पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून पांडुरंग सदाशिव साने या महामानवाने आमरण उपोषण केले. निर्धार एवढा ठाम होता की उपोषण मागे घेण्यासंदर्भातील गांधीजींच्याही विनंतीला त्यांनी जुमानले नाही. हे सारं त्या पांडुरंगाप्रति असणाऱ्या भक्तीभावाने असेलही पण त्याहीपेक्षा माणूस इथून तिथून सारखाच आहे, प्रभूची लेकरे असणाऱ्या या माणसामाणसांमध्ये कुठलाही भेदभाव असता कामा नये हाच विचार मुळाशी होता. या मातीतल्या जातिव्यवस्थेमुळे माणसामाणसात जी विषमतेची पेरणी झालेली आहे, माणूस माणसापासून दुरावला गेला आहे, मोबाईल जमान्यात आता तर तो स्वतःच्या आतून सुद्धा तुटत चालला आहे, स्वतःपासूनच दुरावत आहे.
जात धर्म अहम अज्ञान इत्यादींमुळे माणसातलं माणूसपण हरवत चाललेलं असताना जगाला प्रेम अर्पावे अशी आर्त साद घालणारे महाराष्ट्रमाऊली पूज्य साने गुरुजी यांची प्रकर्षाने आठवण येते. शाळाशाळांमधून साने गुरुजी गायब झालेत, किमान एक सानेगुरुजी प्रत्येक शाळेत असेल तर ती संस्कारशाळा बनू शकेल. पालक म्हणून श्यामच्या आईवडिलांचे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांना साने गुरुजी एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. गुरुजींनी या मराठी मातीत धडपड नावाचं बियाणं पेरलेलं आहे. त्यातून प्रेरित झालेल्या धडपडणार्या पिढीने ठीकठिकाणी प्रगतीची आशादायी बेटं निर्माण केलेली आहेत. गुरुजींच्या ठायी असलेली भावोत्कट तगमग आपल्याला विधायक आणि रचनात्मक काम करण्यासाठी रोड मॅप तयार करून देते. ५१व्या वर्षी गुरुजींनी आत्महत्या केली. आत्महत्येचं समर्थन करता येत नाही परंतु गुरुजींच्या मनातला उद्वेग हा काही व्यक्तिगत स्वार्थाचा नव्हता तर त्यांना अभिप्रेत असणाऱ्या नवसमाजाच्या स्वप्नांच्या चिंधड्या होताना पाहणं गुरुजींना पहावलं गेलं नाही. तीच तगमग आणि घुसमट त्यांचा प्राण घेऊन गेली. बलसागर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी प्राणपणाला लावणाऱ्या पूज्य साने गुरुजींचा उद्वेग आणि समाजाप्रती, देशाप्रती असणारी त्यांची तगमग आपण समजून घेणार आहोत की नाही? माणुसकीचं मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या पूज्य साने गुरुजींना जयंतीदिनी मनोभावे नमन..
- मारुती शेरकर
No comments:
Post a Comment