Thursday, 24 November 2016

आई – जिजाई...!

आई – जिजाई..!

“मह्या मायपुढं थिटं समदं देऊळ राउळ
तिच्या पायाच्या चिऱ्यात माह्य अजिंठा वेरूळ”

कवी अशोक बुरबुरे यांनी प्रत्येक लेकराची आपल्या मायेबद्द्लची भावना शब्दबद्ध केली आहे. जगभरात आई या विषयावर शेकडो पुस्तके, नव्हे ग्रंथ उपलब्ध आहेत. आज मी माझ्या आईविषयी (लोकांच्या जिजाईविषयी) तुमच्याशी अगदी थोडक्यात बोलणार आहे. पंचेचाळीस वर्षापूर्वी मला म्हणजे तिच्या अकराव्या अपत्याला तिने एका चंद्रमौळी झोपडीत जन्म दिला. शनिवारी जन्मलो म्हणून माझ्या काकांनी माझं मारुती असं नामकरण केलं. अगदी अलीकडे म्हणजे दहा वर्षापूर्वी आईनं आम्हाला सर्वांना पोरकं केलं.

मध्यंतरी अवधूत गुप्ते यांच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये प्रिय व्यक्तींशी फोनवर बोलण्याची सोय होती. अर्थात मला आईशी बोलण्यासाठी फोन या माध्यमाची गरज भासत नाही. हवं तेव्हा विशेषतः उत्तररात्री झोपेतल्या subconscious अवस्थेतली वेळ मी आईशी गप्पा मारायला राखून ठेवली आहे. मनातल्या द्वंद्वाचा, घुसमटीचा निचरा झाल्यावर सकाळी माझं छान नवीन आयुष्य सुरु होतं.  

आईविषयी बोलताना सुरुवात कुठून करावी हा प्रश्न माझ्यासमोर आहे. मला वाटतं तिच्या आयुष्याच्या शेवटापासून मी लेखाची सुरुवात करावी. तिनं आयुष्याच्या संध्याकाळी ऐहिक संसारापासून निवृत्ती स्वीकारली होती. गळ्यातलं किडूक-मिडूक सोनं विकून पुणेवाडीच्या भैरवनाथाच्या मंदिरात एक मोठी पितळी घंटा तिने अडकवली होती. तिच्या त्या आसक्तीला तिने ईश्वरार्पण केलं होतं. अध्यात्मिक गप्पा मारणाऱ्या भल्याभल्यांना न जमणारी नि:संग वृत्ती तिने लिलया मिळवली होती. अर्थात ही क्रांतिकारी घटना एकाएकी घडली नव्हती. flashback पद्धतीने तिच्या आयुष्यात डोकावलं तर याचा अंदाज येऊ शकतो. अनेकवेळा पायी वारी केल्याने पंढरीच्या इठ्ठलाची तिच्यावर मोठी कृपा होती. तिची एक इच्छा मात्र ह्या इठ्ठलाने पूर्ण केली नाही. म्हणून मला वाटते कदाचित ती त्याच्यावर अजूनही अधूनमधून रागे भरत असणार. वाखरीच्या रिंगणसोहळ्यात माउलीच्या मानाच्या अश्वाबरोबर, त्या वीणेकऱ्यांबरोबर धावायचे धाडस ती करायची. त्या भक्तीसागरात अश्वाच्या टापाखाली, रामकृष्ण हरीच्या गजरात ‘हे राम’ नव्हे ‘हे पांडुरंगा’ म्हणण्याचे स्वप्न तिच्या विठाईने काही पूर्ण होऊ दिले नाही. तिच्या सत्तरीनंतर तिला पायी वारीला जाऊ देऊ नये असा सर्वांचा आग्रह असताना, सर्वांचा विरोध पत्करून तिच्या वारीला मी सर्व शक्यता गृहीत धरून भरल्या अंत:करणाने पाठिंबा देत असे. दरवर्षी नेमानं माझं एक व्हिजिटिंग कार्ड ती वारीत असताना सदोदित जवळ बाळगत असे. उद्देश एवढाच की समजा तिच्या इच्छेप्रमाणे जर ती पांडुरंगवासी झाली तर चंद्रभागेतीरी रामकृष्ण हरीच्या गजरात इठ्ठलाच्या चरणी विधी व्हावेत आणि कुणी वारकऱ्याने ते आम्हा नातेवाईकांना कळवावेत. ह्या सगळ्या गुजगोष्टी ती माझ्याशी करत असे. शेवटपर्यंत तिचं वारीला जाणं मी थांबवलं नाही. कारण मला माहित होतं की तिचं धड इथं तर मन तिथं वारीतच असणार व्हतं. दहा वर्षापूर्वी वारीहून आल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटून झाल्यावर मध्यरात्रीनंतर एका निवांत क्षणी चालता-बोलता तिनं देह ठेवला. काही तास आधी तिच्या क्षीण आवाजातलं ‘मी मजेत आहे’ ऐकून मी सैरभैर अवस्थेत तिच्या भेटीसाठी मुंबई-पारनेर रातराणी गाडीने निघालो होतो. मला वाटायचे की, आयुष्यभर लई दैन सोसलेल्या आईने शेवटच्या क्षणी माझ्या मांडीवर डोकं ठेऊन निरोप घ्यावा. नियतीला ते मंजूर नव्हतं. दोन अडीच तास ती आणखी थांबली नाही म्हणून मी ही आयुष्यभर अधुनमधून तिला रागे भरतच राहणार आहे. महाराष्ट्र माऊली साने गुरुजींच्या ‘श्यामच्या आई’शी असा मी कायमचा जोडला गेलो आहे.

आईचा तिच्या वयाच्या सातव्या वर्षीच बालविवाह झाला होता. आजोबांच्या खांद्यावर बसून म्हणे ती सासरी आली होती. म. फुले, आगरकरांचा मागमूस तिच्यापर्यंत पोहोचला नव्हता. सासरची गरिबी तिच्या हयातभर सरली नाही. तिच्या पहिल्या दोन बाळांचं अकाली निधन झाल्याचं तिनं मला सांगितलं होतं. नंतर सलग सहा मुलींनंतर आम्ही तीन मुलं. म्हणजे मी अकरावा. तिच्या भाषेत छल्ला नंबर. दरम्यान आई आणि मावशी ह्या दोन्ही सख्या बहिणी एकाच घरात जावा-जावा म्हणून गुण्यागोविंदाने नांदत होत्या. मावशीला तीन मुलींनंतर एक मुलगा झाला. विहीर खोदण्याच्या ब्लाष्टिंगमुळे काका अंध झाले होते. माझे वडील पराकोटीचे प्रामाणिक पण व्यवहार शून्य, फक्त कष्ट उपसणे तेही हसतमुखाने ते जाणून होते. जमिनीचा तुकडा आणि खाणारी तोंडं याचं व्यस्त प्रमाण असल्याने हलाखीला पारावार नव्हता. पोट भरायची भ्रांत असल्याने शिक्षणबिक्षण त्यांच्या अजेंड्यावर नव्हते. तरीही नंतरच्या आम्हा भावंडापर्यंत शिक्षणाचा हा कवडसा पोहोचला. मी आपलं लावून धरलं म्हणून इथपर्यंत पोहोचलो. तर मी बोलत होतो आईविषयी, तिनं जगण्याच्या आणि आम्हाला जगवण्याच्या लढाईत कधी हार मानली नाही. Fighting Spirit, Will Power, Positivity ह्या शब्दांची ती स्वतः मूर्तिमंत उदाहरण होती. अवघ्या गावाला १९७२ सालच्या दुष्काळात लई त्रास झाला. हा दुष्काळ आईला हयातभर पुरला. आई मावशीनं गड्यासारखं राबराबून आम्हाला उभं केलं. शंकरभाऊ मांगाच्या टीममध्ये रोजगार हमी योजनेतून रास्ताभरणीचे काम करण्यात तिनं जात आडवी येऊ दिली नाही. रस्त्यावर खडी फोडली. गवत विकून त्यांनी कण्याघुगऱ्या आमच्या पोटात घातल्या.

रविवारच्या आठवडा बाजारात ती उशीराच जायची. तुटलेल्या आणि खराब झालेल्या केळांचा उक्ता ढीग ती स्वस्तात विकत घ्यायची. घरी येताना वाट वळवून तिच्या आईला ती आवर्जून दोन केळी खाऊ घालायची. हीच सवय पुढे तिने वारीला जाताना कायम ठेवली होती. हाराभर केळी विकत घेऊन दिंडीतल्या वारकऱ्यांना ती केळी खाऊ घालीत असे. प्रेमळ पण तेवढीच ती कर्तव्यकठोर होती. सासरी गेलेल्या लेकी जर गाऱ्हाणे करू लागल्या तर ती कधी ऐकूनही घेत नसे, पुन्हा माहेराकडे मागे वळून बघायचं नाही अशी तंबी ती देत असे. त्याकाळी बाळंतपणासाठी माहेरी येणं जणू सक्तीचं होतं. ह्या प्रचंड तारांबळीत ह्या नऊ लेकींचे पंचवीशेक बाळंतपण तिनं घरच्याघरी केले. पंचक्रोशीत अडलेल्या लेकीबाळींची सोडवणूक करणारी ती दायीन होती. आता तिची ही नातवंड कमावती झाली आहेत. गाडी बंगल्यांची स्वप्न प्रत्यक्षात उतरू पाहात आहेत. पण ती नवजात बाळं, त्यांचं दुखणं खुपणं त्या माऊलीने मोठ्या कष्टाने आणि तितक्याच आनंदाने करताना मी पाहिलं आहे. आजकाल विनाकारण चिडणाऱ्या सुखवस्तू माणसांची मला त्यामुळेच फार कीव वाटते.

१३ जून १९९२ साली मुंबईतील टिळकनगर येथील ‘आमची शाळा’ या शाळेत शिक्षक म्हणून मी रुजू झालो. पहिल्याच दिवशी माझी आई हातात पटकुऱ्याऐवजी इणल्याली पिशवी, सोबत ओली छत्री घेऊन माझ्या थोरल्या बंधूसह शाळेत हजर. तिसऱ्या मजल्यावर इयत्ता नववीच्या सत्तरेक मुलांसमोर हातात खडू घेऊन मी उभा असताना माझ्या आई आणि भावाने माझ्याकडे साश्रुनयनाने अर्थात आनंदातिशयाने बघितल्याचे मला आजही स्मरते. दारिद्र्यात पिचलेल्या, अक्षर ओळख नसलेल्या माऊलीचा हा मुलगा मुंबईत शिक्षक झाला म्हणजे तिनं चंद्रावर अथवा मंगळावर पाऊल ठेवल्याचा विलक्षण आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. इथेच आम्ही भरून पावलो.

“तुका म्हणे मायबापे, अवघी देवाची स्वरूपे” हे तुकोबांचे वचन सार्थ करण्यासाठी मला नेहमी वाटते की आपल्या घरात आणि मनातसुद्धा आईवडिलांसाठी एक कोपरा असावा. असलाच तर एक झोपाळा असावा. प्रयत्नांपेक्षाही माझा पुण्याईवर अधिक विश्वास आहे. वडीलधाऱ्यांच्या पुण्याईमुळेच आपण बऱ्यापैकी यशवंत गुणवंत होत असतो. 

तिच्या त्या करुणाकार पांडुरंगाकडे माझी ही नेहमीच तक्रार असणार आहे की, हा अलौकिक सोहळा याची देही याची डोळा तिला का पाहू दिला नाही? माझ्या थोरल्या बंधूच्या व्यसनमुक्तीसाठी तिने पुणेवाडीच्या पद्मावती देवी मंदिरापासून भैरवनाथ मंदिरापर्यंत जवळपास एक किलोमीटरचे अंतर रणरणत्या उन्हात साष्टांग दंडवत घालून पार केले, शेवटपर्यंत डाव्या हाताने ती जेवत राहिली. तिच्या त्या काळजाच्या तुकड्याचं व्यसनमुक्त होणं तिचं बघायचं राहून गेलं. तिची एक लाडकी नात अहमदनगरला जिल्हा शिक्षणाधिकारी झालेली बघताना मला वाटते ती एवढंच म्हटली असती, ‘इठ्ठला-पांडुरंगा तुझीच ही कृपा’.

माझ्या एका भाच्याने सांगितलेला प्रसंग सांगतो नि थांबतो. आजी आणि हा नातू ज्वारीच्या उभ्या पिकातून वाट काढत चालत असताना एका सापाने अचानक तिच्या पायाला वेटोळे घातले होते. तेव्हा स्तब्ध उभी राहून दोन्ही हात जोडून डोळे मिटून तिने पांडुरंगाचा धावा केला. साप आल्या वाटेने निघून गेला आणि काही घडलेच नाही अशा अविर्भावात तिने पुढची वाट धरली. 

आमचं अवघं आयुष्य आनंदवारी करण्याचं श्रेय तिच्या जीवघेण्या धडपडीला जातंं. आई जिजाईची ही कथा-व्यथा इतरांना बोधकारक ठरेल. ही माय माझ्या गोतावळ्याला संस्कार शिदोरी देणारी एक आदर्श विद्यापीठ ठरली आहे. 

- मारुती शेरकर
२४ नोव्हेंबर २०१६.

Saturday, 12 November 2016

वाघिणीचे दुध..

“इंग्रजी शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध, जो कोणी ते पिईन तो / ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” असे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. जगाची असलेली हि इंग्रजी भाषा माझी मात्र जगण्याची भाषा आहे. माझी रोजी-रोटी असणाऱ्या इंग्रजी भाषेविषयी हितगुज..  

सुमारे ७० वर्षापूर्वी साहेब (इंग्रज) आपला देश सोडून गेला. जाण्यापूर्वी शिस्त, रीतीरिवाज, प्रशासकीय यंत्रणेसह पायाभूत सुविधांची सुस्पष्ट योजना त्यांनी आपणास दिली. सर्वात मोठी देणगी म्हणजे ते आपल्याला इंग्रजी भाषेचा समृद्ध खजिना देऊन गेले. इंग्लंड देशात जेव्हढे लोकं इंग्रजी बोलतात त्याच्या कैक पटीने भारतीय लोकं इंग्रजीतून सर्व भाषाव्यवहार करतात. या इंग्रजी भाषेने आपल्याला उर्वरित जगासी जोडलं त्याहीपेक्षा आम्हा भारतीयांना या इंग्रजी भाषेने भारतीयत्व दिलं, एकत्व दिलं. या देशात राज्यनिहाय भाषा वेगवेगळ्या आहेत. म्हणून सर्व भारतीयांना इंग्रजी भाषेच्या रुपात एक मोठं वरदान लाभले आहे. So it is said that English language is a window to the world, and a link language to all Indians.

इंग्रजी शिकण्या-शिकवण्याकडं थोडं वळूया. 

माझ्यापासून सुरुवात करतो, थोडं विषयांतर होईल पण ते गरजेचं आहे. १९८० साली मी पाचवी इयत्तेसाठी पारनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत प्रवेश घेतला. मनकर्णिका नदीकाठी माजी आमदार कॉम्रेड भास्करराव पाटलांच्या जुन्या वाड्यात शाळा भरत असे. पारनेरच्या पंचक्रोशीतील बारा वाड्यावस्त्यांवरील शेकडो मुलं पुढील शिक्षणासाठी पाच ते दहा किलोमीटर अंतर पायी चालत पारनेरला येत असत. आमचे हेड मास्तर श्री. शंकरराव नरसाळे सर स्वतःच्या उंचीएवढ्या लाकडी पट्टीसह वर्गात येत असत. इंग्रजीविषयी मनात भीती होतीच. पट्टीने रेषा मारून झाल्यावर ते Alphabets Capital आणि Small – Pp Yy या स्वरुपात लिहित असत. ते आजही मनात पक्के बसलेले आहे. आमच्या पाचवीतला हस्ताक्षराचा हा अभिनव प्रयोग गेल्या पंचवीस वर्षापासून मी इयत्ता दहावीच्या वर्गासाठी प्रत्येक जून महिन्यात करत आलेलो आहे. नरसाळे सर मुद्दाम इयत्ता पाचवीचा वर्ग घेत असत. किती दूरदृष्टी! त्यांनी श्री. तांबे सरांच्या मदतीने अगदी गावोगाव, घरोघर जाऊन धान्य, पैशांच्या स्वरुपात देणगी मिळवून शाळेची मोठी अशी बैठी इमारत बांधली. इमारतीच्या उद्घाटनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब आले होते. महाराष्ट्राचे हेडमास्तर आणि माझ्या शाळेचे हेडमास्तर हे दोघे शंकरराव कडक शिस्तीचे. आमच्या बालमनावर काही चिरंतन संस्कार मूल्ये त्यांनी बिंबवली. पुढे गंगाधर रोहोकले सर, संपतराव औटी सर आणि अशोक खिलारी सर या त्रिकुटाने आमच्या इंग्रजीची पायाभरणी केली. त्यातल्या माझ्यासह अनेकांनी इंग्रजी भाषेत एम. ए. बी. एड. करून शिक्षकी पेशा पत्करून इंग्रजी भाषेलाच आमच्या उदरभरणाचे साधन बनवले. ‘Best words into best order creates meaningful sentence.’ हे आमच्या मनात ठसवले. spelling कसं parts मध्ये पाठ करावं. काळ, अर्थ, वचन यातील बारकावे, वाचन उच्चाराचा सराव असा काही करून घेतला की, जेणेकरून आम्हा सर्व विद्यार्थ्यांची पिढी खूप यशस्वी झाली. यंदाची दिवाळी शाळेच्या मुलांसमवेत अभ्यासासाठी देताना मला माझ्या गुरुजनांची आठवण येते. संध्याकाळी ६ ते ९ या तीन तासात आमची study circle व्हायची. प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी, शाळा गावाबाहेर असल्याने अधिकची शांतता असायची. आमचे शिक्षक त्यावेळी अचानक अवतीर्ण व्हायचे. कधी कधी खिडकीतूनच त्यांचे supervision चालायचे. अगदी pin drop silence असायचे. अभ्यास आणि अभ्यास..

आमच्या विषयी त्यांची आस, तळमळ, समर्पण भावना म्हणजे खराखुरा ज्ञानरचनावाद होता. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आमचे वर्गमित्र अगदी Global Personality बनले आहेत. त्यापैकी सुनील रोहोकले हे सध्या ASK या International Finance Group चे विद्यमान एम. डी. आहेत. या आधी ICICI बँकेचे General Manager पद या मित्राने भूषविले आहे. संदीप गाडगे हा माझा वर्गमित्र सध्या आखाती देशात उद्योजक म्हणून कार्यरत आहे. सांगायचा मुद्दा हा की, आमच्या यशात Vernacular / Lower level इंग्रजी कधी अडसर बनले नाही. आम्हा यशस्वी मित्रांच्या जडणघडणीत आमच्या ह्या माध्यमिक शाळेतल्या इंग्रजी शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.

थोडं वर्तमानाकडे वळूया..

पहिलीपासून इंग्रजी शिक्षण, शिक्षण हक्क कायदा, आठवीपर्यंत सर्व पास, सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन, उपचारात्मक शिक्षण, समस्यांचे निराकरण, उपाययोजना किंवा अलीकडचा activity based असा ज्ञानरचनावाद. ह्या सर्व नव्या बदलाला समर्थपणे सामोरे जायला शिक्षकवर्ग धजावत नाही. शिक्षण व्यवस्थेमध्ये आलेले अमुलाग्र बदल रुजायला जरा विलंब होत आहे. बालककेंद्री शिक्षण, हसतखेळत आनंददायी शिक्षण ही संकल्पना खरोखरीच स्तुत्य आहे. तीस वर्षापूर्वीचे माझे शिक्षक आताच्या ह्या पद्धतींचा यथाशक्ती अवलंब करतच होते. मी ही गेली पंचवीस वर्षे शासनादेश येण्यापूर्वी “इंग्रजी” इंग्रजीतूनच शिकविण्याचा यशस्वी प्रयत्न करतो आहे. भाषांतर पद्धतीने मुलांना आशय कळतो. मात्र तो इंग्रजीतून लिहिताना त्याच्या सरावाअभावी खूप चुका होतात. इंग्रजी बोण्याची गोष्ट तर दूरच. विद्यार्थ्यांच्या कानावर सतत इंग्रजी जात असेल, घरीसुद्धा रेडीओ / टीव्ही वर इंग्रजी ऐकायची सवय असेल तर त्यांना किमान गरजेपुरतं इंग्रजी बोलता यायलाच हवं.

एकत्र येणे, चर्चा करणे, चुका करणे, चुकांची संख्या हळूहळू कमी होत जाईल. पण तसा प्रयत्न मात्र जाणीवपूर्वक व्हायला हवा. ‘Speaking can be learnt only by speaking.’ मी मुलांना नेहमी सांगत असतो की, जर तुम्ही बोलण्यासाठी तोंड उघडलेच नाही तर काही मिनिटात फाड-फाड इंग्रजी बोलायला शिकविणारे कोकाटे मास्तर काय, शेरकर काय किंवा वरून ब्रह्मदेव (?) जरी आला तरी तुम्ही बोलू शकणार नाहीत. बोलणे येण्यासाठी सतत बोलण्याचा सराव केला पाहिजे. आपली श्रवणभक्ती वाढविली पाहिजे. शब्द, अर्थ, वाक्य, रचना यांचे वेड मनात असायला हवं. तीच गत लिहिण्याची. ‘Writing can be learnt only by writing.’ स्वतःच्या मनाने पान-दोन पाने वाचावीत, पान-दोन पाने लिहावीत. बरं हा रोजचा उपक्रम आहे.

हिंदी भाषेत एक कहावत आहे,                  
मुझे अगर भूख लगी है
तो मुझे एक मछली दो मैं आज खा लूँगा,
लेकिन अगर मुझे मछली पकड़ना सिखा दो
तो मैं जीवनभर खाते रहूँगा

माझे मित्र बाळकृष्ण शिंदे सर की जे ब्रिटीश कौन्सिलच्या वतीने Mentor आणि पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर विद्यमान सदस्य आहेत. त्यांनी मला सांगितलेल्या दोन बाबी मी तुम्हालाही विषद करतो, एक म्हणजे इंग्रजीकडे भाषा म्हणून नव्हे तर विषय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन. भाषेचं सौंदर्य, त्यातील लहेजा, त्या विश्वात मुलांना घेऊन न जाता विषय म्हणून पुस्तकाचं पारायण होत असेल तर अभ्यासक्रम शिकविल्याचं वांझोट समाधान शिक्षकाच्या खात्यावर जमा होतं. मात्र एखाद्या धड्यातून कोणता धडा आपण शिकलो? मुलांना Personally respond करता येत का? त्यासाठी भाषाशिक्षक म्हणून आवाजातील चढउतार, मुद्राभिनय इ. गोष्टी दुर्लक्षिल्या जातात. परिणामी आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल दिसून येत नाही. आणि दुसरा मुद्दा अगदीच पटण्याजोगा तो असा की बाळ जन्माला आल्यानंतर वर्षा दोन वर्षात हे बाळ आपल्या आईची तोडकी मोडकी, बोबडी भाषा बोलायला सुरुवात करतं. मग ती भाषा कोणतीही असो, मराठी असो, कानडी असो की थेट आफ्रिकन असो. ते बाळ आपल्या आईशी संवाद करतं. पण पहिलीपासून इंग्रजी शिकणारा विद्यार्थी अगदी पुढील दहा ते पंधरा इयत्ता शिकूनही इंग्रजी बोलण्याचे धाडस करत नाही. ह्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की, ह्या बाळाला इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाला त्या बाळाची ‘आई’ होता आलं नाही. आईच्या मायेनं, मुद्राभिनय करून, पुन्हा पुन्हा इंग्रजी भाषेतूनच संवाद करून माझ्या मुलांना मी बोलायला भाग पाडील. तशी आवड त्यांच्यात निर्माण करीन ही तगमग शिक्षकांच्या ठायी असणे गरजेचं आहे. We don’t have an English tongue. सराव आणि इच्छा आवश्यक. परंतु शिक्षक जेव्हा इंग्रजी बोलण्याचे टाळतो तर, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? Self Audit / Introspection होणे गरजेचं आहे. Continuous professional development (CDP), Skill development, Personality development ह्या निरंतर प्रक्रियेशी आपण स्वतःला जोडून घेणे काळाची गरज आहे. मी काय देणे लागतो? समस्त इंग्रजी भाषा शिक्षक बिरादरीने ह्यावर गंभीरपणे विचार करावा. शिक्षक होणे by chance आहे का? की by choice आहे? खराखुरा आनंदाचा ठाव घेऊया. Stagnation (गतीहीनता) मधून बाहेर पडून थोडं mobile होऊया. आपण कमी बोलूया, मुलांना अधिक बोलू देवूयात. त्यांना अधिक चुका करू देत. 
‘Active participation is better than passive reception’ या उक्तीनुसार सर्व वर्गाला, प्रसंगी गटागटाला वेगवेगळ्या Activities मध्ये गुंतवून ठेऊया. तासिका सुरु कधी झाली आणि संपली कधी हे दोघांनाही कळता कामा नये.

त्यासाठी Activities चे planning, selection, set up, assignment, grouping, instructions, presentation, feedback, evaluation अशी सर्व सांगड आपल्याला बांधावी लागेल. ‘एखादी कविता, एखादे भाषण कसे गोळीबंद झाले’ असे जाणकार म्हणतात. त्याप्रमाणे आपली ती तासिका अगदी मनाला समाधान देणारी आणि मुलांनाही आनंददायी शिक्षणाची अनुभूती ठरावी. असं म्हणतात की, “Small things can make perfection but perfection is not a small thing.” स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी काल / परिस्थितीसापेक्ष बदल स्वीकारणं अनिवार्य आहे. किंबहुना हेच तर जीवंतपणाचे लक्षण आहे. चला तर आपण Smart English Teacher बनूया आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याहीपेक्षा अधिक Smart Students बनवूयात. की जेणेकरून ही नवीन पिढी नव्या आव्हानांना सहज सामोरी जाऊ शकेल.

शेवट पुन्हा एकदा तुकोबांच्या या मंत्रासह,
“असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे”

धन्यवाद..!
मारुती शेरकर,
दि. १२ नोव्हेंबर २०१६.

Friday, 11 November 2016

आलो उजळावया वाटा..

आलो उजळावया वाटा..
लेखाचे शीर्षक अर्थात तुकोबांकडून..

पिढ्यानपिढ्या अंधारलेल्या गुहेत शिक्षणाच्या रूपाने आलेला एक कवडसा अवघा अंधार गिळून टाकणार आहे. ज्ञानाचा हा उत्सव आहे. आपल्याला या प्रकाशरूपी ज्ञानाची आराधना करायची आहे. पृथ्वीतलावर आजपर्यंत झालेले सर्व बदल, क्रांती आणि परिवर्तन केवळ शिक्षणाद्वारेच शक्य झाले आहे. हे शिक्षण घराघरातल्या प्रत्येक दारापर्यंत पोहोचले पाहिजे. यशवंत मनोहर म्हणतात, ज्ञानासाठी भुकेलेल्यांना उजेडाचे तुकडे खाऊ घाला. महात्मा फुले म्हणतात, अज्ञानाच्या दुष्ट चक्राला भेदणारी ही शिक्षण प्रक्रिया सर्व पराक्रमांचे मूळ आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. १८८२ साली महात्मा फुल्यांनी हंटर कमिशनसमोर सार्वत्रिक आणि मोफत शिक्षणाचा हट्ट धरला होता. तब्बल दीडशे वर्षानंतर अलीकडे केंद्र आणि राज्य सरकारांनी शिक्षण हक्क कायदा अंमलात आणला आहे. त्याची अंमलबजावणी यशस्वीरीत्या व्हायला हवी. कुणी नापास नाही मात्र आठवी-नववीच्या काही विद्यार्थ्यांना वाचन-लेखन येत नसावे ही शोकांतिका आहे. हे विद्यार्थी गतिमंद अथवा मतीमंद नाहीत. तरीही ही दुरवस्था आहे.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE – Continuous Comprehensive Evaluation)   
उपचारात्मक शिक्षण पद्धती (Remedial Education)
पायाभूत चाचण्या (Baseline Tests)
ज्ञानसंरचनावाद (Constructivism)

ह्या संकल्पना म्हणाव्या तेवढ्या स्पष्टपणे आणि सद्हेतूने राबविल्या न गेल्याने सर्वाना पास करता-करता व्यवस्थाच नापास झाली की काय? असा विचार मनात डोकावतो.

या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरांची दोन विधाने लक्षात घेण्यासारखी आहेत, (१) Right to education पेक्षा right education ची गरज आहे. आणि (२) दर्जेदार शिक्षकांचा अभाव ही राष्ट्रीय आपत्ती समजावी. सम्राट चंद्रगुप्ताला आर्य चाणक्यने म्हटले होते, ‘हे राजन, शिक्षक कभी साधारण नही होते, प्रलय और निर्माण उनकी गोदमें पलते है. उन्हे अगर निर्माण के लिए अवसर नही मिला तो प्रलय निश्चित है.’

शिक्षणावर बोलत असताना विद्यार्थी आणि शिक्षक ह्या दोहोंचाही साकल्याने विचार अनिवार्य आहे. विशेषतः गरीब आणि झोपड्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये Tremendous Energy and potential असूनही प्रकर्षाने जाणवणाऱ्या काही व्याधी नजरेआड करता येणार नाही. (१) Attention Deficiency (Body is here and mind somewhere) (२) Poverty of expectation विजीगुषी वृत्तीने अधिकाधिक गुण मिळवून प्रगती साधावी अशी इच्छा नसण ही तशी घातक बाब आहे. गरीब असण वेगळ आणि गरीब राहण वेगळ. ह्यासाठी शिक्षकांची भूमिका अतिशय परिणामकारक ठरते. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर Model (आदर्श) आणि Catalyst (उत्प्रेरक) य भूमिकेत असायला हवा. शिक्षण महत्वाचे पण त्याहीपेक्षा प्रशिक्षण अधिक महत्वाचे आहे. मार्गदर्शन महत्वाचे पण त्याहीपेक्षा मार्गक्रमण अधिक महत्वाचे असते. समोरील विद्यार्थी नव्या युगाचे, नव्या दमाचे शिलेदार आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही असते. शिक्षकांनी असा गोड गैरसमज करून घेऊ नये की मी शिकविल्याने माझे विद्यार्थी शिकतात. Someone teaches and someone learns ही outdated concept आहे. शिक्षकांनी उपदेशात्मक प्रवचन करू नये. मुलांना घरी-दारी ह्या dos and don’ts चा उबग आलेला असतो. मुलांनी ‘शिकायचे का आणि कसे’ हे शिक्षकांनी मुलांच्या गळी उतरवले पाहिजे. आपण विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण केले पाहिजेत. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सर्वेक्षण करायला लावले पाहिजे. निरीक्षण करायला सांगितले पाहिजे. नवनवीन प्रयोग, अभिनव उपक्रमांसाठी प्रेरणा दिली पाहिजे. एखाद्या घटनेवर भाष्य करायला सांगितले पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रभेटी आयोजित केल्या पाहिजेत. त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव दिला पाहिजे. नामवंताच्या मुलाखती घ्यायला सांगितल्या पाहिजेत. LCD-Projector-Net च्या सहाय्याने Audio – Visual Programmes केले पाहिजेत.

I am going to teach नव्हे तर we are going to learn. दिवसाची / तासिकेची सुरुवात Good Morning / Afternoon ने नव्हे तर Problem Sir / Madam ने व्हायला हवी. स्वभ्यास करणाऱ्याला अनंत Problems भेडसावतात. याउलट अलीकडे, If teacher asks – Any problem? तर Mass Answer असते No Problem. हा No Problem खरा Main Problem असतो. विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न निर्माण करणे, त्याला वादविवाद करण्यास भाग पाडणे, ह्या युक्तिवादातून त्याचा अभ्यास होईल. त्याच्या समस्या निवारणासाठी यथाशक्ती आणि विद्यार्थीसापेक्ष उपाययोजना करायला हव्यात. After all learning is absolutely a learner’s job. शिक्षक त्या विद्यार्थ्यास शिकायची प्रेरणा देऊन त्याला शिकायला मदत करत असतो. म्हणून तो a friend, a felicitator, A guide, A mentor, A model, an ideal personality etc. या भूमिकेत असावा. Teacher is not like a fuel pipe, but he is a spark plug to ignite. तो एक चीनगारीच्या रुपात असतो. तो केवळ माहितीचा साठा असून चालणार नाही. पाणी साठ्विणाऱ्या टाक्यांप्रमाणे नव्हे तर शिक्षक अखंड वाहणाऱ्या जिवंत निर्मळ झाऱ्याप्रमाणे असावेत. The best teacher will not give you something to drink, he will make you more thirsty, he will put you on a path to seek answers. ज्ञानसंरचनावाद हे अध्ययन अध्यापनातलं तत्वज्ञान आहे. आपले पूर्वानुभव, कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती, संस्कृती, बोली भाषा, Heredity & circumstances महत्वाची भूमिका बजावतात.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुलाखतकाराने एकदा विचारले, तुम्ही सर्व भावंड गायक कसे झालात? त्यांनी दिलेलं उत्तर समर्पक आहे. त्या म्हणतात, तू जरी आमच्या मंगेशकर कुटुंबामध्ये जन्माला आला असतास तर तुही एक गायक झाला असता. रोज नवीन काही शिकण्याची प्रबळ इच्छा विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्ये असायला हवी. Coming together and having discussion is very important. Discussion is an exchange of knowledge. Two heads are better than one. ह्या नवनवीन संकल्पना रुजल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग अतिशय महत्वाचा आहे. Active participation is better than passive reception. कारण If I hear – I forget, If I see – I remember but If I do - I know हा विचार महत्वाचा आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनेस्कोने शिक्षणाविषयी चार बाबी सांगितलेल्या आहेत.
१) जाणून घेण्यासाठी शिक्षण Learning to know
२) कृतीशील शिक्षण Learning to do
३) सहजीवन-सहिष्णुता Learning to live together
४) ‘स्व’साठी शिक्षण Learning to be 

विद्यार्थी सुजाण नागरिक बनायला हवा. केवळ शिक्षण हक्क आणि शिक्षण प्रसार नको तर शिक्षणाची गुणवत्ता उंचावली पाहिजे. केवळ परीक्षेतले गुण नको तर सद्गुणांची जोपासना व्हायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजणे आवश्यक आहे. Minu Masani म्हणतात, India is a rich country with poor people. भारत हा गरीब लोकवस्ती असलेला श्रीमंत देश आहे. हे बदलवण्यासाठी काही अमुलाग्र बदल करावे लागतील. ह्या देशात हजारो शाळा, लाखो शिक्षक आणि करोडो विद्यार्थी आहेत. १९५३ साली पंडित नेहरू यांनी संसदेत विज्ञानविषयक धोरण मांडले. त्यात त्यांनी म्हटले, The scientific temperament is a process of thinking, a method of action, the search of truth, a way of life and the spirit of a free man. हे आत्मभानाचं स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य महत्वाचं आहे. मानो, नाही तर ‘जानो’ ह्या तत्वाचा परिपोष आवश्यक आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञा मादाम क्युरी म्हणतात, Nothing in life is to be feared, it is only to be understood. Now is the time to understand more, so that we may fear less. ह्या बाबी केवळ कागदावरच राहिल्याने आजची परिस्थिती आपण ओढवून घेतलेली आहे.

कधी काळी Bertrand Russell यांनी म्हटले होते, Men are born ignorant and they are made stupid by education. किंवा George Bernard Shaw यांनी म्हटले होते, (1) I never let my school to interfere in my education. (2) Education through text book is meaningless if it doesn’t make a good human being. ह्या विचारवंताची विधाने शिक्षक बंधुभगिनिंनो आपल्याला खोडून काढायची आहेत. केवळ अभ्यासक्रमाचे दळण दळत न बसता विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्काराचे वळण रुजवायचे आहे. नवसमाज घडविण्यासाठी आपल्याला कात टाकावी लागेल. भारतरत्न आचार्य विनोबा भावे म्हणत, (१) लहानांना महान बनवते व महानांना लहान बनवते ते खरखुर शिक्षण आहे. (२) शिक्षक विद्यार्थीप्रिय असावा, विद्यार्थी ज्ञानप्रिय असावा, ज्ञान सेवाप्रिय असावे आणि उपरोक्त चारही घटक समाजप्रिय असावेत. त्यातूनच नवसमाजाची निर्मिती होऊ शकेल. कर्मवीर अण्णांनी अवघा महाराष्ट्र साक्षर केला. क्रांतीज्योती सावित्रीने शेण, अंडी अंगावर झेलली. लोकशिक्षक गाडगेबाबांच्या हातातला खराटा केवळ स्वच्छतेचं प्रतीक नसून त्याद्वारे अंधश्रद्धेचं त्यांनी निर्मुलन केलं. महाराष्ट्र माऊली साने गुरुजी आपल्यासमोर अढळ तारा बनून आहेत. संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा यथाशक्ती आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. नियती म्हणा वा जगनियंत्याने आपल्यावर फार जोखमीची जबाबदारी सोपवलेली आहे.

सांगता करण्यापूर्वी दोनच उदाहरणे आपल्यासाठी देतो. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षक इयादुराई यांनी वर्गातील मुलांना एके संध्याकाळी रामेश्वरमच्या समुद्रकिनारी छोटा सालोमन पक्षी आकाशात उंचच उंच कसा उडतो ह्याचे प्रात्यक्षिक दाखविल्याने आपल्याला अब्दुल कलामांच्या रूपाने Missile Man मिळाले. युनियन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या डॉ. माशेलकरांच्या भावे सरांनी आपल्या तुटपुंज्या पगारातून विद्यार्थ्यांचे तिकीट काढून त्यांना अंबरनाथ येथील काडेपेटी बनविणाऱ्या व्हीमको factory ची सैर घडवून आणली होती.

विद्यार्थ्यांमध्ये सुप्त व्यक्तिमत्वे दडलेली आहेतच. त्यांच्या या आत्मशोधाच्या प्रवासात आपण सुज्ञ शिक्षकांनी ह्या चाचपडणाऱ्या आणि सैरभैर विद्यार्थ्यांना योग्य दिग्दर्शन करण्यासाठी त्यांचे गाईड बनणे आवश्यक आहे. प्रसिद्ध शिल्पकार मायकल एन्जेलोला त्याच्या मित्राने विचारले, या ओबडधोबड दगडांतून तू इतकी सुंदर शिल्पं कशीकाय बनवू शकतोस? अतिशय मार्मिक उत्तर- प्रत्येक दगडात शिल्प असतेच, मी फक्त नको असलेला भाग काढून टाकतो, उरते ते सुंदर शिल्प. उपरोक्त वेगवेगळ्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना घडवणे आवश्यक आहे.

सुरेश भटांच्या या पंक्तीने मी माझे मनोगत थांबवतो,
“जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा,
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही.”
- मारुती शेरकर
दि. ११ नोव्हेंबर २०१६.

लेकुराचे हित..

"लेकुराचे हित
जाणे माउलीचे चित्त
ऐसि कळवळ्याची जाती
करी लाभाविण प्रीती"

तुकोबांचे अभंग हे आपले सांगाती आहेत. मला काही सांगायची उबळ आली की, मला पामराला तुकोबांची मदत घ्यावी लागते. आज मी पालकांशी थोडंस हितगुज करणार आहे. सुरुवात अर्थात माझ्या घरापासून.

इयत्ता आठवीत शिकणारा माझा मुलगा निलय आणि मित्राचा मुलगा सुजय या दोघांनीही क्रिकेटच्या वेडापायी हट्टाने आमच्या पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमीत क्रिकेट क्लब जॉईन केला. छान चालल होत. अर्थात त्यांना नेण-आणणं हा मोठाच व्याप करावा लागत होता. एके संध्याकाळी तो म्हटला की, पप्पा उद्यापासून क्रिकेट खेळायला येण बंद. मी कारण विचारले तर तो म्हणाला की आज माझ्या हातून कॅच सुटला आणि एका मुलाने आईवरून शिवी दिली. आता क्रिकेट बंद म्हणजे बंद. मी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला खरा पण व्यर्थ. कारण त्याला म्हणून हसडलेली आणि त्याने ऐकलेली, त्याला ऐकून समजलेली ती पहिलीच शिवी. काही केल्या त्यातून तो बाहेर येईना. त्याच्या आत्मसन्मानाला ठेच लागली होती. त्याच्या मनोविश्वातलं हे जग नव्हत. बर, शिवी देणारा मुलगा विसरला होता की तो कुणाला नि काय बोलला. त्याच्यासाठी ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. त्यात त्याला काही विशेष वाटलं नव्हत. त्याच्यासाठी असं बोलण ‘used to’ असंच होत.

शिवी हा अभिव्यक्तीचा एक प्रकार आहे हे आम्ही पालक त्याच्या निरागस मनावर बिंबविण्यात अयशस्वी ठरलो होतो. कोणत्या गोष्टी लाईटली घ्यायच्या अन कोणत्या सिरीअसली हे त्याला सांगण्यात आम्ही कमी पडलो होतो. केवळ आदर्शाच्या गप्पा अथवा संस्कार करून माझा मुलगा त्याच्या रोजच्या लढाईत यशस्वी होणार नाही अशी माझी मनोमन खात्री झाली.

असाच एक दुसरा प्रसंग माझ्या शाळेतला. शाळेतली ही ‘माझी मुलं’, घरच्या माझ्या मुलांपेक्षा अधिक भाग्यवान आहेत. कारण त्यांना माझा सहवास-मार्गदर्शन जरा आधिकचं मिळत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारी मुलं अतिशय गरीब घरांतून येत असतात. त्यांच्या कथा आणि व्यथांवर नंतर बोलूया. कारण त्यांची कुटुंब आणि सामाजिक व्यवस्थेची वीण खूपच विस्कटलेली आहे. असो. ह्या मुलांना शिकविण्यापेक्षा त्यांचं या दिवसाचं पालकत्व निभावताना आम्हा शिक्षकांची दमछाक होते. दहावीच्या वर्गात शिकत असलेली माझी विद्यार्थिनी अगदीच नाराज वाटली. कारण विचारले तर तणतणत म्हणाली की, आई माझ्यावर चिडते आणि बाबापण मला मारतात. दोन दिवसांपासून मी त्यांच्याशी बोलतसुद्धा नाही. शाळा हे मुलांसाठी दुसरे घर, आणि त्या शाळेतील शिक्षक हे त्या मुलांचे दुसरे आणि तितकेच मायाळू आईवडील असले पाहिजे हा विचार मी गेली पंचवीस वर्षे प्रत्यक्षात जगत आलो आहे. मी त्या मुलीला समजावले. इथपासून सांगितले की, तुझ्या आईवडिलांचे रोजचं जगण कसं महायुद्ध आहे. हातावरचं पोट त्यांचं, त्यांनी घरी येताना हसत यावं, तुझ्या लहानसहान चुका पोटात घालून तुला माफ करावं ही अपेक्षाच तू कशी करू शकते. मी तिला म्हटल, तू वडिलांच्या पाया पड, आणि तुझ्या निरक्षर आईच्या थेट कुशीत जा. सॉरी म्हण. बघू काय होत ते. दुसऱ्या दिवशी ह्या मुलीची कळी खुलली होती. काही दिवसांनी तिच्या वडिलांनी माझ्याकडे तक्रार केली की, माझी मुलगी रात्री बेरात्री उठून अभ्यासाला बसते. तिला समजवा.

अलीकडे आईबाबा दोघांनाही खर्चाच्या तोंडमिळवणीसाठी घराबाहेर पडावं लागतं. चांगल्या पगारदार मुलांच्या समस्या आणखी वेगळ्या आहेत. मात्र गरिबाघरची परवड खूप जवळून पाहिल्याने मन अगदी गलबलून येत बघा. घरी दारी ताणतणाव वाढले आहेत. घरातलं टेंशन कामाच्या ठिकाणी आणि कामाचा ताण / शीण घरी घेऊन येण्यान समस्यांत भरच पडली आहे. कॉर्पोरेट जगात stress management चे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. अगदी पोलिसांना ही अधूनमधून योगाचं प्रशिक्षण दिल जात. काही अर्धशिक्षित पालक पेपरबिपर वाचतात. काहीजण ठार विसरूनच गेले आहेत की आपल्याला लिहिता वाचता येतंय म्हणून. वाचनाची आवड नाही त्यामुळे विचार करण्याचीही सोय नाही. लिहिण्याचा संबंध केवळ सही करण्यापुरताच. घरी आल्यावर ह्या पालकांनाही विरंगुळ्याची आवश्यकता असते. मात्र घरातल्या टीव्हीचा, बाहेरच्या डीजेचा आवाज त्याला अधिकच अस्वस्थ करून सोडतो.

गरीबीचे बाय प्रॉडक्टही खूप असतात बघा. राहायला १०x१० चे घर नसते. झोपड्यांमध्ये बाहेरची हवा यायला खिडक्याही क्वचितच असतात. कुठल्या तनामनाच्या आरोग्याची अपेक्षा करणार? बाहेर कुठेतरी सत्यनारायण, वाढदिवस रोजचाच. प्रचंड अज्ञान नि अंधश्रद्धा त्यांच्या पाचवीला पुजलेल्या असतात. अशा अवस्थेत मुलांचे संगोपन हा अतिशय क्लिष्ट प्रश्न बनतो. आहार आणि विहार दोन्ही बाबतीत ही मुल कुपोषित असतात. किती बाप हसत हसत आपल्या चिमुरड्याला कुशीत घेतात? किती बाळ आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेऊन चूक कबूल करून हमसून हमसून रडून मोकळ होतात. मोकळ होण्याच्या जागा झपाट्याने कमी होत आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत कधी आईच्या, कधी आजीच्या पदराआड लपता येत होते. काका-मावशी, मामा-मामींकडे काही काळ राहायला मिळत असे. गोड धोड खायला मिळायचं, थोडं कवतिक झालं की मुठभर मांस वाढायचं. गाव, तिथली माती-माणसं एकप्रकारे संस्कारशाळा असायची.

ह्यातून सावरायचं कसं?  

तर घरातला टीव्ही आणि सामोपचाराने का होईना आजूबाजूचा कोलाहल विशेष प्रयत्नाने कमी केलाच पाहिजे. घरी-दारी कर्णकर्कश आवाजाने आपली ऐकून घेण्याची क्षमताच संपून जाते आणि अलीकडे उपदेश चालतात कोणाला?

तर एकमेकांच्या भावविश्वात डोकावता आले पाहिजे. आधी स्वतःच्या आत डोकावता येण आवश्यक आहे. आपला आतला आवाज इतका क्षीण झाला आहे की तो आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. शांत निवांतपणा हरवलाय. संवाद आणि सुसंवाद वेगाने कमी होतोय. संध्याकाळचं जेवण सर्वांनी एकत्र घेतलंय, गप्पांचा छान फड रंगलाय, अभ्यासाव्यतिरिक्त एखाद्या कलेच्या प्रांतात मुशाफिरी केलीय, हरवून गेलोय आपण त्यात, हा असा ‘ट्रान्स मूड’ फार दुर्मिळ झालेला आहे. अभ्याससुद्धा हसत खेळत करायचा असतो, स्वतःला विसरून अभ्यासातही तासन् तास आपली तंद्री लागू शकते हे अगदीच विरळा.

गुण आणि सद्गुण ह्यापासून मुलं झपाट्याने पारखी होताना मनाला खूप क्लेष होतात. परीक्षेतले मार्क्स मिळविण्यासाठी न समजताही पाठांतर करणे, शाळेनंतर/आधी क्लासेस, (अगदी रोबो करून टाकलंय त्यांना आपण) उठता बसता घरी-दारी सूचना, सक्ती, तुलना यातून ही मुलं खचून जातात. त्यांची निकोप वाढ होत नाही. त्यांच्यातले सुप्त गुण, कला आतल्याआत घुसमटून जातात. मुलांची म्हणून स्वतःची एक दुनिया आहे. त्यांच्या आनंदाच्या आणि दुखऱ्या जागा समजून घ्या. त्यांच्या समस्येची मूळे जाणून घ्या. त्यांना नवनिर्माणाचे, फुलण्याचे नवनवीन पर्याय द्यायला हवेत. थोडं त्यांच्या कलेने घ्यायला हवं. त्यांची ना स्वतःशी ओळख ना उर्वरित जगाशी. पण प्रत्येकाचा वकूब निराळा, आवडीनिवडी वेगवगळ्या. खूप संयम बाळगून त्यांना ऐकलं पाहिजे. त्यांना बोलत करा, त्यातून शिक्षक आणि पालकांना दोघांनाही खूप शिकायला मिळेल. आपलं मत त्यांच्यावर न लादता त्यांना मनमोकळेपणाने मत मांडायची संधी देण आवश्यक आहे. वयोपरत्वे त्यांच्या तनामनात क्रांतिकारी बदल होत असतात. हार्मोन्सच्या बदलामुळे त्यांचं वागण बोलण बदलत. हा बदल खर तर संधी समजून, ह्या अपरिमित उर्जेला विधायक वळण देता येण सहज शक्य आहे. त्यासाठी थोडं सजग होण आवश्यक आहे. असं म्हटलं जात की, सुसंस्कृत आईवडीलांपेक्षा अधिक चांगले शिक्षक संभवत नाहीत. “तुका म्हणे मायबापे, अवघी देवाची स्वरूपे” या उक्तीनुसार आईवडिलांचा – वडीलधाऱ्यांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. घरात भौतिक गरिबी असू देत, पण विचाराचं दारिद्र्य असता कामा नये. प्रतिकूल परिस्थिती खर तर एक मोठा प्रेरणास्त्रोत असतो.

जन्माला कोठे यावं हे आपल्या हातात नाही मात्र जरी माझे मायबाप परिस्थितीने गरीब असले तरी स्वकर्तुत्वाने ह्या गरीबीवर मात करून मी यशवंत होईन, गुणवंत होईन. ही विजीगुषी वृत्ती ह्या नवीन पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी घराघरातून प्रयत्न व्हायला हवे आहेत, शाळा ह्या supportive आहेतच.        

जाता जाता संदर्भ म्हणून पुन्हा एकदा तुकोबा,

"लोहो परिसासी रुसले
सोनेपणासी मुकले,
येथे कोणाचे काय गेले
ज्याचे त्याने अनहित केले"

- मारुती शेरकर,

दि. १० नोव्हेंबर २०१६