सीबीएससी बोर्डाच्या शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या
माझ्या मुलाने विचारले की आपण शैव आहोत की वैष्णव? मला कधीही न पडलेला हा प्रश्न
छोट्या निलयने विचारल्यानंतर त्याच्या इतिहासातल्या पुस्तकातला भक्ती हा धडा वाचून
काढला. त्यात म्हटले होते की, ‘शिवा’ची भक्ती करणारे शैव व ‘विष्णू’ची भक्ती
करणारे वैष्णव. माझ्या घरात ना शिवा ना विष्णू. मग आपण हिंदू कसे? हा त्याचा पुढचा
प्रश्न. मी खूपच बुचकळ्यात पडलो. हा मोठाच Identity Crisis आमच्यासमोर निर्माण झाला होता. घरी पूजा अर्चा
नाही, उपासतापास नाहीत, गणराया वस्तीला नाहीत, कधी तीर्थयात्रा-देवदर्शन नाही, मग
त्याचा प्रश्न सार्थ आहे की आपण हिंदू कसे? सर्वार्थाने हिंदू होण्यासाठी वरील
काही किमान बाबी अपरिहार्य आहेत असे त्याने माझ्या लक्षात आणून दिले. त्याच्या
प्रश्नाने मी सुखावलो आणि दुखावलो सुद्धा..
सुखावलो अशासाठी की ह्याला प्रश्न तरी पडला की आपण
कोण आहोत? ह्या निरागस बालमनाचं मी पुरेपूर समाधान न
करू शकल्याने दुखावलो ही. नव्या युगातल्या या नव्या पिढीचे प्रश्न वेगळे आहेत.
त्यांना भिडताना नव्याने प्रश्न निर्माण होणार आहेत. ज्ञान विज्ञान
तंत्रज्ञानातल्या प्रगतीने माणूस केव्हाच चंद्रावर, मंगळावर पोहोचलाय पण तो अजून
शेजारच्याचा उंबरा ओलांडून त्याच्या मनात घर करू शकला नाही. निदा फाजली यांनी
म्हटलेय, ‘पडोस में कोई भुखा है, शायद इसीलिये मेरे गलेसे निवाला नही उतर रहा है’
ही करुणा, ही सहानुभूती, सहिष्णुता-प्रेम जागवण्यासाठी कुण्या एका धर्माचा डांगोरा
पिटण्याची गरजच काय?
साविंधानाने आपल्याला देव–धर्म-श्रद्धा यांचे
स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. पण ते आपापल्या घरात किंवा फारतर आपापल्या
प्रार्थनास्थळापर्यंत मर्यादित. डॉ. Any Benzat लिखित seven great religions आणि आचार्य विनोबा
भावे यांनीही सर्व धर्माचे सार सांगितले आहे. सर्व धर्मांची मुलतत्वे सारखीच आहेत.
त्यात कुठेही हिंसा द्वेष तिरस्काराला जागा नाही. मग करूया की सर्व धर्मांचा आदर.
कशाला अवडंबर की आमचा धर्म जगात सर्वश्रेष्ठ आहे म्हणून. क्रूरकर्मा हिटलरने
ज्यूंची कत्तल केली, सद्दाम हुसैन याने शिया, कुर्दिश लोकांचे शिरकान केले, असे
अनेक हैवान य देशात होऊन गेले. दुर्दैवाने आजही हे धर्मांध धर्माच्या नावाखाली
हैदोस घालतच आहेत. राजकारणी त्यांच्या स्वार्थासाठी त्याला खतपाणी घालतच आहे.
धर्मसुधारक आणि चिकित्सक लोकांना येथे थारा नाही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह.
साळुंखे यांनी ह्या विषयावर “आपल्या खांद्यावर आपलेच डोके आहे काय?” हे पुस्तकच
लिहिले आहे. दुबळ्या आणि हरलेल्या लोकांना प्रश्न पडत नाहीत. त्यामुळे जगण्याच्या
दैनंदिन युद्धाला सामोरे जाण्यासाठी अनाकलनीय बाबींना श्रद्धेने ते स्वीकारतात.
मनोभावे शरण जाऊन कर्मकांडात अकंठ बुडून जातात. श्रद्धा ठीक आहे, त्यांची प्रतीके
असलेल्या विविध देवांच्या मूर्ती ठीक आहे. पण त्यांच्या नावाखाली अडल्यानडल्यांची
फसवणूक होते त्याचं काय?
मी पालिकेच्या शाळेत शिक्षक असल्याने मुलांचे
निरीक्षण करताना असे लक्षात आले की, मुल गरिबाघरची आहेत. आई धुनी-भांड्याचे,
मोलकरणीचे काम करते. बाप फार तर सफाई कामगार किंवा कुठेतरी मजूर म्हणून काम करत
असतो. त्यांच्या परिसरात वर्षभर वेगवेगळे उत्सव चालू असतात. गोंगाटात सर्व हरवून
गेलेले असतात. राहायला घर नाही, पोटाला पोषक असे अन्न नाही आणि रात्रंदिवस हा
सावळा गोंधळ चालू आहे. अभ्यास-शिक्षण-प्रबोधन-चांगली राहणी आणि जीवनमानाला मुकलेली
ही माणस प्रगतीच्या वाटेवर येणार कधी? अर्धेअधिक मुल-मुली नवरात्रोत्सवात पायात
चप्पल घालत नाहीत. आधीच कुपोषित त्यात उपासतापास अशी दैन्यावस्था आहे. इंडियात
राहणारी माणस फार पुढ गेलीत. पण बिचारे हे खरेखुरे भारतीय म्हणजेच ग्रामीण,
आदिवासी, गरीब बापुडे ह्या इंडियात कधी प्रवेश करते होणार आहेत?
विविध देवता या गरीबाघरी पाहुणे म्हणून वस्तीला असतात.
मला वाटते गरिबी आणि अज्ञानाचे हे बाय प्रोडक्ट असावेत. ह्या मंडळीना खराखुरा देव
दाखवून देण आवश्यक आहे. ‘चराचरात सामावलेला निर्गुण निराकार’ असलं शब्दबंबाळ
त्यांना पचनी पडणार नाही. घाबरल्या मानाने त्यांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये किंवा
इतरांनी आपले स्वार्थी हेतू पूर्ण करण्याकरिता त्यांच्या अज्ञानाचा, गरिबीचा
दुरुपयोग करू नये. यासाठी किमान त्यांना त्यांच्या अस्तित्वाची, आत्मसन्मानाची
जाणीव करून देण क्रमप्राप्त ठरत. म्हणून त्यांना त्या देवत्वाचा पत्ता सांगितला
पाहिजे.
माणसात देव असतो. आजूबाजूला हा पूरक निसर्ग त्याचे
आपण एक अविभाज्य भाग आहोत. महात्मा फुल्यांनी त्याला ‘निर्मिक’ असे नाव दिले.
त्याच्याप्रती कृतज्ञताभाव ही एक प्रकारची पूजाच आहे. मनोभावे केलेले कोणतेही काम
ही पूजाच आहे. अभ्यास ही पूजा आहे. पूजा आणि भक्तीसाठी तासंतास पुटपुटत साग्रसंगीत
देखावा कशासाठी? वसईचा माझा सायमन नावाचा मित्र म्हणाला की तू जर कधी आजारी पडलास
तर मला आवाज दे. म्हटलं कशासाठी? त्याचं उत्तर होत की, वहिनी तुझ्यासाठी खूप करते
रे, मी तिला विश्रांती देणार आणि तू बेडवर असताना तुला हवी ती सेवा मी देणार. मी
अवाक् झालो. प्रतिप्रश्न केला, हे का? तर म्हटला माझ्या रजा शिल्लक आहेत आणि मी
ठरवले आहे की आजारी माणसांची सेवाशुश्रुषा करायची. सेवापरमोधर्म मानणाऱ्या ह्या
गड्याला मी मनोमन सलाम केला. अशी असंख्य देवमाणस आपल्या आजूबाजूला आहेत. कोणताही
गाजावाजा न करता स्वान्तसुखायपणे जगणारी आणि यथाशक्ती इतरांना जगवणाऱ्या सेवाव्रती
माणसांचा समाज, देश निर्माण झाला पाहिजे. आमटे परिवाराच्या आनंदवनाला क्षेत्रभेट
नव्हे तीर्थभेट देऊन का आपण त्या आनंदाच्या गावाला जाऊ नये? आपल्या आजूबाजूला
माणूसपण जागवणारी अशी शेकडो नवीन आणि आधुनिक तीर्थक्षेत्र आहेत. तिथे घंटानाद नाही.
पण प्रत्यक्ष मुख अथवा चरणस्पर्श होत नसलेल्या या देवत्वाच आपल्याला वावड आहे.
तिथे श्रमाची पूजा आहे, सेवेचा वसा आहे, त्यागाची शकवण आहे, तिथे नवनिर्माण आहे,
तिथे पृथ्वीतलावरचा खराखुरा स्वर्ग आहे. आपले इरादे नेक नसल्याने तो पत्ता
आपल्यासाठी चुकीचा ठरतो. “तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी” किंवा “जे का
रंजले गांजले, त्यासि म्हणावे आपुले” हे विचार रेश्मी वस्त्रातल्या त्या गाथेतून
थेट कीर्तनाच्या मांडवात घुमू देत. मनामनात खळबळ माजवू देत. विज्ञानाची
दारेखिडक्या किलकिल्या करून जरा तार्किक अंगाने, वेगवेगळ्या दृष्टीकोनातून जरा जग
समजून घेऊ देत. जग कसं आहे? या जगात मी कुठे आहे? कसा जगतो?
वैज्ञानिक विदुषी मादाम क्युरी यांनी म्हटले होते
की, ‘या जगात घाबरण्यासारखे काही नाही तर प्रत्येक गोष्ट समजून उमजून घ्यायला
हवी.’ खलिल जिब्रानचे ‘प्रोफेट’ हे जगातले सर्वाधिक खपाचे पुस्तक आहे. त्यात
त्यांनी म्हटले आहे की, “ज्याच्या दर्शनासाठी आपण दूरवर रांगा लावतो, तिष्ठत बसतो,
तो मात्र घरी आजीच्या मांडीवर खेळत असतो.” ओशोंनी तर त्यांच्या ‘व्हाईट लोटस्’
मध्ये सांगितले आहे की, ‘समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या प्रत्येक कणावर त्या
परमात्म्याने तुमच्यासाठी सही करून ठेवलेली आहे.’ अशी अनंत उदाहरणे ओल्याला सांगता
येतील. पण ऐकतो कोण? ह्या छोट्याछोट्या गोष्टीतले देवपण प्रत्यक्ष देवाहून महान
आहे. साधे सोप्पे सुविचार जगण म्हणजेही त्या परमात्म्याची पूजा करणे होय. सहज सोप
जगण आपण क्लिष्ट, अनाकलनीय करून ठेवलं आहे. आपले अपयश आणि अनुत्तरीत प्रश्नांच्या
सोडवणुकीसाठी आपण वणवण भटकत असतो आणि कुणाच्या तरी हातचे बाहुले बनतो. जात धर्म
प्रदेश भाषा यांच्या जोखडातून अज्ञान आणि गरिबीकडे आपला प्रवास चालू आहे. प्रसिद्ध
व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी या विषयावर अलीकडेच चांगले फटकारले आहे.
थंडीने कुडकुडणारा एक फाटका माणूस शेजारच्याला विचारतो, “अरे धर्मांतर केल्याने
थंडी कमी वाजेल काय?” कुणीस म्हटलं आहे की, “हिंदू मिला, मुसलमान मिला, शीख मिला,
इसाई मिला, लेकीन इन्सान नही मिला” ह्या इन्सानियतच्या वाटेवर आपण कितीजण आहोत?
भाषावार प्रांतरचनेच्या वेळी प्रादेशिक अस्मिता हानिकारक ठरू शकतील म्हणून डॉ.
बाबासाहेबांनी म्हटले होते, ‘I am Indian first and Indian last.’ गुरुदेव टागोरांनीही ही
आंतरभारतीची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला. भारतीयत्वाची कल्पना आपल्या पचनी
पडत नसल्याने आपण ज्ञानोबांची विश्वबंधुत्वाची आस जरा बाजूला ठेवूया. मनामनाला
अपंग करणाऱ्या, माणसाला माणसापासून दूर नेणाऱ्या, प्रगतीला मारक ठरणाऱ्या
जातीधर्माच्या निरर्थक जात्यंधपणाच्या, अंधश्रद्धेच्या, देवभोळेपणाच्या या
विळख्यातून माणसाने मुक्त श्वास घ्यावा. प्रेम, परोपकार, शांतता, सहिष्णुता या
मार्गाने जाणाऱ्या देवत्वाचा बोध झाल्यानंतर विविध प्रतीकांच्या रुपात असणाऱ्या
देवदेवतांचा शोध नक्कीच थांबेल.
- मारुती शेरकर
1 comment:
वास्तव लेखन
Post a Comment