पूर आला आनंदाचा। लाटा उसळती प्रेमाच्या ।।
आनंदाचे डोही। आनंद तरंग ।।
कपिल सरांच्या विजयी हॅॅट्रिकने आपली सर्वांची अशी काहीशी अवस्था झालेली आहे. कपिल सर म्हणजे आम्हा शिक्षकांसाठी जणू एक कार्यशाळाच. कपिल पाटील म्हणजे अखंड चळवळ. ही चळवळ लोकचळवळ व्हावी म्हणून काळाने समस्त शिक्षक वर्गाला साद घातलेली आहे. समाजमन बदलवणाऱ्या परिवर्तनाच्या या लोकचळवळीचे आपण पाईक बनूया, वाहक बनूया.
चार-सहा तासांच्या झोपेव्यतिरिक्त कपिल सर निरंतर धावपळ करतात. शिक्षण हा त्यांचा अतिशय आत्मीयतेचा विषय. आई-वडील शिक्षक असल्याने समस्त शिक्षक बिरादारीकडे ते खूप जिव्हाळ्याने बघतात. आमदार होण्यापूर्वीपासून शिक्षण क्षेत्रात ते नवं काही करू पाहत आहेत. गोरगरिबांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता 'शिक्षण' हे प्रभावी माध्यम आहे हे त्यांनी जाणलंं होतंं. शिक्षणाला राजकीय अजेंड्यावर आणण्यासाठी त्यांना शिक्षक आमदार व्हावं लागलं. मुंबई महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेला 'कपिल पाटील' हे उत्तर आहे. शिक्षणाचा हक्क आणि शिक्षकांचा सन्मान हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भारतरत्न धोंडो केशव कर्वे, अवघा महाराष्ट्र साक्षर करणारे कर्मवीर अण्णा, हातातल्या झाडूने परिसर स्वच्छ करणारे आणि आणि आपल्या अमोघ वाणीने डोक्यातील घाण साफ करणारे, अंधश्रद्धेचे कर्दनकाळ गाडगेबाबा, नयी तालीमचे उद्गाते महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थोर वारसा (Legacy) समर्थपणे पुढे चालवणाऱ्या माळेतला आमदार कपिल पाटील हा वर्तमानातला मुकुटमणी आहे. शिक्षण हक्क कायदा येण्यापूर्वी कपिल सरांच्या तोंडून आम्ही फुल्यांचा हंटर कमिशनसमोरचा शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा युक्तिवाद ऐकत आलेलो आहोत.
'सावित्री फातिमा' हा आमचा 'लोगो' आमची प्रेरणा आहे, जीवनध्येय आहे. अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांनी सर्व अडचणींवर मात करत शिक्षणाच्या नवीन प्रयोगशाळा निर्माण केल्या आहेत. ह्या सर्वांची अधुरी स्वप्ने पूर्णत्वास नेण्याचं व्रत आपल्या कपिल सरांनी हाती घेतलेलंं आहे. केवळ राजकीय महत्वाकांक्षेपोटी 'आमदार' म्हणून मिरवायचे असते, तर मुंबईकर शिक्षकांनी त्यांना तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिलेच नसते. आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या विचारांना-कार्याला त्यांनी नवी दिशा दिली. असे म्हटले जाते की, आपल्याबरोबर जो इतरांनाही नेतो तो खरा नेता. गोरगरिबांच्या शिक्षणाचे प्रश्न, शिक्षकांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर विषद करताना आम्हा शिक्षक कार्यकर्त्यांमध्ये आमदार कपिल पाटलांचा संचार झालेला असतो. कपिल सरांचा वेश आणि अभिनिवेश असणारे शेकडो कपिल पाटील आज मुंबईत कार्यरत आहेत. कारण गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे आमचे हेतू शुद्ध आहेत आणि हेतू साध्यतेचे मार्गही तितकेच शुद्ध आहेत. आम्हा कार्यकर्त्यांचं उर्जावहन अधिक उदारतेकडे नेण्यात, आम्हास अधिक समृद्ध शिक्षक बनवण्यात कपिल सरांचे योगदान मोठे आहे. नाहीतर आमची मजल फार कुठे डायरेक्टर, फार फार तर चेअरमन होण्यापर्यंत गेली असती. पोटे भरलेल्यांना अधिक खाऊ घालण्यात काही अर्थ नाही. आजही आपल्या सामाजव्यवस्थेत शोषितांचा, गरीबांचा मोठा वर्ग आहे. त्यांच्यासाठी आपण अविरत काम करणे गरजेचे आहे. ज्या शिक्षणामुळे आपल्यात अमुलाग्र बदल झाले त्या दर्जेदार शिक्षणाची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झालेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊनही जर माणसं आपलं मत विकत असतील तर शिक्षक बिरादरीने आधी जागंं व्हावं लागेल. शाहीर संभाजी भगत म्हणतात की शिक्षकाला जे आज कळतंं ते इतरांना उद्या कळतंं. आपल्या सगळ्यांना जागल्याच्या भूमिकेत (Whistle blower) राहावं लागेल. मत विकलंं जाणंं म्हणजे आपलं विचार स्वातंत्र्य गमावून बसणे होय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात त्याप्रमाणे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपल्याला लढावी लागेल. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे म्हणतात तसं की आपल्या खांद्यावर आपलं डोकं नसणे, मत विकणंं म्हणजे आत्मा विकणंं होय. आत्मसन्मान विकणाऱ्या लाचारांच्या फौजा तयार होत असताना आपण मौनात जाणंं बरंं नव्हे. दुर्जनांच्या दुष्कृत्यांंपेक्षा सज्जनांचे मौन फार घातक असते. असल्या मौनी सज्जनाचा काय उपयोग? hand to mouth आणि 9 to 5 job. ह्या निष्क्रियतेतून आपण जागंं होऊन आपल्या निरक्षर आणि अज्ञानी समाजाला जागे करण्यासाठी मोठी चळवळ आपल्याला उभारावी लागेल. ह्या समाजाचं हेच देणंं आणि उत्तरदायित्व आपण समजून घेणंं आवश्यक आहे. सत्तेसाठी पैसा आणि झुंडशाहीचा गैरवापर यथाशक्ती आपण रोखू शकतो. शाळांशाळांमधून विद्यार्थी पालक वर्गांमधून लोकशाही-संविधान-धर्मनिरपेक्षता-स्वातंत्र्य-समता-बंधुता हे धडे प्रकर्षाने आपण गिरवले नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही.
आपला एक तारखेचा पगार व इतर समस्या सोडविण्यास आपले आमदार सक्षम आहेत. ह्या comfort zone मधून बाहेर पडून कपिल सरांनी सुरु केलेल्या लोक चळवळीमध्ये आपण सामील झाले पाहिजे.
या मुंबई महानगरीतील पदवीधर मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच आपण राजकीय हस्तक्षेप करून प्रस्थापितांना पळता भुई थोडी केली. मुंबईकर पदवीधरांनी आपल्या जालिंदर सरोदे यांना हजारोंच्या संख्येने पसंती दिलेली आहे. मुंबईला जे आज कळतं ते उर्वरित महाराष्ट्राला उद्या कळतं असे म्हणायला हरकत नाही.
निवडणुका जिंकणंं हे फार मर्यादित इप्सित आहे. कपिल सरांसाठी आमदार होणंं हे कधीच साध्य नव्हतंं. समाजाचे विशेषतः शिक्षण क्षेत्रातील प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी, राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी आमदारकीचा 'साधन' (आयुध) म्हणून प्रभावी वापर ते करतात, इतकंच. आता ही चळवळ लोकचळवळ व्हावी ही काळाची गरज आहे.
मारुती शेरकर (3/7/18)

No comments:
Post a Comment