष्णू वृत्ती असावी हे सारे आदर्श प्रत्यक्षात साकारण्यासाठी संविधानाचे धडे बालवयातच देणे आवश्यक आहे.
 
माणसाला माणूस म्हणून आत्मसन्मानाने जगायला शिकवणारा जीवनग्रंथ म्हणजे संविधान.
भारतीय नागरिकाच्या सर्वांगिण मुक्तीचा लिखित ग्रंथ म्हणजे संविधान.
लाखो करोडो भारतीयांच्या आशा आकांक्षाचे प्रतीक आणि स्फुर्तिस्थान म्हणजे आपले संविधान.
सामाजिक विषमतेने गांजलेल्या या देशवासियांमध्ये समताधिष्टित समाजनिर्मितीचा हुंकार म्हणजे संविधान.
प्रगतिक विज्ञाननिष्ठ व विवेकशील समाज उभारण्याची सामुहिक प्रतिज्ञा, सामुहिक निर्धार म्हणजे संविधान.
एकूणच काय तर आपल्या अस्तित्वाचे विधान म्हणजे आपले संविधान. 
 
अशा भारतीय संविधानाचा विचार कुठून युरोप, अमेरिकेतून आलेला नाही. ह्या जमिनीतच ते निपजलेले आहे. इथला बळीराजा, गौतम बुद्ध, महावीर, गुरुनानक, कबीर, तुकोबा, ज्ञानोबा, छत्रपती शिवराय ह्या सर्वांची महान अशी विचार परंपरा संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये, अनुच्छेदामध्ये पानोपानी आपल्याला जाणवते. भारतभूमीतल्या संतांचं, पंथांचं, महामानवांच्या विचारांचं प्रतिबिंब आपल्या संविधानात कसे उमटले आहे ह्याची मीमांसा करत, विवेचन करत, लोकशाहीर संभाजी भगत राष्ट्र सेवा दलाचे अल्लाउद्दीन शेख यांच्याशी चर्चा करत मिशन माणुसकीच्या वतीने 'भारतीयत्वाची abcd' ही छोटीशी पुस्तिका मी लिहिली आहे. सन्माननीय आमदार कपिल पाटील यांच्या प्रेरणेने ही पुस्तिका तत्कालीन शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. उद्देशिकेतील शब्दाशब्दाचा नव्हे तर प्रत्येक मूल्याचा सहज आणि सुलभ अन्वयार्थ लावण्याचा मी त्याद्वारे प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना नक्कीच ही पुस्तिका उपयुक्त ठरेल.
 
संविधान निर्मितीची प्रक्रिया :
शेकडो बॅरिस्टर्स, त्यांची प्रदीर्घ चर्चा, त्यांच्यातल्या मतभेदांचं सौंदर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं अतुलनीय योगदान, इ..
 
जात, धर्म, भाषा, वंश, प्रांत या भेदांपालिकडे जाऊन आपण भारतीय व्हावं, एनलायटेड म्हणजे प्रबुद्ध आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी, आपल्या प्रजासत्ताक संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आपल्यासमोर संविधानाशिवाय दुसरा पर्याय नाही.
 
फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकारांच्या स्वप्नांचा अर्क असलेलं संविधान मनामनात रुजवण्यासाठी दोन मागण्याः
 
१) शिक्षकांना संविधान साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावं.
२) इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात संविधान आणि किमान त्यातील मूल्यांवर आधारित ५० मार्कांचा एक पेपर असावा..
 
संविधान प्रचारक आणि मिशन माणुसकीच्या संयुक्त विद्यमाने संविधानाच्या उद्देशिकेतील प्रत्येक मूल्यावर संविधान अभ्यासकांची आत्तापर्यंत पंधरा व्याख्याने झालेली आहेत. नामवंत साहित्यिक कवी विचारवंत आणि समाजकारणातील धुरीणांचे यासंदर्भातले व्हिडिओज आपण शेअर करत आहोत. याबाबतीतला आजचा पहिला व्हिडिओ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांचा आहे. तुम्ही हे सारे व्हिडिओज ऐकावेत. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.  काळाची गरज असलेल्या या अभियानामध्ये सक्रिय सहभागी व्हावे. ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद..

 व्हिडिओ : https://youtu.be/mF4DKQSkmDw

 
मारुती शेरकर.


No comments: