बा जोतीबा तुमची खुरटी दाढी, रापलेला चेहरा, डोक्यावरचं पागोटं हे सगळं सगळं मला माझ्या ‘बा’मध्ये दिसलं. माझा बा माझा जैविक बाप आहे. पण महामानव जोतीबा, बाप मानसा, तुमच्या खांद्यावर बसून मी हे अद्भुत जग आणि जगणं न्याहाळतोय.
शालेय जीवनात कार्यालयीन भिंतीवरल्या महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुसटशी ओळख होती. मात्र महात्मा जोतीराव फुल्यांचा काही बोध होत नव्हता. कॉलेजला शिकत असताना आमचे प्राचार्य डॉ. विद्याधर औटी सरांच्या तोंडून या फुले दांपत्याचा परिचय झाला. सर स्वतः विज्ञानवादी आणि विवेकवादी, दैववादाला बिलकुल थारा न देणारे, अतिशय कडक शिस्तीचे.. आम्ही शेतकऱ्यांची पोरं. अॅकॅडेमिक अभ्यास करून बीए झालो. इंग्रजीसोबत इतिहास विषय अभ्यासाला असूनही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं आकलन त्या पदवी परीक्षेच्या कालखंडात झालं नाही. पुढे नोकरीला लागल्यानंतर, म्हणजे पोटाची सोय झाल्यानंतर थोडंफार वाचू बोलू लागलो आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची abcd गिरवायला सुरुवात केली. मनात प्रचंड अज्ञान असल्याने स्वतःची कीव वाटू लागली. पण त्या अस्वस्थतेतून पुढील वाटचाल पक्की होत गेली.
मुंबईच्या चर्नी रोड स्टेशनलगत शासकीय मुद्रणालय आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित पुस्तके, महामानवांची चरित्रे असे अनेक दस्तऐवज तिथं माफक दरात विकत मिळतात. आजवर अनेक पुस्तकं मी तेथून आणली आहेत. परीचितांनाही वाचायला देत आहे. इथेच मला फुल्यांवरील ‘शोधाच्या नव्या वाटा’ मिळाले. हरी नरके संपादित या पुस्तकात महात्मा फुल्यांविषयी डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. विद्याधर औटी अशा विचारवंतांचे लेख आहेत. पुस्तक वाचल्यानंतर कधी एकदा पारनेरला जातोय आणि माजी प्राचार्य लेखक विचारवंत औटी सरांना भेटतोय असं झालं. मग सरांच्या तोंडून तासंतास फुले ऐकले, क्रांतीजोती सावित्रीमाई ऐकल्या.. महाराष्ट्राची जडणघडण ऐकली.. नवं विचारविश्व उलगडलं.
जोतीरावांना उतारवयात अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांचा उजवा हात लुळा झाल्याने, त्या हाती पेन न धरता आल्याने, शरीरातील साऱ्या असह्य वेदना सहन करत डाव्या हाताने त्यांनी ‘सार्वजनिक सत्य धर्म’ वाचकांना सुपूर्द केला. ऐन उमेदीत जोतीराव फुले पुण्यातील एक यशस्वी उद्योजक होते. कॉन्ट्रॅक्टर होते. ते त्यातच रममाण झाले असते तर अंबानी, टाटासारखे फुले घराणे त्या अर्थाने नावलौकिकास आले असते. मात्र अखेरच्या श्वासापर्यंत समाजसुधारणेचा ध्यास घेतलेल्या जोतीरावांचा मृत्यू औषधपाण्यावाचून झाला आहे, ही खंत आणि अपराधीपणाची भावना महाराष्ट्राला सदैव बोचत राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या छोट्यामोठ्या सर्व कार्यालयांमध्ये मंत्रालयापासून न्यायालयापर्यंत, ग्रामपंचायतीपासून सर्व शाळाशाळांमध्ये जोती-साऊच्या प्रतिमा पहावयास मिळतात. ह्या दांपत्याचे अलौकिक कार्य मनामनांमध्ये जर रुजलं तर नवा महाराष्ट्र उदयास येईल.
जोतीरावांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून काढली. मराठी मनामनामध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या रयतेच्या या राजावर ‘कुळवाडी भूषण’ नावाचा प्रदीर्घ पोवाडा त्यांनी लिहिला. आपल्या लेखणीने तत्कालीन प्रस्थापित विषमतावादी समाजव्यवस्थेचे वाभाडे त्यांनी काढले. ‘ब्राह्मणाचे कसब’, ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘गुलामगिरी’ इ. पुस्तकांद्वारे समकालीन समाजाच्या समस्या आणि त्यावरील उपायांचा विस्तृत उहापोह त्यांनी केलेला आहे. ‘गुलामगिरी’ हे पुस्तक अमेरिकेच्या बराक ओबामांनी व्हाईट हाउसच्या ग्रंथालयात ठेऊन घेतले. याला कारणही तसेच आहे. जोतीरावांनी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्णीय निग्रो लोकांच्या लढ्यास अर्पण केले आहे. अर्पणपत्रिकेत ते लिहितात, “युनायटेड स्टेट्समधील सदाचारी लोकांनी गुलामांस दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात औदार्य, निरपेक्षता व परोपकार बुद्धी दाखवली. यास्तव त्यांच्या सन्मानार्थ हे लहानसे पुस्तक त्यांस परम प्रीतिने नजर करितो आणि माझे देशबांधव त्यांच्या या स्तुत्य कृत्याचा कित्ता, आपले शुद्र बांधवांस ब्राह्मण लोकांच्या दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात घेतील अशी आशा बाळगतो.”
थॉमस पेन लिखित ‘Rights of Man’ (मानवाचे हक्क) या पुस्तकाचे शालेय वयातच त्यांच्यावर गारुड होते. सर्व प्रकारच्या दास्यापासून हा माणूस मुक्त झाला पाहिजे. जोतीबांची ही वाट पुढे चालताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त संविधान सभेने नागरिकांच्या मुलभूत हक्कासंदर्भात हा मूलगामी विचार अमलात आणलेला आहे. टाईम्स ऑफ इंडिया या अग्रगण्य दैनिकात लिहिलेलं असं काहीसं, “Education gives us knowledge, knowledge gives us confidence, and confidence gives us respect.” हे आत्मभान आणि समाजभान येण्यासाठी शिक्षण अनिवार्य सांगताना फुल्यांनी म्हटलं होतं की, “सारे अनर्थ एका अविद्येने केले आहेत.” अलीकडे देशभरात ‘शिक्षण हक्क’ कायदा आला. पण फुल्यांनी १८८२ साली हंटर कामिशनसमोर शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची शिफारस केली होती. सरकारने १२ वर्षे वयापर्यंतच्या सर्व बालकांस शिक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. शिक्षकांची निवड बहुजनांमधून करावी, ते प्रशिक्षित असावेत, त्यांना पुरेसे वेतन असावे, खेड्यातील मुलांना शेतकीचे आणि तांत्रिक शिक्षण देण्यात यावे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जावे ही मागणी करणारे जोतीराव हे पहिले भारतीय होते.
सुमारे १७० वर्षांपूर्वी जोतीरावांनी १८५१ साली मुलींसाठी या देशातील पहिली शाळा काढली. साऊआई आणि फातिमाबी या देशाच्या आद्यशिक्षिका ठरल्या. युगानुयुगे अंधारात खितपत पडलेल्यांना शिक्षणरुपी उजेडाचा कवडसा दिसू लागला. विधवा पुनर्विवाह, सुतिकागृह, अस्पृशांना हर तऱ्हेची मदत असं सर्वव्यापी मिशनरी काम फुल्यांनी केलं. इथल्या समाजस्वास्थ्याची नेमकी नस त्यांनी शोधली होती. ड्युक ऑफ कनॉट यांच्या सत्काराप्रसंगी ब्रिटिशांना त्यांनी निर्भीडपणे सुनावले होते, “आपल्यासमोर रेशमी कपडे नि अलंकार परिधान केलेले श्रीमंत, सरदार आणि जहागीरदार पाहून रयतेविषयी आपण मत बनवू नये. खरा हिंदुस्तान पहायचा असेल तर माझ्या बरोबर खेड्यात चला.”
जोतीराव हे बोलघेवडे सुधारक नव्हते, तर अतिशय कर्तव्यकठोर कर्ते सुधारक होते. ते इथल्या पददलितांच्या दु:खांशी समरस झाले होते. त्यांचं लिखाण अतिशय रांगडं आणि तिखट असं आहे. त्यात अभिजनांचा रंजनवादी अभिनिवेश बिलकुल आढळत नाही. माणूस इथून तिथून एक आहे. त्याची भाकरी, त्याचा आत्मसन्मान हेच विषय प्रधान्यांनी त्यांनी अनुसरले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्या लेखनाला ग्राम्य वगैरे म्हटलं. फुल्यांच्या पुस्तकाची टर उडवताना चिपळूणकरांनी म्हटलं की, फुल्यांना व्याकरणाचे व शुद्ध लिहिण्याचे ज्ञान नाही. पण जोतीरावांचा इरादा स्पष्ट होता. न्या. रानडे यांनी ग्रंथकारांच्या संमेलनाला जोतीरावांना निमंत्रित केले होते. उत्तरादाखल जोतीरावांनी त्यांना सुनावले होते की, “उंटावरून शेळ्या वळणाऱ्या घालमोड्या दादा, मनुष्याच्या मानवी हक्कांविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यास ते हक्क त्यांच्याने खुशीने व उघडपणे देववत नाहीत, पुढेही देववणार नाहीत. तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा वा पुस्तकांचा मेळ मिळत नाही.” पुढे त्यांनी ग्रंथकारास असेही बजावले की, “सर्व मानवी प्राण्यांत परस्पर अक्षय बंधुप्रिती काय केल्याने वाढेल, त्याचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकांद्वारे प्रसिद्ध करावे. अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही.” तर मंडळी ग्रंथकारांचे संमेलन म्हणजे सध्याचे शासनाच्या निधीवर मोठ्या दिमाखात साजरे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. तमाम लेखकांना काय लिहावं, कसं लिहावं याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे.
मा. शरद पवार साहेबांनी ‘कोरोना’बाबत फुले जयंतीदिनी दारात ‘ज्ञानाचा दिवा’ लावा असं सांगितलं आहे. महाराष्ट्राला पुरोगामित्व बहाल करणाऱ्या महानुभावांमध्ये पवारसाहेबांचे नाव अतिशय आदराने घेतलं जातं. सरकार त्यांचं ऐकतं, आपण का ऐकू नये? महात्मा फुल्यांच्याच सत्यशोधन करणाऱ्या अखंडाने ह्या लेखाची सांगता करतो,
धर्म राज्य भेद मानवा नसावे।
सत्याने वागावे! ईशासाठी।।
ख्रिस्त महंमद मांग! ब्राह्मणासी।
धरावे पोटासी। बंधूपरी।।
निर्मिकाचा धर्म! सत्य आहे एक।
भांडणे अनेक। कशासाठी?।।
मारूती शेरकर
9867708408


1 comment:
अतिशय अभ्यासपूर्ण लेख.
Post a Comment