ज्ये्ष्ठ साहित्यिक बाबुराव
बागुल लिखित ‘जेव्हा
मी जात चोरली होती’ ह्या
आत्मकथनात रेल्वेत कर्मचारी म्हणून काम करत असतानाचं त्यांचं रोजचं मानहानीकारक
जीवनाचं उद्वेगजनक चित्रण केलं आहे. हे आठवण्याचे कारण आजची लोकसत्तामधील
पहिल्या पानावरची बातमी. बातमीचं टायटल- ‘जात लपवून स्वयंपाकी बनलेल्या
महिलेवर गुन्हा?’ यादवकुलोत्पन्न एका महिलेने निर्मला कुलकर्णी असं नाव धारण करून
उच्चशिक्षित ब्राह्मण कुटुंबामध्ये स्वयंपाकीचे काम मिळवलं. सर्व काही सुरळीत चालू
होतं. परवा मात्र पोटासाठी केलेली ही चोरी उघड झाली. पूजेसाठी आलेल्या जोशी
गुरुजींच्या चाणाक्ष नजरेने ही चोरी हेरली. कुटुंब प्रमुख श्रीमती. मेधा खोले
यांनी निर्मलाबाईच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर आपली शुद्ध फसवणूक झाल्याचे
त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपले वजन वापरून निर्मलाबाईंवर फसवणुकीचा
गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले. या मेधा खोले हवामान खात्याच्या माजी
संचालिका. हवामानाचा अंदाज फोल ठरल्याने माझ्या वेतनात कपात करा किंवा कसे? अशी अवाजवी मागणी केल्याची
बातमी काही यापूर्वी वाचनात आल्याचे स्मरत नाही. हवामानशास्त्र विभागाच्या ह्या
माजी संचालिका बाईंनी स्वयंपाकी बाईंची खरी जात शोधून काढल्याबद्दल शाबासकी म्हणून
बारामतीची बचकभर साखर खाण्यास त्या पात्र आहेत. समाजहितैषी वेगवेगळ्या संस्था
त्यांचा यथोचित गौरव करतीलच. शिवाय खोटं बोलल्याबद्दल / जात चोरल्याबद्दल त्या
निर्मला नावाच्या बाईवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहेच.
ही बातमी कालची होती. पेपर
रद्दीत गेला. विषय संपला. इतके आपण बोथट झाले आहोत. आपल्यात हा बधीरपणा कुठून नि
कसा आला? वरच्या
या प्रसंगाने असंख्य प्रश्नांचं भेंडोळं आपल्यासमोर मांडलंय.
खोले बाईंची झालेली फसवणूक, सोवळ्या ओवळ्याचं घर ह्या
निर्मला बाईंनी बाटवल्याबद्दल, पोटासाठी जात चोरल्याबद्दल आपलं दंड विधान त्यांना शिक्षा
करेलच. अठराविश्व दारिद्र्यात जगणाऱ्या त्या निर्मला माउलींच्या हातचं जेवण / अन्न
हे पूर्ण ब्रम्ह बनेलच कसं? अठरा
शास्त्र आणि कितीतरी पुराणांमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. पण ते
कुणी आणि कसं बनवलेलं आहे यावरून ते पूर्ण / अपूर्ण ब्रम्ह ठरवलं जात असावं.
प्रश्नांच्या गुंत्यानं डोस्कं अगदी भंजाळून गेलंय. मु्दलात खोले मॅडम ह्या
विद्यावाचस्पती आणि वैज्ञानिक आहेत. भारतीय शिक्षणाची ‘यत्ता’ तपासावी लागेल. कोणत्या जगात /
युगात आहोत आपण?
काही दिवसांपूर्वी शाळेतल्या
एका स्वयंपाकीणीची जात शोधून काही पालक वर्गाने त्या शाळेवरच बहिष्कार टाकण्याचे
ठरवले होते. हे पालक कधीतरी शाळेत शिकायला गेलेच असतील. प्रत्येक पुस्तकाच्या
पहिल्या पानावरील ‘आम्ही
सारे भारतीय’ ही
प्रतिज्ञा त्यांनी म्हटलीच असेल. “माणूस, अधिक समृद्ध माणूस घडवणं” हे शिक्षणाचं उद्दिष्ट गाठण्यात
आपण नापास झालो आहोत.
भारतीय राज्यघटनेने आपापल्या
घरात विधिवत जगण्याचं स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेलं आहे. अनेक जातीधर्माने, विविधतेने नटलेल्या आपल्या
जगण्याला संविधानाचं सुंदर कोंदण लाभलेलं आहे. मात्र मनामनात घर करून राहिलेली
उच्चनिचता / विषमता कधी आणि कशी घालवायची?
No comments:
Post a Comment